दिर्घ कथा * राकेश भ्रमर
आत्तापर्यंत आपण वाचलंत :
व्यवसायानं आशीष डॉक्टर होता. नंदिता नावाच्या एका सुंदर, मोठ्या कंपनीत सीनिअर मॅनेजर असलेल्या मुलीशी त्याचं लग्नं झालं. पण लग्नानंतर नंदिता खुश नव्हती. पत्नी म्हणून तिनं आशीषला कधी समर्पण केलंच नाही. शरीरानं अन् मनानंही त्यांच्यात दुरावा होता. एक दिवस आशीषनं तिला खूप प्रयत्नांती बोलती केली. नंदितानं सांगितले की तिचं एका व्यक्तीवर प्रेम आहे. त्याच्यासाठी ती वेडी झाली आहे. आश्चर्य म्हणजे तो माणूस विवाहित आहे हे ही तिला माहित आहे. हे ऐकून आशीषला जबर धक्का बसला.
शेवटी नंदिताला त्यानं घटस्फोट दिला. नंतर त्यानं पुन्हा लग्न केलं ते दिव्याशी. प्रेमळ, सालस, समजूतदार दिव्याच्या सहवासात आठ वर्षं आशीष अत्यंत सुखात होता. त्यांचा मुलगा पाच वर्षांचा झाला होता. शाळेत जाऊ लागला होता.
दहा वर्षांनंतर अचानक एक दिवस नंदिता त्यांच्या क्लिनिकमध्ये भेटायला आली. तिने आपली कर्म कहाणी ऐकवली. स्वत:ची हीन, दीन, दयनीय परिस्थिती ऐकवली, स्वत:च्या वागणुकीबद्दल पुन:पुन्हा क्षमा मागितली अन् मदतीची याचनाही केली. कोमल हृदयाच्या आशीषनं माणुसकीच्या नात्यानं तिला मदत करण्याचा निर्णय घेतला.
तिला राहण्यासाठी फ्लॅट मिळवून दिला. नोकरीही मिळवून दिली. भरपूर पैसे त्यात खर्च झाले. खर्चाची आशीषला काळजी नव्हती. पण पत्नीपासून चोरून हे सर्व करण्याचा सल मनांत होता.
नोकरी मिळाल्याबद्दल तोंड गोड करायला घरी या असा नंदितानं वारंवार आग्रह केल्यामुळे आशीष तिच्या फ्लॅटवर गेला. नंदिता नटूनथटून त्याचीच वाट बघत होती…
पुढे वाचा…
नदिताचं सौंदर्य बघून आशीषला वाटलं, हे सौंदर्य खरं तर त्याच्या हक्काचं होतं. नंदितानं थोडं संयमानं, समजुतीनं घेतलं असतं तर तीही आज त्याचीच असती. पण आज ती त्याची नाही ही वस्तुस्थिती आहे, या क्षणी ती कुणाचीही नाही हे ही खरं आहे. ती स्वतंत्र आहे. कुणावरही ती प्रेम करू शकते, कुणाचीही ती प्रेमपात्र म्हणून निवड करू शकते.
‘‘या, या…मला खात्री होती तुम्ही यालंच.’’ ती लाडीकपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यापेक्षा तिची देहबोली अधिक चंचल होती. पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी ती तळमळत, तडफडत होती. आशीषच्या येण्याचा तिला खरंच आनंद झाला होता की ती मुद्दाम हे सगळं नाटक करत होती हे कळायला मार्ग नव्हता. ती इतकी मोकळेपणानं वागत होती. जणू आजही ती आशीषची बायको होती. त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता, दहा वर्षं त्यांनी एकमेकांना बघितलंही नव्हतं असं कुठंच जाणवत नव्हतं.
तिच्या त्या मनमोहक विभ्रमांमुळे आशीषही विचलित झाला. तो तरूण पुरूष होता. सुंदर स्त्रीचे चंचल मोहक विभ्रम कुणाही पुरूषाला भुरळ घालतातंच. त्यात अनैसर्गिक काहीच नाही. त्यातून नंदिता एकेकाळी त्याची पत्नी होती. तिचं शरीर त्यानं हाताळलं होतं…इतक्या वर्षांनी जेव्हा ते सौंदर्य स्त:हून समोर आलंय तेव्हा चित्त विचलित होणं स्वाभाविक होतं.
