* पारुल भटनागर
कोणत्या वयात मैत्री करावी हे सांगता येत नाही आणि मग त्या क्षणापासून आयुष्य इतके सुंदर होऊन जाते की, आपल्या या मित्रासाठी आपण चंद्र-तारे तोडण्याच्या गप्पा मारू लागतो, कारण विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण वाढते.
या नात्यात तुम्ही एकमेकांना समजून घेता, एकमेकांसोबत चांगले क्षण घालवता, एकमेकांच्या भावनांचा आदर करता. प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करता, एकमेकांना मदत करता.
पण जेव्हा तुमचा जोडीदार या नात्याच्या आडून हळूहळू तुमच्याकडून महागडया भेटवस्तूंची मागणी करू लागतो तेव्हा तुम्ही थोडे सावध राहणे गरजेचे असते, जेणेकरून ही मैत्री तुमच्या खिशाला जड होणार नाही आणि तुमच्या जोडीदाराचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल.
चला तर मग, जाणून घेऊया प्रेयसीने मागणी केल्यावर काय करावे आणि काय लक्षात ठेवावे…?
फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिनी
अंगठीची मागणी
भेटवस्तू मोठी असो किंवा छोटी, तीच चांगली असते जी मागून घेतलेली नसते तर मनापासून दिली जाते. नुकतेच तुम्ही त्याला ब्रँडेड शॉपिंग करून दिले असेल, पण आता जर तो पुन्हा येत्या फ्रेंडशिप डेला तुमच्याकडे अंगठीची मागणी करत असेल तर त्याला सांगा की, यावेळी मी अंगठी तेव्हाच देईन जेव्हा तूसुद्धा या खास दिवशी मला अंगठी देशील आणि ती स्वत:च्या हातांनी माझ्या बोटात घालशील.
त्याने होकार दिला तरच त्याला अंगठी भेट द्या, कारण यात कोणतेही नुकसान नाही, पण जर त्याने स्पष्टपणे नकार दिला तर तुम्हीही लाज न बाळगता नकार द्या, कारण मैत्री एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी असावी लागते.
आयफोनचा हट्ट
तुम्ही दोघांनी खरेदीला जायचे ठरवले असेल आणि ही योजना आखण्याचे संपूर्ण श्रेय तुमच्या मैत्रिणीला जात असेल, कारण तिनेच तुम्हाला खरेदीला जाण्यासाठी भाग पाडले असेल तर थोडे सावध व्हा, कारण खरेदी म्हणजे तुमच्या खिशावर भार पडणे.
मी पैसे आणि कार्ड आणायला विसरले, त्यामुळे आता तू तुझ्या कार्डने पैसे दे, मी नंतर पैसे देईन, असे सांगून तिने तुमच्याकडून आयफोन घेण्याचा आग्रह धरला तर वेळीच हुशारीने वागा. मीही कार्ड आणले नाही, त्यामुळे स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही, असे तिला स्पष्टपणे सांगा. तुम्ही पैसे भरलेत तर समजून जा की, तुमच्या खिशाला अळा बसायला सुरुवात झाली आहे. भलेही तुमचा नकार ऐकल्यावर ती तुमच्यावर थोडीशी नाराज होईल, पण तरीही तिच्या नाराजीकडे फारसे लक्ष देऊ नका, कारण पैशांच्या जोरावर कोणतेही नाते फार काळ टिकू शकत नाही.
सर्व गरजांसाठी तुमच्यावरच अवलंबून
मैत्री झाल्यापासून प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी ती जर तुमच्यावर अवलंबून असेल तर समजून जा की, तुमच्यासोबत तिने केवळ पैशांसाठी नाते जोडले आहे. जसे की, कधी फोन रिचार्ज, कधी कॅबचे बिल, कधी महागड्या उपहारगृहात जाण्याची हौस, अगदी प्रेमाच्या जोरावर दरमहा तुमच्याकडून खर्चासाठी मोठी रक्कम वसूल करणे.
