* सोमा घोष

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली अभिनेत्री जुई भागवत ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेत बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसली. तिने वडिलांकडून संगीताचेही प्रशिक्षणही घेतले आहे. संगीताच्या अनेक कार्यक्रमातही तिने भाग घेतला होता. कलेच्या वातावरणातन जन्मलेल्या जुईची आई दीप्ती भागवत या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि अँकर आहेत तर वडील मकरंद भागवत हे एक प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहेत. दीप्ती भागवत यांनी अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक भूमिकाही केल्या आहेत.

जुई भागवतने ‘उंच माझा झोका’, ‘पिंजरा’, ‘स्वामिनी’, ‘मोगरा फुलला’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तिने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये मकरंद देशपांडे परीक्षक होते. तिने यात भावनाप्रधान अभिनयासाठी पुरस्कार मिळवला. सध्या जुई सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत सावनीच्या मुख्य भूमिकेत आहे, ही आतापर्यंत तिला मिळालेली सर्वात मोठी भूमिका आहे, जी प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची आहे. चित्रिकरणात व्यस्त असलेल्या जुईने वेळात वेळ काढून खास ‘गृहशोभिके’साठी गप्पा मारल्या. त्यातील हा काही भाग :

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कुटुंबाचा पाठिंबा किती होता?

माझे आईवडील आणि नातेवाईक सर्वजण सर्जनशील, कल्पक क्षेत्रात आहेत. माझी आई मराठी अभिनेत्री आहे आणि वडील संगीतकार आहेत. संपूर्ण घरातील वातावरण सर्जनशील असल्यामुळे मी बालपणीच कथ्थक आणि गाणे शिकायला सुरुवात केली. मला आठवते की, वयाच्या ८व्या वर्षी मी एकदा आईच्या सेटवर गेले होते, तिथे गेल्यावर मला वाटले, हे माझे क्षेत्र आहे. मी तिथल्या दिग्दर्शकांकडे माझे ऑडिशन घेण्याचा हट्ट धरला. माझ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांनी लगेचच माझे ऑडिशन घेतले आणि मी एक छोटीशी भूमिकाही साकारली. मला कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायला, जिंकायला आणि बक्षिसे मिळवायला खूप आवडायचे. कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे मी महाविद्यालयापासूनच रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. पदवीचा अभ्यास करताना ५ वर्षे अभिनयही केला. त्यानंतर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि या क्षेत्रात पदार्पण केले. त्या दरम्यान ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. तिथे मला सर्वोत्कृष्ट भावनाप्रधान अभिनयासाठी ‘बेस्ट एक्सप्रेशन ऑफ दि सीझन’ हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर कोविड आला. त्या काळात मला ही मोठी मालिका मिळाली. यात माझ्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा वेलनकरसोबत काम करताना मला मजा येत आहे.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

मला पहिला मोठा ब्रेक ‘तुमची मुलगी काय करते’मध्ये मिळाला. ही मालिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. चित्रिकरणादरम्यान, मला उतारावरून कार चालवून अभिनय करायचा होता. मी काही दिवसांपूर्वीच कार चालवायला शिकले होते. त्यामुळे मी खूपच तणावात होते, पण सर्व व्यवस्थित पार पडले.

तुमची मुलगी काय करतेया मालिकेतील व्यक्तिरेखा तुझ्या स्वभावाशी किती मिळतीजुळती आहे?

