– सोमा घोष
हिंदी चित्रपट ‘मिर्जिया’पासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री सैयामी खेर खेळाडूही आहे. सैयामी खेरने हिंदीबरोबरच तेलुगू चित्रपटही केला आहे. अर्थात, तिचा पहिला हिंदी चित्रपट काही फारसा यशस्वी ठरला नाही, पण टीकाकारांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले. ती कोणत्याही गोष्टीवरून दु:खी होत नाही. ती प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात समजून जगते आणि प्रत्येक चित्रपट तिच्यासाठी आव्हान असतो.
कलेच्या वातावरणात जन्मलेल्या सैयामी खेरला लहानपणापासून चित्रपटात अभिनय करण्याची फारशी इच्छा नव्हती, परंतु शाळा-कॉलेजमध्ये ती नाटकांमध्ये अभिनय करत असे. मात्र, त्यावेळी जेव्हा चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, तेव्हा तिने यालाच आपले प्रोफेशन बनवले. आता ती तिचा एक मराठी चित्रपट ‘माउली’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिच्याशी भेटून बोलणे रोमांचक अनुभव होता. सादर आहे त्यातील काही भाग.
प्र. मराठी चित्रपट ‘माउली’ करण्याचे खास कारण काय आहे?
खरे तर अभिनेता रितेश देशमुखचा हा दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी त्याने ‘लय भारी’ चित्रपट केला होता. जो हिट तर झालाच, पण सर्वांसाठी मनोरंजक होता. त्यानंतर, ‘माउली’ येतोय, तो भरपूर मनोरंजन करणारा चित्रपट आहे. माझ्यासाठी ‘मिर्जिया’ थोडा सीरियस चित्रपट होता आणि मला एक कमर्शियल चित्रपट करायचा होता. अशा वेळी मला हा मराठी चित्रपट मिळाला, जो मला करायचा होता.
प्र. चित्रपटात तुझी भूमिका काय आहे?
मी रितेशची को-स्टार आहे. जी शहर नव्हे, तर गावातील आहे. म्हणून मला मराठी भाषेवर थोडे काम करावे लागले. मी मराठी येते, पण शहर आणि गावाकडील भाषेत थोडा फरक असतो. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करावी लागली.
प्र. रितेश देशमुखसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
आधी मला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. कारण ते एक मोठे कलाकार आहेत आणि त्यांनी खूप काम केले आहे. नंतर तेवढे काही वाटले नाही. कारण ते खूप विनोदी स्वभावाचे आहेत. त्यांच्याकडून मी खूप गोष्टी शिकले.
प्र. या भूमिकेत आणि तुझ्यात काही साम्य आहे का?
या भूमिकेचे चरित्र माझ्याशी खूप जास्त मिळतेजुळते आहे. कारण चित्रपटात माझी भूमिका अशी आहे की मला जे चुकीचे वाटते, ते मी बोलून टाकते. प्रत्यक्ष जीवनातही मी अशीच आहे.
प्र. या भूमिकेसाठी वर्कशॉप केलेस का?
तशी मी मुंबईला राहणारी नाही, तर नाशिकला राहणारी आहे. मी तिथेच लहानाची मोठी झाले आहे. मी मोठ्या शहरात राहणारी नाहीए, त्यामुळे या भूमिकेसाठी खूप जास्त असे काम करावे लागले नाही.
प्र. चित्रपटात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
मला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्याच्यातच मला पुढे जायचे होते, पण शाळेच्या काळातच मी थिएटर करायला सुरुवात केली. थिएटरनंतर चित्रपट आणि जाहिरातींच्या ऑफर येऊ लागल्या. मी त्याच फ्लोमध्ये पुढे जात राहिले. मी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला, असे काहीही नव्हते. पण मी माझी आजी उषा किरण आणि आत्या तन्वी आझमीला काम करताना पाहिले होते. ऑडिशनच्या वेळी जेव्हा ‘मिर्जिया’ चित्रपट मिळाला, तेव्हा मी माझे गुरू आदिल हुसैन यांना भेटले आणि त्यांनी मला योग्य दिशा दाखवली आणि मला अभिनयाची आवड निर्माण झाली.
