* श्रुती शर्मा, बॅरिएट्रिक समुपदेशक आणि न्यूट्रिशनिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

अन्नाचा परिणाम तुमच्या त्वचेचा रंग, केस आणि अगदी तुमच्या मूडवरही होतो. जर तुम्ही आतून निरोगी असाल तर तुमची त्वचा स्वत:हून चमकदार दिसते. त्वचेवरूनच तुमचे आरोग्य कसे आहे हे समजते. अन्नामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि खनिज पदार्थ असतात, जे तुमचा ताण नियंत्रित करण्यासोबतच तुमच्या त्वचेलाही चमकदार ठेवतात. त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवणे कठीण नसते.

योग्य आहारामुळे वजन नियंत्रणात राहते : जास्त खाणे आणि चुकीचा आहार घेतल्याने वजन वाढते. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वत:ला मॉडेलसारखे एकदम सडपातळ बनवावे. लठ्ठपणादेखील चांगली गोष्ट नाही, कारण तो मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजाराचे कारण ठरू शकतो.

योग्य आहाराचे सेवन न केल्यास केस रूक्ष आणि निर्जीव होतात : केसांना पोषणाची गरज असते. आहाराचा थेट परिणाम केसांवर होतो.

नखांनाही हवे पोषण : तुमची नखे सहज तुटत असतील तर याचा अर्थ असा की तुम्ही आहारात बदल करायला हवा. केसांप्रमाणेच नखांनाही पोषण आवश्यक असते. त्यासाठी अंडी, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि मटण खा. यामुळे नखांना पुरेसे प्रोटीन (प्रथिने) मिळेल.

पोषक पदार्थांच्या अभावामुळे स्नायू कमजोर होतात : स्नायूंचा तुमच्या सौंदर्याशी थेट संबंध असतो. स्नायू कमजोर होऊ लागले तर तुम्ही वर्कआऊट करू शकणार नाही. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होईल. स्नायू बळकट ठेवण्यासाठी प्रथियुनक्त खाद्यपदार्थांचे सेवन करा.

तुम्ही जे काही खाता ते तुमच्या त्वचेद्वारे प्रतिबिंबित होते : रूक्ष आणि निर्जीव त्वचा तुमच्या निकृष्ट आहाराचा परिणाम आहे. तुम्ही पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास भरपूर प्रमाणात फळे आणि भाज्या खाल्ल्यास त्वचा तरूण, चमकदार राहील. चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नयेत.

पौष्टिक आहार वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करू शकतो : अन्नाचा परिणाम शरीरात होणाऱ्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेवरही होतो. अँटीऑक्सिडंटयुक्त आहार जसे की, सेंद्रिय फळे आणि भाज्या या फ्री रॅडिकल्स दूर करून त्वचेला सुरकुत्या आणि फाईन लाइन्सपासून वाचवतात.

आहाराचा परिणाम डोळे आणि पापण्यांवरही होतो : तुम्ही योग्य आहार घेत नसाल आणि पुरेसे पाणी पित नसाल तर त्याचा परिणाम तुमच्या डोळयांवर आणि पापण्यांवर होऊ शकतो. योग्य पोषण न मिळाल्याने पापण्यांचे केसही गळायला सुरुवात होते.

सौंदर्यासाठी आवश्यक पोषक तत्त्व

व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. हे कोलेजेन तयार करण्यासाठी मदत करते, जे त्वचा कोमल ठेवण्यासाठी आवश्यक असते. ब्रोकोली, अंकुरित धान्य, पेरू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, पार्सली यात खूप जास्त व्हिटॅमिन सी असते.

सेलेनियम : सेलेनियमदेखील एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे त्वचेची लवचिकता कायम ठेवते. अक्रोड, ट्युना, लिव्हर, व्हीट जर्म, कांदे, सीफूड, कडधान्य, तपकिरी तांदूळ आणि कुकुट (पोल्ट्री) उत्पादनांमध्ये सेलेनियम मोठया प्रमाणात आढळते.

व्हिटॅमिन ई : त्वचेसाठी व्हिटॅमिन ई खूप महत्त्वाचे असते. ते व्हिटॅमिन ए सोबत मिळून त्वचेला कर्करोगापासून दूर ठेवते. व्हिटॅमिन ई मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे प्रदूषण, धुके, प्रक्रिया केलेले अन्न आणि उन्हामुळे त्वचेत तयार होणारी फ्री रॅडिकल्स दूर करतात. बदाम, पोल्ट्री उत्पादने, अक्रोड, अव्होकॅडो, शतावरी, सूर्यफुलाच्या बिया, काजू, शेंगदाणे, पालक, ओटचे जाडेभरडे पीठ आणि ऑलिव्ह हे व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण असलेले पदार्थ आहेत.

ओमेगा ३ : याला अत्यावश्यक फॅटी अॅसिड असे म्हणतात. एझिमासारख्या त्वचेच्या अनेक आजारांमध्ये ते प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. आवश्यक फॅटी अॅसिड त्वचेतील आर्द्रता आणि लवचिकता कायम राखतात. शरीर स्वत: याची निर्मिती करू शकत नाही, म्हणून याचे सेवन आहारासोबत करणे गरजेचे असते. अक्रोड, सालमन, अळशी, चायना सीड हे ओमेगा -३ चे उत्तम स्रोत आहेत.

व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन : त्वचेच्या देखभालीसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत आवश्यक असते. जर तुमची त्वचा कोरडी असेल, त्वचेची सालपटे निघत असतील तर समजून जा की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एची कमतरता आहे. हे उन्हामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवते. व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनचे उत्तम स्रोत आहेत – शतावरी, पीच, बीट, ग्रीन पालक, अंडी, रताळे, लाल मिरची.

झिंक : झिंक हा एक महत्तवपूर्ण ट्रेस खनिज पदार्थ आहे, जो त्वचेच्या खराब झालेल्या उतींची दुरुस्ती आणि जखमांना बरे करण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही मुरुमांमुळे त्रस्त असाल तर शरीरात जस्ताची कमतरता असू शकते. झिंकचे स्रोत आहेत – ओएस्टर, पेकान, पोल्ट्री उत्पादने, भोपळयाच्या बिया, आले, डाळी, सीफूड, मशरूम, अख्खे धान्य इ.

निरोगी त्वचेसाठी टीप्स

भरपूर पाणी प्या : पाणी पिण्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि तिच्यातील विषारी द्रव्ये निघून जातात, ज्यामुळे त्वचा मऊ राहते.

कोशिंबीर खा : कोशिंबीर, कच्चा पालक आणि उकडलेली अंडी खा. यामध्ये कॅरोटीनॉइड्स, अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

हळदीचं सेवन करा : तपकिरी भात, मांसाचे पदार्थ आणि शेक इत्यादीमध्ये हळद घालून त्याचे सेवन करा.

आरोग्यदायी पशु उत्पादने : आठवडयातून २-३ सालमन घ्या. यात उत्कृष्ट गुणवत्तेचे ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात.

साखरेचे कमी प्रमाणात सेवन करा : साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. ते ग्लायसेशन वाढवते, ज्याचा त्वचेच्या उतींवर वाईट परिणाम होतो.

खराब फॅटपासून दूर राहा, चांगल्या फॅटचे सेवन करा : वनस्पती तेल जसे की, कॉर्न ऑइल, कॉटन ऑईल, कॅनोला आणि शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू नका. त्याऐवजी खोबरेल तेल, अॅवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल किंवा तुपाचे सेवन करा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...