* आरती सक्सेना
लहानपणापासूनच, लग्नसमारंभ आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. म्हणूनच, तर लहानपणी आपण खेळता खेळता बाहुलाबाहुलीचं लग्न लावायचो. तथापि, २१ व्या शतकात बाहुलाबाहुलीसोबत खेळणे किंवा त्यांचं लग्न लावण्याची प्रथा आता जुनी झाली आहे, कारण जसजसे, आपण शिक्षित होत आहोत, तसतसे जुन्या प्रथा मागे टाकत आहोत. इतर गोष्टींप्रमाणे आता लोकांचा शॉर्टकटवाल्या लग्नांमध्ये इंटरेस्ट वाढत जात आहे. वाढती महागाई आणि रूढीवादी परंपरा यांमुळे अनेक लोकांना पारंपरिक पद्धतीने पार पाडलं जाणार लग्न आता अर्थहीन वाटत आहे.
लग्न व्हावं संस्मरणीय
आजच्या मॉर्डन जमान्यात अशीही धारणा असलेले काही लोक आहेत, ज्यांच्या मते लग्न आयुष्यात एकदाच होतं, तर मग ते मेमोरेबल आणि धुमधडाक्यात झालं पाहिजे.
असे सुविचार फॉलो करणारे कित्येक लोक लग्नाच्या दरम्यान होणारे विधी जसं की, हळद, मेहंदी, नवरीची डोली, नवऱ्याची घोडसवारी, प्रिवेंडिंग फोटोशूट, या सगळ्यांची मज्जा घेऊ इच्छितात. लग्नाच्या दरम्यान होणारे हे सगळे विधी फक्त नवरा नवरीलाच नाही, तर लग्नात सामील झालेल्या वऱ्हाड्यांना पण आनंदित करतात. परिणामी, लग्नाच्या या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंगची प्रथा सुरु झाली.
तथापि, एके काळी डेस्टिनेशन वेडिंग श्रीमंतांचा दिखाऊपणा म्हणून संबोधले जात होते, कारण डेस्टिनेशन वेडिंगच्या निमित्ताने श्रीमंत लोकांना शोबाजी करण्याची पूर्ण संधी मिळते. पण आता हेचं डेस्टिनेशन वेडिंग सामान्य लोकांमध्येसुद्धा फेमस होत आहे, कारण या वेडिंगचे अजूनसुद्धा खूप फायदे आहेत. हे वेडिंग बजेटच्या चौकटीत राहूनसुद्धा केले जाऊ शकते आणि लग्नाच्या सर्व विधींचा पूर्ण आनंदसुद्धा लुटता येतो.
काय स्पेशल आहे डेस्टिनेशन वेडिंगमध्ये
प्रश्न हा उपस्थित होतो की, आजच्या व्यस्त जीवनात जिथे लोकांच्या वेळेचा प्रचंड अभाव आहे, तिथे डेस्टिनेशन वेडिंगला का पसंती मिळत आहे? डेस्टिनेशन वेडिंगमध्ये असं काय स्पेशल आहे, जे आजच्या काळात लोक आपलं लग्न डेस्टिनेशन वेडिंगच्या माध्यमातून करत मेमोरेबल बनवू इच्छित आहेत?
चला, या वेडिंगशी संबंधित पैलूंवर एक नजर टाकूया :
डेस्टिनेशन वेडिंगचे फायदे आणि नुकसान
डेस्टिनेशन वेडिंगचा सर्वात मोठा फायदा तर हा आहे की, लग्नातील दोन्ही बाजूच्या कुटुंबियांची मेहनत आणि परिश्रम करण्यापासून सुटका होते आणि लग्नात सामील झालेल्या सर्व लोकांना लग्नाचा पूर्ण आनंद लुटण्याची संधी मिळते, कारण डेस्टिनेशन वेडिंगमध्ये वर आणि वधूचे कुटुंबीय व मित्र परिवार जर २-३ दिवसांसाठी एकत्र आले, तर नॉर्मल लग्नामध्ये होणाऱ्या छोट्याछोट्या गोष्टींसाठीची धावपळ त्यांना करावी लागत नाही, कारण अशा डेस्टिनेशन वेडिंगमध्ये वेडिंग प्लॅनर बहुतेक करून प्रत्येक गोष्टीचा बंदोबस्त आधीच करून ठेवतात किंवा मग ज्या हॉटेलमध्ये हे लग्न होणार असेल, त्या हॉटेलचा पूर्ण स्टाफ अरेंजमेंट करण्याची जबाबदारी घेतो. वऱ्हाड्यांना फक्त तयार होऊन लग्न मंडपात पोहोचायचं असतं आणि कुटुंबीय वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहतात.
कसा निवडायचा डेस्टिनेशन वेडिंगचा वेन्यू
डेस्टिनेशन वेडिंग आता केवळ श्रीमंताचंच नाही, तर सर्वसामान्य लोकांच्यासुद्धा मजामस्तीचे एक माध्यम बनले आहे, जे प्रत्येकजण आपल्या बजेटच्या चौकटीत राहून करायचा प्रयत्न करतो आहे, कारण या लग्नात दोन्हीही बाजूच्या लोकांचा उद्देश एन्जॉय करणं आणि लग्न संस्मरणीय बनवणं एवढाचं असतो. परिणामी, अशा प्रकारच्या डेस्टिनेशन वेडिंगचं प्लॅनिंग करताना बजेट आणि योग्यवेळेची निवड सगळ्यांत जास्त महत्वाचं असतं.
लग्नात देशविदेशातून, ठिकठिकाणाहून लोक येतात. म्हणून, एक अशी कॉमन प्लेस निवडा, जिथे लग्नाला येणारा प्रत्येकजण सहजपणे पोहोचू शकेल. जसं कि दिल्ली, मुंबई, हैद्रराबाद इत्यादी. मग तो हिल स्टेशनचा वेन्यू असो किंवा समुद्र किनाऱ्याची जागा. फक्त ती जागा अशी असली पाहिजे, जिथे सगळ्या सुविधा उपलब्ध असण्याचा प्रबंध केलेला असेल.
पैसे वाचवायच्या नादात जंगल किंवा अशा एखाद्या ठिकाणी लग्नाचं नियोजन करू नका, जिथे मोबाइल नेटवर्कपासून लग्न समारंभात उपयोगी असणाऱ्या गोष्टी खरेदी करणंदेखील कठीण होऊन बसेल.