वरकरणी अगदी शांत चित्तानं आशीष, आत येऊन सोफ्यावर बसला. नंदितानं घर खूपच सुंदर मांडलं होतं. कलात्मकता अन् उच्च अभिरूची जाणवत होती. (अर्थात सर्व सामान आशीषनंच घेऊन दिलं होतं. पैसा त्यानंच खर्च केला होता.) नंदिताचा हा गुण त्याच्या संसारात त्याला कधीच जाणवला नव्हता. कारण त्यावेळी मनानं ती त्याच्या संसारात नव्हतीच. ती प्रजीतच्याच जगात रमलेली होती. आशीष, त्याचं घर, त्याचा संसार तिचा कधी नव्हताच!
चहा घेऊन आशीष उठला तेव्हा नंदितानं त्याचा हात धरून विचारलं, ‘‘कोणत्या शब्दात आभार मानू?’’ आशीषच्या अवघ्या झिणझिण्या आल्या. तो स्पर्श त्याला नकोसा वाटला नाही. या क्षणी तो स्पर्श हवासा अन् उत्तेजित करणारा होता. गेल्या दहा वर्षांत नंदिताचं फक्त वय वाढलं होतं…पण तिचं सौंदर्य आजही तेवढंच उन्मादक, टवटवीत अन् दिलखेचक होतं. कुणीही पुरूष घायाळ होईल असं तिचं सौंदर्य होतं.
झटक्यात आशीषनं हात सोडवून घेत कोरडेपणानं म्हटलं, ‘‘आभार मानायची गरज नाहीए, माणूसच माणसाची मदत करतो.’’
माणसाला सौंदर्य आवडतं. मग ते सौंदर्य आधी उपभोगलेलं असो की नवीन असो. त्याचा प्रभाव माणसाच्या देह मनांवर असतो. नंदिताचं सौंदर्य आशीषनं अनुभवलेलं होतं पण आज ती अगदी वेगळी अन् पूर्णपणे नवीन भासत होती. चुंबकासारखं आकर्षण होतं तिच्यात.
घरी येईपर्यंत आशीष शांतचित्त झाला होता. समोरच दिव्या वाट बघत काही काम करत बसली होती. आशीषनं तिच्याकडे निरखून बघितलं…ती ही सुंदर होती. टवटवीत अन् प्रसन्न दिसत होती. डॉक्टरची बायको म्हणून वावरताना आपली अदब अन् रूबाब राखून होती. पण तिचं सौंदर्य शालीन होतं. समर्पणाची, जबाबदारीची जाणीव असणारं होतं. नंदिताचं सौंदर्य चंचल अन् फुलपाखरी होतं.
नंदिताला त्यानं एक स्थिर आयुष्य दिलं होतं. त्याचं त्याला मानसिक समाधान होतं. पण त्याचा मोबदला म्हणून काही मागावं, घ्यावं असं त्याला मुळीच वाटत नव्हतं. तो तिला कधी फोनही करत नसे पण नंदिता मात्र दिवसाकाठी दोन तीनदा त्याला फोन लावायची. कधी तो उचलायचा कधी दुर्लक्ष करायचा. ती फोनवर गोड गोड बोलायची, जुन्या गोष्टी उकरून काढून पुन:पुन्हा क्षमा मागायची. पुन:पुन्हा जाणवून द्यायचा प्रयत्न करायची की ती त्याच्या ऋणांत आहे. त्या ऋणातून तिला मुक्त व्हायचं आहे. आशीष हसून तिचं बोलणं टाळायचा, दुर्लक्ष करायचा. त्याला तिच्याकडून काहीच नको होतं, हे तिला कळायला हवं होतं.
नंदिता रोजच त्याला आपली घरी बोलवायची. तिच्या आग्रहात इतकं आर्जव असायचं की नाही म्हणणं आशीषच्या जिवावर यायचं. दुसरं म्हणजे या शहरात ती एकटी आहे. तिच्या अजून ओळखी नाहीत. तिला आधाराची गरज आहे या भावनेनंही आशीष तिला नकार देऊन दुखवत नव्हता. चारपाच दिवसांनी एकदा तो तिच्याकडे जायचा. तिची बडबड ऐकायचा. तिनं केलेले काही तरी खाऊन, कधी चहा घेऊन घरी यायचा.
