कथा * ऋतुजा सोनटक्के
गेली पंधरा वर्ष आम्ही अमेरिकेत राहतोय. इथल्या नोकरीमुळे आम्ही जणू इथलेच झालो आहोत. तीनचार वर्षांनी एकदा आम्ही आईबाबांना भेटायला भारतात जात असू. मुलंही आता इथंच रूळलीत. अनेकदा मी नवऱ्याला म्हटलं, ‘‘आपण आता कधीच भारतात जाऊन राहणार नाही का?’’ तो म्हणाला ‘‘अशी नोकरी तिथं मिळत नाही अन् तिथली नोकरी आपल्याला आवडत नाही, म्हणजे शेवटी आपल्याला इथंच राहणं आलं,’’ तर आम्ही दोघं आपापल्या नोकऱ्या करतोय.
मला आईवडिल नाहीत. नवऱ्याच्या म्हणजे आकाशच्या आईबाबांना मी आईबाबाच म्हणते. ती दोघं भारतात असतात. माझी एकुलती एक नणंद आशूही मुंबईत असते. तिचा नवरा मर्चंट नेव्हीत असतो. तिच्या दोघी मुलींसह ती आईबाबांच्या फ्लॅटच्या शेजारीच असते. ती त्यांची काळजी घेते. यामुळे आम्हीही निर्धास्त असतो. पण आम्हाला असं वाटतं की आता आईबाबांनी तिथं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे येऊन राहावं.
पण त्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या घराचे बंध तुटत नाहीत. अन् अमेरिकेत आम्हाला आवडणार नाही. तिथं फारसे भारतीय नाहीत, भाषेचा एक मोठा अडसर आहेच. पण आशूताईनं त्यांना समजावलं की अमेरिकेत आता खूप भारतीय राहतात. शिवाय थोडे दिवस राहिलात तर भाषाही समजते, बोलता येते. मग ती दोघं आमच्याकडे यायला तयार झाली. आकाश भारतात गेला, आईबाबांचा फ्लॅट विकायला काढला. नाही म्हटलं तरी तो फ्लॅट विकताना आईबाबांना वाईट वाटलं. तिथल्या एकेका वस्तूवर त्यांचा जीव होता. अत्यंत कष्टानं त्यांनी संसार जमवला होता.
पण त्याचवेळी आयुष्याचे उरलेले दिवस आपण नातवंडांसोबत घालवू ही गोष्ट उमेद देत होती. दोनच महिन्यात सगळं काही मार्गी लावून आशुताईचा निरोप घेऊन आईबाबा आमच्याकडे अमेरिकेत आले. आशुताईलाही फार वाईट वाटत होतं. कारण आता भारतात तिलाही कुणाचा आधार नव्हता. मनातलं सांगायला आईएवढं हक्काचे कोण असतं?
माझी मुलं अक्षय आणि अंशिका यांना भेटून आईबाबा सुखावले. मुलंही आपल्या परीनं त्यांच्याशी जुळवून घेत होती. आईंना मुलांचे इंग्रजी एक्सेंट समजत नसत, पण खाणाखुणा करून त्यांचं संभाषण चालायचं. त्यांना इथं बरं वाटावं म्हणून मी बरीच मराठी, हिंदी पुस्तकं व मासिकं ऑनलाइन मागवून घेत होते. हळूहळू इथल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांनाही जमवून घेता आलं.
एक दिवस मी म्हटलं, ‘‘आई, इथं संध्याकाळी काही भारतीय बायका एकत्र जमतात. आपल्याकडे कसा कट्टा असतो, कट्टयावरच्या गप्पा असतात, तसंच! काही तर तुमच्या वयाच्या अन् मुंबईत राहून आलेल्याही आहेत. आज सायंकाळी आपण तिकडे जाऊ, तुमची ओळख करून देते मी. काही मैत्रीणी मिळाल्या की तुमचीही संध्याकाळ मजेत जाईल.’’
