गुरू महाराज

कथा * दीपा पांडे

‘‘ते काही नाही, आज मला आश्रमात जायचंय. नाश्ता तयार करून ठेवलाय. सकाळचं जेवण वाटलं तर ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये घ्या किंवा गुरूजींच्या आश्रमातल्या महाभोजन समारंभात या जेवायला.’’ ड्रेसिंग टेबलसमोर बसून आपला साजश्रृंगार करता करता अनीता नवऱ्यावर डाफरत होती.

‘‘आज एक महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिसात. मला लंचसाठी वेळ मिळतोय की नाही काहीच कल्पना नाही. मिटिंग लांबूही शकते,’’ विनयनं म्हटलं.

४५ वर्षांची अनीता एक अत्यंत कर्कश्श स्वभावाची बाई आहे. सतत ती भांडणाच्या पवित्र्यात असते. घर असो, घराबाहेर असो, भांडायची एकही संधी ती सोडत नाही. नवरा विनय अन् मुलगी नीति तिच्यासमोर तोंड उघडतच नाहीत. शेजारीही सतत टाळत असतात. सगळ्या कॉलनीत ती भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध आहे.

घरात मोलकरीण कधी टिकत नाही. कितीही चांगलं काम करणारी बाई असली तरी दोन तीन महिन्यात ती काहीतरी भांडण करून बाईला हाकलून देते. मधले चार सहा महिने स्वत: काम करते, पुन्हा नवी बाई शोधते. दोन चार महिने झाले की पुन्हा तिला काही तरी कारण काढून कामावरून काढून टाकते. तिच्यातले दोष काढायचे म्हटले तर भलीमोठी यादी तयार होईल. पैसा हातातून सुटत नाही. नवऱ्याला तर सतत धारेवर धरते. तिच्या संमती शिवाय नवरा एक रूपयाही खर्च करत नाही. त्याला दिलेल्या पै न् पैचा हिशेब ती वसूल करते. सरकारी ऑफिसातला उच्च अधिकारी असलेला नवरा घरात चपराशी म्हणून वावरतो. कसा जगत असेल कुणास ठाऊक. पण कधी तरी तो एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलातून डिनर करून येतो. बहुधा त्याचे क्लायंट त्याला नेत असावेत. तो उशिरा घरी आला की त्यांची भांडणं होतात, त्यावरून आम्हाला कळतं. शिवाय अनीता दुसऱ्या दिवशी सकाळीच येते माझ्याकडे कारण माझी सख्खी शेजारीण आहे ती.

मी तिच्या नवऱ्याशी कधीच बोलत नाही. कारण अनीता तेवढ्यावरून माझ्या चारित्र्यावर घसरेल याची मला खात्री आहे. जिचा आपल्या नवऱ्यावर विश्वास नाही, ती माझ्यावर तरी कसा विश्वास ठेवेल? नेहमीच मला येऊन सांगते की तिच्या नवऱ्याचं त्याच्या सेक्रेटरीशी लफडं आहे. ‘‘मी एकदा त्याच्या ऑफिसात जाऊन त्याला रंगेहात पकडणार आहे.’’

‘‘अगं, पण ऑफिसात इतर अनेक लोक असतात ना? त्यांना ऑफिसात लफडं कसं करता येईल?’’

‘‘ते मला माहीत आहे, पण नवऱ्याला स्वतंत्र केबिन आहे. तिथं एक सोफाही आहे.’’ अनीता म्हणाली.

मला हसायलाच आलं, ‘‘म्हणजे सोफा त्यासाठी ठेवलाय?’’

‘‘हसून घे, हसून घे तू. तुझा नवरा नाकासमोर चालणारा आहे, माझ्या नवऱ्यासारखा असता तर कळलं असतं.’’ अनीता संतापली.

