– पूनम अहमद
संडे होता. फुटबॉलची मॅच चालू होती. विपिन टीव्हीला डोळे लावून बसला होता. रियाने अनेक वेळा प्रयत्न केला की विपिनने टीव्ही पाहणे सोडून तिच्यासोबत मूव्ही पाहायला यावे, पण तो काहीही प्रतिक्रिया देत नव्हता.
अधुनमधून एवढेच म्हणत होता, ‘‘मॅच संपू दे, मग बोलतो.’’
तिथे जवळच बसून मासिक वाचणारी मालती मुलगा व सुनेचे बोलणे ऐकून हळूच हसत होती. सुधीश म्हणजेच तिचे पतीही मॅच पाहण्यात व्यस्त होते. मालतीला आपला भूतकाळ आठवला. सुधीशनाही टीव्हीवर मॅच पाहणे खूप आवडत होते. मालतीलाही मूव्ही पाहण्याचा फार शौक होता. खूप हट्ट केल्यानंतर सुधीश तिला घेऊन जात असत, परंतु चांगल्यातली चांगली मूव्ही पाहूनही सुधीश ज्याप्रकारे प्रतिक्रिया देत, ते पाहून मालतीला वाटत असे, यांना सोबत न्यायलाच नको होते.
मालतीने गुपचूप रियाला आत चलण्याचा इशारा केला, तेव्हा रियाला आश्चर्य वाटले. मग मालतीच्या मागोमाग ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि विचारले,‘‘आई काय झाले?’’
‘‘कोणती मूव्ही पाहायची आहे तुला?’’
‘‘सुलतान.’’
मालती हसली, ‘‘तिकिटे मिळतील का?’’
‘‘जाऊन पाहावे लागेल, पण विपिन जागचा हलेल, तेव्हा ना…’’
‘‘त्याचे सोड, तो हलणार नाही. तू तयार हो.’’
‘‘मी एकटी?’’
‘‘नाही गं बाई, मलाही बघायची आहे.’’
‘‘काय?’’ रियाला आश्चर्य वाटले.
‘‘म्हणजे काय मलाही खूप शौक आहे. या बाप-लेकाला मॅच सोडून जबरदस्ती मूव्ही पाहायला नेले, तरी तिथेही हे दोघे एन्जॉय थोडेच करणार आहेत. आपल्याही उत्साहावर पाणी फेरतील. चल, निघू या. मूव्ही पाहू आणि मग डिनर करूनच परत येऊ.’’
रिया मालतीच्या कुशीत शिरली आणि खूश होत म्हणाली, ‘‘थँक्यू आई, किती बोअर वाटत होतं मला. संडेचा संपूर्ण दिवस विपिन टीव्हीला चिकटलेले असतात.’’
दोघी सासू-सून तयार झाल्या.
सुधीश आणि विपिनने विचारले, ‘‘कुठे निघालात?’’
‘‘मूव्ही पाहायला.’’
दोघांना जणू करंटच लागला. सुधीश म्हणाले, ‘‘एकटी?’’
मालती हसून म्हणाली,‘‘एकटी कुठे आहे, सुन आहे ना सोबत. चला बाय, तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवलेय. आम्ही बाहेरच जेवू,’’ एवढे बोलून मालती रियाला घेऊन झपझप पावले टाकीत निघून गेली.
सासू-सुनेने अगदी मैत्रिणींप्रमाणे ‘सुलतान’ चित्रपटाचा आनंद लुटला. त्या कधी सलमानच्या बॉडीवर चर्चा करीत होत्या, तर कधी एखाद्या सीनवर मोकळेपणाने बोलून हसत होत्या. खूप चांगल्या मूडमध्ये मूव्ही पाहून दोघींनी छानपैकी डिनर केले. रात्री १० वाजता दोघी आनंदात घरी परतल्या. आता बापलेकाची मॅच संपली होती आणि दोघे बोअर होत होते.
त्यानंतर रिया आणि मालतीमधील सासू-सुनेचे नाते दोन मैत्रिणींमध्ये बदलले. जेव्हा सुधीश आणि विपिन एखादा प्रोग्राम बनविण्यात टाळाटाळ करायचे, तेव्हा दोघी त्यांना विचारतही नसत. त्या शॉपिंगला एकत्र जाऊ लागल्या. कारण दोघे पुरुष लेडीज शॉपिंगमध्ये बोअर होत असत. दोघींनाही दुसऱ्या कुणा मैत्रिणीची गरजच वाटत नव्हती. रियाही ऑफिसला जात असे. सुट्टीच्या दिवशी तिला बाहेर एन्जॉय करायचे असायचे आणि विपिनला मॅच बघायची असायची. बाप व मुलगा दोघांनाही फूटबॉलचे वेड होते. रिपिट मॅचही ते आवडीने पाहात असत. त्यांना मूव्हीज, शॉपिंगचे अजिबात वेड नव्हते. रिया आणि विपिन आता या गोष्टीवरून मूड खराब करीत नव्हते. चौघेही आपापला शौक पूर्ण करीत होते.
एकमेकींबरोबर वेळ घालविल्यामुळे एकमेकींचा स्वभाव, आवडनिवड जाणून घेतल्यानंतर दोघी एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असत.
आता स्थिती अशी होती की, विपिन कधी फ्री असे, तेव्हा रिया म्हणत असे, ‘‘तुझं राहू दे. मी आईसोबत जाईन. तू तर शॉपच्या बाहेर फोनवर बिझी होतोस. मग मला बोअर वाटतं.’’
विपिन मग त्रस्त होत असे. सुधीशसोबतही असेच होऊ लागले. रिया फ्री असे, तेव्हा मालतीला रियाचीच कंपनी जास्त आवडत असे. सासू-सुनेचे बाँडिंग पाहून दोघे बाप-मुलगा चकित होत असत.
अनेक वेळा ते बोलूनही दाखवित, ‘‘तुम्ही दोघी आम्हाला विसरलात.’’
घरातील वातावरण हलकेफुलके आणि आनंदी राहात होते.
प्रत्येक घरात सासू-सुना मैत्रिणी बनल्या, तर जगण्यात आणखी मजा येईल. म्हणूनच दोघींनीही एकमेकांच्या भावनांचा आदर ठेवून, एकमेकांचे सुख-दु:ख, आवडनिवड मनापासून जाणून घेतली पाहिजे. पतिपत्नीचे शौक एकसारखे असावेत, हे आवश्यक नाही. दोघांनी आपले मन मारणे योग्य नाही. जर पिता-पुत्राचे शौक सासू-सुनेशी जुळत नसतील आणि सासू-सुनेची आवड एकमेकींशी जुळत असेल, तर आपल्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठी एकमेकींना साथ अवश्य द्यावी.
अजून एक उदाहरण पाहू. एका हिंदू कुटुंबात जन्मलेली आणि वाढलेली सुमन जेव्हा एका मुस्लीम मुलाशी समीरशी आंतरजातीय विवाह करून सासरी गेली. तेव्हा सासू अबिदा बेगमला सुमन शाकाहारी आहे हे कळलं, तेव्हा ती केवळ शाकाहारीच जेवण बनवू लागली.
सुमन समीरसोबत राहात होती. ती जेवढे दिवस सासरी कानपूरला राहात असे, तेवढे दिवस घरात केवळ शाकाहारी जेवणच बनत असे. या गोष्टीमुळे सुमनच्या मनात सासूबद्दल एवढे प्रेम आणि आदराचे बीज रोवले गेले की काळानुसार सुमनच्या मनात त्याची पाळे-मुळे घट्ट झाली. दोन वेगळया वातावरणात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सासू-सुनेमधील ताळमेळ पाहून सर्वजण कौतुक करू लागले.
खूप शांत आणि अतिगंभीर दिसणारी अबिदा बेगम जेव्हा हसऱ्या सुमनसोबत हसून बोले, तिच्यासोबत आनंदाने बाहेर जाई, तेव्हा तिचे पती आणि मुलगा चकित होत असत.
आजकालच्या बहुतेक सासवा जुन्या चित्रपटातील ललिता पवारसारख्या नाहीत. त्यांनाही सुनांसोबत हसत-खेळत जीवन जगायचे आहे. जीवनात अपूर्ण राहिलेले शौक आणि आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत.
आजच्या बहुतेक सुनाही शिकलेल्या आणि समजदार आहेत. त्या आपली कर्तव्ये आणि अधिकारांबाबत जागरूक आहेत. त्या नोकरदार आहेत. सुट्टीच्या दिवशी त्यांना रिलॅक्स व्हायची इच्छा असते. सासूची प्रेमळ साथ मिळाली, तर त्यांच्यातही उत्साह संचारतो.
आजच्या सासू-सुना दोघीही जाणतात की, एकमेकींसोबत मिळतंजुळतं घेण्यातच खरा जीवनाचा आनंद आहे. भांडणे करून स्वत:चे आणि दुसऱ्याचे आयुष्य संकटात टाकण्याने काहीही फायदा नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने त्रास वाढणार, एवढे नक्की.