आई कबूल झाल्या. मग मी सायंकाळी त्यांना घेऊन कट्टयावर गेले. रूपा मावशी, विनिता मावशी, कमल मावशी अन् लीला मावशींशी ओळख करून दिली. त्या सर्व आईंच्याच वयाच्या होत्या. त्यांनी आनंदानं, प्रेमानं आईंचं स्वागत केले. रूपा मावशी म्हणाल्या, ‘‘आमच्या या कट्टयावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण रोज भेटूयात. कट्टयावरच्या गप्पांमध्ये, आपल्या वयाच्या आणखी एक सभासद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.’’
त्यानंतर आई रोजच त्या सर्वांसह बागेत जाऊ लागल्या. तिथं त्यांचे दोन तास अगदी मजेत जायचे. आता त्यांना इथं राहणंही आवडू लागलं. बाबांनाही इथं मित्र भेटले होते. त्यांनाही इथं आवडत होतं. सकाळी पायी फिरून येणं, सायंकाळी कट्टा, दुपारी वाचन वामकुक्षी व मला स्वयंपाकात मदत करण्यात आईंचा दिवस भर्रकन् संपायचा. रोज सायंकाळी घरी आल्यावर त्या मला तिथं काय काय गप्पा झाल्या ते सांगायच्या. एक दिवस मात्र त्यांचा मूड जरा नीट नव्हता. वालाच्या शेंगा मोडता म्हणाल्या, ‘‘आज रूपा सांगत होती इथं एक भारतीय जोडपं आहे. त्यातला पुरूष नपुंसक आहे. त्याच्या बायकोचं तिच्या ऑफिसमधल्या कुणाशी तरी सूत आहे म्हणे.’’
‘‘आई, इथं अशा गोष्टी सर्रास घडतात. फार कुणी त्यावर चर्चा करत नाही. मी ओळखते त्या दोघांना…दोघंही सज्जन आहेत.’’ मी म्हटलं.
‘‘डोंबलाचे सज्जन, अगं नवरा असताना बाईनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायचे हे काय सज्जनपणाचं लक्षण म्हणायचं का?’’ आई चिडून बोलल्या.
मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांच्या पिढीला अन् भारतात तर हे सगळं भलतंच, अपवित्र किंवा पाप वाटणार. अर्थात् भारतात लपूनछपून अशा गोष्टी घडत असतातच. उघड झालं तर मात्र कठीण असतं. पण आपल्याकडेही रखेल, देवदासी, अंगवस्त्र बाळगणारे लोक होतेच की! श्रीमंत लोक तर उघड उघड हे करायचे. श्रीमंतांना अनेक गोष्टींची मुभा असते. एरवी लपून छपूनही लोक भानगडी करतात. इथं मात्र (म्हणजे अमेरिकेत) सगळं उघड असतं. लोक मोकळेपणानं अशी नाती स्वीकारतात. पण हे आईंना कुणी समजवायचं? मी गप्प बसले. त्यांच्यासोबत शेंगा मोडू लागले. विषय बदलला अन् वेगळ्याच विषयावर आम्ही बोलू लागलो.
आता आईंनाही बऱ्यापैकी इंग्रजीत बोलता येऊ लागलं. त्यामुळे मुलांशी त्या खूप गप्पा मारायच्या. मुलांनाही त्यांच्याकडून भारतातल्या गमतीजमती ऐकायला आवडायचं. आईची मला घरकामात खूप मदत व्हायची. इथं नोकरचाकर हा प्रकारच नसतो. सगळं स्वत:च करायला लागतं. आईंची घरकामतली मदत मला मोलाची वाटायची.