एक दिवस नंदिता त्याच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसली. आशीष दचकला अन् थोडा बाजूला झाला. त्यानं अंग चोरून घेतलं.
हसून नंदितानं म्हटलं, ‘‘तुम्ही माझ्यापासून असे दूर दूर का असता? एके काळी मी तुमची पत्नी होते. अजूनही आपल्या नात्यात आपलेपणा आहे. मग असा दुरावा का?’’
कोरडेपणानं आशीष म्हणाला, ‘‘मी असा बरा आहे.’’
‘‘पण मी नाहीए.’’ ती अजून जवळ सरकली. ‘‘माझ्या मनांत अपराधीपणाची भावना आहे. मी तुम्हाला किती त्रास दिला, मनस्ताप दिला. पण तुम्ही ते सगळं अगदी सहजपणे सहन केलं. कधी मला रागावला नाहीत. मारझोड केली नाही, बळजबरी केली नाही, तरीही मला कळलं नाही की तुम्हाला त्रास देऊन मी अपराधीपणाच्या भावनेने होरपळत आहे. तुम्ही जर त्यावेळी कठोरपणे वागला असता, तर कदाचित तुम्हाला सोडून जाण्याची घोडचूक मी केली नसती. माझ्या या अपराधीपणाच्या भावनेतून मी कशी मुक्त होऊ?’’
आता यातून कसं मुक्त व्हायचं हा नंदिताचा प्रश्न होता, आशीष काय सांगणार? तिनं निर्णय घ्यायला हवा.
‘‘मी इथं तुमच्या माध्यमातून नोकरी मिळवायला आले नव्हते. सुखासीन, आनंदी आयुष्य जगण्यासाठी आले नव्हते. हे तर मला मुंबईतही करणं शक्य होतं. सोडलेली नोकरी परत धरता आली असती. नवी नोकरीही मिळवता आली असती. ते तेवढं अवघड नव्हतं.’’
आशीष दचकला. ती मनांतलं काहीतरी बोलत होती. म्हणजे तिला तसा प्रॉब्लेम, दु:ख किंवा अडचण नव्हतीच, ती फक्त त्याच्यासाठी इथं आली होती.
‘‘बरं तर, मग?’’जरा बेचैन होऊन आशीषनं विचारलं. खरं त्याला अजून बरंच काही विचारायचं होतं, पण त्यानं न विचारताही ती सगळं सांगेल हे त्याला ठाऊक होतं. तिचा स्वभाव चंचल होता, थोडा बालिश…मनांतलं सगळं बोलून टाकल्याखेरीज तिला चैन पडत नसे.
नंदितानं आपला हात त्याच्या डाव्या मांडीवर ठेवला. पण आपल्याच विचारात असलेल्या आशीषला ते जाणवलं नाही.
‘‘जोपर्यंत माणूस स्वत: दु:ख भोगत नाही, तोवर त्याला दुसऱ्याच्या दु:खाची कल्पना येत नाही. जेव्हा त्यानं मला नाकारलं, ठोकरलं, सोडून गेला तेव्हा मला जाणीव झाली…की मी तुम्हाला नाकारलं, तुमचा विश्वासघात करत होते तेव्हा तुम्हाला किती वेदना झाल्या असतील. माझ्या हृदयाच्या चिंधड्या झाल्या, मी कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची उरले नाही. त्यावेळी मनांत आलं, सरळ आत्महत्त्या करावी. आयुष्य संपवावं.
‘‘पण मग मनांत विचार आला, माझ्यामुळे तुम्ही इतकं दु:ख सहन केलं, विषाचा घोट पचवला, विषप्राशन करून विष प्राषी झालात, तर त्यानं दिलेलं विष मी का पचवू नये? मी ठरवलं, मी तुम्हाला भेटेन. तुम्ही मला क्षमा केलीत तर माझं दु:ख कमी होईल.
‘‘तुम्ही मला भेटलात. मला जाणवलं की तुमच्या निर्मळ मनांत माझ्याविषयी कडवटपणा नाहीए, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. दु:ख कमी झालं. सुखाच्या सागरात डुंबल्यासारखं वाटतंय. मला आता जगावंसं वाटतंय. मला आता खूप काही मिळवायचं आहे, जे माझ्या मूर्खपणामुळे मी याआधी घालवून बसले.’’
आशीष गप्प बसून होता.
‘‘तुम्ही माझ्या अपराधांना क्षमा केली, माझं दु:ख दूर केलंत पण माझं प्रायश्चित्त अजून कुठं झालंय? ते व्हायचं आहे…’’
‘‘ते काय?’’ आशीषनं थेट नंदिताच्या डोळ्यात बघत विचारलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते पण खात्रीही होती की आशीष तिचं म्हणणं टाळणार नाही. अश्रूभरल्या डोळ्यांमधला आत्मविश्वास आशीषला चकित करून गेला.
भावना विवश होऊन नंदितानं त्याचे दोन्ही हात घट्ट धरले. ‘‘मला ठाऊक आहे, तुमचं मन फार मोठं आहे. म्हणूनच मी याचना करते आहे, मला प्राय:चित्त घेऊ द्या. आयुष्यभर तुमच्याबरोबर राहू द्या.’’
आशीषला जणू शॉक बसला. झटक्यात हात सोडवून घेत तो उठून उभा राहिला, ‘‘काय?’’
नंदिताही उठून उभी राहिली. ‘‘तुम्ही इतके दचकलात का? मी काही विचित्र नाही बोलले. या जगात किती तरी माणसं लग्नं न करता एकत्र राहतात. मी तर तुमची पूर्व पत्नीच आहे. माझा तुमच्यावर काहीही हक्क नाही पण मला माझं उर्वरित आयुष्य आता तुम्हालाच समर्पित करायचं आहे.’’
‘‘हे…हे कसं शक्य आहे?’’ आशीषला बोलणं सुधरेना.
‘‘सगळं काही शक्य आहे. फक्त मनाला समजवायला पाहिजे.’’
‘‘माझं लग्न झालंय. घरात पूर्ण समर्पित पत्नी आहे. लहान मुलगा आहे. तुझ्याबरोबर कसा राहणार मी?’’
‘‘मी दिलेल्या मनस्तापाचं, अपमानाचं विष प्यायलात अन् जगता आहात. आता सुखाचा घोट घेऊन माझ्याबरोबर आनंदात राहा. मला तुमच्याकडून काहीही नको, संपत्ती, मुलंबाळं, कशावरही मी हक्क सांगणार नाही. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमची सोबत, सहवास हवाय…तुम्हाला समर्पित व्हायचंय…’’
आशीषला गरगरायला लागलं. तो स्वत: डॉक्टर होता. विचारी होता. कठिण आणि प्रतिकूल परिस्थितीतही कधी तो डगमगत नसे. नंदिताच्या दुसऱ्या पुरूषाबरोबरच्या संबंधांविषयी समजलं तेव्हाही तो एवढा भांबावला नव्हता. त्याही परिस्थितीतून त्यानं मार्ग काढला पण आज त्याला काही कळेनासं झालं होतं.
नंदिताला जे हवंय, ते कधीच शक्य नाही. निदान त्याच्यासाठी तरी ते अशक्यच होतं. एकदा विषाची चव चाखली होती. दुसऱ्यांदा ती विषपरीक्षा नको. उघड्या डोळ्यांनी, जाणूनबुजून तर नकोच नको…
नंदिता त्याला चिकटून उभी होती. तिनं त्याला मिठी घातली, ‘‘इकडे बघा, नाही म्हणू नका, मी खूप आशेनं तुमच्याकडे आले आहे. इथं येण्याचा एकमेव उद्देश जन्मभर तुमची सेवा करणं हाच होता. हे करूनच मी आपल्या चुका सुधारू शकेन. माझ्या पापाचं प्रायश्चित्त घेऊ शकेन.’’
‘‘तुमच्या खेरीज दुसऱ्या कुणालाच मी समर्पित होऊ शकत नाही. तुम्ही मला स्वीकारलं नाहीत तर जन्मभर मी अविवाहित राहीन. तुमचीच वाट बघेन.’’ तिच्या आवाजात विवशता, असहायता होती. जर आशीषनं तिला आधार दिला नाही तर ती मोडून पडेल… पण. आशीषवर कशाचाच परिणाम झाला नाही. मात्र त्याच्या डोक्याच्या शिरा तडकताहेत असं त्याला वाटलं. चारी बाजूला बॉम्बस्फोट होताहेत अन् सगळं उद्ध्वस्त होतंय असं त्याला वाटलं.