मी तर माझ्या नवऱ्याला ऑफिसबद्दल काहीच विचारत नाही. मला माहीत आहे की ऑफिसच्या कामाचं त्यांना एवढं टेन्शन असतं, त्यात रोमान्स करायला वेळच कुठं असतो? त्यामुळे त्यांना भलते प्रश्न विचारून त्यांना भंडावण्यापेक्षा त्यांचा ताणतणाव कमी कसा करता येईल हेच मी बघते.

‘‘माझा नवरा सदैव दुसऱ्या स्त्रियांचीच कौतुकं करत असतो. १०२ वालीचा ड्रेस सेन्स किती छान आहे. १०८ वालीचे केस किती सुंदर आहेत. १०५ वालीची फिगर छान आहे. आता जर हे मी जाऊन त्यांच्या नवऱ्यांना सांगितलं अन् माझा नवरा खरा कसा आहे हे त्या बायकांना सांगितलं तर त्याला असं काही सडकून काढतील की सगळे फ्लॅट नंबर विसरेल तो.’’ अनीता तणतणत होती.

‘‘अगं, त्यांना वाटत असेल ना, ऑफिसातून दमून घरी परततात तेव्हा छान नटून थटून बायकोनं प्रसन्न चेहऱ्यानं स्वागत करावं,’’ मी तिची समजूत घालत म्हणाले.

‘‘आणि घरातली कामं काय त्याचे नातलग येऊन करतील? घराची झाडलोट, स्वच्छता, स्वंयपाक, भांडी, धुणं हे करू की नटून थटून बसू?’’ अनीता प्रत्येक गोष्ट उलट्या बाजूनंच बघते.

‘‘तर मग एक मोलकरीण ठेव ना. कशाला संपूर्ण दिवस कामं करून दमतेस? स्वत:कडेही लक्ष देना जरा.’’

‘‘तुला माहीत नाही, अगं, यांचं तर त्या मोलकरणी बरोबरही लफडं असतं. मी नसताना काय बोलतो तिच्याशी कुणास ठाऊक. मला तर वाटतं चोरून चोरून तिला पैसेही देत असेल. नवरा ऑफिसला जाईपर्यंत तर मी स्नानही करू शकत नाही,’’ अनीता म्हणाली.

ऐकून मला आश्चर्यच वाटलं. मी विचारलं, ‘‘स्नान का करू शकत नाही?’’

‘‘अगं, तुला माहीत आहे, माझी मुलगी सकाळीच कॉलेजला निघून जाते, नंतर आम्ही दोघंच असतो घरात. मी अंघोळीला गेले अन् तेवढ्यात मोलकरीण आली तर यांना एकमदच मोकळीक मिळेल ना तिच्याशी लघळपणा करायला,’’ अनीतानं आपल्या मनांतला संशय बोलून दाखवला.

अनीताच्या संशयी वृत्तीमुळे घर म्हणजे नरक वाटायचा तिच्या नवऱ्याला. गेली दोन तीन वर्ष एका गुरू महाराजांच्या भजनी लागली होती. कधी त्यांनी मंत्रवलेलं पाणी नवऱ्याला पाजायची, कधी प्रसाद खायला लावायची. हल्ली तर मुलीलाही आश्रमात नेत होती. मुलगी कार ड्राइव्ह करायला लागल्यापासून दोघी मायलेकी दर गुरूवारी व रविवारी आश्रमात जायच्या. मुलीचं एमबीए पूर्ण झालं होतं. गुरूजींच्या कुणा शिष्यानं मुलीला कुठल्या तरी कंपनीत नोकरी लावून दिली होती. तेव्हापासून तर मायलेकी गुरूजींच्या पायाचं पाणी तीर्थ म्हणून पित होत्या. विनयलाही ती अधूनमधून भंडारा, महाभोजन वगैरे निमित्तानं आश्रमात घेऊन जायची. विनयची आई कधीतरीच इथं यायची पण तेवढ्या वेळात घरात असं महाभारत रंगायचं की विनय बिच्चारा पुन्हा आईला गावी सोडून यायचा. विनयच्या कोणत्याही नातेवाईकाशी अनीतानं संबंध ठेवले नव्हते. तो फारच एकटा पडला होता.

