* नसीम अंसारी कोचर
शकानुशतके समाजाने स्त्रीला सात पडद्यांमध्ये आणि चार भिंतीत जखडून ठेवले आहे. ती समाजाच्या तथाकथित ठेकेदारांनी स्त्रियांसाठी बनवलेल्या नियमांचे उल्लंघन तर करत नाही ना याकडे सतत लक्ष ठेवले गेले. तिच्या प्रत्येक मर्यादेची सीमा पुरुषाने ठरवली. तिच्या शरीराला आणि मनाला कधी कशाची गरज आहे, तिला किती आणि कधी दिले पाहिजे हे पुरुषांनी आपल्या सोयीनुसारच ठरवले. परंतु प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, हा दबाव आणि लादलेपण कधीतरी थांबणारच होते.
शिक्षणाने स्त्री सक्षम झाली. लोकशाहीने तिला उभे राहायला आधार दिला. आचार, विचार स्वातंत्र्य आणि आपले अधिकार जाणून घेण्याची संधी दिली. गेल्या अनेक दशकांमध्ये स्त्रीने कधी बंडखोर होऊन तर कधी घरातील अन्यायाला कंटाळून, कधी घरातील आर्थिक समस्येमुळे सबळ बनण्यासाठी चार भिंती तोडून बाहेरच्या जगात प्रवेश केला. गेल्या दोन शतकांत आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासोबतच स्त्री वैचारिक पातळीवरही खूप प्रगल्भ झाली आहे. तिला केवळ एक शरीर म्हणून नाही तर माणूस म्हणून ओळख मिळाली आहे.
बेडयांतून मुक्त स्त्री देह
आजची स्त्री आपल्या इच्छा व्यक्त करायला संकोचत नाही. ती तिच्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम भोगायलाही तयार आहे. आपली पर्सनॅलिटी आणि समजूतदारपणा यांमुळे ती अशी दारेही आपल्यासाठी उघडत आहे, जी आजपर्यंत तिच्यासाठी बंद होती. सर्वात मोठी क्रांती तर शरीराच्या पातळीवर झालेली आहे. स्त्री देह ज्यावर पुरुष शतकानुशतके स्वत:चा अधिकार मानत आला आहे, त्या आपल्या देहाला तिने त्याच्या नजरेच्या बेडयांतून मुक्त केले आहे.
तिच्या शरीराला जखडू पाहणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक मर्यादांना तिने झुगारून दिले आहे. आता ती आपल्या शारीरिक गरजांविषयी मुक्तपणे बोलते. आधी आपल्या इच्छा व्यक्त करायला संकोचणारी स्त्री आता बेडरूममध्ये खाली मान घालून राहण्याऐवजी आपल्या इच्छा बेधडक पुरुषांसमोर व्यक्त करून त्याला आश्चर्यचकित करून सोडत आहे.
तिचे बेडरूम दररोज नव्या उत्तेजनेने परिपूर्ण असते. लग्नाआधी सहमतीने सेक्स संबंध ठेवायलाही ती आता मागेपुढे पाहत नाही.
या नवीन स्त्रीची उन्मुक्त चाहूल अनेक दशकांआधीच लागली होती. विवाहाच्या असमान बंधनात कैद, नैतिक द्विधांनी त्रस्त आणि अपराधीपणाच्या भावनेने कंटाळून आता एका नवीन स्त्रीचे पदार्पण झाले आहे, जी आपले भविष्य स्वत: लिहिते, स्वत:च वाचते, जी आपल्या पसंतीचे कपडे परिधान करून रात्री उशीरापर्यंत पार्टी अटेंड करते. मोठमोठी स्वप्ने पाहते आणि ती पूर्ण करण्याची हिंमतही बाळगते.
