* गरिमा पंकज
एखादी व्यक्ती चेहऱ्याने कितीही सुंदर असली तरी बोलतांना किंवा हसताना जर तिच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर सारे सौंदर्य व्यर्थ जाते. लोकांना अनेकदा श्वासातून येणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
तोंडातून दुर्गंधी येण्याला वैद्यकीय भाषेत हॅलिटोसिस म्हणतात. श्वासातून दुर्गंधी अनेक कारणांमुळे येऊ शकते. जसे की तोंडाला कोरडे पडणे, अन्नामध्ये प्रथिने, साखर किंवा आम्लाचे जास्त प्रमाण, धूम्रपान, कांदा आणि लसूण खाणे, कोणताही जुनाट आजार, कर्करोग, सायनस इन्फेक्शन, कमकुवत पचनशक्ती, किडनी समस्या, पायोरिया किंवा दात किडणे इ. चांगल्या ओरल हेल्थ सवयी अवलंबून आणि तुमचा आहार व जीवनशैली बदलून तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होऊ शकता :
तोंडाची व्यवस्थित स्वच्छता
दररोज दात चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. दिवसातून दोनदा किमान २ मिनिटे ब्रश करा, ब्रश जास्त हार्ड नसावा याची काळजी घ्या. दर २-३ महिन्यांनी ब्रश बदलत रहा. केवळ दातच नाही तर जिभेची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. खाण्यापिण्यामुळे जिभेवर एक थर जमा होतो, ज्यामुळे श्वासाला दुर्गंधी येते.
त्यामुळे रोज टंग क्लीनरच्या मदतीने जीभदेखील स्वच्छ करा, जीभेवर मागून पुढच्या दिशेने ब्रश करा आणि तसेच जिभेचे कोपरेही स्वच्छ करायला विसरू नका.
दात फ्लॉस करा
फ्लॉस केल्याने दातांमधील प्लेक आणि बॅक्टेरिया निघून जातात, जे ब्रशने निघत नाहीत. दिवसातून एकदा तरी फ्लॉस अवश्य करा, फ्लॉस केल्यामुळे तोंडात अडकलेले अन्नाचे कण आणि अवशेषदेखील निघून जातात. तसे न केल्यास दात किडण्याची शक्यता असते.
माउथवॉशचा वापर
श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी माउथवॉश वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. अँटिसेप्टिक माउथवॉश तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतो आणि दुर्गंधी लपविण्यासदेखील मदत करतो.
श्वास दरवळण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे माउथ फ्रेशनर उपलब्ध आहेत, कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोट्रेक्ट स्प्रे, लिस्टरिन फ्रेश बर्स्ट माउथवॉश, लिस्टरिन कूलमिंट माउथवॉश, एलबी ब्रीथ हर्बल शुगर फ्री ब्रेथ फ्रेशनर स्प्रे, कोलगेट प्लाक्स पेपरमिंट माउथवॉश, बायोआयुर्वेद अँटी बॅक्टेरियल जर्म डिफेन्स माउथवॉश, स्पीयरमिंट माउथ फ्रेशनर, लीफोर्ड फेदर ग्लोबल जिओफ्रेश आयुर्वेदिक इन्स्टंट कूल, मिंट माउथ फ्रेशनर, जिओफ्रेश आयुर्वेदिक इन्स्टंट माउथ फ्रेशनर, पतंजली माउथ फ्रेशनर, बायोटिन ड्राय माउथवॉश, ट्रिसा डबल अॅक्शन टंग क्लीनर इ.
शुगर फ्री डिंक किंवा मिंट वापरा
शुगर-फ्री डिंक किंवा पुदीना तुमच्या तोंडात लाळ निर्माण करून हानिकारक जीवाणूंना बाहेर काढण्यास मदत करतात. ते तुमच्या श्वासाची दुर्गंधी काही काळ लपवूही शकतात.
बेकिंग सोड्याचा वापर
आठवडयातून एकदा बेकिंग सोडयाने दात ब्रश केल्याने बॅक्टेरिया बऱ्याच प्रमाणात नष्ट होतात. ब्रशच्या ब्रिस्टल्सवर हलका बेकिंग सोडा लावून तुम्ही सामान्यपणे ब्रश करू शकता किंवा मग बेकिंग सोडा माउथवॉश म्हणूनही वापरता येईल.
आहारात सुधारणा
जास्त मसालेदार अन्न, कांदा, लसूण, आले, लवंग, काळी मिरी इत्यादींचे सेवन केल्याने तोंडाला दुर्गंधी येते. यांचा वापर कमी करा आणि जेव्हाही कराल तेव्हा चुळ भरून किंवा ब्रश करून तोंड स्वच्छ ठेवा, कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन करू नका, नाश्त्यात अखंड धान्य वापरा, धूम्रपान टाळा आणि तंबाखू टाळा.