आता त्या इथं छानच रूळल्या होत्या. दर महिन्याला एकदा सगळ्या मैत्रिणी मिळून रेस्टारंण्टमध्ये जायच्या. एकत्र जमायच्या. तेव्हाही प्रत्येकीनं काहीतरी नवा पदार्थ करून आणायचा. आईंना ही कल्पना आवडली. त्या सुरगण होत्या. त्यांनी केलेला पदार्थ नेहमीच भरपूर प्रशंसा मिळवायचा. आता त्या सलवार सूट वापरायला लागल्या होत्या. नवी पर्स, मॅचिंग चप्पल वगैरेची त्यांना मजा वाटत होती. लिपस्टिकही लावायच्या. कधी कधी पत्ते नाही तर एखादा वेगळाच खेळ असायचा. एकूण त्यांचं छान चाललं होतं.
एकदा मी ऑफिसातून परतले, तेव्हा त्या ही त्यांच्या कट्टयावरून घरी परतल्या होत्या. माझी वाट बघत होत्या. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. मी घरात आले तशी पटकन् दोन कप चहा करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या.
‘‘काय म्हणतोय तुमचा कट्टा?’’
‘‘बाकी सगळं छानच आहे गं, पण काही गोष्टी मात्र फारच विचित्र असतात इथं. आज तर स्पर्म डोनेशनचा विषय होता चर्चेला. जर एखाद्या पुरुषाला शुक्राणू (स्पर्म) पुरेसे किंवा सशक्त नसल्यामुळे मूल होत नसेल तर त्याच्या बायकोच्या गर्भाशयात दुसऱ्या कुणाचे तरी शुक्राणु ठेवून गर्भ तयार करतात किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाच्या दोषामुळे पोटात मूल वाढवता आलं नाही तर ती आपलं मूल भाड्याचं गर्भाशय घेऊन (दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ ठेवून) मूल जन्माला घालू शकते. शी शी काय हा अधर्म? घोर कलियुग गं बाई!!’’
मी शांतपणे म्हटलं, ‘‘पण जर मूल हवं म्हणून अशी मदत घेतली तर त्यात वाईट काय आहे?’’
‘‘पण ज्या मातेच्या गर्भात ते मूल वाढेल, तिचेच गुणधर्म, दोष वगैरे घेऊन बाळ जन्माला येईल ना? मग ते मूल स्वत:चं कसं म्हणायचं?’’
यावेळी वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. मी बोलण्याचा विषय बदलायचा प्रयत्न केला, पण आई अजूनही तणतणत होत्या. ‘‘कसला देश आहे…अन् कसली माणसं आहेत. काही संस्कृती, संस्कार यांना नाहीतच जणू. यापुढची पिढी अजून काय काय करेल, कुणास ठाऊक?’’
माझ्या अमेरिकन झालेल्या मुलांना आजीचं हे वागणं, बोलणं फारच मागासलेलं, बुरसटलेलं वाटत होतं. ‘‘ममा, आजी असं का बोलते? जो तो आपला स्वतंत्र आहे ना आपल्या पद्धतीनं वागायला?’’ लेकीनं मला हळूच म्हटलं.
‘‘हो गं! पण आजी आताच भारतातून आली आहे ना, तिला हे सगळं विचित्र वाटतंय.’’ मी लेकीची समजूत घातली.
बघता बघता तीन वर्षं उलटलीसुद्धा. आईंना एकदा भारतात जाऊन आशाताईंना भेटायची फार इच्छा झाली होती. मुलांनाही सुट्या होत्या. मी त्यांची तिकिटं काढून दिली. बाबांना इथंच त्यांच्या मित्रांचे वाढदिवस असल्यामुळे मुंबईला जायचं नव्हतं. ते इथंच राहणार होते.
आई आणि मुलं आल्यामुळे आशुताईला खूप आनंद झाला. गेली तीन वर्षं ती ही फार एकटी पडली होती. आशुताईनं मुलांसाठी, आईसाठी खूप कार्यक्रम ठरवून ठेवले होते. रोज सगळी मिळून कुठं तरी भटकायला जायची. रोज घरात नवे पदार्थ केले जायचे. मुलांच्या आवडीनिवडी, कोडकौतुक पुरवताना आशुताईला खूप आनंद वाटायचा. निशांत म्हणजे माझे मेव्हुणे, आशुताईचा नवरा शिपवरच असायचा. आपल्या दोन मुलींना तर आशुताईनं एकटीनंच वाढवलं होतं. अर्थात निशांत पूर्ण क्रेडिट आशुताईना द्यायचा.