माझे आयुष्य माझ्या अटी
एका सर्व्हेनुसार २००३ साली जेव्हा पोर्न पाहण्याची सवय फक्त ९ टक्के महिला कबूल करत होत्या, तिच संख्या आज ४० टक्के इतकी वाढली आहे. आता स्त्री आपल्या इच्छा आकांक्षांचा बळी देत नाही तर ती विनासंकोच आपल्या प्रेमी सोबत लग्नाआधीही शारीरिक संबंध प्रस्थापित करते. आता हे तिच्या इच्छेवर अवलंबून असते की एखाद्या पुरुषाशी लग्न करावे की नाही. तसेच तिने आई कधी बनायचे हेही तिच ठरवते. जर तिला विवाह बंधनात अडकायचे नसेल तर त्याशिवायही ती तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आई होण्यासाठी स्वतंत्र असते.
आजची स्त्री आपल्यावर झालेल्या अन्यायावरही बोलते. छेडछाड, लैंगिक छळ, हिंसा, बलात्कार यासाठी ती स्वत:ला दोषी समजत नाही. उलट ज्याने हा गुन्हा केला आहे त्याला गजाआड करण्याची हिंमतही बाळगते. ‘मी टू’ कॅम्पेन याचे ताजे उदाहरण आहे. इंटरनेट सेवांनी स्त्रीला खूप सपोर्ट दिला आहे तर सोशल मिडियाने तिला आपल्या भावना व्यक्त करायला एक प्लॅटफॉर्म दिला आहे.
स्त्री आणि पुरुष दोघेही थोडयाफार फरकाने एकमेकांविषयी समान वासनेने प्रेरित असतात. आपल्या शारीरिक सौंदर्याची जाणीव आजच्या स्त्रीला पुरेपूर आहे आणि ते सौंदर्य अधिकच खुलवण्याचा ती क्षणोक्षणी प्रयत्न करत असते. आपल्या या सामर्थ्याचा वापर कधी, कुठे आणि किती करायचा हेही ती जाणते.
वर्कप्लेसवर बॉसला खुश करून नोकरीत बढती मिळवणे यासाठी तिचे शरीर हे तिचे खास शस्त्र बनले आहे. मिडिया इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री, टीव्ही किंवा मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्त्रीचे शरीर हे तिच्या टॅलेंटपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरू लागले आहे आणि तिच्या यशाचे मार्ग उघडणारे ठरू लागले आहे. पुढे जाण्यासाठी सेक्सचा वापर करणे यात आता तिला काही गैर वाटत नाही. या लैंगिक स्वातंत्र्यामुळे स्त्रीला पुरुषाच्या समान पातळीवर तर कधी त्याच्यापेक्षाही वरचढ ठरवले आहे.
समाजाने आता हे सत्य मानलेच पाहिजे की सेक्सची जितकी गरज आणि महत्त्व पुरुषासाठी आहे, तितकेच ते स्त्रीसाठीही आहे. जर पुरुष आपल्या पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीशी संबंध बनवू शकतो, विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करू शकतो आणि आनंदी राहू शकतो तर एक स्त्री असे का करू शकत नाही? स्त्रीने का एकाच पुरुषासोबत आयुष्यभर जबरदस्तीने बांधून घ्यावे? का तिने आपल्या इच्छेविरुद्ध त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण कराव्यात? जर तिचा पती तिच्या भावनात्मक आणि शारीरिक गरजा पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असेल तर तिला दुसऱ्या पुरुषासोबत नाते जोडण्याचा अधिकार का नसावा?
ही चिंतेची बाब आहे की तनुश्री दत्ता नंतर जी प्रकरणे ‘मी टू’समोर आली, त्या एकातही छळवणूक करणाऱ्या पुरुषाने असे म्हटले नाही की स्त्रीने स्वत:ला समर्पित केले होते. ते असेच म्हणत राहिले की असे काहीही घडले नाही.
सुरक्षित आर्थिक भविष्य
आर्थिक स्वातंत्र्याने स्त्रीला पुरुषाच्या गुलामीतून मुक्त केले आहे. तिच्यातील उत्साह आणि सौंदर्य वाढवले आहे. आज त्यांची सुंदर शरीरे आणि लोभसवाणे चेहरे वर्कप्लेसला फ्रेशनेस देत आहेत. आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत स्त्रिया वर्कप्लेसवर अधिक खुश दिसून येतात. आजचे वास्तव हे आहे की स्त्रीला सुरक्षित आर्थिक भविष्य आणि समाधानकारक नात्यांचे वातावरण जसे आज लाभत आहे, ते पूर्वी कधीच नव्हते.