एक दिवस मलाही ती ओढून आश्रमात घेऊन गेली. ‘‘चल, आज तुला आमच्या नीतिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटवते. गुरूजींची फार मोठी कृपा आहे. एका अत्यंत होतकरू, कर्तबगार तरूणाशी त्यांनी आमच्या लेकीचं लग्न ठरवून दिलं. तुला तर ठाऊकच आहे, आपल्या कॉलनीतले लोक माझ्यावर जळतात. तू नितीचं लग्न होईपर्यं ही बातमी कुणालाच सांगू नको. फक्त तुलाच मी सांगते आहे,’’ माझ्यावर उपकार केल्याच्या थाटात ती म्हणाली.

‘‘चल जाऊ या,’’ मी जायला तयार झाले. नाहीतर ती म्हणायची की मी तिच्यावर जळते.

आम्ही कारनं आश्रमात पोहोचलो. चांगली आठ दहा एकर जागा होती आश्रमाची. भरपूर झाडं होती. गुरूजींचं निवासस्थान थोडं बाजूला होतं. तिथं निवडक लोकांनाच जाण्याची परवानगी होती.

बाहेर मोकळ्या वाऱ्यात खरंच छान वाटत होतं, पण अनीतानं मलाही आत ओढून नेलं. आत जाताना दोन तीन ठिकाणी आमची तपासणी केली गेली. इतक्या सिक्युरिटीची काय गरज होती ते मला समजेना. त्यानंतर आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो. तिथं व्यवस्थित खुर्च्या मांडलेल्या होत्या. अनीतानं पटकन्  एक खुर्ची बळकावली. दुसरी माझ्यासाठी राखून ठेवली. मी मुकाट्यानं तिच्या शेजारी जाऊन बसले.

थोड्याच वेळात समोरच्या मंचावर गुरू महाराज अवतरले. जयजयकार आणि फुलांचा वर्षाव होऊ लागला. गुरूचं वय ५०-५५ असेल. भगव्या रंगाची कफनी, तशीच लुंगी, गळ्यात, हातात रूद्राक्षाच्या माळा, कपाळावर गंध फासलेलं, त्यावरच कुंकवाचा टिळा, डोक्याचा तुळतुळीत गोटा, दाढी मिशाही नव्हत्या. रंग गोरा होता. चेहरा गोल अन् त्यावरचे डोळे मिचमिचे, नाक फेंदारलेलं अन् जाड जाड ओठ, एकूणच त्यांचं दर्शन किळसवाणं वाटलं मला. ते काय सांगत होते ते मला डोक्यात शिरलंच नाही. त्यांच्या त्या विचित्र चेहऱ्याकडेच माझं लक्ष पुन्हा पुन्हा जात होतं.

अनीतानं हलकेच माझा हात हिसडला तेव्हा मी भानावर आले. हॉलमध्ये बहुतेक लोक एव्हाना निघून गेले होते. जे उरले होते ते क्रमाक्रमानं गुरूजीजवळ जाऊन आपली समस्या सांगत होत. गुरूजी त्यावरचे उपाय सांगत होते. नंतर त्या व्यक्तिच्या हातांचा किंवा माथ्याचा मुका घेत होते. मला तेही सगळं फारच किळसवाणं वाटत होतं. शेवटी अनीता उठली. मी मात्र लांबच उभी होते. अनीता गुरूजींच्या पायाशी बसली. त्याचवेळी गुरूजींनी खूण केली अन् एक देखणा तरूण येऊन अनीता शेजारी बसला. हाच तिचा भावी जावई असावा असा मी कयास केला. काही वेळ अनीता त्यांच्याशी बोलली. दोघांनाही चुंबनरूपी प्रसाद देऊन गुरूजी तिथून निघून गेले. आता आम्ही तिघंच तिथं होतो. त्या तरूणाचं नाव होतं अभिषेक. मुलगा सुसंस्कृत, निरोगी अन् सज्जन वाटला.