एकदा रात्री आईंना थोडं बेचैन वाटायला लागलं म्हणून त्या आपल्या खोलीतून बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन लवंडल्या. रात्री माझी व आशुताईची मुलं एकाच बेडरूममध्ये झोपत होती. एक खोली आईंना दिली होती. एक खोली आशुताईची होती. आईंना झोप येत नव्हती.
तेवढ्यात आशुताईच्या खोलीचं दार उघडलं. एक तरूण पुरुष खोलीतून बाहेर पडला. त्याला सोडायला गाऊनमध्येच असलेली आशुताईही खोलीबाहेर पडली. जाता जाता त्यानं आशुताईना पुन्हा मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् बाय करून तो निघून गेला.
आपली आई सोफ्यावर बसली आहे हे आशुताईला ठाऊकच नव्हतं. तो पुरुष निघून गेला अन् आईंनी ड्रॉइंगरूमचा दिवा लावून जोरानं विचारलं, ‘‘कोण आहे हा? तुला असं वागणं शोभतं का? तुझा नवरा इथं नाही, तुझ्या मुली मोठ्या होताहेत…’’
‘‘आई, जाऊ दे…तुला कळायचं नाही,’’ आशुताईनं म्हटलं.
आईचा पारा चढलेलाच होता. ‘‘मला कळायंचं नाही का? तुझी अक्कल शेण खायला गेली आहे, माझी नाही,’’ आईनं ताबडतोब फोन लावून अमेरिकेत माझ्या नवऱ्याला ही बातमी दिली.
क्षणभर तर आकाशही भांबवला. मग म्हणाला, ‘‘आई, तू आशुताईला काही बोलू नकोस, मला आधी सगळं प्रकरण समजून घेऊ दे.’’
‘‘तुम्ही ताबडतोब इथं या. मी काय म्हणते ते कळेल तुम्हाला.’’ आईंनी रागानं फोन आपटला.
दुसऱ्याचदिवशीची तिकिटं मिळवून आम्ही दोघं भारतात आलो. आम्हाला बघून आशुताई खूपच घाबरली. त्या दिवशी आम्ही काहीच बोललो नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्यापाशी हा विषय काढला. ती जे सांगत होती ते फार विचित्र होतं. ती सांगत होती,
‘‘दादा, तुला ठाऊक आहे. आमचं लग्नं आम्हा दोघांनाही न विचारता ठरवलं गेलं. मर्चंट नेव्हीच्या नोकरीमुळे निशांत सहा महिने बोटीवर असतो. त्या काळात त्याचे अनेक मुलींशी संबंध येतात. इथं तो येतो तेव्हाही त्याला माझ्यात फारसा इंटरेस्ट नसतो. तो घरातला कर्ता पुरुष म्हणून कर्तव्य पार पाडतो. आमच्या दोन मुलींसाठी खरं तर आम्ही एकत्र आहोत. हा फ्लॅट मला घेऊन दिलाय. घर खर्चाला भरपूर पैसाही देतो. मुलींना काही कमी पडू देत नाही, पण आमच्यात पतिपत्नी म्हणून तसा संबंध नाही.
मी त्याला या बाबतीत विचारलं तर तो म्हणतो तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तुला हवं तर तू घटस्फोट घे. इतर कुणाशी संबंध ठेवायचे तर ठेव. फक्त बाहेर या गोष्टीची चर्चा व्हायला नको. बाहेरच्या जगात आम्ही पतिपत्नी आहोत. पण तशी मी एकटी आहे. मुलींना सोडून कुठं जाऊ? डिव्होर्स घेतला तर मुलींच्या लग्नात अडचण येऊ शकते. पण मलाही प्रेम हवंय. शरीराची ओढ काय फक्त पुरुषालाच असते? स्त्रीला शरीरसुख नको असतं?’’