या मालिकेतील माझी भूमिका आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सावनी मिरजकरची आहे. या मालिकेतून आजच्या तरुणाईची विचारसरणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, कारण महाविद्यालयात जाणारी मुले जेव्हा अमली पदार्थांचे सेवन, एखादे व्यसन किंवा समवयस्कांच्या दबावाला बळी पडतात तेव्हा त्यांच्या नकळत एक वेगळीच व्यक्ती होऊन जातात. ही एक सत्यकथा आहे, जी हरवलेल्या मुलीच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर तिला कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि कुटुंबाची काय स्थिती होते, यावर आधारित हे कथानक आहे. यात शांत महिला ते प्रसंगी वाघिणीचे रूप धारण करणाऱ्या आईची कणखर वृत्ती दाखवण्यात आली आहे. ही व्यक्तिरेखा माझ्या स्वभावापेक्षा खूप वेगळी आणि अवघड आहे. माझ्यासाठी ही पहिलीच मोठी मालिका आहे. ती साकारताना मला खूप काही शिकायची संधी मिळत आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्याचा अभिनय करणे सोपे नाही, कारण मुळात मी तशी नाही. त्यासाठी मला खूप संशोधन करावे लागले. या व्यक्तिरेखेत अनेक चढ-उतार आहेत.

एखाद्या मोठया कलाकारासोबत काम करण्यासाठी तुला किती तयारी करावी लागते?

खूप तयारी करण्याबरोबरच, योग्य शॉट मिळण्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते, कारण या मालिकेतील माझे सर्व सहकारी मुरलेले कलाकार आहेत आणि जवळपास सर्वच रंगभूमीवरून आलेले आहेत. अशा कलाकारांचे काम चोखंदळ असते, त्यामुळे त्यांच्या तोडीचे काम करणे सोपे नसते, पण मला सर्वांचे सहकार्य मिळाले. तांत्रिक ज्ञानही खूप जास्त मिळत आहे.

कोणत्या मालिकेमुळे तुझे आयुष्य बदलले?

मला याच मालिकेतून मोठे नाव मिळाले. प्रेक्षक मला ओळखू लागले. ते कुठेही भेटले तरी मला मालिकेतील नावानेच हाक मारतात.

आईवडील मराठी इंडस्ट्रीत असल्यामुळे तुला काम मिळणे सोपे झाले का?

माझ्यासाठी काहीही सोपे नाही, मात्र इंडस्ट्रीतील लोकांची माझ्यासोबतची वागणूक खूप चांगली असते, पण यामुळे मला कोणतीही संधी मिळाली नाही आणि मला ती नकोही होती. रंगभूमीवर काम करताना मला ही भूमिका मिळाली. मला कोणीतरी ओळखल्यानंतर दडपण येते, कारण माझी तुलना माझ्या आईशी होऊ लागते.

तुला हिंदी चित्रपटात काम करायची इच्छा आहे का?

हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे, काही स्क्रिप्टही मिळाल्या आहेत. चांगले कथानक मिळाल्यास नक्कीच काम करेन. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतही काम करण्याची माझी इच्छा आहे.

रिजेक्शन म्हणजेच नकाराचा सामना तू कसा करतेस?

रिजेक्शनला अनेकदा सामोरे जावे लागले, पण ज्या मालिकेत मला नकार मिळाला, ती न मिळणे माझ्यासाठी फायदेशीर ठरले. म्हणूनच मी कोणत्याही प्रकारे नाराज झाले नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी खूप काही माहीत करून घ्यावे लागते. मी नेहमी प्रयत्न करत राहाते.

तुझ्या स्वप्नांचा राजकुमार कसा आहे?

ज्याच्याशी सूर जुळतील आणि सहजतेने वागता येईल, तोच माझ्या स्वप्नांचा राजकुमार असेल.

आवडता रंग – फिकट जांभळा, फिरोजी.

आवडता पोशाख – भारतीय, पाश्चात्य.

आवडते पुस्तक – अल्केमिस्ट.

पर्यटन स्थळ – हिमालय ट्रेकिंग, युरोप.

वेळ मिळाल्यास – कथ्थक किंवा संगीताचा सराव.

सामाजिक कार्य – वृद्ध, अनाथ मुलांची सेवा.

आवडता पदार्थ – आईच्या हातची पुरणपोळी.

जीवनातील स्वप्न – कलेशी जोडलेले राहाणे.

जीवनातील आदर्श – शिकत राहाण्याची इच्छा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...