* एनी अंकिता
उन्हाळ्यात त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशील होते. या मोसमात त्वचा सतत उन्हाच्या संपर्कात येत असल्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. मात्र, अशा वेळेस या गोष्टींकडे थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी तुमच्या सौंदर्यावर याचा परिणाम दिसू लागतो.
म्हणूनच, उन्हाळ्यात त्वचेच्या समस्येपासून वाचण्याचे उपाय सांगत आहेत, यावाना एस्थेटिक क्लीनिकच्या कन्सलटण्ट डर्मेटोलॉजिस्ट डॉ. माधुरी अग्रवाल आणि सोहम वेलनेस क्लीनिकच्या ब्यूटी एक्सपर्ट दिव्या ओहरी.
सनबर्न
सनबर्न ही सूर्याच्या हानिकारक किरणांच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेवर होणारी प्रतिक्रिया आहे. यामुळे त्वचा कोरडी, रूक्ष आणि सुरकतलेली दिसू लागते. उन्हाचा तडाखा फारच असेल तर त्वचेवर चट्टेदेखील उमटतात. कधी कधी तर त्वचा सोलवटल्यासारखी दिसू लागते.
सनबर्नसाठी घरगुती उपाय
* सनबर्नवर प्राथमिक उपचार घरातही करता येऊ शकतात. यासाठी थंड पाण्याने अंघोळ किंवा दिवसातून अधूनमधून सनबर्नने प्रभावित भागांवर थंड पाण्याच्या पट्टया ठेवा.
* सनबर्नमुळे त्वचेवर काळे चट्टे पडले असतील तर प्रभावित भागावर बर्फ चोळा.
* बटाटा वेदनाशक आहे. बटाटा कापून जर सनबर्न झालेल्या ठिकाणी चोळला तर खूपच आरामदायी वाटतं. तुम्ही याची पेस्ट बनवून कापसानेही लावू शकता.
* पुदिन्याच्या पानांचा रस काढून तो जरी होरपळलेल्या त्वचेला नियमित लावला तरीही आराम मिळतो. याशिवाय १ चमचा उडदाची डाळ दह्यासोबत बारीक करा आणि ती त्वचेवर लावा. निश्चितच तुम्हाला आराम मिळेल.
वैद्यकीय उपचार
* व्हिटामिन ई हे एक प्रकारचं अॅण्टिऑक्सिडंट असतं, जे संसर्ग कमी करतं. सनबर्नमुळे तुम्ही सप्लिमेंटच्या रूपात व्हिटामिन ई घेऊ शकता. तुम्ही हवं तर व्हिटामिन ईयुक्त आहारदेखील घेऊ शकता.
* या दिवसात कोणत्याही प्रकारच्या साबणाचा वापर करू नका. त्यापेक्षा असा फेसवॉश किंवा लोशन वापरा ज्यामध्ये टी ट्री घटक असतील. त्वचा थंड राखण्यासाठी कॅलिमाइन लोशनचाही वापर करू शकता.
* जर सनबर्नची समस्या अधिक असेल, तर डर्मेटोलॉजिस्ट अॅण्टिएलर्जी औषधं देतात जेणेकरून जळजळ कमी होईल.
प्रिकली हीट
उन्हाळ्याच्या मोसमात घाम येणं स्वाभाविक आहे. जेव्हा घाम चेहऱ्यावर जमा होतो तेव्हा चेहऱ्याची त्वचा निस्तेज दिसू लागते आणि चेहऱ्यावर बारीक घामोळं येऊ लागतं. त्यामुळे त्वचेची जळजळ वाढू लागते.
प्रिकली हीटवरील उपाय
* प्रिकली हीट अर्थात घामोळ्यासाठी बेकिंग सोडा परिणामकारक ठरतो. १ चमचा बेकिंग सोडा थंड पाण्यात मिसळा. मग त्यामध्ये स्वच्छ कपडा बुडवून घामोळं आलेल्या जागी ५-१० मिनिटं ठेवा. याने घामोळ्यामुळे येणारी खाज आणि सूज कमी होईल.
* घामोळ्यावर थंड पाण्याचा परिणामही लवकर होतो. एका कपड्यात बर्फाचे काही तुकडे गुंडाळून घ्या आणि ते घामोळं आलेल्या जागी ठेवा. असं दर ५-६ तासांनी करा, बरं वाटेल.
* चंदनामध्ये शरीराचं तापमान कमी करण्याची क्षमता असते म्हणूनच चंदन पावडर आणि गुलाबपाणी समप्रमाणात घेऊन ते घामोळं आलेल्या जागी लावा. चंदन सुकू द्या. मग थंड पाण्याने धुऊन टाका. याने खूप आराम मिळेल. जर घामोळं आलं असेल तर सुती कपडे वापरा. डीहायडे्रशनपासून वाचण्यासाठी नारळपाणी प्या.
वैद्यकीय उपचार
* प्रिकली हीटसाठी हायड्रोफेशियल ट्रीटमेण्ट दिली जाते. याच्या ३-४ स्टेप्स असतात. याने खूप आराम मिळतो.
रोसेसिया
रोसेसिया एक सामान्य त्वचा समस्या आहे, जी खासकरून ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना भेडसावते. यामध्ये नाक, गाल व हनुवटीवर लाल चट्टे उमटतात आणि त्वचा कोरडी होते.
रोसेसियासाठी घरगुती समस्या
* रोसेसियाची समस्या नैसर्गिकरीत्या कमी केली जाऊ शकते. यासाठी २ कप ग्रीन टी बनवून फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी थंड करायला ठेवा. मग फ्रिजमधून काढून एक स्वच्छ मुलायम कपडा यामध्ये भिजवून संसर्गित ठिकाणी काही मिनिटं ठेवा, खूप आराम मिळेल.
* रोसेसियासाठी सफरचंदाचा मास्कदेखील एक नैसर्गिक उपाय आहे. यासाठी सफरचंदाची साल काढून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर १५-२० मिनिटं लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका.
वैद्यकीय उपचार
* रोसेसियाची समस्या घरगुती उपचारांव्यतिरिक्त केमिकल पील, ग्लायकोलिक पील आणि फोटो फेशियलद्वारेही बरी करता येते. केमिकल पील एक ट्रीटमेण्ट आहे, जी मृतत्वचा काढून टाकून त्वचेला नितळ बनविते. याचप्रमाणे ग्लायकोलिक पील ट्रीटमेण्टद्वारे त्वचेच्या वरच्या थरावर जमलेला मळ स्वच्छ केला जातो.
अॅक्ने
जेव्हा त्वचेमधील तेलकट ग्रंथी अधिक सक्रिय व अनियमितरीत्या कार्य करू लागतात तेव्हा अॅक्नेची समस्या सुरू होते. अत्याधिक अशा तैलीय ग्रंथींच्या स्त्रावामुळे त्वचेची रोमछिद्रं उघडली जातात आणि परिणामी ब्लॅकहेड्स आणि अॅक्नेची समस्या निर्माण होते.
घरगुती उपाय
* अॅक्नेसाठी काकडीचा फेसपॅक उपयोगी ठरतो. काकडी आणि ओटमिलचं एकत्रित मिश्रण करून त्याची पेस्ट बनवून घ्या. मग या पेस्टमध्ये १ चमचा दही मिसळून मुरमांवर लावा. हा पॅक सुकला की थंड पाण्याने धुवा.
* अॅक्नेसाठी हळददेखील खूप उपयुक्त आहे. २ चमचे बेसनमध्ये थोडीशी हळद, चंदन पावडर आणि बदामाचं तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनंतर थोडंसं चोळून थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका.
* मधाचाही अॅक्नेवर लवकर परिणाम दिसून येतो. मधामध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. हे सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.
वैद्यकीय उपचार
* अॅक्नेची समस्या घालविण्यासाठी काही खायची औषधंही दिली जातात. अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉडक्ट्स वापरून अॅक्नेची समस्या दूर केली जाऊ शकते. जसं की खास अॅक्ने फेसवॉश, अॅक्ने बेबी क्रीम.
* अॅक्नेसाठी अॅक्ने पील, केमिकल पील आणि लेझर लाइट ट्रीटमेंट घेऊ शकतो. या ट्रीटमेण्टद्वारे अॅक्नेची समस्या सहजपणे संपुष्टात येते.
घामाच्या दुर्गंधीवरील घरगुती उपाय
आपल्या शरीरातून दोन प्रकारचा घाम निघतो. पहिला – एक्राइन, जो दुर्गंधीयुक्त नसतो आणि संपूर्ण शरीरातून निघत असतो तरीसुद्धा शरीराचं तापमान कायम राखतो. दुसरा घामाचा प्रकार आहे एपोक्राइन. या प्रकारचा घाम कंबर आणि काखेच्या ग्रंथीद्वारे निर्मित होत असतो. एपोक्राइन घामाला दुर्गंधी नसते, पण जेव्हा यावर बॅक्टेरियाचा प्रभाव पडतो.
जर उन्हाळ्यात घामामुळे तुमच्या शरीरातून दुर्गंधी येत असेल तर खालील उपाय अजमवा :
* लिंबू बॅक्टेरियाला मारतात म्हणूनच एका लिंबाचे दोन भाग करून अंडरआर्म्सवर चोळा. थोडा वेळ लिंबाचा रस तसाच राहू द्या. मग थंड पाण्याने धुऊन टाका.
* जर तुम्ही घरी असाल आणि तुमच्याकडे डिओडेंरट नसेल तर एक कप पाण्यात थोडंसं हायड्रोजन पॅराक्साइड मिसळा. मग या पाण्यात एक स्वच्छ कपडा भिजवून तो काखेखाली चोळा, दुर्गंधी कमी होईल.
वैद्यकीय उपाय
डिओडे्रंट आणि अॅण्टिपर्सपिरेंट हे काही वैद्यकीय उपचार आहेत जे घामाची दुर्गंधी कमी करतात. अॅण्टिपर्सपिरेंटमध्ये अॅल्युमिनियम क्लोराइड असतं जे शरीरातून उत्पन्न होणाऱ्या घामाला कमी करतं. बोटोक्स ट्रीटमेंटद्वारेही घामाची समस्या दूर केली जाऊ शकते.