परतीच्या प्रवासात अनीता त्याच्याचबद्दल बोलत होती. ‘‘बघितलंस ना? किती सुंदर आहे माझा जावई. माझ्या सासरची सगळी माणसं तर त्याला बघून आमचा हेवाच करतील. आमच्या घरात असा देखणा, शिकलेला, कर्तबगार अन् मुख्य म्हणजे इतका साधा सज्जन जावई आजतागायत आलेला नाहीए. सासरची माणसं माझ्या गुरूजींची चेष्टा करायची, आता सगळे गुरूजींकडे घेऊन चल म्हणून मागे लागतील. पण कुणालाही मी नेणार नाहीए गुरूंकडे. इतकी वर्ष सेवा केली, त्याचं हे फळ आहे. तुला नेलं एवढ्यासाठी की तूच एकटी मला मदत करतेस.

‘‘तुम्ही लोक कुलीन ब्राह्मण आहात, हा मुलगाही ब्राह्मण आहे का?’’ मी विचारलं.

‘‘तू बघितलं नाहीस का, तो किती देखणा आहे? आता आमच्या जातीचा नाहीए पण हिमाचलच्या कुलीन कुटुंबातला आहे. गुरूजींचे तर आश्रम आणि शिष्य सगळ्या देशभरात आहेत.’’

‘‘तू कधी भेटली होतीस त्याच्या घरच्यांना?’’

‘‘अजून नाही भेटले. इतकी घाईही नाहीए. अगं एकदा आपलं जाणं येणं सुरू झालं की द्यावंही लागतं ना प्रत्येक सणाला. मुलगा मुलगी एकमेकांना पसंत आहेत. आता तो आमच्या घरी येत जाईल. गुरूजी म्हणतात त्यामुळे त्यांना एकमेकांना समजून घ्यायला मदत होते. आम्हालाही कळेल तो कसा आहे,’’ अनीता म्हणाली.

मी यावर काहीच बोलले नाही. तसंही ती माझ्या म्हणण्याला महत्त्व कुठं देत होती?

काही महिन्यांपासून मी बघत होते अभिषेक अनीताकडे येतो. नीति व तो बाहेर फिरायला जातात. तो तिला आश्रमातही नेतो अन् एक दिवस सगळं कुटुंबच तरी निघून गेलं. खूप दिवस घर बंद होतं. कुणीतरी म्हणालं विनयला डेप्युटेशनवर जावं लागल्यामुळे अनीताही मुलीला घेऊन तिकडेच गेली. मग काही महिन्यांनी सगळे परत आले, त्यावेळी नीतिला बाळ झालं होतं. मुलीचं लग्न हिमाचलमध्येच केलं. कारण जावयाला परदेशात नोकरीवर जावं लागलं. कुणाचाच अनीताच्या या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.

माझी शेजारीणच असल्याने मी बाळाला भेटायला निघाले. बाळासाठी कपडे, खेळणी, बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू वगैरे सामान घेऊन अनीताच्या घरी गेले. मला बघून ती शांत बसून राहिली. मग मीच म्हटलं, ‘‘अनीता अगं, मुलांकडून चुका होतातच…पण तू दोघांचं लग्न पटकन् उरकून घेतलंस हे छान केलं. सगळे परिचित, आप्त, मित्रांना बोलवायला पाहिजे असं गरजेचं नाहीए ना?’’

‘‘हो गं! दृष्टच लागली आमच्या सुखाला. माझी फार इच्छा होती नीतिचं लग्न धूमधडाक्यात करायची. पण सगळ्या इच्छा मनांतच राहिल्या बघ,’’ ती खिन्नपणे म्हणाली.

