* प्राची भारद्वाज
‘डेटिंग’ हा शब्द मनात प्रेमाची कोमल भावना जगवण्यासाठी पुरेसा आहे. आपला प्रेमी आपल्यासोबत असतो. त्याच्यात आपण आपल्या भावी जोडीदाराला पाहत असतो. त्याच्यासोबत वेळ घालवणे, भविष्याची सुखद स्वप्ने रंगवणे खूपच सुंदर, हवेहवेसे वाटणारे असते. आपल्या जीवनातील जोडीदार कसा असेल, हा विचार सतत मनामध्ये घोळत असतो. आपण सर्वच आपल्या मनात त्याची प्रतिमा आणि डोक्यात एक यादी तयार करून ठेवतो, जसे की, माझ्या जोडीदारामध्ये अमुक गुण असतील, तो हुशार असेल, खूप काळजी घेणारा असेल, मला समजून घेईल इत्यादी.
पण या यादीत एक गोष्ट राहून जाते, ती म्हणजे जोडीदाराची जास्त किंवा कमी खर्च करण्याची सवय. तुमचा जोडीदार पैसे कसे खर्च करतो त्याचा थेट प्रभाव तुमच्या नात्यावर पडतो. एरिजोना विद्यापीठाने सुमारे ५०० जणांची माहिती गोळा केली. सर्व २० वर्षांचे होते आणि आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत भावनात्मकरित्या गुंतलेले होते. या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की, ज्यांचे प्रेमी पैसे जबाबदारीने, जपून वापरणारे होते त्यांच्यात आंनद आणि ताळमेळ जास्त असतो.
या उलट ज्यांच्यामध्ये पैसे कसेही उधळण्याची सवय होती त्यांचा एकमेकांवर कमी विश्वास असल्याचे निदर्शनास आले. मिशिगन विद्यापीठातही एक संशोधन झाले जिथे असा निष्कर्ष निघाला की, सुरुवातीला खर्च करण्याबाबतचे भिन्न विचार एकमेकांबद्दल आकर्षण वाढण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर मात्र विचारातल्या याच तफावतीमुळे दोघांमध्ये वाद होऊन चिंता वाढत गेली.
धोक्याची घंटा
याचा सरळ सोपा अर्थ असा की, जसे रंगरूप, व्यक्तिमत्त्व, वागणूक इत्यादी एखाद्या नात्यासाठी खूपच महत्त्वाचे असते तसेच पैशांबद्दल विचार करण्याचा आणि ते खर्च करण्याचा दृष्टिकोन हा आपापसात ताळमेळ वाढवण्यासाठी गरजेचा असतो. तुमचा प्रेमी खूप उधळपट्टी करणारा असेल तर सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला आनंदच होईल. त्याने दिलेल्या महागडया भेटवस्तू आणि महागड्या हॉटेलमध्येल घेऊन जाणे यामुळे तुम्ही हुरळून जाल. पण जसे दिवस जातील तसा हा त्याचा चांगला गुण नसून अवगुण असल्यासारखे वाटायला वेळ लागणार नाही.
फिनसेफ कंपनीचे संस्थापक, संचालक मृण अग्रवाल यांनी सांगितले की, एखादे नाते टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचे असते की, आर्थिक बाबतीत दोघांमध्ये एकमत असावे. कमावणे, बचत करणे, गुंतवणूक आणि कर्ज घेण्याबद्दल दोघांनी एकसारखा विचार केला तर हे शक्य होते. यामुळे जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाणे सोपे होते. पण हो, पैशांसंदर्भातील गोष्टी दोघांनी तेव्हाच बोलायला हव्यात जेव्हा त्यांनी नात्याला पुरेसा वेळ दिलेला असेल.
सुरुवातीलाच पैशांबद्दल बोलणे योग्य नसते, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. यात ६० टक्के लोकांनी मान्य केले की, कमीत कमी ६ महिन्यांनंतर दोघांनी आपापल्या आर्थिक स्थितीबद्दल एकमेकांना सांगायला हवे. पण जर त्यावेळी तुमचा प्रेमी त्याची आर्थिक स्थिती तुमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्याबाबत बोलणे टाळत असेल तर ही धोक्याची घंटा आहे, हे समजून जावे.
सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर तारेश भाटिया यांनी सांगितले की, तुमचा प्रेमी मागील ४-५ वर्षांपासून नोकरी करत असेल आणि तरीही घर, गाडी, बँक बॅलन्स, म्युच्युअल फंड किंवा फिक्स डिपॉझिट यापैकी त्याच्याकडे काहीही नसेल तर समजून जावे की, त्याचे कुठलेही आर्थिक ध्येय निश्चित नाही. याकडे गांभीर्याने पाहायला हवे, कारण हे एक प्रकारचे आर्थिक बेजबाबदारपणाचे लक्षण असते. त्याचा दुष्परिणाम तुमच्या भविष्यावर नक्कीच होऊ शकतो.
तारेश यांच्या सल्ल्यानुसार, भरमसाठ पगार नसतानाही तुमचा प्रेमी तुम्हाला महागडया ठिकाणी जेवायला घेऊन जात असेल किंवा फिरायला गेल्यावर भरपूर खर्च करत असेल तर तुम्ही त्याला वेळीच रोखायला हवे. कदाचित मिळकतीपेक्षा जास्त खर्च करायची त्याला सवय असू शकते. तुम्हाला याबाबत जितक्या लवकर समजेल तितके चांगले असते, कारण लग्नानंतर अशा सवयी मोडणे कठीण असते.
तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला पैशांची कदर नाही हे कसे ओळखाल?
किमतीबद्दल बिनधास्त
वर्षाने सांगितले, ‘‘रेहानसोबत फिरायला जाणे म्हणजे भरपूर खरेदी करणे. त्याला खरेदी करायला प्रचंड आवडते. त्याला सर्व काही खरेदी करायचे असते. अत्याधुनिक गोष्टी त्याला खूप आवडतात. ब्रँडेड कपडे, शूज असोत किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, रेहानला सर्व हवे असते. काहीही खरेदी करताना त्याला किमतीशी काहीही देणेघेणे नसते. जेवणाचे बिल देताना, घरासाठी नवीन भांडी घेताना किंवा वेटरला टीप देताना तो पैशांकडे कधीच बघत नाही. असे कधीपर्यंत चालणार? आम्ही दोघेही खासगी कंपनीत कामाला आहोत. पैशांची उधळपट्टी करायला आम्हाला एखादा खजिना सापडलेला नाही.’’
मागील ३ वर्षांपासून प्रेमसंबंध असलेले रेहान आणि वर्षा आता लग्नाचा विचार करत आहेत. त्यामुळेच वर्षाला भविष्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
‘हाऊ टू बी हॅप्पी पार्टनर्स’च्या लेखिका डॉक्टर टीना टेसिना यांनी सांगितले की, ‘‘नात्यात आर्थिक बेईमानी तेव्हा जन्माला येते जेव्हा आपापसात संवादाचा अभाव असेल किंवा तुम्ही मतभेद जाणूनबुजून टाळत असाल. वेळ हातून निघून जाण्याआधीच पैशांबाबत एकमेकांशी स्पष्टपणे बोलणे गरजेचे असते. उधळपट्टीची सवय असलेल्या माणसासोबत आयुष्य काढणे सोपे नसते. भविष्यात तो कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाण्याची शक्यता अधिक असते. खोटा दिखावा करणाऱ्यापेक्षा जीवनमूल्ये जाणारा प्रेमी अधिक चांगला ठरतो.’’
चादरीपेक्षा पाय मोठे
शिखाचा मित्र पाहून तिच्या मैत्रिणींना तिचा हेवा वाटायचा. त्याने बीएमडब्ल्यू कारने येणे, शिखाला महागडया भेटवस्तू देणे, महागडया हॉटेलमध्ये पार्टी देणे, यामुळे शिखा खूप खुश होती, पण तरी तिच्या मनात अधूनमधून एक विचार येत असे की, एका साध्या कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक या पदावर असूनही त्याला इतका जास्त खर्च करणे कसे परवडते? सोपी गोष्ट आहे, तो क्रेडिट कार्ड आणि कर्ज काढून असे ऐशोआरामी जीवन जगत आहे.
तरेश भाटिया यांनी सांगितले की, तुमचा प्रेमी कोणते कपडे घालतो, त्याची जीवनशैली कशी आहे, तो कोणती गाडी चालवतो, या सर्व प्रश्नांमध्ये तुम्हाला त्याची जीवन जगण्याची पद्धत ही त्याच्या मिळकतीच्या तुलनेत बेजबाबदारपणाची आहे की नाही, याचे उत्तर सापडेल. जर तो बचतीऐवजी खर्चबद्दलच अधिक बोलत असेल तर समजून जावे की, लवकरच त्याचे क्रेडिट बिल त्याच्या आनंदी जीवनावर ताबा मिळवेल. म्हणूनच या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. उलट शक्य तितक्या लवकर त्याच्याशी या विषयावर बोला.