गडबडीनं नंदिताला दूर सारून तो दाराकडे जायला निघाला. पुन्हा नंदितानं त्याचे हात धरले.
‘‘तुम्ही जाताय, तर मी तुम्हाला अडवणार नाही. मात्र मी तुमची वाट बघेन. तुमची प्रतीक्षा करेन. याच शहरात राहीन…तुमचा निर्णय कळवा.’’
काही न बोलता आशीष घराबाहेर आला. साऱ्या शहराची वीज गेल्यासारखा सगळीकडे अंधार होता. मात्र काही घरातून दिवे जळंत होते, रस्ते अंधारात बुडाले होते. आशीषला असं वाटत होतं हे रस्ते म्हणजे अंधाऱ्या गुहा आहेत. त्यातून तो मार्ग काढतोय.
त्याला समजंत नव्हतं. हे असं का घडतंय? तो कधीच कुणासा त्रास देत नाही पण त्याला मात्र त्रास सोसावा लागतो. दु:ख सहन करतोय म्हणजे दु:खाला आमंत्रण थोडीच देतोय?
कशी त्यानं नंदिताच्या बिल्डिंगच्या बाहेर उभी असलेली गाडी स्टार्ट केली, कधी ती मुख्य रस्त्यावर आणली, कधी गाडी त्याच्या घराच्या वाटेवर धावू लागली, त्याला काही कळंत नव्हतं. शरीराला कंप सुटला होता. पण हातपाय काम करत होते. मेंदू बधीर झाला होता. पण दुसरं कुणी तरी सूचना देत असल्याप्रमाणे आशीषच्या योग्य त्या हालचाली होत होत्या अन् गाडी योग्य मार्गावर चालली होती.
गाडी चालवताना समोरून येणाऱ्या गाड्यांच्या दिव्यांचा प्रकाश डोळ्यांवर येत होता. डोळे दिपत होते. पुन्हा पुन्हा डोळे उघडून मिटून आशीष समोर बघत होता.
किती वेळ असा गेला कुणास ठाऊक. पण गाडी त्याच्या घराजवळ आली तेव्हा शरीराचा कंप थांबला होता. मेंदू तरतरीत झाला होता. मनावर ताबा आला होता मात्र मघा नंदिनीच्या घरी घडलेल्या प्रसंगाचा ताण चेहऱ्यावर दिसत होता. अजून त्या वादळाच्या खुणा शिल्लक होत्या.
गाडी गॅरेजमध्ये लावून आशीष घरात आला. या क्षणी दिव्याशी भेट होऊ नये असं त्याला वाटत होतं. पण ती त्याचीच वाट बघत होती. रात्र बरीच झाली होती. मुलगा झोपी गेला होता. दिव्याला त्याची वाट बघण्याशिवाय दुसरं कामंच नव्हतं. घरात प्रवेश करणाऱ्या आशीषचा थकलेला चेहरा बघून ती पटकन् उठली. त्याला आधार देत तिनं सोफ्यावर बसवलं. ‘‘किती दमलाय तुम्ही,’’ ती मायेनं म्हणाली.
आवाजातली काळजी आशीषला सुखावून गेली. आशीषनं एकदा तिच्याकडे बघितलं अन् सोफ्याच्या पाठीवर डोकं टेकून डोळे मिटून घेतले.
दिव्यानं पट्कन लिंबाचं मधुर सरबत आणलं, ग्लास त्याच्या ओठाशी लावून म्हणाली, ‘‘किती दमता तुम्ही, इतकं काम नका करत जाऊ. पेशंट तर येतच असतात. पण त्यावर थोडं नियंत्रण नको का? अतिश्रमानं तुम्ही आजारी पडलात तर मग पेशंटची काळजी कोण घेणार? तुम्ही आनंदी, तरतरीत तर आम्ही ही सुखी आणि आनंदी. यामुळे कामं कमी करायची.’’ तिच्या स्वरातली काळजी अन् अधिकार आशीषला सुखावून गेला. तिच्या स्पर्शानं त्याला खूप बरं वाटलं.
‘‘किती उतरलाय चेहरा…चला थोडं खाऊन घ्या. रात्री पाय चेपून देते. शांत झोपा. उद्या बरं वाटेल.’’ दिव्यानं म्हटलं.
आशीषला डोळे उघडायला होत नव्हते. दिव्याचा शब्द न शब्द कानांत शिरत होता. समजंत होते पण डोळे उघडावेसे वाटत नव्हते. तिला बिचारीला कुठं ठाऊक होतं की तिचा नवरा आत्ता केवढ्या मोठ्या वादळात सापडला होता. त्यातून सही सलामत बाहेर पडू शकला हेच खूप झालं. आशीष हे सगळं दिव्याला सांगणारही नव्हता. तिनं प्रेमानं जोपासलेला श्रद्धेनं जोपासलेला तिचा सुखी संसार असाच अभंग रहायला हवा. तिचा आनंद हिरावता कामा नये.
दिव्यानं त्याला कधीच दुखवलं नव्हतं. कधी त्यांचे मतभेद झाले नव्हते. या प्रकरणांत दिव्याचा काहीच संबंध नव्हता. दुसऱ्या कुणाच्या कृत्याची शिक्षा तिला कशाला? जे विष तो प्यायला होता त्याचा एक थेंबही तो दिव्याला देणार नव्हता. हे विष अजून किती छळणार होतं कुणास टाऊक?
ती रात्र सरली. सकाळी सगळं आलबेल होतं, आशीषलाही खूप बरं वाटत होतं. शांतपणे उठून त्यानं दैनंदिन कामं आटोपली. मनांतल्या मनांत काही योजना तयार झाली होती. आज सगळ्याचा निकाल लावायचा. काहीच अधांतरी नको राहायला.
दिव्या स्वयंपाकघरात होती. स्नान आटोपून आशीष बैठकीच्या खोलीत आला. मोबाइल बघितलाच नव्हता. खूप खूप मेसेजेस होते. एक मेसेज नंदिताचा होता. ‘‘तुम्ही व्यवस्थित घरी पोहोचलात ना? मला तुमची काळजी वाटते?’’
त्यानं उत्तर लिहिलं, ‘‘मी उत्तम आहे. तू ही तशीच असशील, नंदिता. मी आयुष्यात भरपूर विष प्यायलो आहे. कुणामुळे ते तू जाणतेस. तुला एकच सांगतो, आता यापुढे माझी विष प्राषनाची शक्ती संपली आहे. एक थेंबही विष मी पचवू शकणार नाही. मला आता शांतपणे जगायचं आहे. माझ्या मुलावर, बायकोवर, संसारावर माझं प्रेम आहे. त्यांच्यावर अन्याय करणं मला मान्य नाही. कारण मला आयुष्य जगायचं बळ त्यांनीच दिलं आहे. तुलाही सल्ला देतो, आता इकडे तिकडे धावणं, भटकणं बंद कर, चांगला जोडीदार शोधून लग्न कर, सुखाचा संसार कर. यापुढे मला भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस. फोन, मेसेज काहीही करू नकोस.’’
नंदिताला मेसेज पाठवल्यावर आशीषला एकदम हलकं वाटलं. आता त्याच्या मनांत शंका, कुशंका, पूर्वग्रह, काळजी, वेदना अगदी काही म्हणता काही नव्हतं. त्याला आतून जाणवलं की गेली दहा वर्षं जो विषघट त्याच्या मनांत सतत थेंब थेंब झिरपत होता तो एकाएकी फुटून सगळं विष वाहून गेलंय. आता तो विषमुक्त झाला आहे.
आतून बाहेर येत दिव्यानं म्हटलं, ‘‘नाश्ता तयार आहे. येताय ना?’’
त्यानं तिच्याकडे बघितलं, स्नान आटोपून ती अगदी ताजीतवानी दिसत होती. नटलेली नव्हती तरीही तिचं सात्विक सोज्वळ रूप अन् चेहऱ्यावरचं स्निग्ध हसू मोहात पाडत होतं. हा मधुपट जवळ असताना आता त्याला कुणाची भीती वाटत नव्हती. खुषीत येऊन त्यानं शीळ घातली अन् तो डायनिंग टेबलपाशी येऊन बसला.
– समाप्त