* पूनम अहमद

आजकाल बारीक दिसण्याचे वेड लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बारीक असणे हीच जणू सौंदर्य आणि हुशारीची ओळख आहे. कमी वेळेत मेहनतीशिवाय बारीक दिसण्याची इच्छा वाढीस लागली आहे. याचे दुष्परिणाम माहीत असूनही लोक तीच चूक करत आहेत जी ठाण्यात राहणाऱ्या २२ वर्षीय मेघनाने केली. मेघना अलीकडेच एका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कामाला लागली होती. जिममध्ये वर्कआऊटपूर्वी तिने डिनिट्रोफेनॉल घेतली आणि अचानक तिची तब्येत बिघडली. तिला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा कितीतरी जास्त होते. तिला श्वास घ्यायला त्रास होता. हृदयाची धडधड खूपच वेगवान होती आणि ब्लडप्रेशर खूपच वाढले होते. त्यामुळेच हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला.

हे औषध ऑनलाईन मिळते आणि यात असलेले आयनोफोरिक हे शरीरातील चयापचय प्रक्रियेचा स्तर वाढवून वजन कमी करते. हे असे एक रासायनिक तत्त्व आहे जे माणसाचा जीव घेऊ शकते. याचा डोस जास्त झाल्यास श्वास घ्यायला त्रास होणे, प्रचंड गरम होणे, हृदयाचे ठोके वाढणे इत्यादी अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.

आता याचा तपास सुरू आहे की, मेघनाने ते औषध कुठून आणि कसे मिळवले? पोलिसांनी जिममध्ये जाऊन तिच्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली.

मेघनाच्या भावाने सांगितले की, ती २ महिन्यांपासून प्रशिक्षक म्हणून जिमला जात होती. ते औषध तिला कुठून मिळाले? बाजारात अशा ब्रँडचे औषध मिळतेच कसे? असे प्रश्न तिच्या भावाने विचारले.

एफडीएच्या आयुक्त पल्लवी यांनी सांगितले की, ‘‘अशा ब्रँडची औषधे ऑनलाईन सहज मिळत असल्याने हा चिंतेचा विषय आहे. अनेकदा अशी औषधे एखाद्या वेगळया नावाने ऑनलाईन मिळतात. अशा ब्रँडची औषधे विकणाऱ्या आणि त्याची जाहिरात करणाऱ्या ६२ ठिकाणांवर आम्ही कारवाई केली आहे. आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, मेघनाला ते औषध कुठून मिळाले.’’

जीवघेण्या ठरत आहेत बारीक होण्याच्या गोळया

आजकाल लोक आपले आरोग्य आणि दिसण्याकडे जास्तच लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या स्लिमिंग पिल्स म्हणजे बारीक होण्याच्या गोळया खूपच लोकप्रिय होत चालल्या आहेत. याचे दुष्परिणाम माहीत करून घेण्यापूर्वीच अनेज जण या गोळया खात आहेत. संतुलित आहार, पुरेसा व्यायाम, निरोगी जीवनशैलीकडे लक्ष देण्यापेक्षा अशा गोळया खाणे त्यांना जास्त सोपे वाटू लागले आहे.

रिमाचे वजन लहानपणापासूनच खूप जास्त होते. एक ब्रेकअप आणि एका शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच कारणांमुळे वजन आणखी वाढले. तिने सांगितले की, ‘‘माझ्या एका मैत्रिणीने डेकसाप्रिन गोळी खाण्याचा सल्ला दिला. मला ती इंटरनेटवर मिळाली. मी ती खायला सुरुवात केली. तिचे साईड इफेक्ट लगेचच जाणवू लागले. मला खूप घाम यायचा. त्यानंतर अचानक थंडी वाजू लागायची. हृदय जोरजोरात धडधडू लागायचे. कामावर गेल्यानंतर हात थरथर कापायचे. मात्र माझे वजन कमी होऊ लागले होते. त्यामुळे मी खुश होते. त्यानंतर सहाव्या दिवशी माझ्या छातीत दुखू लागले. हृदय रोगाचा झटका येईल, असे मला वाटू लागले. मी त्याच वेळी घशात हात घालून गोळी बाहेर काढली. डेकसाप्रिनवर यूके आणि नेदरलँडमध्ये बंदी घालण्यात आली आहे.’’

यात असे घटक आहेत ज्यामुळे मानसिक असंतुलन, हृदय रोगाचा झटका, पक्षाघात होऊ शकतो. २०१२ मध्ये ३० वर्षीय लंडन मॅरेथॉनचा धावपटू क्लेअर्स  स्क्वायर्सचा मृत्यू त्यावेळी झाला ज्यावेळी तो अंतिम रेषेपासून फक्त १ मैल दूर होता. २०१४ मध्ये डच वैज्ञानिकांनी सांगितले की, त्या धावपटूच्या आहारात सिंथेटिक घटक सापडले होते.

