* प्रियंका यादव
कानपूरची श्रृती सक्सेना बंगळुरूमध्ये काम करणारी तिची मैत्रीण ईशा मौर्यच्या घरी गेली होती. श्रृतीचा २४ वा वाढदिवस होता. ती पार्टीची तयारी करत होती, पण त्याचवेळी तिला एका समस्येचा सामना करावा लागला. ईशाच्या सांगण्यावरून तिने ऑफ-शोल्डर म्हणजे उघड्या खांद्यांचा मोठी, उघडी पाठ असलेला ड्रेस खरेदी केला होता, पण तिच्याकडे ज्या ब्रा होत्या त्या सर्व या ड्रेसमधून बाहेर डोकावणाऱ्या होत्या. ब्रा शिवाय हा ड्रेस कसा घालायचा, हे तिला समजत नव्हते. अस्वस्थ होऊन ती पलंगावर एका कोपऱ्यात जाऊन बसली. जेव्हा ईशाने श्रृतीला जुन्या कपड्यांमध्ये पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तिने श्रृतीला यामागचे कारण विचारले, तेव्हा श्रृतीने तिला तिची समस्या सांगितली. ईशाने कपाटातून एक बॉक्स आणला आणि श्रृतीला देत म्हणाली, हे घे तुझ्या समस्येवरचे उत्तर. बॉक्समध्ये त्वचेच्या रंगाचे २ मऊ पॅच होते. हे काय आहे, ते श्रृतीला समजले नाही.
श्रृतीने विचारल्यावर ईशाने सांगितले की, हे सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर आहे. ते ब्रासारखेच काम करते, परंतु त्याला पट्ट्या नसतात आणि यामुळे वेदनाही होत नाहीत. ते ड्रेसखाली स्तनांवर वापरता येते. श्रृती ते घेऊन आतल्या खोलीत गेली आणि ड्रेस घालून बाहेर आली.
श्रृती आनंदाने ईशाला म्हणाली, ‘‘हे खूप आरामदायक आहे. माझ्या स्तनांवर काहीतरी वजनदार आहे, असे मला अजिबात वाटत नाही. हे खूपच हलके आहे.’’ ‘‘सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर्सची हीच तर खरी गंमत आहे. ते घालूनही, काहीच न घातल्यासारखे वाटते,’’ ईशा म्हणाली.
सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर
सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर स्तनांना उभारी देण्याचे काम करते. ते आउटफिटला चांगले फिटिंग देते. आजकाल मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात याचा वापर करत आहेत. एक प्रकारे, ते ब्रा नसले तरी ब्रा म्हणून काम करते. ते उघड्या पाठीचा ड्रेस किंवा टॉप, खोल गळ्याचा ड्रेस किंवा टॉप आणि ब्लाउजच्या आत घालता येते. ते त्वचेच्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. तुम्हालाही लग्नात किंवा पार्टीत हॉट ड्रेस घालायचा असेल आणि तुमच्या ब्रा चा पट्टाही दिसू नये असे वाटत असेल तर तुम्ही सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर वापरू शकता. यामुळे ब्राच्या त्रासापासून, सोबतच उन्हाळ्यात ब्रामुळे होणाऱ्या चिडचिडीपासूनही सुटका होईल.
सध्या हे केवळ ऑनलाइन खरेदी करता येते. ऑफलाइनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे जोडीत मिळते आणि त्याची किंमत रू. २५० ते १,००० रुपयांपर्यंत आहे.
याच प्रकारे, निप्पल कव्हर्स आहेत, जे सिलिकॉनचे असल्यामुळे खूप मऊ आहेत. ते त्वचेच्या रंगात उपलब्ध आहेत. ते पसरलेले स्तनाग्र लपविण्यासाठी वापरले जातात. अशा प्रकारचे निप्पल कव्हर नॉन-पॅडेड ब्रा सोबत घालता येतात. सुती किंवा साधी ब्रा घालणाऱ्या मुली आणि महिला अनेकदा ड्रेसमधून निपल्स दिसल्याने अस्वस्थ होतात. हे मुख्यत: थंड हवामानात होते. पण, मोठे स्तन असलेल्या महिलांना या समस्येमुळे नेहमीच लाजल्यासारखे होते. अशा परिस्थितीत, त्यांनी सिलिकॉन निप्पल कव्हर्स वापरून पाहावे, जे त्यांना ड्रेसमधून दिसणाऱ्या स्तनाग्रांपासून आराम देतील. हे वापरून त्यांना आत्मविश्वास देखील मिळेल. हे घातल्यामुळे कोणताही पोशाख बिनधास्तपणे घालता येतो. लक्षात ठेवा की, निपल कव्हर्स फक्त स्तनाग्र झाकतात. त्यांना उभारी देत नाहीत.
वेगवेगळ्या आकारात उपलब्ध
उन्हाळ्यात निपल कव्हर किंवा निपल स्टॉकचा वापर ब्रामुळे होणाऱ्या चिडचिडीपासून सुटका करतो. स्तनाग्र कव्हर्सदेखील वेगवेगळ्या आकारात येतात जसे की, स्टार शेप, हार्ट शेप. त्यांची किंमत ९९ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे. ही किंमत निप्पल कव्हरच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. स्तनाग्र कव्हर स्वच्छ ठेवल्यास, चांगल्या दर्जाचे स्तनाग्र कव्हर १२ वेळा वापरले जाऊ शकते. अशाच प्रकारे मोठे, बाहेर आलेले स्तन लपवण्यासाठी, निप्पल कव्हर स्टॉकचा वापर करता येतो. निपल स्टॉकला निप्पल पॅच असेही म्हणतात. ते वेगवेगळया आकारात येतात. ते स्तनाग्र कव्हर म्हणून देखील वापरले जातात. ते फक्त एकदाच वापरता येतात.
जर तुम्हाला ब्रा घालायची नसेल आणि खोल पाठ किंवा खोल गळ्याचा पोशाख घालायचा असेल तर तुम्ही ब्रेस्ट टेप वापरू शकता. ते नेकलाइनदेखील वाढवते, ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडते.
त्वचेच्या प्रकारासाठी योग्य
सिलिकॉन निपल लिफ्ट कव्हर्सप्रमाणे, ब्रेस्ट टेप किंवा बूब टेपदेखील आहे. ती कॉटन आणि लेटेक्सची बनलेली असते, जी प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. ती फॅब्रिक आणि त्वचेसाठी डिझाइन केलेली असते. यात एका बाजूला गोंद लावलेला असतो आणि दुसरी बाजू कोरडी असते. आपल्या स्तनाच्या आकारानुसार चिकट टेप कापून घ्या आणि हळूवारपणे स्तनावर चिकटवा. तुमच्या स्तनाच्या आकारानुसार किती टेप वापरायची ते ठरवा.
ती लांब, रुंद, कशाही प्रकारे वापरता येते. जर तुम्हाला ती स्तनांना उभारी देण्यासाठी वापरायची असेल तर लांबट आकारात लावा. ब्रेस्ट टेपच्या वापराने, स्तन एकाच स्थितीत राहातात, ज्यामुळे त्यांचा आकार सुंदर, किंचित उंचावलेला दिसतो. ती स्तन लपविण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.
बऱ्याचदा महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा खरेदी कराव्या लागतात, जसे की, खांदे उघडे असलेल्या ड्रेससाठी पारदर्शक पट्ट्या असलेली ब्रा लागते आणि जर खूप खोल पाठ असलेला ड्रेस घालायचा असेल तर तो कसा घालायचा, असा प्रश्न पडतो. अशा ड्रेसमध्ये साधी ब्रा घातल्यावर ती बाहेर डोकावूं लागते. अशा ड्रेसच्या आत कोणतीही ब्रा घातली तरी ती बाहेरून दिसतेच. वेगवेगळ्या ड्रेससाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा खरेदी करणं सोपं नाही. ते फार महागडे ठरेल. अशा परिस्थितीत, ब्रेस्ट टेप वापरणे खूप फायदेशीर ठरेल, कारण ती कोणत्याही ड्रेससाठी वापरली जाऊ शकते. ड्रेस कसाही असला तरी ती दिसत नाही.
जर तुम्हाला खोल पाठ असलेला, खोल गळ्याचा ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही ब्रेस्ट टेप वापरू शकता. ज्या महिलांचे स्तन सपाट किंवा लहान असतात, क्लिवेज नीट दिसत नाही, त्या या टेपचा वापर करून क्लिवेज दाखवू शकतात. त्यासाठी स्तनाची टेप दोन्ही स्तनांवर रुंदीच्या दिशेने लावावी आणि जवळ आणावी.
आत्मविश्वासात वाढ
जर तुम्हाला उभारी आणण्यासाठी बूब टेप वापरायची असेल तर सर्वप्रथम तुमचे स्तन झाकण्यासाठी निप्पल कव्हर्स वापरा. सुरक्षेसाठी तुम्ही त्यावर एक लहान पॅड किंवा कापूस ठेवू शकता. लक्षात ठेवा की, टेप थेट स्तनाग्रांवर ठेवू नये. स्तनाची टेप त्वचेचा रंग, काळा, चंदेरी, अशा अनेक रंगात येते. ती कोणत्याही ड्रेसमधून दिसत नाही. ती कोणत्याही खोलगट पाठीच्या, खांदे उघडे असलेल्या, खोल गळ्याच्या ड्रेस आणि टॉपमध्ये तसेच स्तनांना उभारी देण्यासाठी वापरली जाऊ शकते. तिच्या वापराने स्तनांना उभारी, आधार आणि क्लिवेज मिळते. वाढत्या वयाबरोबर महिलांना स्तन गळण्याची समस्या भेडसावते. स्तन पूर्वीसारखे आकर्षक दिसत नाहीत. अशा वेळी, स्तनाची टेप लांबीच्या दिशेने लावून स्तन उचलता येतात. यामुळे स्तन सुडौल दिसतात. याच्या वापराने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.
ब्रेस्ट टेप लावताना ही खबरदारी घ्या
* ब्रेस्ट टेप वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा.
* ब्रेस्ट टेप लावताना हे लक्षात ठेवा की, स्तन अस्वच्छ नसावेत. ब्रेस्ट टेप लावण्यापूर्वी, टॉवेलने स्तन नीट पुसून घ्या. ब्रेस्ट टेप लावताना स्तनांवर कोणतेही लोशन, क्रीम किंवा तेल लावलेले नसेल, याची खात्री करा.
* ब्रेस्ट टेप वापरण्यापूर्वी, स्तनांवर केस नाहीत याची खात्री करा. जर तुमच्या स्तनाच्या भागात खूप घाम येत असेल तर ब्रेस्ट टेप वापरणे टाळा किंवा वेळोवेळी ती काढून घाम पुसल्यानंतर त्याचा वापर करा. जास्त घाम आल्याने ब्रेस्ट टेपचा गोंद खराब होतो.
* स्तनाग्र कव्हर किंवा ब्रेस्ट टेप लावून झोपू नका. फक्त चांगल्या दर्जाचे स्तनाग्र कव्हर्स किंवा ब्रेस्ट टेपच खरेदी करा.
कशी काढायची
टेपवर कोमट पाणी टाकून किंवा कोमट पाण्याने अंघोळ करून टेप सहज काढता येते. टेप काढल्यानंतर त्वचेवर चिकटपणा राहिल्यास, बेबी ऑईलने मालिश करा. त्यामुळे चिकटपणा दूर होईल.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निप्पल कव्हर्स आणि ब्रेस्ट टेपचे अनेक तोटे आहेत. ते कोणते, चला जाणून घेऊया :
श्वास घेताना त्रास : कोणतेही सिलिकॉन आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. बूब टेप आणि स्तनाग्र कव्हर्स स्तनांना चिकटतात, ज्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ शकतो. याच्या वापरामुळे त्वचेवर जळजळ देखील होऊ शकते. ब्रेस्ट टेपचा बराच काळ वापर केल्यास अस्वस्थ वाटू शकते, कारण ती त्वचेला श्वास घेऊ देत नाही. यामुळे स्तनाग्रांमध्येही वेदना होऊ शकतात.
संसर्ग : ब्रेस्ट टेपचा बाहेरील भाग प्लास्टिकचा बनलेला असतो. त्यामुळे त्यावर धूळ सहज चिकटते, त्यामुळे बॅक्टेरिया जमा होतात. जर तुम्ही ती नियमितपणे वापरत असाल तर त्यातून वासही येऊ शकतो.
त्वचेला खाज येऊ शकते किंवा जळजळ होऊ शकते. कधीकधी कंपन्या स्वत:च्या फायद्यासाठी हलक्या दर्जाच्या सिलिकॉनपासून सिलिकॉन निपल कव्हर बनवतात. ते वापरल्यास शरीरावर चट्टे किंवा पुरळ उठू शकते. याचा सतत वापर करणाऱ्या महिलांना त्वचेची अॅलर्जीही होऊ शकते.
जर तुम्हाला खोल पाठीचा, खोल गळ्याचा, खांदे उघडे असलेला ड्रेस आणि टॉप घालायला आवडत असेल तर निपल कव्हर्स आणि ब्रेस्ट टेप हे तुमचे सोबती होऊ शकतात. पण, जर तुम्ही दिवस-रात्र स्तनाग्र कव्हर आणि ब्रेस्ट टेप घालण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. ते फक्त कधीतरी वापरायला हरकत नाही. ते स्वच्छ ठेवणे फार गरजेचे आहे. जिथे वेगवेगळ्या कपड्यांसाठी वेगवेगळ्या ब्रा घालाव्या लागतात तिथे ब्रेस्ट टेप मात्र वेगवेगळ्या कपड्यांच्या आत सहजपणे घालता येते, शिवाय वेगवेगळ्या ब्राच्या तुलनेत परवडणारीही आहे.