प्र. तुझा पहिला चित्रपट जास्त चालला नाही, चित्रपटाच्या यश-अपयशाने तुझ्या कारकिर्दीवर कोणता प्रभाव पडला? मराठी चित्रपटातही यायला एवढा उशीर का झाला?
हे खरे आहे की पहिला चित्रपट चालला नाही. त्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मी जेव्हा ‘मिर्जिया’ चित्रपट करत होते, तेव्हा खूप ऑफर्स येत होत्या. चित्रपट न चालल्यामुळे मला त्या ऑफर्स मिळाल्या नाहीत. पण मी धीर सोडला नाही आणि याचे फळ समोर आहे. यादरम्यान मी अनेक स्क्रिप्ट ऐकल्या, पण मला ज्याची प्रतीक्षा होती, तशी एकही मिळाली नाही. अशा प्रकारे उशीर होत गेला, पण आता मी पुन्हा एकदा मोठा चित्रपट करत आहे. तशी हिंदी आणि मराठीमध्ये कोणतीही बॉर्डर आता राहिलेली नाही.
प्र. तू तुझी आजी उषा किरण आणि आत्या तन्वी आझमीची कोणती शिकवण आपल्या जीवनात पाळतेस?
जेव्हा आजीचा मृत्यू झाला, तेव्हा मी अवघी १० वर्षांची होते. मला खंत आहे की मी तिला अभिनय करताना पाहू शकले नाही, पण तिचे चित्रपट जरूर पाहते. त्या काळच्या ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटात जी ग्रेस आणि सौंदर्य होते, ते आजच्या काळातील चित्रपटांमधून पूर्णपणे गायब झाले आहे. त्या काळचे चित्रपट आणि अभिनेत्रींचा अभिनय कोणत्याही तंत्राशिवाय होता, त्यांची बरोबरी आजची कोणतीही अभिनेत्री करू शकत नाही. त्यामध्ये वहीदा रेहमान, आशा पारेख, मधुबाला इ. आहेत. अभिनयाबाबत जाणून घेण्यासाठी मला माझ्या आत्याची मदत नेहमीच झाली आहे.
प्र. तुझे कुटुंब तुला किती सहकार्य करते?
कुटुंबाचे सहकार्य खूप आवश्यक असते. त्याशिवाय अभिनय करणे कठीण आहे. कारण हे एक असे क्षेत्र आहे, जिथे चांगल्या चित्रपटासाठी खूप वाट पाहावी लागते. अशा वेळी कुटुंबच आपल्याला त्या तणावापासून दूर नेते.
प्र. तू चित्रपट क्षेत्रात आलीस, त्यामुळे स्पोर्टस्ला मिस करतेस का?
शाळेत क्रिकेट खेळत असे आणि भारतासाठी खेळणार होते. त्याबरोबरच मी सायना नेहवालसोबत बॅडमिंटनही खेळले आहे. अर्थात, हरले, पण योग्य खेळाबाबत कळले. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर मी मॅरेथॉन रनिंग सुरू केले आहे. यामध्ये फुल मॅरेथॉननंतर मी जर्मनीमध्ये हाफ मॅरेथॉन केले होते. पुढच्या वर्षी मी ट्राईलाथन करणार आहे. माझी इच्छा आहे की अभिनयासोबत माझी रनिंगही चालू राहावी.
प्र. आपल्या स्पष्ट बोलण्याचा प्रभाव तुझ्या करिअरवर पडला का?
मी अशा वातावरणात मोठी झालेय की, जिथे काही चुकीचे होत असेल, तर ते पाहू शकत नाही आणि बोलून टाकते. याचा माझ्या करिअरवर कोणताही परिणाम अजूनपर्यंत तरी झालेला नाहीए. पब्लिसिटीसाठी मी काहीही बोलत नाही, जे योग्य आहे, तेच बोलायला आवडते.
प्र. आता तुझा संघर्ष कशाप्रकारचा आहे?
