* गरिमा पंकज
लंच टाईममध्ये पुनीताच्या जेवणाचा डबा उघडताच ऑफिसमध्ये सर्व खूष व्हायचे. तिचा डबा सर्व महिलांच्या आकर्षणाचे केंद्र असायचा, कारण त्यात नेहमीच विविध प्रकारचे चवदार पदार्थ असायचे. सर्वांना आश्चर्य वाटायचे की ती सकाळीच इतके सर्व कसे काय बनवते.
मग एके दिवशी पुनीताने यामागचे कारण सांगितले आणि म्हणाली, ती हे सर्व बनवत नाही, तर तिची बहीण बनवते. हे ऐकून महिलांमध्ये कुजबूज सुरू झाली. विभाने थेट प्रश्नच विचारला, ‘‘बहीण तुझ्याबरोबर सासरी राहाते का?’’
पुनीताने हसत उत्तर दिले की, ‘‘ती माझी सख्खी बहीण नाही, लहान जाऊ आहे, पण माझ्यासाठी बहिणीपेक्षाही खूप काही आहे. तिच रोज माझ्यासाठी आणि मुलांसाठी टिफिन बनवते.’’
हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. ‘‘तिच्याकडे एवढा वेळ असतो? ती नोकरीला जात नाही का?’’
‘‘हो, ती नोकरीला जात नाही, पण सर्व घर सांभाळते. आमच्या सर्वांची लाडकी आहे. ती नसती तर मी इतक्या सहजी नोकरी करू शकले नसते.’’
‘‘छान, ही फारच चांगली गोष्ट आहे. आजच्या जगात कोण दुसऱ्यासाठी एवढे करते?’’ विभा म्हणाली.
‘‘दुसऱ्याचे आणि आपले असे काही नसते. ज्याला आपले मानतो तिच व्यक्ती आपल्यासाठी सर्व काही असते. एक बहीण माहेरी असेल तर एक सासरीही असू शकते,’’ असे म्हणत पुनीता हसली.
पुनीता एकत्र कुटुंबात राहात होती आणि लहान जावशी तिचे चांगले संबंध होते. पुनीताच्या पतिचे निधन झाले होते, पण या कुटुंबाने तिला कधीच ती एकटी पडल्याचे जाणवू दिले नाही. संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभे राहिले.
आज बहुसंख्य विभक्त कुटुंबं पाहायला मिळतात, पण जर तुम्ही एकदा एकत्र कुटुंबात राहाल तर कधीच वेगळे राहण्याचा हट्ट करणार नाही. परिस्थितीमुळे आज वेगळे राहिले जाते. महानगरांमध्ये कुटुंबाचा अर्थ पती-पत्नी आणि मुले असाच होऊन गेला आहे.
एकत्र कुटुंब विरुद्ध एकटे कुटुंब
अलीकडेच, चित्रपट दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या एका ट्विटने एकत्र कुटुंब विरुद्ध एकटे कुटुंब यातील वादाला तोंड फोडले, जेव्हा त्यांनी सोशल मिडियावर लिहिले, ‘‘आपण आपल्या जीवन पद्धती म्हणजेच एकत्र कुटुंबात परत यायला हवे. सर्व प्रकारची मानसिक असुरक्षितता, एकटेपणा आणि औदासिन्य टाळण्यासाठी कदाचित हा एकमेव मार्ग असेल. कुटुंब नावाची छत्री आपल्या मनाला सुरक्षिततेची भावना देते.’’
यावर मीटू कार्यकर्त्या आणि पत्रकार रितुपर्णा चॅटर्जी यांनी लिहिले, ‘‘हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी अतिशय जवळून एक एकत्र कुटुंब पाहिले आहे, जिथे महिलांच्या श्रमांचे शोषण केले जाते. महिला एकमेकींविरोधात उभ्या ठाकतात.’’
