* प्रतिनिधी
- मी २१ वर्षांचा तरूण आहे. माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे. तिचंसुद्धा माझ्यावर निरतिशय प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. पण जेव्हा मुलीने तिच्या घरी याविषयी सांगितलं तेव्हा तिच्या घरात हल्लकल्लोळ माजला. तिच्या घरच्यांनी मुलीला मारहाण केली व तिचा मोबाइल ताब्यात घेतला. एवढंच नाही तर तिचं घराबाहेर येणंजाणं बंद केलं. तिने माझ्याशी संबंध तोडले नाहीत तर ते मला खोट्या केसमध्ये अडकवून तुरूंगात पाठवतील वा मला जीवे मारतील अशी तिला धमकी दिली. मुलगी यामुळे खूप घाबरली. तिने खाणंपिणं सोडून दिलं, प्रत्येक वेळी रडत राहते. तिच्यामुळे माझ्या जिवाला धोका पोहोचू नये असं तिला वाटतं.
आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आम्ही मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही ऐकत नाही. लग्नाला नकार देण्यामागचं कारण हे आहे की मुलीच्या आजीची जात (गोत्र) आणि आमची जात एक आहे. त्यामुळे नात्याने आम्ही दोघे भाऊबहिण आहोत.
माझ्या घरच्यांचा यावर अजिबात विश्वास नाही. त्यांच्याकडून लग्नासाठी पूर्ण होकार आहे. परंतु मुलीकडच्यांची सहमती नाही. दुसरीकडे कुठे तरी लग्नासाठी ते मुलीवर दबाव आणत आहेत. पण मुलगी मात्र अडून बसली आहे की लग्न करणार तर माझ्याशीच. नाहीतर मरून जाईन असं तिचं म्हणणं आहे. मला काही समजत नाही की काय करू?
मी मुलीच्या आई व मोठ्या बहिणीला भेटलो. आम्ही दोघं एकमेकांबाबत खूप गंभीर आहोत, आम्ही एकमेकांबरोबर खूप सुखी राहू तेव्हा आमच्या लग्नाला परवानगी द्या, असं समजवायचा प्रयत्न केला. परंतु त्या काहीच करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. समाज आमचं लग्न कधीच स्वीकारणार नाही. शेवटी याच समाजात त्यांना राहायचं आहे. समाजाच्या विरोधात त्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीचा मी पिच्छा सोडणं योग्य अन्यथा अघटित घडू शकतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन आम्ही लग्न करू शकत नाही. सांगा, आम्ही काय करावं?
एकतर आपण २१व्या शतकात जगतो आहे. आपण सुशिक्षित आहोत व स्वत:ला सुधारक मानतो. असं असूनही जात, गोत्र, जन्मकुंडली याच चक्रात अडकून आहोत. जेव्हा आंतरजातीय विवाहाचा मुद्दा समोर येतो, तेव्हा काही ना काही वाद जरूर होतो.
जन्मपत्रिकेत जर वधूवराचे गुण मिळाले तर विवाह यशस्वी होतात असं मानलं जातं. परंतु प्रत्यक्षात मात्र विवाह यशस्वी होण्यात या गोष्टींचं काहीही योगदान नाही. या अशा जुन्या गोष्टींच्या मोहात अडकवून ज्योतिष-पूजारी आपलं दुकान चालवत असतात. खरंतर लोक हे वास्तव जाणून असतात. पण समाजातील तथाकथिक ठेकेदारांच्या दादागिरीमुळे विरोध करायला घाबरतात.
आता तर तुम्ही फक्त २१ वर्षांचे आहात. तुम्ही लग्नासाठी वाट पाहू शकता. शक्यता आहे की तुमच्या दबावात येऊन उशीरा का होईना मुलीकडचे होकार देतील. जर कोणत्याही परिस्थितीत मुलीकडचे मानायला तयार नसतील तर तुम्ही कोर्ट मॅरेज करू शकता. एकदा लग्न झालं की थोड्या नाराजीनंतर ते तुम्हाला स्वीकारतील.
- मी एक विवाहित स्त्री आहे. माझ्या लग्नाला २ वर्षं झालीत. हे माझं दुसरं लग्नं आहे. पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर मी खूप दु:खी असायचे. कारण माहेरून मला कुणाचाच आधार नव्हता. अशात माझ्या नवऱ्याने मला मित्राप्रमाणे सांभाळून घेतलं आणि आमच्या मैत्रीचं रूपांतर केव्हा प्रेमात झालं कळलंच नाही. त्यांनी मग घरच्यांशी बोलून माझ्याशी विवाह केला. माझे पती मुसलमान व मी हिंदू आहे. लग्नानंतरचे ३-४ महिने चांगले गेले. त्यानंतर सासूच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती माझ्याशी नेहमी भांडते. नवऱ्याला मी याबाबत सांगते, पण तो आईला काहीही बोलत नाही. मी खूप चिंतेत असते.
पहिल्या विवाहातून मला दोन मुलं आहेत. ज्यांना पतिने घटस्फोटानंतर स्वत:जवळ ठेवून घेतलं आहे. मला त्यांची खूप आठवण येते. पण माझ्या नवऱ्याशी मी याबाबत काही बोलू शकत नाही. सतत बेचैन असते. वाटतं की दुसरं लग्न करून मी चूक केली. मी काय करू?
तुम्ही सांगितलं नाही की पहिल्या पतीशी तुमचा घटस्फोट का झाला, जेव्हा की तुम्ही दोन मुलांची आई आहात. शिवाय आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही मुलांचा विचार करायला हवा होता. पण तुम्ही आपल्या स्वार्थापायी त्यांचा तसूभरही विचार केला नाही. घटस्फोटाचे परीणाम सर्वात जास्त मुलांना भोगावे लागतात हे तुम्हाला समजायला हवं होतं.
शिवाय नवरा म्हणजे काही वस्तू नाही मनात आलं की बदलून टाका. विवाह म्हणजे तडजोड असते. ज्यात पतीपत्नींना स्वत:चे अहं बाजूला ठेवून ताळमेळ बसवावा लागतो. विशेषत: जेव्हा तुमच्यावर मुलांची जबाबदारी असते. तुमच्या बाबतीत असं वाटतं की तुम्ही आवेशात येऊन घाईघाईने निर्णय घेतला. एवढं करूनही दुसऱ्या लग्नातही तुम्ही सुखी नाही. म्हणजे की तुमच्या स्वभावातच काहीतरी खोट आहे. नातेसंबंध निभावून न्यायला शिका. हेच तुमच्यासाठी योग्य होईल. मुलांसाठी तुमचा जीव तगमगतो ते व्यर्थ आहे. याचा तुम्ही आधीच विचार करायला हवा होता. आता तर तुमच्या मुलांनाही तुम्हाला भेटायची इच्छा नसेल. शिवाय तुमचे पती व परिवार यांनासुद्धा तुमचा मूर्खपणा असह्य होईल.