आशुताई एवढं बोलतेय तोवर आईंनी तिच्या थोबाडीत मारलं. ‘‘लाज नाही वाटत असं बोलायला,’’ त्या ओरडल्या.
आकाशनं आईचा हात धरून तिला बाजूला घेतलं. ‘‘आई, शांत हो, मला आशुशी एकट्याला बोलू दे,’’ आकाश शांतपणे म्हणाला. त्यानं आईला तिच्या खोलीत नेलं.
आता आशुच्या खोलीत आम्ही तिघंच होतो. आशु सांगत होती, ‘‘इथं ही आकाशचे दोन तीन मुलींशी संबंध आहेत. त्यातली एक तर विवाहित आहे. तिच्या नवऱ्यालाही हे माहीत आहे. काल माझ्याकडे आलेला तरूण डायव्होर्सी आहे. एकटाच राहतो. आम्ही दोघं एकटेपणातून एकमेकांच्या जवळ आलो. निशांतला हे ठाऊक आहे. त्याला याबद्दल ऑब्जेक्शन नाही. फक्त हे सगळं चोरून घडतं. बाहेर कुणालाही काहीही ठाऊक नाही. तसं मुंबईतही कुणाला कुणाशी काही देणंघेणं नसतं. वेळही नसतो, तरीही समाजाची भीती असतेच,’’ बोलता बोलता आशुताई रडायला लागली.
मी तिला जवळ घेत म्हटलं, ‘‘ताई, तुम्ही, काळजी करू नका, आपण यावर नक्की तोडगा काढू. फक्त विचार करायला थोडा वेळ द्या.’’
आम्ही दोघं तिथून उठलो अन् बागेतल्या बाकावर येऊन बसलो. ‘‘आशुताई सांगते आहे ते जर खरं असेल तर यात तिचा काय दोष? पुरुषानं हवं तिथून शरीरसुख मिळवायचं अन् त्याच्या बायकोनं मात्र घुसमट सहन करायची हा कुठला न्याय?’’ मी म्हटलं.
आकाशनं मान हलवून संमती दर्शवली. तो म्हणाला, ‘‘तुझं म्हणणं खरंय, पण आईला कसं पटवून द्यायचं? ती तर आशुलाच दोष देणार?’’
मीही विचार करत होते ताई म्हणाली ते खरंय, स्त्रीच्याही शारीरिक गरजा असतातच ना? जर नवरा तिची शारीरिक भूक भागवू शकत नसेल तर तिनं काय करावं? खरं तर यात आशुची काहीच चूक नाही. समाजानं पुरुषाला झुकतं माप दिलंय म्हणून तो हवंय ते करेल का? जर तो शेजारी अन् आशू स्वखुषीनं एकत्र येताहेत तर हरकत काय आहे? जगात असे किती तरी लोक असतील.
‘‘आकाश, आपण आईंना समजावून बघूयात. प्रयत्न तर करायलाच हवा,’’ मी म्हटलं. तोही कबूल झाला.
शेवटी आम्ही आई व मुलांना घेऊन परत अमेरिकेत आलो आणि निशांत बोटीवरून घरी परतल्यावर पुन्हा लगेच मुंबईला आलो. आकाशनं निशांतला एकूण परिस्थितीबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं खरेपणानं आपल्या इतर संबंधांबद्दल कबूली दिली. ‘‘मी आशुपासून काहीही लपवलेलं नाही अन् तिलाही मी पूर्ण मोकळीक दिली आहे. फक्त आम्ही या गोष्टी आमच्यातच ठेवल्या आहेत. बाहेर हे कुणाला माहीत नाही. आकाश, तू अमेरिकेत राहतो आहेस, तुलाही यात काही प्रॉब्लेम वाटतो का?’’
