* सोमा घोष

नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंट यांची पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणारी मिथक-गूढ-गुन्हेगारी सीरीज ‘मंडला मर्डर्स’ येत्या २५ जुलैला प्रीमियर होणार आहे. ही मालिका जितकी कथानकासाठी चर्चेत आहे, तितकीच अभिनेत्री वाणी कपूरच्या ओटीटी डेब्यूमुळेही चर्चेचा विषय ठरली आहे.

या सीरीजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाणी पहिल्यांदाच ‘मर्दानी’ फ्रँचायझीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक गोपी पुथरन यांच्यासोबत काम करत आहे.

वाणी कपूर आपल्या अनुभवाविषयी म्हणते, “गोपी सरसोबत काम करणं म्हणजे कथाकथनातील एक मास्टरक्लास अनुभवणं आहे. त्यांच्या दिग्दर्शनात असणारी वास्तवतेची धार आणि मनोवैज्ञानिक खोली एकत्र येऊन प्रत्येक प्रसंग एक अनुभव बनतो. ते केवळ थ्रिलर तयार करत नाहीत, तर एक अशी दुनिया उभी करतात जिथे प्रत्येक पात्राचा हेतू एक कोडं असतो आणि प्रत्येक चिन्हामागे एक रहस्य.”

ती पुढे म्हणाली,”गोपी सर जसे प्रत्येक सीनमध्ये प्रामाणिकतेचं दर्शन घडवतात, तसंच कलाकारांकडून ही ते त्याच प्रामाणिकतेची अपेक्षा करतात. पात्राच्या आत खोलवर दडलेल्या भावना शोधण्याची ही प्रक्रिया खूपच आव्हानात्मक असते, पण त्याचवेळी ती सर्जनशील दृष्टिकोनाने समृद्ध करणारी ही ठरते. त्यांच्यासोबतचा हा प्रवास माझ्यासाठी एक परिवर्तनकारी अनुभव आहे.”

‘मंडला मर्डर्स’ ही नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्स यांची दुसरी वेब सिरीज आहे. याआधी २०२३ मध्ये आलेली ‘द रेल्वे मेन’ ही सीरीज प्रचंड यशस्वी ठरली होती.

या मालिकेत वाणी कपूरसोबत वैभव राज गुप्ता, सुरवीन चावला, आणि श्रिया पिळगावकर यांच्यासारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक गोपी पुथरन आणि सह-दिग्दर्शक मनन रावत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली ही मालिका वाईआरएफ एंटरटेनमेंटने निर्माण केली आहे. गुन्हेगारी, मानसशास्त्रीय थरार, आणि पौराणिक प्रतीकांचे मिश्रण असलेली ही मालिका प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...