* गरिमा पंकज

सकाळचे आठ वाजले आहेत. घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत. शाळेची बस कधीही येऊ शकते. घरातील वातावरण तणावपूर्ण आहे. तितक्यात मोठा मुलगा आतून बाबांना आवाज देतो कि त्याला शाळेचे मोजे सापडत नाहीत. इकडे बाबा ना-ना-चा पाढा वाचणाऱ्या चिमूरडीला नाश्ता भरवण्यात मग्न आहेत. त्यानंतर त्यांना मुलाचा लंचबॉक्स भरायचा आहे. मुलाला शाळेत पाठवून मुलीला अंघोळ घालायची आहे आणि घराची स्वच्छताही करायची आहे.

हे दृश्य आहे एका अशा घरातील, जिथे पत्नी नोकरी करते आणि पती घर सांभाळतो. अर्थात तो हाउस हसबंड आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतं हे, पण हे वास्तव आहे.

पुराणमतवादी आणि मागास मानसिकतेच्या भारतीय समाजामध्येही  पतींची अशी नवी जमात उदयास येत आहे. ते जेवण बनवू शकतात. मुलांना सांभाळू शकतात आणि घराची स्वच्छता, भांडीधुणी अशी घरगुती कामेही व्यवस्थित पार पाडू शकतात.

हे सामान्य भारतीय पुरूषांप्रमाणे विचार करत नाहीत. कुठल्याही कटकटीशिवाय बिछाना घालतात आणि मुलांचे नॅपीसुद्धा बदलतात. समाजातील हा पुरूष वर्ग पत्नीला समान दर्जा देतो आणि गरज भासल्यास घर आणि मुलांची जबाबदारी घेण्यासही तत्पर असतात.

तसे तर जुनाट मनुवादी भारतीय अजूनही अशा हाउस हसबंडना नालायक आणि पराभूत पुरूष समजतात. त्यांच्यामते घरकुटुंब, मुलांची काळजी घेणे ही नेहमीच स्त्रीची जबाबदारी असते आणि पुरूषांचे काम आहे बाहेरील जबाबदाऱ्या स्विकारणे आणि कमावून आणणे.

अलीकडेच हाउस हसबंड या संकल्पनेवर आधारित एक चित्रपट आला होता, ‘का एंड की’ करीना कपूर आणि अर्जुन कपूर अभिनीत या चित्रपटाचा मूळ विषय होता लिंग आधारित कार्यविभाजनाच्या विचारसरणावर टीका करत पतिपत्नींच्या कामाची अदलाबदली करणे.

लिंग समानतेचा काळ

हल्ली स्त्रीपुरूषांच्या समानतेच्या गप्पा रंगतात. मुलांबरोबरीनेच मुलीसुद्धा शिकून उच्चपदावर पोहोचत आहेत. त्यांची स्वत:ची स्वप्नं आहेत, स्वत:ची योग्यता आहे. या योग्यतेच्या बळावर ते उत्तम असा पगार मिळवत आहेत आणि अशात लग्नानंतर वर्किंग जोडप्यांना मूल होतं, तेव्हा अनेक जोडपी भावी समस्या आणि शक्यतांचा विचार करून कुणासाठी दोघांपैकी कुणासाठी नोकरी महत्त्वाची आहे हे समजून घेतात. अशाप्रकारे परस्पर संमतीने ते आर्थिक आणि घरगुती जबाबदाऱ्या विभाजित करून घेतात.

हा व्यवहार्य विचार गरजेचा आहे. जर पतिपत्नीची कमाई अधिक आहे. करिअरसाठी तिची स्वप्नं आकांक्षा जर जास्त प्रबळ असतील तर अशावेळी कमावते असण्याची भूमिका पत्नीने स्विकारली पाहिजे. पती पार्टटाइम किंवा घरातून काम करत कुटुंब व मुलांना सांभाळण्याचे काम करू शकतो. यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवावं लागत नाही तसेच त्या पैशांचीही बचत होते, जे पाळणा घरात किंवा मोलकरणीला द्यावे लागतात.

