* गरिमा पंकज
दिवाळी हा दिव्यांचा, उत्साहाचा, मौजमजेचा, आतषबाजीचा आणि भेटीगाठींचा सण आहे. यासोबतच, दिवाळी हा दिखाव्याचाही सण आहे. या दिवशी काहीतरी दिखाऊपणा करायला हवा, कारण आपले महागडे दागिने आणि स्टायलिश कपडे दाखवून इतरांना हेवा वाटावा, अशी संधी आजकाल मिळतेच कुठे? घर सजवण्यासाठीचे कारण तरी असतेच कुठे? कारण आजकाल लग्न आणि मोठे घरगुती कार्यक्रम फार कमी होतात.
पूर्वी एकत्र कुटुंब असायचे. घरात कधी ना कधी लग्न असायचे, ज्याच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून घेत असत, पण आजकाल संपूर्ण कुटुंबात क्वचितच २-३ किंवा ४ सदस्य असतात. ते देखील त्यांच्या खोल्यांमध्ये बंद असतात आणि त्यांच्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न दर १०-१५ वर्षांनी होते. स्वत:च्या कुटुंबात लग्न होणे ही एक वेगळीच गोष्ट आहे. मग एखादी व्यक्ती सर्वोत्तम कपडे खरेदी करते, जेणेकरून शेकडो लोक तिलाच पाहातील. स्टायलिश आणि महागडे कपडे आणि किंमती दागिने घालून, ती व्यक्ती राजा-राणीसारखी फिरते. घर सजवते. महागड्या वस्तू खरेदी करते. पण आता लग्नाचा प्रसंग फक्त १०-१२ वर्षांनी येतो.
अशा परिस्थितीत, दिवाळी हा एक मोठा सण आहे, जो प्रत्येकाच्या घरात साजरा केला जातो. हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा एकाच जातीच्या लोकांचा सण नाही. हा काही वैयक्तिक प्रसंग नाही जिथे आपण वर्धापन दिन किंवा वाढदिवस साजरा करतो. हा एक असा सण आहे जो प्रत्येकजण साजरा करत असतो. जर आपण दिवाळी एकत्र साजरी करत असू तर या प्रसंगी स्वत:साठी, स्वत:च्या घरासाठी आणि प्रियजनांसाठी काहीतरी खास का करू नये?
मनसोक्त खरेदी करा
मनसोक्त खरेदी करण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही संपूर्ण दुकान खरेदी करावे. याचा अर्थ असा की, तुम्ही अशी खरेदी करावी की, तुम्हाला ती करताना मजा येईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. असे कपडे, दागिने आणि अॅक्सेसरीज खरेदी करा ज्यामुळे तुम्हाला निखळ आनंद मिळेल. तुम्हाला असे वाटायला हवे की, तुम्ही कोणीतरी खास आहात. तुमचे कपडे आणि दागिन्यांकडे १० लोकांनी पाहावे आणि त्यांची नजर तुमच्यावरून हटवू नये.
तुम्ही फक्त एक साडी किंवा एक गाऊन किंवा असा कोणताही ड्रेस खरेदी करा की जेव्हा तुम्ही तो घालाल तेव्हा लोक तुमची प्रशंसा करतील. त्यासाठी जास्त पैसे खर्च करण्यासही मागेपुढे पाहू नका, कारण अशी संधी दररोज येत नाही. ज्यांचे डिझाइन विशेष नसेल असे खूप साधे किंवा फिकट रंगाचे कपडे खरेदी करू नका, त्याऐवजी असे कपडे खरेदी करा ज्यात जरीकाम आहे किंवा काही विशेष कौशल्य दिसेल आणि त्याची डिझाईन वैशिष्ट्यपूर्ण असेल. ड्रेस असा असावा की, तो तुम्हाला एक सुंदर लूक देईल. तुम्ही ड्रेस कुठून खरेदी केला, कितीला खरेदी केला, तो कोणत्या प्रिंटचा आहे इत्यादी प्रश्न लोक तुम्हाला विचारत राहातील.
वेगळे दिसण्यासाठी
जर तुम्हाला दिवाळीत स्वत:ला चांगल्या प्रकारे सादर करायचे असेल आणि इतरांपेक्षा वेगळे दिसायचे असेल तर तुम्ही काही अशा प्रकारचे कपडे निवडू शकता :
दिवाळीसाठी तुम्ही फ्लोअर लेंथ गाऊन खरेदी करू शकता. प्रसंग कोणताही असो, गाऊन नेहमीच सुंदर दिसतात. या दिवाळीसाठी, जरी किंवा खडे लावलेला सौम्य, चमकदार रंगाचा गाऊन निवडा. तुम्ही तो दिवाळी पार्टीत किंवा विशेष प्रसंगी घालू शकता.
वेगळे दिसण्यासाठी तुम्ही क्रॉप टॉप आणि स्कर्ट घालू शकता. हा लूक तुमच्या पोशाखाला आधुनिक टच देईल. लूक अधिक सुंदर बनवण्यासाठी, एक छान चमकणारा दुपट्टा घ्या. सणासुदीच्या काळात लेहेंगा नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. सुंदर आरशाचे केलेले नक्षीकाम अशा पोशाखांना आणखी सुंदर बनवते.
तुम्ही धोती स्टाईल ड्रेसदेखील घालू शकता. हा लूक पारंपरिक आहे, पण त्याला आधुनिकतेची जोडही आहे.
महिला साडीत इतक्या सुंदर दिसतात की, सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते. तुम्ही दिवाळीत साडी नेसू शकता. बाजारात तुम्हाला गुजराती, राजस्थानी साड्या, सिल्क, म्हैसूर, बनारसी इत्यादी अनेक प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील. त्या खूपच सुंदर दिसतात.
जर तुम्हाला पंजाबी सूट घालण्याची आवड असेल तर पलाझा सूट दिवाळीसाठी एक परिपूर्ण पोशाख आहे. तुम्ही तो अनेक प्रकारे कॅरी करू शकता. बाजारात तुम्हाला पलाझासह सेंटर कट असलेल्या सुंदर कॉटन किंवा सिल्क कुर्तींचे अनेक प्रकार मिळतील. याशिवाय, तुम्ही या कुर्तींना लाउंजिंग्ज, पलाझा पँट, जीन्स किंवा सलवार इत्यादींसह स्टाईल करू शकता आणि वेगळे दिसू शकता.
दागिने असावेत खास
असे दागिने खरेदी करा की, तुम्ही वर्षभर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात ते घालू शकाल. दिवाळीला जेव्हा तुम्ही ते घालून बाहेर किंवा कोणाच्या तरी घरी जाल किंवा कोणी तुम्हाला भेटायला येईल तेव्हा त्या दागिन्यांवरून त्यांची नजर हटता कामा नये. लोकांनी विचारत राहायला हवे की, तुम्ही ते कुठून घेतले? जर तुम्ही व्हॉट्सअॅपवरील स्टेटसमध्ये तुमचा असा फोटो टाकला तर लोक तुमचा लूक आणि निवडीबद्दल तुमचे खूप कौतुक करतील. तुम्हाला जो कोणी पाहील, मग तो तुमचा शेजारी असो, मित्र असो किंवा नातेवाईक असो, तो तुमच्याकडे बघतच राहील.
या दिवसासाठी, तुम्ही ड्रेसशी मिळतेजुळते चोकर नेकलेस, स्टेटमेंट इअररिंग्ज, स्टोन स्टड ज्वेलरी सेट इत्यादी घेऊ शकता. तुम्ही महागडे सोने किंवा हिऱ्यांचे दागिने खरेदी करू शकता. यामध्ये सोन्याचा नेकलेस, बांगड्या, कानातले आणि अंगठ्या इत्यादी असू शकते. तुम्ही कुंदन, पोलकी, मीनाकारी दागिने खरेदी करू शकता, जे विविध डिझाइनने आणि रंगीबेरंगी रत्नांनी सजवलेले असतात. तुम्ही माणिक, पन्ना, नीलम किंवा इतर मौल्यवान खड्यांनी सजवलेले दागिने देखील घालू शकता.
नवरत्न दागिने घाला, म्हणजेच नऊ वेगवेगळ्या रत्नांपासून बनवलेले आकर्षक दागिने घाला आणि चारचौघांमध्ये उठून दिसा. पोल्कीने जडवलेल्या जड सोन्याच्या अंगठ्या घाला. पांढऱ्या किंवा पिवळ्या सोन्यात मढवलेला माणिक आणि हिऱ्याचा हार घाला. पारंपरिक पोशाख असो किंवा रेशमी साडी असो, हे दागिने चंद्रप्रकाशात चमकतात म्हणून संध्याकाळच्या सोहळ्यात ते आकर्षक दिसतील.
या दिवाळीत लक्ष वेधण्यासाठी सोन्याची चांदबाली हा आणखी एक आकर्षक दागिना आहे. चांदबाली हे चंद्रकोरीच्या आकारातले कानातले असतात, जे सहसा पोल्की आणि इतर मौल्यवान रत्नांनी जडवलेले असतात. एका शब्दात सांगायचे तर चांदबाली तुम्हाला एखाद्या तारकेसारखे दिसण्यास मदत करू शकतात.
असे सजवा घर
आजकाल, दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने घर सजवण्यासाठी विविध गोष्टी उपलब्ध आहेत जसे की, हार, विद्युत रोषणाई, रांगोळी, ज्या स्टिकर्ससारख्याही लावता येतात, वॉलपेपर, स्फटिक आणि मण्यांनी बनवलेली रांगोळी, तरंगत्या आणि सुगंधित मेणबत्त्या, काचेचे कंदील, झालर इत्यादी, बाजारात अनेक प्रकारचे विद्युत दिवे उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही दिवाळीनिमित्त तुमचे घर वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने प्रकाशित करू शकता.