जर उगाचच तो पैशांची उधळपट्टी करत असेल तर समजून जा की, त्याचे तुमच्यापेक्षा जास्त प्रेम पैसे खर्च करण्यावर आहे आणि तेच त्याला जास्त प्रिय आहे.
टिना टेसिना याकडे वाईट सवय नव्हे तर विश्वासघात म्हणून पाहातात.
यश आणि निवेदिता दोघे ३० वर्षांचे आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. लग्नापूर्वी दोघेही एकमेकांशी बचत आणि गुंतवणुकीबाबत मनमोकळेपणाने बोलले. त्यांनी सांगितले की, ‘‘मागील ५ वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध आहेत. लग्नापूर्वी एकमेकांबाबत सर्व गोष्टी आम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. घर, गाडी इतकेच नाही तर कॅमेरा आणि लॅपटॉपलाही आम्ही मालमत्ता समजतो.’’
निवेदिताने सांगितले की, ‘‘यश मार्केटिंग मॅनेजर आहे. गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची त्याला सवय होती. मी बँकेत काम करते. बचत करणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे माझ्या नोकरीचा एक भाग आहे. यशच्या जास्त खर्च करण्याच्या सवयीमुळे एकदा आमचे ब्रेकअप झाले होते. अडचण अशी होती की, पैसे कुठे खर्च झाले, हेच आम्हाला समजत नव्हते. यशला नेहमी बाहेर खायची सवय होती. मात्र चांगल्या हॉटेलमध्ये खाणे महाग पडते.
मी यशला विचारले की, त्याला बाहेरचे नेमके काय आवडते? चव, तिथले वातावरण की घरात जेवण बनवण्याचा आळस? त्यानंतर आम्ही दोघांनी खूप विचार करून महिन्याच्या किराणा मालात ‘रेडी टू कूक’ पदार्थांचा समावेश केला, जेणेकरून घरातल्या जेवणाची चव बदलेल आणि जेवण बनवणेही सोपे होईल. एकत्र विचार केल्यामुळे लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचणे सोपे झाले. जेव्हापासून भांडण विसरून आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत तेव्हापासून वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक गरजांकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित केले आहे.’’
मानसशास्त्रीय दृष्टिकोन?
मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर प्रीती यांनी सांगितले की, आपल्यातील काही गुण सामान्यपणे बाहेर येत नाहीत, पण आर्थिक देवाण-घेवाणीवेळी ते अगदी सहज समोर येतात. म्हणून प्रेमसंबंध पुढे घेऊन जाण्यापूर्वी हे माहिती करून घेणे गरजेचे आहे की, जोडीदाराची जास्त खर्च करण्याची सवय धोक्याची घंटा तर नाही? जसे की, अशा वेळी तुमचा प्रेमी तुमच्या आर्थिक व्यवहारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमच्या खर्च करण्याच्या किंवा न करण्याच्या प्रवृत्तीवरून तुमचा अपमान करेल.
या सर्वांमागे त्याच्या स्वत:च्या मनोग्रंथी असू शकतात. जेव्हा आपण प्रेमात वेडे होतो तेव्हा आपला स्वत:चा झालेला अपमान आणि योग्य विचार करण्याची क्षमता गमावून बसतो.
‘‘जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करतो.’’ असे डॉक्टर प्रीती यांनी सांगितले.
विरुद्ध आकर्षण
असे म्हणतात की, आपण अशा माणसांकडे आकर्षित होतो जे आपल्यापेक्षा खूप वेगळे असतात किंवा वेगळा स्वभाव, वेगळया विचारांचे असतात. अंतर्मुख लोक बहिर्मुख लोकांकडे आकर्षित होतात, पण जर तुम्ही पैसे वाचवण्यासाठी कामावर घरचा डबा घेऊन जात असेल आणि तुमचा प्रेमी मात्र रोज बाहेरून जेवण मागवून जेवत असेल तर तुमच्या दोघांची बचत कशी होणार?