अर्थात, कोणत्याही गोष्टीला चांगली आणि वाईट दोन्ही बाजू असतात. आपल्याला जर संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा आणि प्रेम हवे असेल तर आपण काही तडजोडी करायला तयार असले पाहिजे. पण एकंदर विचार केल्यास, अशा एकत्र कुटुंबांत राहण्याचे फायदे नुकसानापेक्षा अधिक असतात. जेव्हा घरात बरेच लोक असतात, तेव्हा खटके उडणे आणि स्वत:ला चांगले सिद्ध करण्यासाठी स्पर्धा लागणे, हे स्वाभाविक आहे. पण या बदल्यात मनाला जो आनंद मिळतो, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. कुटुंबातील महिलांची स्थिती कशी असेल आणि त्यांचे शोषण होईल की नाही हे मोठया प्रमाणावर महिलांची आर्थिक स्थिती आणि घरातील इतर महिलांच्या वृत्तीवर अवलंबून असते.
एकत्र कुटुंबात राहाण्याचे तसे तर बरेच फायदे आहेत, पण आम्ही तुम्हाला काही खास फायदे सांगतो :
वस्तू शेअर करण्याची सवय : एकत्र कुटुंबात राहणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. येथे तुम्ही वस्तू शेअर करायला शिकता. आपल्या वस्तू इतरांशी शेअर करून आनंद घेण्याची मजा तुम्ही लहानपणापासूनच शिकता. तुम्हाला याचा फायदाही होतो. एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल पण घरातील इतर सदस्याकडे असेल तर ती तुम्हाला सहज मिळते. कधी आयुष्यात असाही प्रसंग येतो, जेव्हा मोठे आर्थिक संकट येते, पण एकत्र कुटुंबाच्या आधारावर तुम्ही त्यातून सहज बाहेर पडू शकता.
नुकसान कमी होते : एका संशोधनानुसार वेगळे राहणाऱ्यांच्या सामग्रीचे ५० टक्क्यांपर्यंत जास्त नुकसान होते. एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वात मोठा फायदा असा की तुम्ही कुठल्याच गोष्टी वाया घालवत नाही. जे एकटे राहातात ते वीज, गॅस, पाणी आदी जास्त खर्च करतात. घरात खूप माणसे असतील तर खर्चही विभागला जातो.
कमी तणाव : एकटे राहणाऱ्याला जीवनात जास्त तणावाचा सामना करावा लागतो, पण एकत्र कुटुंबात लोक अधिक सुखी राहतात. एकत्र राहण्याचा हादेखील फायदा आहे की तुम्ही अधिक सुदृढ आणि आनंदी राहता कारण तुम्ही तुमचे सुख-दु:ख इतरांशी वाटून घेऊ शकता.
संरक्षक भिंत : एकत्र कुटुंबात जर पती बाहेरख्याली असेल किंवा पत्नीला मारझोड करत असेल तर अशावेळी कुटुंबातील इतर सदस्य त्याला समजावतात. अशा परिस्थितीत एकत्र कुटुंब महिलांसाठी संरक्षक भिंतीसारखेच काम करते.
पालनपोषणासाठी उपयुक्त : मुलांच्या पालनपोषणासाठी एकत्र कुटुंबातील वातावरण चांगले समजले जाते. मुले आजी-आजोबा, आत्या, काका यांच्या सहवासात कधी मोठी होतात हे कळतदेखील नाही. मुलांच्या मानसिक विकासासाठीही एकत्र कुटुंब उत्तम ठरते.
एकत्र कुटुंबात कसे जुळवून घ्याल
कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी कायम राहावी यासाठी सर्वात गरजेचे आहे की आपल्या मुलांना मोठयांचा आदर करायला शिकवा. हे केवळ मुलांसाठीच लागू होत नाही तर घरातील सर्वच सदस्यांनी मोठयांचा आदर करायला हवा, जेणेकरून कुटुंबरुपी मणी एका माळेत व्यवस्थित गुंफून राहातील.
मुलांसमोर कधीच कोणाला ओरडून बोलू नका. जसे घरातील वातावरण असेल त्याचप्रमाणे मुले शिकतात. मुलांना नेहमीच मोठयांसमोर विनम्र आणि लहान मुलांशी संवेदनशीलपणे वागायला शिकवा. स्वत:ही तसेच वागा.
विभक्त कुटुंबात मुलांचे गरजेपेक्षा जास्त लाड होतात. यामुळे ती हट्टी होऊ शकतात. शक्य तेवढे आपल्या मुलांना पाय जमिनीवरच ठेवून चालायला शिकवा.