आव्हानात्मक चित्रपट मिळणेच माझा संघर्ष आहे. ज्यांना मी माझे गुरू मानते, ते माझे गुरू अभिनेते आदिल हुसैन सांगतात की एखाद्या चित्रपटात दोन सीनही चांगले असतात, जर काही आव्हान असेल. असेच चित्रपट साकारण्याची इच्छा आहे.
प्र. एखादी ड्रीम प्रोजेक्ट आहे का?
अर्थात, मी असलेला राकेश ओम मेहरांचा चित्रपट चालला नाही, पण मी त्या चित्रपटाच्या प्रोसेसिंगमध्ये खूप काही शिकले. त्यांनी खूप प्रकारचे चित्रपट साकारले आहेत. जर पुन्हा मला संधी मिळाली, तर मी त्यांचे चित्रपट करणे पसंत करेन. याबरोबरच इम्तियाज अली, विशाल भारद्वाज, जोया अख्तर इ. सर्वांसोबत काम करण्याची इच्छा आहे. लहानपणापासूनच मला खेळाची आवड होती. त्यामुळे तशा प्रकारचे चित्रपट करण्याचे माझे स्वप्न आहे.
प्र. ‘मीटू’ अभियानाबाबत तुझे मत काय आहे?
मी याबाबत खूप लकी राहिले आहे की माझ्यासोबत असे काही घडले नाही, पण ज्यांच्यासोबत असे वाईट घडले आहे आणि त्या बाहेर येऊन सांगण्याची हिंमत दाखवतात, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मी तर छोट्या-छोट्या गोष्टी पुढे येऊन सांगितल्या, पण ही मोठी गोष्ट आहे. ज्यांनीही या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी त्यांची कारकीर्द आणि सोशल लाइफवरही प्रभाव पडतो माझे मत असे आहे की, ही समस्या मुळासकट काढून टाकली पाहिजे. ही मोहीम मधेच थांबता कामा नये. हे अभियान केवळ भारतातच नव्हे, संपूर्ण विश्वात चालू आहे आणि ही चांगली गोष्ट आहे.
प्र. तुझी कोणाबरोबर स्पर्धा आहे का?
नाही, अजून खूप सारे प्लॅटफॉर्मस अभिनयासाठी आहेत आणि प्रत्येकाला काम मिळते. मी नेहमी चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न करते. पुढे मी एक वेब सीरिज करतेय.
प्र. आजीच्या कोणत्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनय करायला आवडेल?
तिने खूप छान-छान चित्रपट केले आहेत. मराठी चित्रपट ‘शिकलेली बायको’ आणि हिंदी चित्रपट ‘दाग’ आणि ‘पतिता’च्या रिमेकमध्ये मला अभिनय करण्याची संधी मिळाली, तर तो करणे पसंत करेन.
प्र. तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?
मला खूप साधारण, आरामदायक व पिवळे आणि सफेद रंगाचे कपडे वापरायला आवडतात. मी खूप फूडी आहे. सर्वकाही खाते. वजन न वाढण्याचे कारण म्हणजे माझे स्पोर्टस् आहे.
प्र. तणाव आला तर काय करतेस?
तशी मी जास्त तणाव घेत नाही आणि आलाच, तर माझ्या रनिंगचा मला उपयोग होतो.
प्र. काही सोशल वर्क करतेस का?
गेल्या दोन वर्षांपासून मी एका ब्रँडसोबत ‘क्लीनिंग द ओशन’च्या मोहिमेसोबत काम करत आहे. या कॅम्पेनमध्ये मी सर्वांसोबत समुद्राच्या साफसफाईकडे लक्ष देते. याबरोबरच नाशिकमध्ये रस्ते रुंद करण्यासाठी खूप झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळे तेथील प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे. म्हणूनच मान्सूनच्या काळात जास्तीतजास्त झाडे लावण्याचा मी प्रयत्न करते.
प्र. ‘गृहशोभिका’च्या वाचकांसाठी काही संदेश देणार का?
– त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की महिला चांगले काम करतात. गृहिणी असो किंवा नोकरदार त्या कुटुंबाला आकार देतात. त्यांनी स्वत:ला कधीही कमी समजू नये आणि नेहमी खूश राहण्याचा प्रयत्न करावा.