हाउस हसबंडची भूमिका

हाउस हसबंड म्हणजे असे नाही की पती पूर्णपणे पत्निच्या कामावरच अवलंबून राहिल किंवा पूर्णपणे गुलाम बनून जाईल. तर घरातील काम व मुलांना सांभाळण्यासोबतच तो कमावूसुद्धा शकतो. हल्ली घरातून काम करण्याच्याही बऱ्याच संधी उपलब्ध असतात. आर्टिस्ट, रायटर हे त्यांचे काम घरीच व्यवस्थितरित्या करू शकतात. पार्टटाइम काम करणेही शक्य आहे.

सकारात्मक बदल

बराच काळ महिलांना गृहिणी बनवून सतावले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांची अवहेलना करण्यात आली आहे. आता काळ बदलत आहे. एका पुरूषाने स्वत:च्या करिअरचा त्याग करून पत्नीला स्वत:ची स्वप्नं पूर्ण करू देण्याची संधी देणे समाजात वाढती समानता आणि सकारात्मक बदलाचा संदेश आहे.

एकमेकांप्रति आदर

जेव्हा पतिपत्नी कर्ते असण्याची पारंपरिक भूमिका आपसात बदलतात, तेव्हा ते एकमेकांचा अधिक सन्मान करतात. ते जोडिदाराच्या त्या जबाबदाऱ्या आणि कामाचा दबाव अनभवू शकतात, जो त्या भूमिकांसोबत येतो.

पुरूष एकदा का घरगुती काम आणि मुलांचे संगोपन करू लागतो तेव्हा आपोआपच त्याच्या मनात महिलांसाठी आदर वाढतो. महिलासुद्धा अशा पुरूषांना अधिक मान देतात, जे पत्नीच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान देतात आणि कुठलाही भेदभाव करत नाहीत.

जोखीमही कमी नाही

समाजाचे टोमणे : मागास आणि बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक आजही हे स्विकारू शकत नाहीत की पुरूषाने घरात काम करावे व मुलांना सांभाळावे. अशा पुरूषांना बायकोचा गुलाम म्हटल्याशिवाय त्यांना राहवत नाही. स्वत: चेतन भगतनेही मान्य केले होते की त्यांनाही अशा प्रश्नांना तोंड द्यावे लागले, जे सामान्यत: अशा पुरूषांना ऐकावे लागतात. उदा ‘अच्छा तर तुमची पत्नी कमावते?’ ‘घरातील कामे करताना कसे वाटते तुम्हाला? इ.’

पुरूषाचा अहंकार दुखावणे : अनेकदा परिस्थितीमुळे किंवा वैयक्तिक असफलतेमुळे पुरूष जर हाउस हसबंड झालाच तर तो स्वत:ला कमकुवत आणि हीन समजू लागतो. त्याला असे वाटू लागते की त्याच्या कर्तव्यात (कमाई किंवा घर चालवणे) तो अयशस्वी होत आहे आणि पुरूषाने जे केले पाहिजे ते कार्य तो करत नाहीए.

मतभेद : स्त्री बाहेर जाऊन जेव्हा पैसे कमावते आणि पुरूष जेव्हा घरी राहतो, तेव्हा इतरही अनेक बाबी बदलतात. साधारणत: कमावणाऱ्यांच्या विचारांना प्राधान्य दिले जाते. त्याचाच आदेश घरात चालतो आणि अशावेळी स्त्रिया अशा बाबींवरही कंट्रोल करू लागतात, ज्यावर पुरूषांना अॅडजस्ट करणे कठिण असते.

सशक्त आणि पुरूषार्थावर विश्वास ठेवणारा पुरूष या बाबीकडे दुर्लक्ष करू शकतो की लोक त्याच्याबद्दल काय म्हणत आहेत. असे पुरूष आपल्या मनाचे ऐकतात, समाजाचे नाही.

स्त्रीपुरूष संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत. आर्थिक आणि घरातील जबाबदाऱ्या त्या दोहोंमधील कुणी कुठली जबाबदारी घ्यायची आहे हे उभयतांनी आपसात ठरवायला हवे. समाजाने त्यात नाक खुपसणे चुकीचे आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...