‘‘काही हरकत नाही. अभिषेक परतून आल्यावर बाळाचा जन्मोत्सव खूप थाटात कर. सगळ्यांची तोंडही बंद होतील. जावईही बघायला मिळेल सर्वांना, तुझी धुमधडाक्याच्या समारंभाची इच्छाही पूर्ण होईल,’’ मी तिला बरं वाटावं म्हणून म्हणाले.

‘‘तुला तर ठाऊकच होतं ना की तो दोन वर्षांसाठी अमेरिकेला जायचा होता. माझ्या मनात होतं की दोन वर्षांनी तो परत आला की लग्न करायचं. पण ते घाईतच उरकावं लागलं. विनयला केवळ आठ दिवस रजा मिळाली होती. सगळं एकटीलाच निस्तरावं लागलं. नीतिच्या सासरची माणसं म्हणाली, इतकं लहान बाळ घेऊन ही एकटी परदेशात कसं करेल? मग मीच हिला माझ्यासोबत घेऊन आले. तिथं सासरी तरी कुणावर विश्वास कसा ठेवायचा. नवरा नाहीए इथं तर तिला धड खायला प्यायला तरी घालतील की नाही, कुणी सांगावं?’’

वातावरणात एक तऱ्हेचा ताण वाटत होता. मी विषय बदलला, ‘‘अगं, बाळाला आण, नीतिलाही बोलाव. मी आज त्यांना भेटायला आले आहे, तुला नाही. मी आत येऊ का?’’

‘‘नको, मी बाळाला आणते इथं. नीतिलाही जरा बरं नाहीए. सकाळीच तिला डॉक्टरकडे नेऊन आणली आहे. ती औषधं घेऊन झोपली आहे. तिला डिस्टर्ब नको करायला.’’ ती म्हणाली.

मी काही बोलणार त्या आधीच ती घाईनं आत निघून गेली. ती आतून बाळाला घेऊन आली. बाळाला माझ्या हातात ठेवत म्हणाली, ‘‘तू बाळाकडे बघ, मी चहा करून आणते.’’

‘‘अगं चहा राहू दे. तू बैस थोडी, गप्पा मारूयात.’’

‘‘छेछे, चहा घेतल्याशिवाय अन् तोंड गोड केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.’’

तिनं चहा, मिठाई व इतर फराळाचे जिन्नस आणले. मी बाळाकडे बघितलं. रंग गोरापान होता. चांगलं गोल गुटगुटीत होतं बाळ. हातपाय पण छान लांब होते. पण त्याच्या चेहऱ्याकडे बघताच मी दचकले. पसरट नाक, मिचमिचे डोळे अन् ते जाड ओठ…मला त्या क्षणी ते गुरू महाराज आठवले…नक्की तेच रूप होतं बाळाचं…मला काही सुधरेना. मी बाळाला खाली ठेवलं.

‘‘मला जरा बरं वाटत नाहीए…बहुतेक बी.पी. लो होतोय…मी निघू का?’’ मी म्हटलं.

‘‘नाही अजिबात नाही. मला एक सांग या कॉलनीवाल्यांची तोंडं कशी बंद करू? अभिषेक दोन वर्ष काही येणार नाहीए.’’

 

‘‘तू एक छोटसं गेट टूगेदर कर अन् सर्वांना बोलावून घे. लवकरात लवकर समारंभ आटोपून घे.’’

‘‘असं म्हणतेस?’’ माझा सल्ला तिला पटला बहुधा. तेवढ्यात म्हणाली, ‘‘विनयची बदली दिल्लीला झाली आहे. पुढल्याच महिन्यात आम्ही जाऊ. तर मग मी या लोकांसाठी खर्च तरी कशाला करू?’’

‘‘तुला जे योग्य वाटेल तेच तर,’’ मी तिथून उठत म्हणाले. बाळासाठी आणलेला बाळंतविडाही द्यायला मला सुचलं नाही. मी तशीच ते सामान तिथं ठेवून घरी निघून आले.

निघताना अनीतानं दारात येऊन म्हटलं, ‘‘आता आम्ही लवकरच जाऊ. तू एकदा पुन्हा येऊन जा,’’ मी मान डोलावली…तडकन् घरी आले.

मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. खरोखरंच अभिषेकशी लग्न झालं का नीतिचं? बाळाचा बाप अभिषेक असेल तर बाळाचं रूप इतकं गुरूशी मिळतं जुळतं का असावं? भलत्या वेळी बदली का घेतली विनयंन? अनीतानं लग्नाचे फोटोही दाखवले नाहीत. नीति भेटायला समोर का येत नाही?

एमबीए झालेल्या, नोकरी करणाऱ्या तरूण मुलीचं जीवन तर उद्ध्वस्तच झालं. इथून कुठंही ही मंडळी गेली तरी नितिला जन्मभराचा कलंक तर सांभाळावाच लागणार…

अरेंज्ड मैरिजमध्ये उदारमतवादी बना

– सुधा जुगरान

जर काही कारणास्तव तरूण मंडळी आपला भावी जोडीदार स्वत: शोधू शकले नाहीत किंवा ते शोधू इच्छित नसतील आणि आपल्या आईवडिलांच्या मदतीनेच विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय त्यांनी घेतला असेल तर आजच्या काळात पालकांसाठी आपल्या मुलाचे लग्न लावून देणे अवघड होत चालले आहे.

स्थळासंबंधी कोणत्याही एका मुद्यावर पालक आणि मुलांचे एकमत होणे सोपे नाही. तिथेही जनरेशन गॅप स्पष्टपणे दिसू लागला आहे आणि बहुतांश तरुण लव्ह मॅरेज करू लागल्याने अरेंज्ड मॅरेजसाठी विवाहयोग्य मुलामुलींचा जणू दुष्काळ पडू लागला आहे. शिवाय मुले दुसऱ्या शहरात किंवा परदेशात राहात असतील तर लग्नाच्या स्थळाबाबत त्यांच्याशी बोलणे कठीण नव्हे तर अशक्य होते.

उच्च शिक्षित गृहिणी असलेल्या सुधा थपलियाल सांगतात की मुलीसाठी स्थळे येतात, पण फोनवर तिच्याशी याबाबत चर्चा करायची इच्छा असते तेव्हा सकाळी ती घाईत असते, संध्याकाळी दमलेली असते आणि सुटीच्या दिवशी विश्रांतीच्या मूडमध्ये असते. लग्नाबाबत चर्चा करू तर ती कोणाशी करू.

सावी शर्मा यादेखील एक उच्चशिक्षित गृहिणी आहेत. त्यांनी सांगितले की मी मुलाचे अरेंज्ड मॅरेज केले, पण मला फारसा त्रास झाला नाही, कारण मुलाने सर्व माझ्यावर सोपविले होते. त्यामुळे जी स्थळे मला योग्य वाटली त्याच मुलींशी त्याची भेट घडवून आणली आणि त्यातीलच एका ठिकाणी लग्न ठरले.

पालकांचा त्रास मुलांनी समजून घ्यावा

आजकाल अरेंज्ड मॅरेज ठरवताना पालकांसमोरील सर्वात मोठा पेच हा आहे की मुलांच्या अवास्तव अपेक्षांना जमिनीवर आणणे, जे अशक्य आहे. सोबतच कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमी पाहता योग्य ताळमेळ जुळेल अशी स्थळे शोधणे, कारण ती शोधताना मुले कमी सहकार्य करतात.

