काय आहे पोस्टपार्टम नैराश्य?

* प्रतिनिधी

जगातल्या सुमारे १३ टक्के महिलांना प्रसूतीनंतर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्या अस्वस्थ राहतात. प्रसूतीनंतर लगेच येणाऱ्या नैराश्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये ही संख्या २० टक्यांपर्यंत आहे. २०२० मध्ये सीडीसीने केलेल्या अभ्यासानुसार, हे उघड झाले आहे की, ८ पैकी १ महिला प्रसूतिपश्चात नैराश्याने ग्रस्त आहे. विशेषत: टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये प्रसूतिपश्चात नैराश्याची शक्यता जास्त असते.

या संदर्भात बंगळूरूमधील मणिपाल रुग्णालयाच्या सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हेमनंदिनी जयरामन सांगतात की, जेव्हा महिलांना मानसिक समस्या येतात तेव्हा त्या आतून तुटतात, जे घरातील सदस्यांनाही समजत नाही, त्यामुळे त्यांना खूपच एकटेपणा जाणवतो.

पोस्टपार्टम म्हणजे प्रसूतीनंतरचा काळ अर्थात बाळाच्या जन्मानंतरचा काळ. प्रसूतीनंतर लगेचच महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील बदलांना पोस्टपार्टम म्हणतात. पोस्टपार्टम अवस्थेपर्यंत पोहोचण्यापूर्वीचे तीन टप्पे असतात, जसे की इंट्रापार्टम म्हणजे प्रसूतीपूर्वीचा काळ आणि एट्रेपार्टम म्हणजे प्रसूतीदरम्यानचा काळ तर पोस्टपार्टम म्हणजे बाळाच्या जन्मानंतरचा काळ.

भलेही बाळंतपणानंतर अनोखा आनंद मिळत असला, तरी अनेक महिलांना प्रसूतीनंतरचा त्रास सहन करावा लागतो. प्रसूती सामान्य होते की, शस्त्रक्रियेद्वारे होते याच्याशी या समस्येचा काहीही संबंध नसतो. प्रसूतीदरम्यान शरीरातील सामाजिक, मानसिक आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये पोस्टपार्टम म्हणजे प्रसूतीनंतरच्या समस्या उद्भवतात.

नैराश्याचे कारण

पोस्टपार्टम नैराश्य आई आणि बाळ दोघांनाही येऊ शकते. पहिल्या प्रसूतीनंतर आईमध्ये अनेक संप्रेरक आणि शारीरिक बदल दिसून येतात, ज्याची लक्षणे वारंवार रडणे, जास्त झोपण्याची इच्छा, कमी खाण्याची इच्छा, बाळाशी नीट संबंध ठेवू न शकणे इत्यादी आहेत. या नैराश्यामुळे अनेकदा आई स्वत:चे तसेच बाळाचेही नुकसान करते.

प्रसूतीनंतर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी बाळासोबतच त्यांनी स्वत:चीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते, कारण या काळात शरीर कमकुवत होण्यासोबतच अंगावर स्ट्रेच मार्क्स येणे, वाढत्या ताणामुळे पाठदुखी, सततची केस गळती, स्तनांच्या आकारात बदल अशा बदलांमधून आईला जावे लागते. यासोबतच ती नोकरदार असेल तर करिअर पुढे सुरू ठेवण्याची चिंताही तिला सतावत असते.

कुटुंबाचा पाठिंबा

अशा परिस्थितीत फक्त एकच व्यक्ती तिच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकते आणि ती म्हणजे बाळाचे वडील, कारण जेव्हा आईचे शरीर कमकुवत असते आणि ती तिच्या नवीन आयुष्याशी संघर्ष करत असते, तेव्हा तिचा जोडीदार तिला सर्व प्रकारे मदत करत असतो, जसे की, सर्व चांगले होईल, मी आणि माझे संपूर्ण कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. अशा परिस्थितीत पोस्टपार्टम समस्येतून जाणाऱ्या महिलेला जोडीदाराच्या बोलण्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तिलाही वाटू लागते की, आता ती बाळाची योग्य काळजी घेऊ शकेल, म्हणजेच जोडीदार आणि कुटुंबाच्या मदतीने ती या समस्येतून बाहेर पडते.

तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक अशा परिस्थितीत पूर्ण समजूतदारपणे आणि परिपक्वतेने सामोरे जाण्याचा सल्ला महिलांना देतात. विशेषत: ज्या महिलांना जुळी मुले आहेत किंवा दिव्यांग मुले आहेत त्यांना तज्ज्ञ डॉक्टर तसेच कुटुंबातील सदस्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांना या परिस्थितीवर सहज मात करता येईल.

अनेक महिलांना आपण डिप्रेशन अर्थात नैराश्यातून जात असल्याची साधी कल्पनाही नसते. अशा परिस्थितीत आपण त्यांना या परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. पोस्टपार्टम नैराश्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते, कारण या अवस्थेवर वेळीच उपचार केले नाहीत तर महिला स्वत:वर तसेच बाळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. याशिवाय, ती बाळाच्या गरजाही समजू शकत नाही. खरं तर जन्मानंतर बाळाला आईची सर्वात जास्त गरज असते. म्हणूनच वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें