कथा * प्रा. रेखा नाबर
मी जर्मन रेमिडीज या कंपनीत मेडिकल ऑफिसर असताना घडलेली ही गोष्ट आहे. एका वर्षासाठी मला गोवा डिव्हिजनला पोस्टिंग मिळाले. गोव्याच्या निसर्ग सौंदर्याच्या मी प्रेमात आहे. त्याशिवाय जवळच असलेल्या सावंतवाडीतील आजोळच्या मधाळ आठवणींनी मी आनंदित झालो. दोन वर्षं माझे शालेय शिक्षण तिथे झाले होते. त्यावेळचा माझा जीवश्च कंठश्च मित्र रमाकांत मोरचकर (मोऱ्या) मला साद घालू लागला. गोव्याला बाडबिस्तरा टाकून सावंतवाडीला मोऱ्याला न कळविता दाखल झालो. ‘येवा, कोकण आपलाच असा’ या वृत्तीची ही माणसं दिलखुलास स्वागत करतात. त्याच्या घरात एक प्रकारचा सन्नाटा जाणवला. माझ्या मामेभावाने तर तशी काही बातमी दिली नव्हती. मी कोड्यात पडलो.
‘‘काय मोरोबो, सगळं क्षेमकुशल ना?’’
‘‘हो. तसंच म्हणायचं.’’
‘‘न सांगता आलो म्हणून नाराज आहे की काय?’’ वहिनी पाणी घेऊन बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसले. तब्येतही काहीशी उतरलेली वाटली. मी कोड्यात.
‘‘सवितावहिनी, कशा आहात?’’
‘‘ठीक आहे,’’ चेहरा निर्विकार.
‘‘चहा टाक जरा आंद्यासाठी.’’ (आंद्या म्हणजे मी… आनंद).
देवघरात काकी (मोऱ्याची आई) जप करीत होत्या. त्यांना नमस्कार केला. ‘‘बस बाबा.’’ त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी.
माजघरात नजर टाकली तर एक १४-१५ वर्षांची मुलगी शांतपणे बसली होती, जे तिच्या वयाला अजिबातच शोभत नव्हते. कृश हातपाय व चेहेरा फिकुटलेला. मी निरखून बघितले.
‘‘ही सुरभी ना? सुभ्या, ओळखलं नाहीस चॉकलेट काकाला? हो कळलं, चॉकलेट दिन नाही म्हणून रागावलीस ना? हे घे चॉकलेट, चल ये बाहेर.’’
तिने चॉकलेट घेतले नाहीच, उलट ती रडायलाच लागली.
‘‘आंद्या, तिला बोलायला येत नाही,’’ काकींनी धक्कादायक बातमी दिली.
‘‘काय? लहानपणी चुरूचुरू बोलणाऱ्या मुलीला बोलता येत नाही. पण का? आजारी होती का? अशक्त वाटतेय. का रे मोऱ्या?’’
चहा घेऊन आलेल्या वहिनींनी आणखी एक धक्का दिला.
‘‘गेल्या वर्षी एक दिवस शाळेतून आली, तेव्हापासून मुकीच झाली.’’
‘‘काहीतरीच काय? आता शाळेत जात नाही वाटतं?’’
‘‘शाळेत जाऊन काय करणार? बसली आहे घरात.’’ वहिनींचा उदास स्वर.
मी धक्क्यातून सावरलो. सुरभीचा गळा, कान, नाक वगैरे तपासले.
स्वीच ऑडिओ माझा विषय नसला तरी डॉक्टर असल्यामुळे प्राथमिक ज्ञान होते.
‘‘मोऱ्या, मला सांग हे नक्की कधी झालं? कळवायचं नाही का रे मला?’’
‘‘गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मैत्रिणींबरोबर शाळेतून येत असताना एकदम हिचा आवाज बसल्यासारखा झाला आणि काही वेळाने बाहेरच पडेना. तेव्हापासून असंच आहे.’’
‘‘अरे त्या झाडाखालून आली होती ते सांग ना,’’ काकींची सूचना.
‘‘कोणत्या झाडाखालून? त्याची फांदी पडली का हिच्या अंगावर?’’
‘‘पिंपळाखालून. फांदी कशा पडायला पाहिजे. त्या झाडाखालून अमावस्येच्या दिवशी आलं की असंच होतं. शिवाय दुपारी बाराला.’’
‘‘ही एकटीच होती का?’’
‘‘नाय रे, होत्या तीनचार जणी. पण हिलाच धरले ना. अण्णा महाराजांनी सगळं सांगितलं मला,’’ काकींचे विवेचन अगाध वाटले.
‘‘आता हे अण्णा महाराज कोण?’’
‘‘गेल्या वर्षींपासून गावाच्या बाहेरच्या मळात येऊन राहीलेत. बरोबर एक शिष्य आहे. पूजा पठण, जप असा त्यांचा कार्यक्रम असतो. भक्तांना काही समस्या असल्या तर त्यांचं निवारण करतात. काही तोडगे सुचवतात. जडीबुटीची काही औषधंसुद्धा आहेत त्यांच्याकडे. गावात बऱ्याच जणांना गुण आलाय.’’
‘‘मग तू गेला होतास की काय त्याच्याकडे?’’
‘‘आई घेऊन गेली होती सुरभीला. बघताक्षणीच त्यांनी सांगितलं की पिंपळाखालची बाधा आहे. मंतरलेले दोरे दिलेत. हिला उपास करायला सांगितलेत. करतेय ती.’’
‘‘दिसतंय ते वहिनीच्या तब्येतीवरून, कसला रे गंड्या दोऱ्यांवर विश्वास ठेवतोस? ही अंधश्रद्धा आहे. अज्ञानातून आलेली. विज्ञानयुगात आपली विचारसरणी बदलली पाहिजे. या बुवाबाबांच्या औषधाने गुण आला तर वैद्यकशास्त्र का मोडीत काढायचं? बी.ए.पर्यंत शिकलास ना तू? डॉक्टरांना दाखवलं नाहीस का?’’
‘‘दाखवलं ना! गोव्याहून येणाऱ्या स्पेशालिस्टना दाखवलं. त्यांनी सांगितलं स्वरयंत्राचं ऑपरेशन करावं लागेल. एक तर ते खर्चिक आहे आणि यशाची खात्री नाही. म्हणून मनात चलबिचल आहे.’’
‘‘ठीक आहे. हिच्या ज्या मैत्रिणी त्यावेळी बरोबर होत्या, त्यांना मी भेटू शकतो का?’’
त्या मैत्रिणींशी बातचित करून मी मनाशी काही आडाखे बांधले. पिंपळाखालची जागा बघून आलो. मोऱ्या, त्याची आई व पत्नी संभ्रमात होते. ‘‘मोरोबा, उद्या सकाळी आपण गोव्याला जाऊ या. माझा मित्र नाक, कान, घसा यांचा तज्ज्ञ आहे. त्यांचा सल्ला घेऊ या.’’
‘‘गोव्याच्याच डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय ना? मग हा काय निराळं सांगणार? जायचा यायचा त्रास आणि जबरदस्त फी.’’
‘‘त्याची तू काळजी करू नकोस. जाताना माझी गाडी आहे. येताना तुम्हाला कदंबच्या बसमध्ये बसवून देतो. रात्रीपर्यंत परत याल.’’
‘‘पण अण्णा महाराजांनी सांगितलंय की डॉक्टर काही करू शकणार नाहीत.’’ काकींचा विरोधाचा सूर.
‘‘काकी, त्यांचे दोरे आहेतच हातात. आता हे डॉक्टर काय म्हणतात बघू.’’
नाखूशीनेच मोऱ्या तयार झाला. बाहेर पडल्यामुळे सुरभीची निराशा कमी झाल्यासारखी वाटली. डॉक्टरांनी तपासून गोळ्या दिल्या. त्या कशा घ्यायच्या ते सांगितलं. नंतर चर्चा करून आम्ही कार्यवाही ठरविली.
सुरभीच्या तब्येतीविषयी मी फोनवर चौकशी करत होतो व माझ्या भावालासुद्धा लक्ष ठेवायला सांगितले होते. त्याच्या मुलीला सुरभीसोबत वेळ घालविण्याची विनंती केली होती. उपाय-तापास, गंडेदोरे, अण्णा महाराजांकडे खेटे घालणे चालूच होते. पंधरा दिवसांनी मी पुन्हा सावंतवाडीला मोऱ्याकडे हजर झालो, यावेळी सुरभीनेच पाणी आणले.
‘‘काय सुभ्या, थोडंसं बरं वाटतयं ना?’’
मानेनेच होकार देत तिने हातातील चॉकलेट घेतले व किंचित हसलीसुद्धा.
‘‘मोऱ्या, ही हसली का रे? आता हे बघ त्या डॉक्टरने सुरभिला पंधरा दिवसासाठी गोव्याला बोलावलं आहे. तिथे तिची ट्रिटमेंट होईल.’’
‘‘अरे बाप रे, म्हणजे पंधरा दिवस हिला हॉस्पिटलमध्ये ठेवायची? मला नाही रे हा खर्च परवडणार.’’
‘‘गप रे. माझं घर हॉस्पिटलच्या आवारातच आहे. तुझी वहिनीसुद्धा आली आहे. दोन दिवसांनी येऊन मी सुरभीला घेऊन जातो. ही तिला रोज हॉस्पिटलमध्ये नेईल. ट्रिटमेंट पंधरा दिवस चालेल. परिमाम पाहून नंतरची कार्यवाही ठरवू.’’
‘‘पण ट्रिटमेंट काय असेल?’’ वहिनीने घाबरतच विचारले.
‘‘ते डॉक्टर ठरवतील. पण ऑपरेशन नक्कीच नाही,’’ सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सुरभीची ट्रिटमेंट वीस दिवसांपर्यंत लांबली. त्या दरम्यान दोन वेळा मोऱ्या आणि वहिनी येऊन गेल्या. वीस दिवसांनी मी व माझी पत्नी सुरभीला घेऊन सावंतवाडीला गेलो.
‘‘सुभ्या बेटा, आईला हाक मार.’’
सुरभीने जोर लावून ‘‘आ आ…’’ असे म्हटले. वहिनींचा आनंद गगनात मावेना.
‘‘सुभ्या, बाबाला नाही हाक मारणार?’’
पुन्हा तिने ‘बा…बा…’ असे म्हटले. दोघांच्या डोळ्यांतून आंनदाश्रू पाझारले.
‘‘भाऊजी, सुरभी बोलायला लागलीय. पण नीट बोलत नाही आहे.’’
‘‘वहिनी, इतके दिवस तिच्या गळ्यांतून आवाज फुटत नव्हता. आता नुकता फुटायला लगलाय. प्रॅक्टिस केल्यावर होईल सुधारणा.’’
‘‘पण इथे कसं जमणार हे सगळं?’’
‘‘इकडच्या आरोग्य केंद्रात शितोळे नावाच्या बाई येतात. त्या हिच प्रॅक्टिस करतात. त्याला स्वीच आणि ऑडिओ थेरपी म्हणतात. त्या सराव करून घेतील. मग लागेल ती हळूहळू बोलायला.’’
काकींनी आपले घोडे पुढे दामटले. ‘‘अण्णा महाराजांनी वर्षभर उपाय केले. सुनेने उपास केले त्याचं फळ आहे हे आंद्या. तुझा डॉक्टर एक महिन्यांत काय करणार?’’
‘‘काकी, जे वर्षांत झालं नाही ते पंधरवडयात झालं. कारण वैद्यकिय ज्ञान. तरीही सुरभी अजून पूर्णपणे बरी झालेली नाही.’’
‘‘पण झालं तरी काय होतं तिला?’’
‘‘आपण सर्व अण्णा महाराजांकडे जाऊनच खुलासा करू?’’
आमची वरात मठात दाखल झाली.
‘‘नमस्कार अण्णा महाराज, सुभ्या बेटा, अण्णांना हाक मार.’’
ना…ना… अशी अक्षरे ऐकून अण्णा चपापले पण क्षणभरच.
‘‘अहो साहेब, वर्षभर आम्ही कसून प्रयत्न करतोय. माईंची तपस्या, वहिनींचे उपासतापास आणि आमचे उपाय..आला ना गुण?’’
‘‘अरे व्वा. पण काय झालं होतं हिला?’’
‘‘अहो काय सांगू? त्या पिंपळाला टांगून एका मुलीने जीव दिला होता. तिच्या भुताने हिला झपाटलं. आता जायला लागलंय ते भूत.’’
‘‘पण मी त्या पिंपळाला लोबंकळलो. हिच्या मैत्रिणींनासुद्धा करायला लावलं. आम्हाला कुणाला नाही झपाटलं.’’
‘‘सगळ्यानाच झपाटत नाही. या मुलीचं प्राक्तनच होतं तसं.’’
‘‘आणि तुमच्या प्राक्तमनांत हिच्या पालकांचा पैसा होता.’’ मीसुद्धा आवाज चढवला.
‘‘काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्यावर संशय घेताय?’’ अण्णा गरजले.
‘‘ओरडण्याने खोट्याचं खरं होत नाही. तुम्हाला लबाडी करून लोकांना लुबाडण्याच्या वृत्तीने झपाटलंय, खरी गोष्ट फार निराळी आहे,’’ मी चवताळून बोललो.
‘‘काय आहे सत्य?’’ अण्णांचा आवाज नरमला होता.
‘‘सुरभी जन्मत:च मुकी नाही. ती बोलत होती, पण तोतरी. वर्गातल्या मुली तिला ‘तोतरी तोररी’ असं चिडवायच्या. त्यामुळे ती बोलणं टाळायला लागली. आतल्या आत कुढायला लागली. कायमचे आघात झाल्यामुळे तिचं मन काही व्यक्त करणं विसरूनच गेलं. त्याचा परिपाक म्हणजे मुकेपणा. कायम दाबून ठेवलेल्या भावना तिला निराशेच्या गर्तेत नेऊ लागल्या होत्या. ही शारीरिक नाही तर मानसिक समस्या होती.’’
‘‘मग याच्यावर तू उपाय तरी काय केलेस? फक्त त्या गोळ्या?’’
‘‘त्या गोळ्या शक्तीवर्धक म्हणजे टॉनिक होत्या. खरं टॉनिक हवं होतं तिच्या मनाला. ते माझ्या डॉक्टर मित्राने ओळखलं. पण ही सगळी पार्श्वभूमी मला सुरभीच्या मैत्रिणींनी सांगितली. गोव्याला गेल्यावर तिचं समुपदेशन केलं. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं. नंतर बोलण्याचा प्रयत्न करायला शिकवलं. अजून जवळजवळ दोन महिन्यांनी ती व्यवस्थित बोलायला लागेल.’’
‘‘हे सगळं आपणहून होईल का?’’ वहिनींची रास्त शंका.
‘‘आपणहून कसं होईल वहिनी? त्यासाठी इथल्या आरोग्य केंद्रात तिला रोज जावं लागेल. एवढं तुम्हाला करावं लागेल.’’
‘‘करेन मी भावोजी. तुम्ही खूपच मदत केलीत आम्हाला.’’
‘‘मग माझी वर्गणी?’’
‘‘कोंबडी वडे.’’
‘‘एकदम बरोबर. राहणार आहे मी दोन दिवस. आता आधी या अण्णा महाराजांना कोणता नैवेद्य द्यायचा ते बघू, काय म्हाराजा?’’
‘‘काही नको. मी जातो दुसरीकडे.’’
‘‘आधी सुरभीच्या हातातले गंडेदोरे सोडा. दुसरीकडे अजिबात जायचं नाही. कारण तिकडच्या लोकांच्या हातात गंडेदोरे बांधून त्यांना गंडवणार. तेव्हा इथेच या मठात राहायचं. काम करून खायचं. फुकटचं नाही. हे गाव तुम्ही सोडूच शकत नाही. तुमचे फोटो आहेत माझ्याकडे. माझा भाऊ पोलिसांत आहे. तो तुम्हाला कुठनही शोधून काढील. काय, आहे का कबूल?’’
‘‘हो डॉक्टरसाहेब, तुम्ही सांगाल तसंच वागेन.’’ अण्णा नरमले.
घरी आल्यावर मी त्या सर्वांचं बौद्धिकच घेतलं.
‘‘मोऱ्या, काकूंचं एक राहू दे. पण तुसुद्धा सारासार विचार करू शकला नाहीस? अंधश्रद्धा आणि कर्मकांडामुळे आपल्या सर्वस्वाचा नाश होतो. गंडेदोरे, अंगारेधुपारे यांनी कुणाचा उद्धार होत नाही. मनात श्रद्धाभाव जरूर असावा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीवर, व्यक्तिवर किंवा शास्त्रज्ञावर आपली श्रद्धा असते. डॉक्टरांनी दिलेलं औषध विश्वासाने घेतलं तरच गुण येतो. सकारात्मक विश्वासाला श्रद्धा म्हटलं तर नकारात्मक विचाराला अंधश्रद्धा म्हणता येईल. स्वा. सावरकर म्हणत, ‘‘श्रद्धा माणसाला प्रगतीपथावर दौडण्याची शक्ती देते व अंधश्रद्धा माणसाच्या बुद्धिला पंगू बनवून एकाच जागी जखडून ठेवते.’’ म्हणूनच बुद्धिचा कस लावून विचार करावा.’’