हरीहरन आणि साधना जेजुरीकरांची ‘दूरीयां…’ गझल रसिकांच्या भेटीला

* सोमा घोष

मखमली आवाजाचे धनी असलेले गायक अशी ओळख असणारे हरिहरन यांनी जगभरात आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. काळानुरूप संगीतामध्ये होणारे बदल आत्मसात करून आजही ते संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हरिहरन यांनी गायिका साधना जेजुरीकर यांच्या साथीनं गायलेली एक सुमधूर गझल नुकतीच रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे. प्रकाशनानंतर अल्पावधीतीच या गझलला संगीतप्रेमींची पसंती मिळत असून संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर या गाण्यावर प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.

साधना जेजुरीकर यांची निर्मिती असलेली ‘दूरीयां…’ हि गझल नुकतीच समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकच्या बॅनरखाली अंधेरीतील रेड बल्ब स्टुडिओमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. हरीहरन यांच्या साथीने साधना जेजुरीकर यांनी आपल्या सुमधूर गायकीच्या आधारे गझलमधील शब्दरचनांना अचूक न्याय दिला आहे. ‘दूरीयां…’बाबत हरीहरन म्हणाले की, आजवर मी बऱ्याच गझल्स गायल्या आहेत, पण ‘दूरीयां…’ गाताना एका वेगळ्या प्रकारचं आत्मीक समाधान लाभलं. या गीतातील शब्दरचना आणि त्याला अनुरूप अशी संगीतरचना यांचा अद्भूत संगम संगीतप्रेमींच्या मनाला भिडणारा असून, मला स्वत:ला आनंदाची अनुभूती देणारा ठरला आहे. ही गझल ऐकताना आणि पाहताना रसिकांनाही याची प्रचिती येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ‘दूरीयां…’ ही गझल खऱ्या अर्थानं आजच्या काळातील संगीतप्रेमींना भावणारी असल्याचं सांगत साधना जेजुरीकर म्हणाल्या की, रसिकांची आवड लक्षात घेऊन ‘दूरीयां…’ची निर्मिती करण्यात आली आहे. कर्णमधूर संगीतरचनेला दर्जेदार निर्मितीमूल्यांची जोड देऊन सादर करण्यात आलेली ‘दूरीयां…’ ही गझल हरिहरन यांनी आपल्या गायकीनं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. या गझलच्या निमित्तानं त्यांच्यासारख्या आघाडीच्या गायकासोबत गाण्याची संधी मिळाल्यानं खूप आनंदी आहे. संगीतप्रेमींही ‘दूरीयां…’वर नक्कीच भरभरून प्रेम करतील याची खात्रीही त्यांनी दिली.

मदन पाल यांनी लिहिलेली ‘दूरीयां…’ गझल संगीतकार कैलाश गंधर्व यांनी संगीतबद्ध केली आहे. या गझलचा व्हिडिओ कैलाश पवार यांनी दिग्दर्शित केला असून, प्रमोदकुमार बारी यांनी कोरिओग्राफी केली आहे. हरीहरन, साधना जेजुरीकर, हरीश वांगीकर आणि ऐश्वर्या माने यांच्यावर या गझलचा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. पिकल म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध असणाऱ्या ‘दूरीयां…’ची सिनेमॅटोग्राफी प्रतीक बडगुजर यांनी केली असून अक्षय हरीहरन संगीत निर्माते आहेत. दिग्दर्शक कैलाश पवार यांनीच ‘दूरीयां…’चं एडिटींगही केलं आहे.

‘असा ये ना…’ हे गुलाबी गाणं रसिकांच्या भेटीला

* सोमा घोष

मराठी संगीत क्षेत्रात कायम नवनवीन प्रयोग होत आहेत. गीतलेखनापासून संगीत दिग्दर्शनापर्यंत सर्वच पातळीवर विविध प्रकारची संगीत निर्मिती होत आहे. आजच्या सिंगल्सच्या काळातही मराठी सिंगल्सचा खूप बोलबाला आहे. आजवर बऱ्याच सिंगल्सनी रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. हिच परंपरा पुढे सुरू ठेवत रसिकांना मंत्रमुग्ध करणारं ‘असा ये ना…’ हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. या गुलाबी गाण्यात प्रेक्षकांना एका छोट्याशा हळूवार प्रेमकथेचाही अनुभव घेता येईल.