फसव्या जाहिरातींचे जाळे

योग्य आहार, पुरेसा व्यायाम, मेहनत आणि संयम राखल्यास वजन कमी करता येते, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तरीही दरवर्षी हजारो लोक तात्काळ वजन कमी होण्याचा चमत्कार आपल्या आयुष्यात घडेल या आशेने इंटरनेटवरून बारीक होण्याच्या गोळया बेकायदेशीरपणे खरेदी करतात. रात्री उशिरा टेलिमार्केटिंगमध्ये अनेकदा एक बारीक मुलगी आपली कंबर आणि एक मुलगा त्याचे अॅप्स दाखवत असतो आणि बारीक होण्याच्या गोळयांमुळे हे शक्य झाले, असे दोघेही सांगतात. या गोळयांचे एक कटू सत्य असे की, त्या हायड्रोक्सिल पिल्स आहेत. वजन कमी करण्यासाठी त्या जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सेवनामुळे भूक मंदावते. चरबी कमी होते. यामुळे आपोआपच वजन कमी होऊ लागते. पण याचे साईड इफेक्ट खूपच धोकादायक आहेत.

आहारतज्ज्ञ डॉक्टर मानसी यांच्या मते, यामुळे यकृत आणि स्वादुपिंड खराब होऊ शकते. चिंता, झोप न येणे, मासिक पाळीच्या समस्या, हृदयाची धडधड वाढणे, अशा समस्याही निर्माण होतात. भलेही त्या आयुर्वेदिक किंवा हरबल असल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

५२ वर्षीय सुनीताचे वजन प्रमाणापलीकडे वाढले होते. त्यांनी सांगितले की, ‘‘लठ्ठपणामुळे कँसर होऊ शकतो, असे मी टीव्हीवर पाहिले होते. मी घाबरले. काहीतरी करायला हवे असे मला वाटले. मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सांगितले की, तुमचे जेवण कमी आहे. फक्त तुम्ही भरपूर व्यायाम करायला हवा. माझे समाधान झाले नाही. मला झटपट बारीक व्हायचे होते. त्यामुळे मी गूगलवर ‘स्लिमिंग पिल्स’ असे सर्च केले. बऱ्याच साईट्स दिसू लागल्या. एका साईटवर एक डॉक्टर गळयात स्टेथस्कोप घालून समजावत होते.

‘‘मला वाटले हीच साईट योग्य आहे. लोक बनावट वेबसाईटवर हे सर्व दाखवतात, याची मला कल्पना नव्हती. मी लगेच ऑर्डर देऊन त्या गोळया मागवल्या. गोळया खाऊन फक्त ३ आठवडेच झाले होते. अचानक माझी तब्येत बिघडली. मी घरी एकटीच होते. मुले शाळेत गेली होती. माझे पाय लटपटू लागले. जोरात चक्कर आली. मी मरणार, असे मला वाटू लागले. हे सर्व त्या गोळयांचे साईड इफेक्ट होते.’’

फिगर बनवण्याचे धोकादायक उपाय

चांगली फिगर किंवा बांधा हवा, असे दडपण महिलांवर असते. आता पुरुषांनाही असेच वाटू लागले आहे. कपडयांच्या एका मोठया ब्रँडच्या दुकानात अंजली आणि रवी दोघेही काम करत होते. अंजलीसारखे बारीक आणि सुंदर दिसावे, असे रवीलाही वाटत होते. तिथे येणाऱ्या एका मॉडेलच्या सल्ल्यानुसार दोघांनी इंटरनेटवरून डाएट पिल्स खरेदी केल्या.

काहीच दिवसात शरीरातील चयापचय प्रक्रियेची पातळी वेगाने वाढल्यामुळे रवीची तब्येत अचानक इतकी बिघडली की, तो यातून वाचू शकला नाही.

फेब्रुवारी २०२० मध्ये एफडीएने यूएसच्या मार्केटमधून उत्पादक आणि वितरकांना बेल्विक देऊ नका असे सांगितले, कारण बेल्विकमुळे कॅन्सरचे रुग्ण वाढू लागले होते.

बारीक होण्याच्या गोळया म्हणजे एखादी जादू किंवा चमत्कार नाही. म्हणूनच त्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

अशा गोळया खाऊन स्वत:चे आयुष्य धोक्यात घालू नका. बारीक होणे किंवा बारीकच राहणे अवघड नाही. त्यासाठी संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे गरजेचे आहे.

लक्षात ठेवा, बारीक राहिल्यामुळेच तुम्ही यशस्वी, सुंदर आणि सुखी व्हाल, असे मुळीच नाही. वजन जास्त असेल तर संयमाने रोज व्यायाम करून ते कमी करण्याचा प्रयत्न करा. मेहनत कधीच वाया जात नाही. बारीक होण्यासाठी कमी प्रमाणात खाणे, प्रोटीन घेणे, पालेभाज्या खाणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. बारीक होण्याच्या गोळयांपासून दूरच रहा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...