* डॉ. यतीश अग्रवाल
प्रश्न : मी ४१ वर्षीय महिला आहे. मला २ मुलगे आहेत. दीर्घ काळापासून माझ्या गर्भाशयात २ छोटे-छोटे फायब्रॉइडच्या गाठी आहेत. पण नुकतेच माझे अल्ट्रासाउंड झाले, तेव्हा कळले की, या फायब्रॉइड्सची साइज वाढून २.५ सेंटीमीटर झाली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, माझी इच्छा असेल गर्भपिशवी काढताही येईल. परंतु त्यांच्या असण्याने मला कोणताही त्रास नाहीए. तरीही भीती वाटते की काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत. कृपया सांगा मी काय करू?
उत्तर : फायब्रॉइड महिलांच्या गर्भाशयात होणाऱ्या सामान्य गाठी आहेत. अल्ट्रासाउंड केल्यानंतर जवळपास ४० टक्के महिलांच्या गर्भाशयात या गाठी आढळून येतात. काही महिला जसं की आपल्या केसमध्ये या गाठी छोट्या-छोट्या आहेत आणि काहींमध्ये तर या फूटबॉलएवढ्या मोठ्याही असतात.
जोपर्यंत फायब्रॉइडमुळे मासिकपाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या निर्माण होत नसेल, एखाद्या महिलेला मूल हवंय आणि फायब्रॉइडमुळे ही इच्छा पूर्ण होण्यात अडचण येत नसेल किंवा फायब्रॉइड्समुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत नसतील उदा. गाठ आपल्या स्थानी चक्रासारखी फिरणे आणि रक्तपुरवठा भंग होण्यासारख्या इमर्जेन्सी उत्पन्न होत नसतील किंवा या गाठी खूप मोठ्या झाल्याने ब्लॅडर दबणे अथवा मलाशय दबल्यामुळे कोणती समस्या निर्माण होत नसेल, तर तिला तिच्या स्थितीवर सोडून देण्यातच शहाणपण आहे.
सध्या तुमचे जे वय आहे, ते पाहता या गाठींना सहजपणे कोणतीही छेडछाड न करता सोडता येऊ शकते. विशेषत: अशा स्थितीत जेव्हा आपले कुटुंब पूर्ण झाले असेल आणि या गाठी असण्याने आपल्याला कोणताही त्रास नसेल.
जसजसे आपले वय वाढेल आणि आपली रजोनिवृत्ती होईल तसेच आपल्या शरीरात लैंगिक हार्मोन्सचे प्रमाण घटत जाईल, तसतशा या गाठी आपोआपच आकुंचन पावत जातील.
प्रश्न : मी २६ वर्षांची आहे आणि मला गर्भावस्थेचा तिसरा महिना चालू आहे. मला सकाळी उठताच उलट्या होण्याचा त्रास चालू आहे. चक्कर येते आणि अशक्तपणाही जाणवतो. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी ग्लुकोजच्या बॉटलची ड्रीपही लावली, परंतु त्यामुळेही काही फायदा झाला नाही. काहीतरी असा उपाय सांगा, ज्यामुळे त्रास दूर होऊ शकेल.
उत्तर : गर्भधारणा झाल्यानंतर महिलेच्या शरीरात एकाच वेळी खूप सारे बदल होतात. त्यात हार्मोनल फेरबदलही सामील आहेत. त्यामुळे उलटीचा त्रास होतो. हे लक्षण साधारणपणे गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात सुरुवातीच्या काळात दिसते. याची तीव्रता एखाद्या महिलेमध्ये कमी तर एखादीमध्ये जास्त असते. एखादीला थोडाशीच मळमळ होते, कोणाला जास्त उलट्यांचा त्रास होतो. परंतु बहुतेक महिलांमध्ये हा त्रास चौथा-पाचवा महिना उलटल्यानंतर आपोआपच दूर होतो.