सुमनच्या प्रियकराला स्वत:चेच लाड करायला आवडतात. त्यामुळे दर महिन्याला चांगल्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल, पॅडिक्युअर आणि हेअर स्पा करायची त्याला सवय होती. एवढा मोठा खर्च तो तेव्हाच करू शकत होता जेव्हा तो दर महिन्याला त्याच्या क्रेडिट कार्डचे कमीत कमी बिल भरायचा आणि बाकीचे सर्व वाढत जायचे. पण असे कधीपर्यंत चालणार होते? सुमनने हजारदा सांगूनही त्याने स्वत:च्या अशा राहणीमानात बदल न केल्यामुळे अखेर नाईलाजाने सुमनला हे नाते तोडावे लागले.
अशा परिस्थितीचा सामना कसा कराल?
स्टुडंट लोन एक्स्पर्ट शशी मोहन यांना असे वाटते की, जे प्रेमी आपल्या आर्थिक स्थितीबाबत मनमोकळेपणाने बोलतात ते चांगल्या गुंतवणुकीचा पर्याय शोधण्यासाठी सक्षम असतात.
मिळून बनवा अर्थसंकल्प : एकमेकांचे ऐकून, एकमेकांच्या गरजा ओळखून दोघांनी मिळून बजेट तयार करायला हवे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. खर्च मर्यादित राहतील आणि तुम्ही भविष्यासाठी बचतही करू शकाल. बजेट बनवण्याची एक चांगली पद्धत आहे ५०/३०/२० बजेट. याचा अर्थ कर कापून गेल्यानंतर उरलेल्या आपल्या कमाईतील ५० टक्के पेक्षा जास्त भाग तुम्ही तुमच्या गरजांसाठी खर्च करणार नाही. ३० टक्के पेक्षा जास्त भाग स्वत:च्या इच्छांसाठी खर्च करणार नाही आणि कमीत कमी २० टक्के भाग वाचवाल.
आर्थिक आराखडा तयार करा : कोणालाही दोष न देता एक असा आराखडा तयार करा जिथे तुम्हाला दोघांना पुढच्या ५-१०-१५-२० वर्षांपर्यंत पोहोचायचे असेल. भविष्यातले तुमचे टप्पे ठरवा आणि त्यानुसार आतापासूनच बचत योजना तयार करा.
मासिक खर्च : काही लोक स्वत:च्या खर्चांवर नियंत्रण ठेवूच शकत नाहीत. मग तो ब्रँडेड घड्याळासाठीचा खर्च असो, किमती पर्ससाठी असो किंवा एखादा महागडा छंद अथवा खेळावर केलेला खर्च असो. अशा वेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराला या गोष्टीसाठी तयार करायला हवे की, दर महिन्याला तुमच्या दोघांच्या बँक खात्यात बचत केलेली काही रक्कम जमा व्हायलाच हवी.
तुम्ही ही जमा रक्कम तुमच्या मर्जीप्रमाणे खर्च करा, पण त्यापेक्षा अधिक पैसे तुम्ही खर्च करायचे नाहीत. आईवडील किशोरवयीन मुलाला दरमहा खर्चासाठी काही रक्कम देतात, त्याचप्रमाणे एक ठराविक रक्कम लिफाफ्यात भरून तुमच्या जोडीदाराला द्या. त्यानंतर ते पैसे तो कसा खर्च करतो याकडे अजिबात लक्ष देऊ नका.
याचे ३ फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे तुम्ही दोघे तेवढी बचत करू शकाल ज्याबद्दल तुम्ही ठरवले होते. तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल. दुसरा फायदा म्हणजे कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय स्वत:च्या इच्छेनुसार काहीतरी खर्च करता आल्याचे समाधान तुमच्या जोडीदाराला मिळेल. तिसरा फायदा म्हणजे केलेल्या या अतिरिक्त खर्चानंतरही तुमच्या दोघांपैकी कोणालाही काहीच खटकणार नाही किंवा मनात अपराधीपणाची भावना येणार नाही.
पैशांची उधळपट्टी करणारा प्रेमी तुमच्यावर जास्त खर्च करत असल्यामुळे असे करून तो सुरुवातीला तुम्हाला आकर्षित करेल. तुमच्यावर प्रभाव पाडेल. पण जर तुम्ही लग्न करायच्या विचारात असाल तर भविष्यातील चांगल्या जीवनशैलीसाठी तुमच्या बँक खात्यात पैसे असणे गरजेचे असते आणि त्यासाठी खर्चाला थोडासा लगाम लावण्याची गरज असते.