‘‘प्रश्न माझा नाहीए. आईचा आहे. तिला कसं पटवून द्यायचं?’’
‘‘मी बोलेन त्यांच्याशी, उद्याच बोलतो.’’ निशांत म्हणाला.
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आटोपल्यावर निशांत आईजवळ बसले, ‘‘आई, मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर अन् आशुवर फार चिडला आहात. तुमचा रागही बरोबरच आहे. पण तुम्हीही जाणता की आमचं लग्न आमची संमती न घेताच तुम्ही मोठ्यांनी ठरवलंत. समाजाच्या रिवाजानुसार लग्न झालं, पण आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप नव्हतो, पुरक नव्हतो. आम्ही प्रयत्नही केला. पण कुठंतरी काही तरी बिनसलं हे खरं. निसर्ग नियमानुसार आम्हाला मुलंही झाली. म्हणजे संतानोत्पत्ती हा लग्नाचा उद्देश तर सफल झाला. पण आम्ही दोघंही संतुष्ट नव्हतो. पतिपत्नी म्हणून जी एकरूपता असावी ती आमच्यात नव्हती. कदाचित माझी भूक जास्तच असेल…त्यातून नोकरीमुळे मी सहा महिने घराबाहेर असतो. अशावेळी शरीराची गरज भागवायला मला दुसरा आधार शोधावा लागला. आशुलाही त्याच भावना आहेत. मी सुख भोगणार अन् माझी पत्नी इथं तळमळणार हे मला मान्य नाही. मीच तिला पूर्ण मोकळीक दिली आहे. तिला पूर्णपणे सुखावू शकेल अशा पुरुषाशी तिनं संबंध ठेवायला माझी हरकत नाही. त्यामुळे आम्ही दोघंही सुखी होतो अन् आमचे आपसातले संबंधही चांगले राहतात. एकमेकांविषयी आमच्या मनांत राग, द्वेष, संताप नाही…’’
आई अजूनही रागातच होती. निशांतलाही ते समजलं. त्यानं अत्यंत प्रेमानं अन् आदरानं आईचा हात आपल्या हातात घेतला, ‘‘आई, मला कळंतय, या गोष्टींमुळे तुम्ही खूप दुखावला आहात. तुम्हाला खूप रागही आला आहे. पण मला एक सांगा, एखाद्या जिवंत माणसाच्या आनंदापेक्षा निर्जीव रीतीरिवाज किंवा नियम कायदे महत्त्वाचे आहेत का? अन् या गोष्टी पूर्वीही घडतंच होत्या. अगदी आपल्या महाभारतातही असे दाखले आहेतच ना?’’
एवढं बोलून निशांतने इंटरनेटमधून डाऊनलोड केलेले महाभारतातले प्रसंग सांगायला सुरूवात केली. ‘‘पांडूला एका ऋषीनं शाप दिल्यामुळे तो पत्नीशी रत होऊ शकत नव्हता. पण त्याला पुत्र हवा होता, तेव्हा त्याची पत्नी कुंतीनं तिला मिळालेल्या वराचा उपयोग करून वेगवेगळ्या देवांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. महाभारतातली पांडवांच्या जन्माची कथा काय सांगते? तिथंही नवऱ्याखेरीज इतर पुरुषांची मदत घेतली गेली ना?’’
महाभारतातच द्रौपदीची कथा आहे. द्रौपदीला पाच पती होते. कारण आईनंच पाचही भावांना तिला वाटून घ्यायला सांगितलं होतं. अर्जुनाला सुभद्रा आवडली अन् तो तिला पत्नी म्हणून घेऊन आला. भीमाला हिंडिंबेपासून घटोत्कच नावाचा मुलगा होता. धृतराष्ट्र राजाचा मुलगा युयुत्सु तर म्हणे एका वेश्येपासून झाला होता.