तोपर्यंत आराम मिळवण्यासाठी आपण काही छोटे-छोटे उपाय करू शकता. जर उलट्या सकाळीच जास्त होत असतील, तर सकाळी अंथरुणावरून उठण्यापूर्वी एक सुका टोस्ट किंवा बिस्कीट खा. आपण आपल्या खाण्यापिण्यात बदल केल्यास उत्तम होईल.
खाण्याच्या काही पदार्थ किंवा वासामुळे मळमळत असेल, तर त्या पदार्थांपासून लांब राहा. गर्भावस्थेत गंधाबाबत संवेदनशीलता वाढते. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी गरमागरम पदार्थ खाण्याऐवजी थंड पदार्थ खाणे योग्य ठरते. कारण थंड पदार्थांमध्ये सुगंध कमी जाणवतो.
जिथे चक्कर येणे आणि अशक्तपणा वाटण्याची गोष्ट आहे, तिथे डॉक्टरांकडूनच तपासणी करून घेणे उत्तम असते. याचा संबंध रक्ताची कमतरता आणि ब्लड प्रेशर कमी होणे याच्याशीही असू शकतो. गर्भातला भ्रुणाच्या वाढीसाठी कॅलरीज, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी गर्भवतीने आपल्या खुराकाकडे लक्ष देणे आवश्यक असते. जर एखाद्या पोषक तत्त्वाच्या कमतरतेबाबत कळले तर ती पूर्ण करण्यासाठी डॉक्टर गोळी, कॅप्सूलही देऊ शकतात.
प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला दर १५ दिवसांनी पाळी येते. डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी औषध दिले. ते घेतले की आराम मिळतो, पण ते सोडले तर पुन्हा मासिक चक्र १५ दिवसांचे होते. हे एखाद्या गंभीर रोगाचे लक्षण तर नाही ना?
उत्तर : किशोरावस्थेत सुरुवातीच्या काळात हार्मोनल असंतुलनामुळे मासिकपाळीची वेळ अनियमित होणे सामान्य गोष्ट आहे. कमी दिवसांच्या अंतराने पुन्हा-पुन्हा रक्तस्त्राव झाल्यास नक्कीच त्रास होत होतो. त्यामुळे मनही शंकाकुल होते.
अशा वेळी हेच योग्य ठरेल की हा शरीर परिपक्व होण्याच्या शारीरिक क्रियेचा सामान्य भाग मानून स्वत:हून ही गोष्ट सामान्य होण्यास वेळ द्या. यामुळे विचलित होऊ नका किंवा आपल्यात अशी धारणा निर्माण होऊ देऊ नका की आपल्याला एखादा रोग झाला आहे. रजस्वला झाल्यानंतर काही वर्षांत बहुतेक किशोरींचे देह आपोआपच मासिक पाळीचे चक्र नियमित करतात.
तरीही एखाद्या तरुणीला धीर नसेल किंवा तिच्या शरीरात रक्ताची खूप कमी आली असेल, तर डॉक्टरांना भेटा. ते लैंगिक हार्मोन्सच्या गोळ्या देऊन चक्राचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या डॉक्टरांनीही असेच केले, पण हा प्रयत्न अनेक महिन्यांपर्यंत पुन्हा-पुन्हा करण्याची आवश्यकता असते.
जोपर्यंत मासिक पाळी नियमित होत नाही, तोपर्यंत लैंगिक हार्मोन्सच्या गोळ्या घेणे आवश्यक ठरू शकते. दुसरा पर्याय हा आहे की आपण आपल्या शरीराला स्वत:हून त्याची नियमितता स्थापित करू द्यावं.
आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. सातत्याने रक्तस्त्राव झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता येणे स्वाभाविक आहे. यापासून वाचण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमितपणे आयर्न आणि फोलिक अॅसिडच्या गोळ्या घ्या आणि आहारात लोहयुक्त पदार्थ, हिरव्या भाज्या आणि प्रोटीन घ्या.