जर तुमच्या मैत्रिणीची ही सवय झाली असेल तर आधी तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करा. तरीही तिला समजत नसेल तर हे नाते तोडणेच योग्य ठरेल, अन्यथा तुमच्या पैशांची लूट होईल, कारण हा तिचा स्वार्थ असेल प्रेम नसेल.
लक्ष द्या
शोऑफ टाळा : बरीच मुले मैत्रिणीवर रुबाब झाडण्यासाठी कधी तिला स्वत:कडील पैसे दाखवतात तर कधी महागड्या उपहारगृहात घेऊन जातात. त्यामुळे ती प्रियकराला श्रीमंत समजून लुटायला लागते, पण हेच पुढे त्याच्या त्रासाचे कारण ठरते, कारण तिच्या रोजच्या अवास्तव मागण्या पूर्ण करणे शक्य नसते. त्यामुळे सुरुवातीपासूनच नात्यात शोऑफला थारा देऊ नका, जेणेकरून भविष्यात हे नाते ओझे बनणार नाही.
तिलाही संधी द्या : प्रेम खरे आहे की, हा सगळा पैशांचा खेळ आहे, याची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीलाही खर्च करण्याची संधी द्या. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन ती पैसे देत असेल तर तिला रोखू नका, कारण यामुळे तिचे खरे रूप तुमच्या समोर येणार नाही. त्यासाठी तुम्ही उपहारगृहात जाऊ शकता. बिल आल्यावर घाईत पर्स आणायला विसरलो, असे सांगून तिच्याकडून बिलाचे पैसे काढू शकता.
मी पैसे दिले तर बिघडते कुठे? असे विचारत तिने आनंदाने पैसे दिले तर समजून जा, तुमचे नाते थोडे तरी खरे आहे. याउलट बिल भरल्यावर ती काहीशी नाराजीने तुमच्याशी बोलली तर समजून जा की, तिला फक्त तुमच्या पैशांवर मजा मारायची आहे.
तुमची कमाई फक्त तुमची आहे : कदाचित तुमचे कुटुंब सधन असेल आणि तुम्हीही चांगली नोकरी करत असाल तर याचा अर्थ असा नाही की, तुमच्या मैत्रिणीने विचार न करता फक्त तुमची कमाई वाया घालवावी. कधी, कुठे आणि किती खर्च करायचा, हे तुम्हीच ठरवायला हवे. चांगला कमावतोस तरीही इतका कंजूषपणा कशाला? असे तुमची मैत्रीण विचारत असेल तर तिला सांगा की, हा कष्टाचा पैसा आहे आणि जेव्हा गरज असते तेव्हाच मी तो खर्च करतो. मी जे कमावले आहे ते उडवून दिले तर माझ्या भविष्याचे काय? असा थेट प्रश्न विचारून स्वत:ची भूमिका मांडा. यामुळे तिच्या लक्षात येईल की, तुम्हाला तिच्यावर पैसे खर्च करायला लावणे तितकेसे सोपे नाही.
गरज समजून घ्या : मैत्रीण म्हटले म्हणजे ती पैसे उकळणारच किंवा प्रत्येकवेळी तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीच ती एखादी मागणी करत असेल, असा समज करून घेणे चुकीचे आहे. कधी-कधी गरजेपोटी तिला तुमच्याकडून काहीतरी मागावे लागू शकते. अशावेळी तुम्ही त्याबद्दल तिला लगेच बोलू नका, तर तिचे म्हणणे ऐकून घ्या आणि गरज समजून घ्या. हीदेखील तुमची जबाबदारी आहे.
तुम्हाला वाटत असेल की, तिची मागणी न्याय्य आहे आणि ती तुमच्या खिशाला परवडणारी असेल तर तिला मदत करा, कारण गरजेच्यावेळी तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवलीत तर मजबूत नात्यासाठी ते योग्य ठरणार नाही.