स्त्रीच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च न्यायालयानेही खूप सपोर्ट केला आहे. मग ते लिव्ह इन रिलेशनशिप असो की विवाहबाह्य संबंध असोत, न्यायालयाने नेहमीच स्त्रीच्या बाजूनेच सर्व निर्णय दिले आहेत. यामुळे स्त्रियांमध्ये जोशाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. बंधनाना तोडत ताज्या हवेत श्वास घेणारी स्त्री आपल्या सुरक्षेप्रति खूप जागरूक बनली आहे.
‘मी टू’ कॅम्पेन याचे ताजे उदाहरण आहे. १०-२० वर्षांपूर्वी ज्या स्त्रिया त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचाराविरुद्ध समाज बंधने आणि आर्थिक दृष्टया विशेष सक्षमता नसल्याने नाईलाजाने गप्प राहिल्या होत्या, आज सोशल मिडियावर आपली ही वेदना ठासून व्यक्त करत आहेत. कायदेशीररित्या एफ आय आरला नोंदवत आहेत आणि आरोपींना गजाआड करण्यासाठी कायदेशीर लढाई लढायलाही तयार आहेत.
पुरुषांना असे वाटते की स्त्रियांसोबत त्यांनी काहीही केले, तरी आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्या तोंड उघडणार नाहीत. काहींना सेक्सच्या बदल्यात पद किंवा पैसा देऊन त्यांना असे वाटू लागले होते की प्रत्येक स्त्री देह हा विकाऊ आहे. प्रत्येक स्त्री ही गायीसारखी आहे जेव्हा वाटले तेव्हा तिचा फायदा घेतला आणि जेव्हा वाटले तेव्हा लाथाडले.
हा ‘मीटू’ कॅम्पेनचाच परिणाम आहे, ज्यामुळे देशाचे तत्कालिन परदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांना न केवळ आपले पद गमवावे लागले, पण जगभरात त्यांचे नाव खराब झाले. त्यांच्या वाह्यात अपराधी कृत्यांमुळे राजकीय आणि मिडिया जगत दोन्हीही लाजिरवाणे झाले आहेत.
जागरूक आहे अर्धी लोकसंख्या
आज स्त्री ही आपल्या स्वातंत्र्याविषयी जागरूक तर आहेच, पण आपल्या विरोधात घडणाऱ्या अपराधांविषयीही ती तितकीच जागरूक आहे. यामुळे पुरुषांमध्ये भय निर्माण झाले आहे. कामाच्या ठिकाणी, घरात, पार्टीमध्ये, सार्वजनिक ठिकाणी आधी जिथे महिलांसोबत छेडछाड आणि अश्लील चाळे करणे हे पुरुष आपला जन्मसिद्ध अधिकार मानत होते आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसे, आता तो काळ गेला आहे. आता त्याला आपल्या चुकीच्या कृत्यांकरता एक्स्पोज केले जाते. त्याच्या विरोधात कायदेशीर खटला चालवला जाऊ शकतो. त्याला शिक्षा होऊ शकते आणि हे सर्व अशामुळे होते की स्त्री आता जागरूक झाली आहे.
जेव्हा शारीरिक संबंधांमध्ये स्त्रीची इच्छा ही ग्राह्य धरली जाईल, तेव्हा हे अपराधाच्या चौकटीतून बाहेर पडून आनंदाची परिसीमा गाठेल. ज्या दिवशी स्त्रीच्या ‘होय’चा अर्थ ‘होय’ आणि ‘नाही’चा अर्थ ‘नाही’ हे पुरुषांच्या लक्षात येईल, त्यादिवशी स्त्रीपुरुष संबंध या विश्वात नवीन परिभाषा रचतील आणि सुंदर रूपात समोर येतील.
देहाच्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे जे सहमतीने होते त्याच्यासाठीच प्रेम आहे. स्त्री हे काही खेळणे नाही जिच्याशी तुम्ही खेळाल आणि सोडून निघून जाल.