अनेक तरुण विचार तर खूप करतात, पण लग्नाचं सर्व खापर पालकांच्या माथी फोडतात, जसे की पालकांनी सुरुवातीलाच त्यांच्या अवास्तव अपेक्षांची जाणीव करून द्यायला हवी होती, त्यांनी ते केले नाही ही त्यांची चूक आहे. पण तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की अवास्तव अपेक्षा पूर्ण होत नाहीत.

बोलण्याच्या ओघात आलेल्या स्थळांच्या चांगल्या, वाईट बाजूंवर विचार करता येतो. लव्ह मॅरेजमध्ये जिथे मागचे पुढचे न पाहता, काहीही विचार न करता प्रेम होते, अर्थात प्रेमाची भावनाच सर्वकाही असते. पण अरेंज्ड मॅरेजमध्ये तुमचे गुणदोष, नोकरी, पैसा, पगार, सौंदर्य, सामाजिक परिस्थिती, घर, कुटुंब, शिक्षण इत्यादी पाहूनच स्थळे येतात.

म्हणूनच जर तरुण स्वत:साठी योग्य जोडीदार शोधू शकत नसतील आणि त्यासाठी पालकांवर अवलंबून असतील तर योग्य जोडीदार निवडण्यासाठी त्यांनी पालकांना सहकार्य करायला हवे.

मुलांच्या अडचणी पालकांनी समजून घ्याव्या

पालकांनीही याकडे लक्ष द्यायला हवे की अरेंज्ड मॅरेजमध्ये लव्ह मॅरेजसारखी लवचिकता येण्यासाठी त्यांनी उदारमतवादी व्हायला हवे. जुनाट प्रथांना चिकटून राहू नये. जात, जन्मपत्रिका, प्रथापरंपरा, गोत्र, धर्म, रीतिनाती आदींच्या चाळणीतून गाळून जे स्थळ योग्य ठरते, ते शिक्षण आणि विचारांच्या चौकटीत तुमचा मुलगा किंवा मुलीसोबत किती फिट बसते हे पाहण्याचे किंवा याचा विचार करण्याचेही कष्ट घ्यावेत.

म्हणूनच अरेंज्ड मॅरेजमध्येही ठरलेल्या चौकटीतून बाहेर पडून थोडे उदारमतवादी व्हा, स्वत:च्या बुरसटलेल्या विचारांना बाजूला सारून, मुलांसाठी योग्य ठरेल अशाच स्थळांचा विचार करा. आजच्या काळात मुलींसाठीही सर्व प्रकारच्या तडजोडी करणे सोपे नाही. म्हणूनच त्यांच्यासाठीही अरेंज्ड मॅरेज करणे सोपी गोष्ट नाही.

अरेंज्ड मॅरेजमधील अडचणी

अरेंज्ड मॅरेजमध्ये मध्यस्थ, आईवडील किंवा नातेवाईक एखाद्या स्थळाला होकार देण्यासाठी भावनात्मक दबाव टाकतात. हे योग्य नाही. याव्यतिरिक्त मुलामुलीला एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. या अडचणी अधिकच वाढतात जर ते वेगवेगळया शहरात किंवा त्यांच्यापैकी एक विदेशात राहात असेल.

लव्ह मॅरेजमध्ये प्रदीर्घ काळ एकमेकांना समजून घेतल्यानंतरच दोघे लग्नाचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांचा या निर्णयावर पूर्ण विश्वास असतो. पण अरेंज्ड मॅरेजमध्ये दोघेही निर्णय घ्यायला घाबरतात. आजकाल तरुणाई वय आणि मानसिकदृष्टया परिपक्व असल्यामुळे कुणाशीही सहजपणे समजुतीचे संबंध प्रस्थापित करू शकत नाही.