आता तुम्हीच बघा, तुम्ही रोज महाभारत वाचता, अगदी श्रद्धेनं वाचता. त्यातला खरा अर्थ तुम्हाला लक्षात आलाय का? आयुष्य स्वेच्छेनं, आनंदात घालवा. हसतखेळत घालवा. फक्त एकच लक्षात ठेवा की तुमच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होता कामा नये, तुमचं सुख दुसऱ्याला दु:ख देऊन मिळवलेलं नसावं आणि कुणी कुणावर बळजबरी करू नये. असा साधा संदेश हे ग्रंथ देतात ना?
मग आज आम्ही, म्हणजे मी आणि आशु जर परस्पर सहमतीनं आमचं सुख मिळवतो आहोत तर त्यात गैर काय आहे? मी इथं नसताना तिनं मुलींना उत्तमरित्या एकटीनं वाढवलं, याचं मला कौतुक आहे, तिच्याविषयी अभिमान आहे. मी बोटीवर अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहतो. मुबलक पैसा मिळवताना मला सतत धोक्यांना सामोरं जावं लागतं. याबद्दल आशुच्या मनात माझ्याबद्दल कौतुक आणि आदर आहे. आम्ही पतिपत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र म्हणून राहतोय. यात चुकीचं काय आहे? आता तुम्ही समाजाचे नियम म्हणाला तर हे नियम केले कुणी? ज्यांनी कुणी हे नियम केले त्यांना समाजातला वेश्या व्यवसाय दिसत नाही? राजरोसपणे चालणारा शरीराच्या सौदेबाजार त्यांना खटकत नाही? हे नियम करणारे पुरुष असतात, स्वत:साठी पळवाटा काढतात अन् स्त्रियांना मात्र दु:खाच्या खाईत लोटतात. स्त्रियांना का हक्क नसावा हवं ते सुख मिळवण्याचा? नियम सर्वांसाठी सारखे असावेत. त्यात स्त्री पुरूष असा भेदभाव कशासाठी? अन् मी तर म्हणतो त्रासदायक ठरतील असे नियम, कायदे, कानून नसावेतच म्हणजे माणूस मुक्तपणे जगेल. नाहीतर मग चोरून लपवून काम करेल.’’
आई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून स्तब्ध झाल्या होत्या. नि:शब्द बसून होत्या. तिथंच बसलेली आशूताई गदगदून रडत होती. निशांतने उठून तिला मिठीत घेतलं. थोपटून शांत शांत करत म्हणाला, ‘‘आशू, रडू नकोस, तुझं काहीही चुकलेलं नाहीए. माझ्याकडून तुला पूर्ण मोकळीक आहे. तू तुझा आनंद मिळव.’’
खरं तर आईंना हे सगळं पचवायला जडच जात होतं पण निशांत आणि आशुताईंचे उजळलेले चेहरे बघून आम्ही ही सुखावलो होतो. वातावरणातला ताण कमी झाला होता.
आईंनी आशुताईला म्हटलं, ‘‘पोरी, मला क्षमा कर, फार वाईट वागले मी तुझ्याशी,’’ आशुनं आईला मिठीच मारली.
निशांतनं ज्या धीरगंभीरपणे अन् हुषारीने सर्व परिस्थिती हाताळली, त्याला तोड नव्हती. त्याच्या स्वच्छ मनाचं, प्रामाणिकपणाचं अन् समजावून सांगण्याच्या कसबाचं आम्हाला कौतुक वाटलं.
आकाश म्हणाला, ‘‘मला आता भूक लागलीये. आज आपण जेवण बाहेरूनच मागवू, निशांत जेवण ऑर्डर करतोस का?’’
निशांतनं लगेच विचारलं, ‘‘आई, पहिला पदार्थ तुम्ही सांगा?’’
वातावरण निवळलं. आम्ही आईंना घेऊन अमेरिकेत परत आलो. आता आईंना अमेरिकेतल्या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या. त्यांनी इथलं कल्चर समजून घेतलं होतं. मुलंही म्हणत होती, ‘‘आजी, आता बदलली आहे बरं का!’’