धरणी प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मात्या सुनीता नायक यांनी ‘असा ये ना…’ या गाण्याची निर्मिती केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी मोहन नामदेव राठोड यांनी सांभाळली आहे. ‘असा ये ना…’ हे गाणं गीतकार कौतुक शिरोडकर यांनी लिहिलं असून रोहित राऊत आणि डॅा. नेहा राजपाल यांच्या सुमधूर आवाजात सुप्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘असा ये ना…’ या सुमधूर गाण्यात रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची अफलातून केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या गाण्याच्या निमित्तानं अभिनेत्री अंजली नान्नजकर आणि अभिनेता अमित डोलावत यांना एकाच फ्रेममध्ये आणण्याची किमया दिग्दर्शक मोहन राठोड यांनी साधली आहे. या गाण्यात प्रेमाचा एक वेगळाच रंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यात राठोड यांनी एका शूरवीर सैनिकाची लव्हस्टोरी सादर केली आहे. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाच्या स्वप्नातील हे गाणं आहे. या सैनिकाची पत्नी घरी आहे. पती सीमेवर देशाच्या रक्षणाची, तर पत्नी घरी संसार सांभाळण्याची जबाबदारी चोख बजावत असताना ते मनांच्या माध्यमातून दोघे एकत्र येतात आणि त्यातून हे गाणं तयार होतं. या गाण्याचं शूटिंग सातारा येथे करण्यात आलं आहे. मोहन राठोड यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेलं ‘मन काहूर…’ हे गाणं खूप गाजलं आहे. याखेरीज ‘दणका…’ या धमाल गाण्यानं खरोखर दणका उडवला होता. ‘मन धुंद पायवाट…’ हे राठोड यांचं गाणं रसिकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवणारं ठरलं. याखेरीज ‘मेरा जहां…’ या राठोड यांच्या हिंदी गाण्यानेही संगीतप्रेमींना ताल धरायला लावला आहे. आता ‘असा ये ना…’ हे रोमँटिक साँग रसिकांच्या भेटीला आलं आहे.

धरणी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अहमदाबादची असून त्यांनी सर्वप्रथम मराठी गाण्याची निर्मिती करायचं ठरवलं. धरणी प्रोडक्शन बॅनरखाली तयार झालेलं पहिलं गाणं म्हणजे ‘असा ये ना…’ या गाण्याच्या निर्मात्या सुनीता नायक या अहमदाबादच्या रहिवासी आहेत. चित्रपटक्षेत्राची खूप आवड असल्यामुळे त्यांनी मराठीमध्येच काम करायचं ठरवलं. प्रत्येक उत्सवाला एक गाणं स्वतःच्या यूट्यूब चॅनल वर रिलीज करायचं आणि नवीन टॅलेंटला प्रोत्साहन द्यायचं हा निर्मात्या सुनीता नायक यांचा मुख्य हेतू आहे.

 

अक्षया गुरवची ‘बंडखोरी’ रिवणावायली मधून येणार समोर

* सोमा घोष

मराठी चित्रपट हा नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटकांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी प्रेक्षकांना देत आहे. हेच मराठी चित्रपट हे बहू आयामी आणि विषयातील वैविध्य यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या चित्रपटातुन कलाकारांची सामाजिक जाणीवसुद्धा लक्षात येत असून बिटरस्वीट या चित्रपटाच्या नंतर अक्षया गुरव ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

रिवणावायली असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटही आपल्या भूमिकेविषयी अक्षया सांगते ‘सामाजिक दृष्टया कितीही पुढारलेलो असला तरी कुठे ना कुठे अनिष्ट रूढी परंपरा या आपल्या पाठीमागे तग धरून असतात. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत कितीही जनजागृती होत असली तरी कुठेतरी समाजात अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. तर शिकलेल्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासूनसुद्धा अडवलं जात आहे. अशाच एकदा बंडखोर मुलीची तिच्या संघर्षाची कथा म्हणजे रिवणावायली.’ तर याच चित्रपटाच्या विषयी पुढे ती सांगते ‘कलाकार आपल्या कलेतून समाजाचं एक प्रतिबिंब उभं करत असतो. कलाकार समाजाचा देणेकरी असतो, त्याने सामाजिक विषय हाताळताना विषयाची सवेंदनशीलता जाणून घेणे आणि त्यावर योग्य ती भूमिका घेणं ही त्याची जबाबदारी असते. तीच जबाबदारी मी या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे.’ अक्षया या चित्रपटात ‘ऐश्वर्या देसाई’ हे पात्र साकारत असून ती उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे.

या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें