* डॉ. मनीष पॉल

सनस्क्रीनला सनब्लॉक क्रीम, सनटॅन लोशन, सनबर्न क्रीम, सनस्क्रीनसुद्धा म्हणतात. ते लोशन स्प्रे किंवा जेलच्या रूपातही असू शकतं. सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांना शोषून घेऊन किंवा परावर्तित करून ते त्वचेचं सनबर्नपासून संरक्षण करतं. ज्या स्त्रिया सनस्क्रीनचा वापर करत नाहीत त्यांना त्वचेचा कॅन्सर होणाची अधिक शक्यता असते. नियमितपणे सनस्क्रीनचा वापर केल्याने सुरकुत्या कमी आणि उशिराने पडतात. ज्यांची त्वचा सूर्यप्रकाशापासून संवेदनशील असते त्यांनी रोज सनस्क्रीनचा वापर करावा.

एसपीएफ म्हणजे काय?

एसपीएफ हे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून सनस्क्रीनद्वारे उपलब्ध करून देणाऱ्या सुरक्षेचं मोजमाप आहे. परंतु सनस्क्रीन किती उत्तम प्रकारे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून संरक्षण करेल हे मात्र एसपीएफ मोजत नाही. त्वचारोगतज्ज्ञ एसपीएफ ३० वापरण्याचा सल्ला देतात. लक्षात ठेवा, अधिक एसपीएफ अधिक संरक्षण देत नाही.

सनस्क्रीन न लावण्याचे तोटे

सनस्क्रीन प्रत्येक ऋतूत लावलं पाहिजे. उन्हाळ्यात याचा वापर अत्यंत आवश्यक आहे. या ऋतूला त्वचारोगांचा काळ म्हणता येईल. याच ऋतूत रॅशेज, फोटो डर्मायटिस अधिक घाम येणं आणि फंगस व बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे बऱ्याच महिला त्रस्त असतात. उन्हाळ्यात थोडा वेळ उन्हात राहिल्यानेसुद्धा सनटॅन आणि सनबर्नची समस्या उद्भवते. टॅनिंग ही तर या ऋतूतील सर्वात सामान्य समस्या आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याआधी उत्तम दर्जाचं सनस्क्रीन अवश्य वापरावं.

ज्या स्त्रिया सनस्क्रीनचा वापर करत नाहीत त्यांची त्वचा अकाली वयस्कर दिसते, त्यावर सुरकुत्या पडतात. यूवी किरणांच्या अत्याधिक संपर्कामुळे ते कॅन्सरचं कारण ठरू शकतं.

सनस्क्रीन कसे निवडाल?

योग्य सनस्क्रीनची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. बहुतांश स्त्रियांसाठी एसपीएफ १५ युक्त सनस्क्रीन योग्य असतं. परंतु ज्यांच्या त्वचेचा रंग खूप हलका असतो, कुटुंबात त्वचेच्या कॅन्सरचा इतिहास असेल किंवा लुपूससारखा आजार असल्याने त्वचा संवेदनशील असेल तर त्यांनी एसपीएफ ३० असलेलं सनस्क्रीन वापरावं. आपल्याला जर वाटत असेल की एसपीएफ ३० असलेलं सनस्क्रीन एसपीएफ १५ असलेल्या सनस्क्रीनपेक्षा दुपटीने चांगलं असतं तर ते चुकीचं आहे. एसपीएफ १५ हे ९३ टक्के यूवीबीला फिल्टर करतं, तर एसपीएफ ३० त्याहून थोडे जास्त म्हणजे ९७ टक्के यूवीबीला फिल्टर करतं.

त्वचारोगतज्ज्ञांच्या मते कमीत कमी एसपीएफ ३० असलेलं सनस्क्रीन वापरावं. काही स्त्रिया एसपीएफ ५० असलेलं सनस्क्रीनसुद्धा लावतात. परंतु त्वचेला नुकसान देणाऱ्या यूवी किरणांपासून १०० टक्के सुरक्षा देणारे कोणतंही सनस्क्रीन बाजारात उपलब्ध नाही. नेहमी चांगल्या ब्रॅण्डचं सनस्क्रीन वापरावं. ज्यांना जास्त घाम येतो त्यांनी वॉटरप्रूफ किंवा स्वेटप्रूफ सनस्क्रीन वापरावं.

सनस्क्रीन कसं व किती प्रमाणात वापरावं?

जर आपण सनस्क्रीनचा नियमित आणि योग्य प्रकारे वापर केला नाही, तर चांगलं सनस्क्रीन वापरूनही विशेष उपयोग होणार नाही. त्याविषयी काही सूचना :

* सनस्क्रीन उन्हात जाण्याच्या १५ ते ३० मिनिटं आधी लावावं.

* जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर ते मेकअप करण्याआधी लावावं.

* सनस्क्रीन खूप कमी प्रमाणात लावू नये.

* फक्त चेहऱ्यावरच नाही, तर शरीराच्या इतर उघड्या भागांवरही लावावं.

* दर दोन तासांनी सनस्क्रीन परत लावावं.

* एक्सपायरी डेट उलटून गेलेलं सनस्क्रीन लाऊ नये, कारण त्याचा प्रभाव राहात नाही.

सनस्क्रीन : समज आणि सत्य

समज : सनस्क्रीन लावल्याने सनटॅन होऊ शकत नाही.

सत्य : जर आपण एसपीएफ ३० असलेलं सनस्क्रीन वापरत असाल तर तुम्ही सनबर्नपासून वाचू शकता. चांगलं सनस्क्रीन तुम्हाला यूवीए आणि यूवीबी किरणांपासूनसुद्धा वाचवू शकतं. परंतु जर तुम्ही दीर्घकाळपर्यंत उन्हात राहिलात तर मात्र तुम्हाला सनटॅनची समस्या उद्भवू शकते.

समज : पाण्यात सनबर्न होत नाही.

सत्य : गरमीमध्ये पाणी शरीराला थंडावा देतं; कारण पाण्यात बुडालेलं शरीर सूर्यकिरणांपासून सुरक्षित राहातं. परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. वास्तवात पाणी यूवी किरणांना परावर्तित करतं. अशाप्रकारे आपण किरणांच्या अधिक संपर्कात येतो.

समज : कार किंवा बसच्या खिडकीतून तुम्हाला सूर्याच्या यूवी किरणांपासून नुकसान होत नाही.

सत्य : हा अत्यंत चुकीचा समज आहे. कारण हानिकारक अशी यूवी किरणं काचेतून आरपार जातात. जर तुम्हाला खिडकीजवळ बसणं पसंत असेल किंवा काही कारणास्तव दीर्घ प्रवास करावा लागत असेल, तर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...