* सोमा घोष
लहानपणापासूनच क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करायचं स्वप्न पाहणारी मराठी अभिनेत्री मोनालिसा बागल ‘झाला बोभाटा’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रसिद्ध झाली. लहान वयातच तिचे वडील आणि आता वर्षभरापूर्वीच तिची आई मीनाक्षी राजेश बागल यांचं निधन झालं. मोनालिसा आता तिची मोठी बहीण अश्विनी बागलसोबत मुंबईत राहते, तिची बहीणदेखील मराठी चित्रपटात अभिनय करते. अभिनयाव्यतिरिक्त मोनालीसाची एक सिनेवितरक कंपनीदेखील आहे, हा सर्व डोलारा ती स्वत: सांभाळते. तिच्याशी तिच्या एकूण प्रवासाबद्दल बोलणं झालं. सादर आहेत याचे खास अंश :
अभिनयाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती या क्षेत्रात नाहीए. मात्र, माझ्या आईला अगदी लहानपणापासून अभिनयाची आवड होती, मात्र कुटुंबियांच्या दबावामुळे तिला काम करता आलं नाही. तिची ही आवडच मला या क्षेत्रात घेऊन आली आणि आज मी जी काही आहे ती तिच्यामुळेच होऊ शकले.
कुटुंबीयांचं किती सहकार्य मिळालं?
माझा पहिला चित्रपट आल्यानंतरदेखील मी या क्षेत्रात येण्याबद्दल काही ठरवलं नव्हतं. मी माझं शिक्षण लोणावळामध्ये पूर्ण केलं आणि मी अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे मला चार्टड अकाउंटंट व्हायचं होतं. बारावीला असताना एके दिवशी मला चैतन्य देशमुख भेटले आणि त्यांनी माझा फोन नंबर घेऊन ठेवला. काही दिवसानंतर त्यांनी मला मराठी चित्रपटात अभिनयाची ऑफर दिली. मी अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना ऑडिशन दिली. त्यात मला सई ताम्हणकरच्या लहानपणीची भूमिका करायची होती. त्यावेळी मी १७ वर्षाची होती. माझी निवड झाली आणि माझ्या कामाचं कौतुकदेखील झालं. त्यानंतर मी अनेक चित्रपट केले, परंतु चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत.
अभिनयाचा प्रवास पुढे कसा सुरू झाला?
यादरम्यान अनेक मोठया चित्रपटातून मला नकार मिळाला. कारण म्हणजे माझी गावाकडची भाषा आणि माझी शारीरिक सुदृढता. यामुळे मला खूपच नैराश्य आलं होतं. असं वाटू लागलं की हे क्षेत्र माझ्यासाठी नाहीच आहे. परंतु माझी आई आणि मोठया बहिणीने मला समजावलं आणि अधिक प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. मी पुन्हा अभ्यासात मन रमवलं. मात्र काही दिवसातच मला दिग्दर्शक प्रदीप जगदाळेंचा फोन आला. एक टिनएजर मुलीची भूमिका होती. मी ऑडिशन दिली आणि निवड झाली. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मी सगळयांच्या नजरेत आली. हळूहळू मी पुढे जात राहिले.
पहिला ब्रेक केव्हा मिळाला?
मराठी चित्रपट ‘झाला बोभाटा’साठी मला पहिला ब्रेक मिळाला. यानंतर तर माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं. अलीकडेच मी एक वेब सिरीज आणि चित्रपट केलाय, जो प्रदर्शनासाठी तयार आहे. करंट चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरु आहे.
हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनय करण्याची इच्छा आहे का?
हिंदी चित्रपटासाठी मी स्वत:ला तयार करतेय. एखादी चांगली कथा मिळाली तर मी नक्कीच काम करेन. हिंदीमध्ये धर्मा प्रोडक्शन आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आहे.
कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतील?
सध्या माझ्याकडे अनेक चांगल्या स्क्रिप्ट येत आहेत आणि मला निवडक काम करायचं आहे, कारण लोकांनी मला लक्षात ठेवायला हवंय. याव्यतिरिक्त मला चांगल्या लोकांसोबत काम करायचंय, यामुळे बरंचसं शिकायची संधी मिळते.
अभिनयात यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं आहे?
अभिनयाच्या जगतात धैर्य आणि संयम यांची खूप गरज आहे. कोणतीही व्यक्ती सर्वगुण संपन्न नसते, परंतु जी प्रतिभा तुमच्यामध्ये आहे, ती जाणून घेऊन पुढे गेल्यास कधीच मागे पडणार नाही.
नेपोटीज्मचा कधी सामना करावा लागला का?
मला नाही अनुभव आला असा कधी. परंतु मी अनेकदा ऐकलंय की चित्रपट निर्माते त्यांच्या मुलांना अभिनय येत नसतानादेखील प्रमुख भूमिका देतात आणि चांगल्या कलाकाराला दुय्यम भूमिका करावी लागते. अशावेळी कलाकाराने तो या भूमिकेसाठी तयार आहे की नाही याचा स्वत: निर्णय घ्यायला हवा.
कोरोनाकाळात चित्रीकरण करणं किती कठीण आहे?
कोरोनाकाळात चित्रीकरण करणं खूपच कठीण होऊन राहिलंय. सर्व नियम आणि टेस्ट नंतरच काम करावं लागतंय. मलादेखील सर्वांना सांगायचंय की तुम्ही सर्वांनी मास्क घाला आणि गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी.
इंटिमेट सीन करताना तू किती सहज असतेस?
अजिबात सहज नसते, मी दोन चित्रपटात अधिक इंटिमेट सीन होते म्हणून सोडले आहेत. एका चित्रपटात मात्र मी इंटिमेट सीन मोठया मुष्किलीने दिला होता कारण मी त्यातील अभिनेत्याला ओळखत होती. आपण सहज नसू तर ते मोठया पडद्यावर दिसून येतं.
तू किती फॅशनबल आणि फुडी आहेस?
सुरुवातीला मी फक्त सलवार सूट घालायची, परंतु हळूहळू मला बदलावं लागलं. आता मी प्रसंगानुरुप पेहराव करते.
मी खूपच खाण्याची खूपच शौकीन आहे, परंतु महाराष्ट्रीयन पदार्थ अधिक आवडतात.
तुझ्या स्वप्नातील राजकुमार कसा असायला हवा?
मला आईवडिल नाहीएत आणि जबाबदाऱ्यादेखील अधिक आहेत. कोणावर फारसा विश्वास ठेवणं खूपच कठीण आहे. त्यामुळे माझं काम माझ्यासाठी सर्वकाही आहे.
उन्हाळयात तुझ्या त्वचेची निगा कशी राखतेस?
मी दररोज फेसवॉश वापरते. याव्यतिरिक्त त्वचा निरोगी असावी यासाठी घरी असल्यावरदेखील सनस्क्रीन लोशन लावते. खाण्यात द्रवपदार्थांचा अधिक समावेश करते, यामध्ये टरबूज खास आहे. व्हिटॅमिन सीदेखील घेते.
चाहत्यांना काय सांगशील?
माझी आई कायम सांगायची की आपल्याला एकच आयुष्य मिळतं, त्यामुळे जे काही ठरवलंय ते कर, परंतु कोणतंही काम शॉर्टकटने करू नकोस. हेच मला सगळया तरुणाईला सांगावंसं वाटतंय.
आवडता रंग – काळा आणि लाल.
आवडता पेहराव – सिल्क आणि कांजीवरम साडी.
आवडतं पुस्तक – छावा
(कादंबरी) लेखक – शिवाजी सावंत.
फावला वेळ मिळतो तेव्हा – गाणं, नृत्य आणि प्रवास.
आवडता परफ्यूम – धाराचे सर्व परफ्यूम्स.