लव्ह मॅरेजमध्ये जिथे गुणदोष सोबत घेऊनच प्रेम पुढे जाते, तिथे अरेंज्ड मॅरेजमध्ये सर्व काही परिस्थितीवर अवलंबून असते. लव्ह मॅरेजमध्ये दोघेही आधीच एकमेकांच्या संमतीने भविष्यातील योजना आखतात तर अरेंज्ड मॅरेजमध्ये बरेचदा भविष्यातील हे सर्व निर्णय घेताना कौटुंबिक दबाव येतो आणि मुलगा किंवा मुलगी आपल्या जोडीदाराचा हेतू नीटपणे समजून घेऊ शकत नाही.

जोडीदाराला भेटा काही अशा प्रकारे

पालक जोडीदार निवडणार असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या निर्णयाशी आपली आवड जुळवून पाहा आणि भावी जोडीदारास अशाप्रकारे भेटा :

* भेटायला गेल्यावर समोरच्याला मनमोकळे बोलण्याची संधी द्या. तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. दोघांपैकी कोणीही एकाने सहजपणे बोलणे सुरू करून दुसऱ्याला कम्फर्टेबल करा. तुम्हाला त्याच्याबद्दल जे काही वाटले ते कुटुंबातील सदस्यांना स्पष्टपणे सांगा.

* चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा उशिराने निर्णय घेणे किंवा निर्णयच न घेणे चांगले. परंतु पालकांसोबत लग्नाबाबत चर्चा करताना त्यात सहज संवाद किंवा सकारात्मकता हवी, जेणेकरून ते तुमच्यासाठी योग्य जोडीदार निवडू शकतील.

* एकमेकांचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका, परंतु भविष्यातील योजना, आवडीनिवडी, स्वभाव वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपली नोकरी, कामाचे तास, फिरण्याची आवड, व्यस्तता, पगार इत्यादी बाबत स्पष्टपणे माहिती द्या, जेणेकरून नंतर वाद होणार नाहीत. याव्यतिरिक्त एकमेकांच्या पुरुष आणि महिला मित्रांच्या बाबतीत असलेली वागण्यातील सहजता आणि हद्द जाणून घेणे योग्य ठरेल.

* खर्चाची बाबही स्पष्ट व्हायला हवी, कारण बहुतांश मुलींना असे वाटते की पतिचे पैसे सर्वांचे असतात, पण त्यांचे पैसे हे केवळ त्यांचेच असतात. याशिवाय आजच्या नोकरदार मुली अशा मुलांना पसंत करतात, जे कुटुंब, मुले ही फक्त मुलींचीच जबाबदारी नसते, असा विश्वास त्यांना देतात.

अरेंज मॅरेजमध्येही जागवा लव्ह मॅरेजसारख्या भावना

आता जेव्हा लग्न ठरलेच आहे आणि तुम्ही स्वत:ला त्यासाठी तयार केले आहे, तर मग शहर असो किंवा विदेश, परस्परांसोबत चांगला वेळ घालवा.

कामाच्या ओझ्याखाली दबला असाल, मनात अनेक संशय असतील आणि जोडीदाराबाबत फारसे आकर्षण वाटत नसेल तरीही एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण करा. असा विचार करा की निसर्गाने त्याला फक्त तुमच्यासाठीच बनवले आहे. फ्लट्रिंग, हसणे-हसवणे, लहान लहान सरप्राईज द्या आणि तुमचे प्रेम नुकतेच सुरू झाले असून ते जिंकून सुखाचा किनारा गाठायचा आहे, अशा प्रेमळ भावना मनात जागवा.

भलेही तुमच्यासाठी तुम्ही स्वत: जोडीदार निवडला नसेल, परंतु पसंती तर तुमचीच आहे ना, म्हणूनच त्याच्याबाबत त्याच भावना जागवा, ज्या लव्ह मॅरेजमध्ये असतात. वाटल्यास लपूनछपून भेटा किंवा थेट बोलून प्रेम व्यक्त करा. मग बघा, अरेंज्ड मॅरेजमध्येही कशी लव्ह मॅरेजची मजा अनुभवता येते ती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें