* पारुल भटनागर
अनेकदा लोक हेल्थ पॉलिसी घेताना महत्वाच्या गोष्टींकडे कानाडोळा करतात. हेल्थ पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे, याबाबत सांगत आहेत मल्टी हेल्थ कंपन्यांचे एजंट शैलेंद्र.
पॉलिसी घेताना तुलना अवश्य करा
हेल्थ इंश्युरन्स निवडण्याआधी तुम्ही ३-४ कंपन्यांच्या योजना पडताळून पहा. लक्षात ठेवा ज्या योजनेत खूप जास्त अटी आहेत, ती खरेदी करणे टाळा. हेल्थ पॉलिसीतील प्रत्येक क्लॉज बारकाईने वाचा.
क्लेम प्रोसेस सोपी असावी
जेव्हाकेव्हा पॉलिसी घेणार असाल तेव्हा क्लेम प्रोसेस अवश्य विचारा. जसे क्लेमचे अप्रुव्हल किती तासात मिळेल, पॅनलमध्ये किती हॉस्पिटल्स येतात आणि जर पॅनेलबाहेरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तर किती दिवसात खर्चाची भरपाई होईल. ही सर्व माहिती त्यांच्या साईटवर जाऊनसुद्धा तुम्हाला मिळेल. साधारणत: ३ ते ९ तासात क्लेमसाठी मंजुरी मिळते आणि २० ते २५ दिवसात खर्चाची भरपाई मिळते. म्हणून सोप्या सहजपणे कार्यान्वित होणाऱ्या पॉलिसीची निवड करणेच योग्य ठरेल.
आपल्या गरजा समजून घ्या
जेव्हा पॉलिसी घेण्याबाबत विचार कराल, तेव्हा आपल्या कुटुंबाच्या गरजा लक्षात घ्या. कुटुंबातील सदस्यांची संख्या व वय खास करून लक्षात घेणं जरूरीचं ठरतं. जर तरुण कुटुंब असेल तर बेसिक ५ लाखांची पॉलिसी घेऊ शकता, ज्यात पालक आणि २ मुलं समाविष्ट असतात. याचा प्रीमियम रु. १६, ८४० च्या आसपास असतो. यासोबत अनेक कंपन्या अतिरिक्त १५० टक्क्यांची रिफिल रक्कमही देतात. म्हणजे जर तुम्ही ५ लाखांची पॉलिसी घेतली आहे तर तुम्ही रू. ३ ते ७ लाख ५० हजाराचा फायदा मिळवू शकता. पण जर कुटुंबात आईवडील असतील तर मोठ्या फ्लोटर कव्हरची पॉलिसी घ्यावी, जेणेकरून मोठे आजार झाल्यास तुमच्या खिशावर भार पडणार नाही. शिवाय पॉलिसीचा प्रिमियम भरणंही शक्य झालं पाहिजे.
काय माहीत असणे आवश्यक आहे
विचारा की पहिल्या दिवसापासून अॅक्सिडेंटल डॅमेज कव्हर अंतर्भूत आहे अथवा नाही, हंगामी आजार केव्हापासून अंतर्भूत होतील, पॉलिसी घेतल्यावर किती दिवसांनी गंभीर आजार समाविष्ट केले जातील. काही कंपन्या सुरूवातीपासूनच पूर्वनियोजित ऑपरेशन जसे स्टोन, गालब्लॅडर इत्यादी ऑपरेशन समाविष्ट करतात. म्हणून या गोष्टींची संपूर्ण माहिती आधीच मिळवा.
आयुष्यभर नुतनीकरण
तुम्ही अशी पॉलिसी घ्या, जी आयुष्यभर नुतनीकरणाची सुविधा देते, कारण एखाद्याला माहीत नसते की तो केव्हा आजारी पडणार आहे. अशावेळी योग्य पॉलिसीची निवड जीवनभर सुरक्षा प्रदान करेल.
मोफत वैद्यकीय तपासणी
अशी पॉलिसी घ्या, ज्यात मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा असेल. काही कंपन्यांचे आपले डायग्नोस्टिक सेन्टर व पॅनल हॉस्पिटल असतात. तिथेच तपासणी केली गेली तर काही कंपन्या ही सुविधा देतात की तुम्ही बाहेरून तपासणी करून खर्चाची भरपाई करू शकता.
प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन
ऑपरेशन करण्यापूर्वी व नंतर डॉक्टरला दाखवण्याच्या आणि तपासण्या करण्याच्या नावावरसुद्धा हजारो रुपये खर्च होतात. पॉलिसी घेताना विचारून घ्या की प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनची सुविधा आहे की नाही. यामुळे तुम्हाला आयुष्यभराची सुविधा मिळेल.
अटींच्या बंधनात अडकू नका
काही कंपन्यांच्या पॉलिसीत हे स्पष्ट केलेले असते की तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास खोलीचे भाडे ठराविक रकमेपेक्षा जास्त मिळणार नाही. जर पॉलिसीमध्ये अशी एखादी अट असेल तर पॉलिसी घेऊ नका, कारण तुम्हाला हे माहीत नसते की कोणत्या आजाराच्या स्थितिमध्ये तुम्हाला यासाठी किती रक्कम चुकवावी लागेल.
जुने आजार लपवू नका
विमा कंपन्यांना असे वाटते की आजार व सवयींविषयी ग्राहकाकडून प्रत्येक गोष्ट स्पष्ट व्हावी जसे जीवनपद्धती कशी आहे, मेडिकल हिस्ट्री इत्यादी जेणेकरून कंपनीला तुम्हाला विम्याची रक्कम देण्यात काही अडचण येणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आजारांची व्यवस्थित माहिती द्यायला हवी, भले थोडा जास्त प्रीमियम द्यावा लागला तरी चालेल.
महिलांसाठी पॉलिसीची गरज
भवितव्य आणि करिअरप्रति महिलांमध्ये जागरूकता वाढली आहे. नोकरदार महिला गुंतवणूक आणि वेगवेगळया इंश्युरन्स पॉलिसीची गरज समजून घेऊन काळाप्रमाणे आवश्यक पावलं उचलत आहेत.अधिकांश घरांमध्ये गृहिणीच संसार चालवण्यासाठी घरखर्चाचा हिशोब ठेवतात. अशावेळी घरातील एखाद्या सदस्याला अचानक एखाद्या आजाराने ग्रासले किंवा ती स्वत: गरोदर असेल तर बजेट कोसळणे स्वाभाविक आहे.
अशावेळी हेल्थ इंश्युरन्स खूप उपयोगी पडते. अलीकडेच एका सर्वेमध्ये ही गोष्ट समोर आली की अधिकांश भारतीय गृहिणी आपल्या नियमित आरोग्य तपासण्या करत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची समस्या आक्राळविक्राळ रूप घेतात आणि मग हॉस्पिटलमध्ये जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. ब्रेस्ट कॅन्सर, यूटरस कॅन्सर वगैरे महिलांमध्ये सर्वसाधारण समस्या आहेत. हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी मॅटर्नल हेल्थसोबत या सर्व समस्यांच्या उपचारावर होणारा खर्चही कव्हर करते.
महिलांसाठी हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीचे प्रमुख फायदे हे आहेत.
आर्थिक मजबूती : आजारावर होणारा खर्च जेव्हा वाचेल तेव्हा स्वाभाविक आहे की तुमचे बजेट मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मुलांसोबत स्वत:साठीसुद्धा उत्तम भवितव्य प्लॉन करू शकाल.
गंभीर आजार : बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वात जास्त महिलाच प्रभावित होत आहेत. ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, व्हजायनल कॅन्सर अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांच्या उपचारासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. हेल्थ इंश्युरन्स अशावेळी तुमचा आर्थिक आधार बनून भार कमी करतो.
मॅटर्निटीवर होणारा खर्च : प्रसूतीदरम्यान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याव्यतिरिक्त प्रसुतीपूर्व व नंतरच्या खर्चाचे बिल जरा जास्तच होते, जे मध्यमवर्गीय कुटुंबाचे बजेट बिघडवायला कारणीभूत ठरते. अशात हेल्थ इंश्युरन्स घेताना मॅटर्निटी कव्हर आहे अथवा नाही याबाबत संपूर्ण माहिती घ्या, जेणेकरून आई होण्याच्या भावनेचा तुम्ही मुक्तपणे आनंद लुटू शकाल.
टॅक्स बेनिफिट : नोकरदार महिला असाल तर हेल्थ इंश्युरन्सचे टॅक्स बेनिफिट तुम्हाला मिळतील आणि जर गृहिणी असाल तर तुमच्या पतिला. म्हणून जर तुम्ही हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी घेतली तर तुमचे बजेट तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने आखण्यात तुम्हाला सहाय्यता मिळेल. म्हणून सारासार विचार करून आणि आपल्या गरजा लक्षात घेऊन हेल्थ इंन्शरन्स पॉलिसी अवश्य घ्या.