तुम्ही सतत चमकत राहाणाऱ्या निळ्या, हिरव्या, पांढऱ्या किंवा लाल रंगाच्या तारा लावू शकता. चमकदार लूकसाठी बहुरंगी दिवेदेखील सुंदर दिसतात. याशिवाय, तुम्ही तुमच्या घराचे वेगवेगळे भाग सोनेरी तारांच्या दिव्यांनी सजवू शकता. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत. तुम्ही सुगंधित, रंग बदलणाऱ्या मेणबत्त्या वापरू शकता. काही दिवे रिमोटवर आधारित किंवा इलेक्ट्रिक असतात. यात रंग बदलण्याचा पर्याय देखील असतो, जो घराच्या सौंदर्यात भर घालतो. सजावटीचे कंदील वापरून तुम्ही घराच्या सजावटीला तुमच्या मनासारखा लूक देखील देऊ शकता.
येथे हे देखील लक्षात ठेवा की, भरपूर सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी काही खास उत्पादने खरेदी करा. तुमचे घर मोठे नसले तरी ते सर्वात सुंदर दिसले पाहिजे, जेणेकरून लोक तुमच्या घराकडे पाहात राहातील आणि तुम्ही इतक्या सुंदर सजावटीच्या वस्तू कुठून आणल्या, असा प्रश्न त्यांना पडेल.
स्वागतही असावे भव्य
इतकेच नाही तर घरासाठी एखादी मौल्यवान वस्तू खरेदी केली पाहिजे, ज्याची खरेदी तुम्ही अनेक महिने पुढे ढकलत होता, असा विचार करून की पैसे असतील तेव्हा ती खरेदी करू. हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही ती खरेदी करायला हवी. दिवाळीला तुम्हाला बोनस मिळाला असेल आणि जरी तो मिळाला नसला तरी तुम्ही वर्षभरात इतके पैसे नक्कीच खर्च करू शकता, जेणेकरून तुम्हाला बरे वाटेल आणि तुम्ही इतरांना दाखवू शकाल की, आज दिवाळीला आम्ही ही वस्तू खरेदी केली. या दिवशी पाहुण्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करा. जर तुम्हाला नवीन महागडा सोफा सेट, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन किंवा नवीन बाईक घ्यायची असेल तर दिवाळीच्या निमित्ताने ती खरेदी करा.
धमाल पार्टी करा
बहुतेक जण दिवाळीत घरी पार्टी करतात किंवा दुसऱ्यांच्या घरी जातात. तुम्ही तुमच्या घरीही पार्टी आयोजित करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या वस्तू, तुमचे दागिने आणि कपडे, तुमच्या घरातील सजावट आणि महागड्या वस्तू इतरांना दाखवू शकाल. त्यासाठी पार्टी इतकी साधी ठेवू नका की, जिथे लोक येतील, जेवतील, विनोद करतील आणि निघून जातील, पार्टीमध्ये काहीतरी मनोरंजक संकल्पना असायला हवी.
हॅकवर गाणी वाजवा, त्या गाण्यांवर नाच करा. काही डान्स गेम खेळा. काही मनोरंजक उपक्रम करा. टूथ अँड डेअरसारखे खेळ खेळा आणि इतकी धमाल, मजा करा की, परिसरातील सर्वांना समजेल की, तुमच्या घरी पार्टी आहे. मनसोक्त खाऊ-पिऊ घाला, जेणेकरून दिवस अधिक उत्साही होईल. दिवाळीच्या दिवशीच पार्टी करायला हवी, असे मुळीच नाही.
ज्या दिवशी तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्ही सुट्टी घेऊ शकता किंवा तुमच्या सुट्टया सुरू झाल्या असतील, त्या दिवशी तुमच्या मित्र- मैत्रिणींना, नातेवाईकांना, जवळच्या लोकांना, शेजाऱ्यांनाही आमंत्रित करा आणि एकत्र मजा करा, फोटो काढा, जेणेकरून ते फोटो आठवणी बनतील आणि वर्षभर तुमच्या मनात राहातील. लोकांना हेवा वाटेल असे हे फोटो तुमच्या स्टेटसवर किंवा फेसबुकवर शेअर करा.
फटाकेही असावेत वेगळे
फटाक्यांशिवाय दिवाळीची मजा येत नाही, विशेषत: मुलांसाठी. त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाचे फटाके खरेदी करा. असे फटाके थोडे महाग असू शकतात, पण त्यांचा प्रकाश आणि आवाज खूप दूरपर्यंत जातो, त्यामुळे जेव्हा तुम्ही ते गच्चीवर किंवा दाराबाहेर लावता तेव्हा लोक ते दूरवरून पाहू शकतात. तुम्ही पाऊस, रॅकेट, चक्री इत्यादी प्रकाश उत्सर्जक फटाक्यांची आतषबाजी तासभर जरी केली तरी दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल. दरवेळी काही नवीन प्रकारचे फटाके नक्कीच बाजारात येतात. ते खरेदी करा आणि मुलांचा उत्साह वाढवा.





