विष प्राषी ( भाग -2)

दिर्घ कथा * राकेश भ्रमर

आत्तापर्यंत आपण वाचलंत :

व्यवसायानं आशीष डॉक्टर होता. नंदिताशी त्याचं लग्न झालं. दिसायला सुंदर, एका नामांकित कंपनीत सीनिअर मॅनेजर असलेली नंदिता लग्नानंतर उदास असायची, मोकळेपणानं बोलत नसे. एक पत्नी म्हणून ती आशीषला कधी समर्पित झालीच नाही. ती अशी का वागते हे आशीषला कळत नव्हतं, शेवटी त्यानं तिला खूपच प्रयत्नानं बोलती केली. तिने सांगितलं तिचं एका व्यक्तीबरोबर प्रेम आहे अन् ती त्याच्यासाठी वेडी झाली आहे. तो माणूस विवाहित आहे हे ही तिला ठाऊक आहे. हे ऐकून आशीषला मोठाच धक्का बसला.

– पुढे वाचा…

डॉ. आशीषनं खूप विचार केला. या स्थितीत त्यांच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर नंदिताला मानसोपचार द्यायचं, समुपदेशन करून घ्यायचं किंवा सरळ घटस्फोट देऊन तिला मोकळं करायचं अन् आपणही मोकळं व्हायचं.

पहिला पर्याय वेळखाऊ, खर्चिक अन् अवघड होताच, यश कितपत मिळेल याचीही खात्री नव्हती. नंदितानं केलेला विश्वासघात मनात सलत राहणार होता. फक्त तिला सुधारण्याची एक संधी देऊन डॉक्टर स्वत:ला महान, महात्मा सिद्ध करू शकला असता. मुळात तो दयाळू वृत्तीचाच होता. पण एवढं सगळं झाल्यावरही जर नंदिता बदलली नाही तर? तर मग आशीष स्वत:ला सावरू शकला असता का? आपली बायको दिवसा दुसऱ्या पुरूषाला रिझावते, स्वत:ची सगळी ऊर्जा उष्मा त्याला समर्पित करते अन् रात्री अंथरूणात पतिशेजारी असताना बर्फाच्या लादीसारखी थंड, निष्क्रीय पडून राहते, जणू पतिविषयी तिला काहीच भावना नाहीएत…

ही अवस्था किती काळ तो सहन करू शकेल? त्यातून उद्या मुलंबाळं झालीच तर ती मुले आशीषचीच आहेत हे सिद्ध करायला तो पोरांचे डीएनए तपासत बसले का? की आयुष्य संशयाच्या भोवऱ्यात गरगरत राहणार?

लग्न करून घरी आणलेल्या नववधूचे कुणा दुसऱ्या पुरूषाबरोबर लैंगिक संबंध असणं ही बाब किती वेदनादायक असते हे डॉक्टर आशीष अनुभवत होता. ही एक अशी शिक्षा होती, ज्यात माणूस जगूही शकत नाही अन् मरूही शकत नाही. त्यापेक्षा दुसरा पर्याय अधिक सोपा होता.

आशीषनं नंदिताला विचारलं, ‘‘तुझी काय इच्छा आहे? निर्णय मी तुझ्यावर सोपवतो. तू जर स्वत:त सुधारणा घडवून आणू शकलीस तर मी तुला घरात ठेवीन. नाही तर माझ्याकडून मी तुला मुक्त करतो. तुला काय हवं ते तू कर.’’

नंदितानं म्हटलं, ‘‘मी प्रयत्न करते. खरं तर तुमच्याशी लग्न ठरल्यानंतरच मी प्रयत्न केला होता. लग्न झाल्यावरही हे संबंध तोडून टाकायचा प्रयत्न केला होता, त्यामुळेच मला तुमच्याशी नॉर्मल पत्नीप्रमाणे वागता येत नाहीए. पण मी त्या व्यक्तीपासून सुटकेचा प्रयत्न करते. कदाचित मला ते जमेलही.’’

तेवढ्यापुरतं तरी त्यांचं नातं तुटलं नाही. नंदितानं ऑफिसमधून दीर्घ रजा घेतली. त्यामुळे त्या व्यक्तीशी रोजची भेट होणार नाही. पण आधुनिक युगातल्या संपर्क माध्यमांमुळे माणसाची प्रायव्हसी कमी झाली आहे. नंदितानं खूप प्रयत्न केला. घरकामांत मन रमवण्याचा, टीव्हीवरच्या कार्यक्रमात रमण्याचा, पुस्तकात जीव रमवण्याचा पण तिला कशातच रस वाटत नव्हता. शिवाय मोबाइल सतत होताच.

तिनं चार पाच वेळा त्याचा आलेला फोन उचलला नाही. त्याच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केलं. पण किती वेळा, किती दिवस? शेवटी तिनं फोन उचललाच.

पलीकडून आवाज आला. ‘‘काय झालंय? फोन उचलत नाहीस, स्वत:हून फोन करत नाहीस, मेसेजेसला उत्तर देत नाहीस, काय झालंय तुला?’’ आवाजात हुकुमत होती.

‘‘प्लीज, समजून घे. आता माझं लग्न झालंय. यापुढे हे संबंध मला शक्य नाहीत. ते योग्यही नाहीत.’’

बराच वेळ शांततेत गेला. मग पलीकडून आवाज आला, ‘‘ठीक आहे, फक्त एकदा भेट…मग मी विचार करतो.’’

‘‘खरंच? नक्की ना? मग तू माझा नाद सोडशीला?’’ तिनं आनंदून विचारलं.

‘‘होय.’’ तिकडून प्रसन्न आवाजात उत्तर आलं, ‘‘मी तुला अशीच आनंदात बघू इच्छितो.’’

दुपारची वेळ होती. डॉक्टर आशीष त्याच्या क्लिनिकमध्ये होता. तिनं आवरलं अन् ऑफिसला गेली. पण प्रजीतला भेटून आल्यावर ती आनंदी नव्हती. मनातून ती पार खचली होती. मनातल्या मनात खूप रडत होती.

रात्री घरी परतलेल्या आशीषला काही न बोलताही सगळा प्रकार लक्षात आला. दिवसा बरंच काही घडून चुकलंय हे त्याला कळलं. रात्री त्यानं तिला विचारलं, ‘‘तू त्याच्याकडे गेली होतीस.’’

नंदिता गदगदून रडू लागली. ‘‘मी तुमची अपराधी आहे. मला हवी ती शिक्षा द्या. पण एक गोष्ट अगदी खरी की मी त्याच्याशिवाय अन् तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. आम्ही एकमेकांना सोडू शकत नाही.’’

‘‘तर मग तू मला सोड…मी तुला मुक्त करतो.’’ आशीषनं शेवटचा निर्णय ऐकवला.

नंदिता काहीच बोलली नाही. फक्त अश्रूभरल्या नेत्रांनी आशीषकडे बघत होती. आशीषला कळेना, ही कशी स्त्री आहे? तिच्या मनात नेमकं काय आहे? का ही जाणूनबूजून खड्डयात उडी घेतेय? स्वत:च्या आयुष्याचा असा खेळखंडोबा का करून घेतेय?

शेवटी नंदिता म्हणाली, ‘‘ठीक आहे,’’ आता तिच्या आवाजात अपराधीपणाची भावना नव्हती. कदाचित तिनंच आशीषपासून वेगळं होण्याचं ठरवलं असावं पण, आशीष इतक्या सहजी तिला संमती देईल असं तिला वाटलं नव्हतं. दोघांनी मिळून ठरवलं अन् अगदी जवळच्या नातलगांच्या उपस्थितीत खरं कारण न सांगता परस्पर सहमतीनं घटस्फोट घेतला.

या घटस्फोटानंतर आशीष जरी मनानं खचला नाही तरी विषाचा कटू घोट त्यानं पचवलाच. नंदिताचं विष प्यायला. त्याचा परिणाम अजूनही मनांवर मेंदूवर रेंगाळत होता. अनंत प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडता येत नव्हतं. जागा बदलल्यानं कदाचित फरक पडेल म्हणून बदलली. नोकरी सोडून गावी आईवडिलांजवळ काही दिवस राहिला. काहीच न करता केवळ स्वत:वर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आईवडिलांना त्याची मन:स्थिती कळत होती. तेही फक्त भावनिक मानसिक आधार देत होते. पण असं निष्क्रीय किती दिवस राहणार? शेवटी हातपाय हलवायलाच हवेत.

थोडा सावरल्यावर आईबाबांच्या सल्ल्यानं त्यानं स्वत:चं क्लिनिक उघडलं. आशीषचं निदान अचूक असे, बोलणं पेशंटला दिलासा देणारं. त्यामुळे बघता बघता क्लिनिक अन् डॉक्टर आशीषचं नाव गाजू लागलं. पैसा मिळू लागला. कामात दिवत जात होता. सकाळी टेनिस, व्यायाम, दुपारपर्यंत क्लिनिक, घरी येऊन थोडी विश्रांती, सायंकाळी पुन्हा क्लीनिक…सगळं छान चाललं होतं. आता आईवडिल पुन्हा लग्नासाठी आग्रह करू लागले. पुन्हा विषाची परीक्षा बघण्याची आशीषची तयारी नव्हती. पण पालकांनी समजावलं, धीर दिला, अनेक उदाहरणं दिली.

वृक्षाला केवळ मुळांचा आधार पुरत नाही. फांद्या, पानं फुलं असं सगळं लागतं. माणसाचंही आयुष्य असंच असतं. त्यालाही कुटुंबाची, बायकोमुलांची गरज असते. सर्वच जीव या चक्रातून जातात.

आशीष सरळ स्वभावाचा सज्जन मुलगा होता. निवांत, शांत आयुष्य आनंदानं जगावं ही त्याची विचारसरणी होती. आईवडिलांच्या इच्छेला मान देऊन त्यानं लग्नाला होकार दिला. मुलगी बघताना फक्त ती शिकलेली आहे, नोकरी करत नाही एवढंच बघितलं.

दिव्याही दिसायला छान होती. साधी पण आकर्षक राहणी…तिचं वकिलीचं शिक्षण झालं होतं. आशीषचं स्थळ सांगून आल्यावर तिनं आशीषला एवढंच म्हटलं की मला हे लग्न मान्य आहे, पण गरज पडलीच तर तिला वकिली करायची परवानगी आशीषनं द्यावी. आशीषलाही त्यात काही गैर वाटलं नाही. पतीपत्नी एकमेकांचे पूरक असतात. एकमेकांना गरजेच्यावेळी मदत करणं, आर्थिक भार उचलणं हेसुद्धा समर्थनीयच होतं.

आज पत्नी व मुलगा यांच्याबरोबर आशीषचा संसार छान चालला होता. मुलगा आता शाळेत जात होता. पाच वर्षांचा झाला होता. दिव्या जबाबदारीनं घर सांभाळत होती. आशीषची काळजी घेत होती. आशीषचे आईवडिलही त्याच गावात त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. आशीषनं स्वत:चं घर नव्या कॉलनीत बांधलं होतं.

दिव्या सासुसासऱ्यांचं सगळं बघायची. जाऊन त्यांना भेटायची. घरी रहायला घेऊन यायची. पण त्यांना दोघांना जुन्या घरातच सोयीचं वाटायचं. शिवाय स्वातंत्र्यही होतंच. एरवी गरज पडेल तेव्हा ती सर्व एकत्र असायचीच.

आशीषच्या लग्नाला एव्हाना आठ वर्ष झाली होती. एवढ्या वर्षात दिव्याबद्दल कधी तक्रार करावी असा प्रसंगच आला नव्हता. दिव्या समंजस होती, समर्पित होती. ती चांगली पत्नी, सून, आई होती. या लग्नाआधी जे विष आशीषनं पचवलं होतं, त्याचा परिणाम आता कमी कमी होत होता. धो धो चाललेली प्रॅक्टिस, समाजातला मान सन्मान, प्रेमळ बायको, गोड गुणी मुलगा, अजूनही असलेलं आईबापाचं छत्र असं सगळं छान चालू असतानाच ही विषाची कुपी पुन्हा त्यांच्यासमोर आली होती.

नंदिता आज त्याला भेटायला आली होती. कशाला? काय हवंय तिला? आता तिचा त्याच्याशी संबंधच नाहीए. मुळात त्याच्यासमोर येण्याचं धाडस केलं कसं तिनं? काही तरी विशेष कारण नक्कीच असणार. जोपर्यंत तिच्याशी बोलत नाही तोवर त्याला ते कळणार कसं?

खरं तर त्यानं नंदिताला भेटाययलाच मुळात नकार द्यायचा होता. पण कोमल मनाचा आशीष कुणाचंही मन दुखवू शकत नव्हता. अगदी स्वच्छ मनानं तो नंदिताला भेटणार होता. तिचं म्हणणं ऐकून घेणार होता. ती का आलीय ते समजून घेणार होता.

सायंकाळी आशीष जेव्हा क्लिनिकला पोहोचला, तेव्हा नंदिता तिथं आलेलीच होती. आशीषला बघताच तिचा चेहरा उजळला. त्यानं हसून तिच्याकडे बघितलं अन् केबिनमध्ये यायची खूण केली.

तो आपल्या खुर्चीवर बसला तशी नंदिताही बिनधास्तपणे त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. तिच्या चेहऱ्यावर उदासपणा किंवा निराशा नव्हती, उलट ती खूपच टवटवीत अन् प्रसन्न दिसत होती. छान नटूनथटून आली होती. सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यात एक तहान मात्र स्पष्ट दिसत होती…कसली तहान होती ती? आशीषला कळलं नाही, त्याला ते जाणूनही घ्यायचं नव्हतं. तिच्याकडे न बघताच त्यानं विचारलं, ‘‘कशी आहेस?’’

नंदितानं एक दीर्घ श्वास घेतला अन् लाडीकपणे म्हणाली, ‘‘अजूनही तुम्हाला माझी काळजी वाटते?’’

नंदिताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यानं विचारलं, ‘‘तुला माझा पत्ता कुठून मिळाला?’’

‘‘आजच्या काळात हे काही अवघड नाहीए. शिकलेला प्रत्येक माणूस सोशल मिडियावर सक्रीय असतो, फेसबुकवर तुमचा नंबर अन् पत्ता सापडला…अन् मग.’’

तिला मध्येच तोडत आशीषनं विचारलं, ‘‘कशाला भेटायचं होतं?’’

नंदितानं नजर खाली वळवली. ती म्हणाली, ‘‘तुम्ही गैरसमज करून घेऊ नका…परंतु माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. मला आता समजलंय की जी माणसं तारूण्यात अनैतिक आचरण करतात. समाजाचे नियम धुडकावतात. कुटुंब अन् दाम्पत्य जीवनातल्या निष्ठांना ठोकरतात, त्यांना एक ना एक दिवस खूप त्रास सोसावा लागतो.’’

तारूण्याच्या उन्मादात मी ही वाहवले. मातीच्या ढेकळाला सोनं म्हणून हृदयाशी धरलं. ज्याच्यासाठी मी तुम्हाला, माझ्या आईवडिलांना सोडलं, तोच मला सोडून निघून गेला. का गेला याला आता काहीच अर्थ नाही.

या जगात ज्या नात्यांना काही आधार नसतो. ती फार लवकर तुटतात. त्यानं माझं तारूण्य अन् सौंदर्य पूर्णपणे ओरबाडून घेतलं अन् मग त्याला माझा कंटाळा आला. तो मला टाळायला लागला अन् एक दिवस तर त्यानं चक्क सांगून टाकलं की त्याला माझ्याशी संबंध ठेवायचा नाहीए. आज माझ्याकडे नोकरी नाही, पैसा नाही. त्याच्या नादानं सगळं घालवून बसले. मला सांगा, आता मी कुठं जायचं?

आशीषनं तिच्या मागच्या आयुष्याबद्दल काहीच विचारलं नव्हतं. त्याला विचारायची इच्छाही नव्हती. खरं तर नंदिताशी, तिच्या आयुष्याशी त्याला काय करायचं होतं? ती त्याची कोण होती? त्यांच्यात काहीच संबंध नव्हता. फक्त नातं माणूसकीचं म्हणून आशीषनं ऐकून घेतलं होतं.

नंदितानं आपण होऊन सांगितलं. त्यानं ऐकून घेतलं. प्रतिक्रिया काहीच दिली नाही. ठेच लागल्यावर तिला शहाणपण आलंय, पण आता उपयोग काय?

एकदा बिघडलेली नाती पुन्हा जुळत नाहीत. कशीबशी जुळवली तरी कुठं तरी गाठ असतेच. ती बोचत राहते. नंदिता आता पुन्हा नातं जोडायला आली होती की त्याची सहानुभूती मिळवायला आली होती? त्यामुळे तिला नेमकं काय मिळणार होतं?

त्यानं काहीच म्हटलं नाही. नंदिता स्वत:च बोलत होती. ‘‘माझ्या अडचणींचा पाढा वाचून मी तुम्हाला अडचणीत आणणार नाहीए. मी फक्त इतकंच सांगायला आलेय की या जगात मी अगदी एकटी आहे. आईवडिलांनी माझ्याशी संबंध तोडले. नातलगांना मी डोळ्यासमोर नकोए. मित्रमैत्रिणींनीही तोंडं फिरवलीत. त्यानं मला नोकरीही सोडायला लावली.

मुंबईत मला चारी बाजूला काळाकुट्ट् काळोखच दिसत होता. त्या अंधारात गटांगळ्या खाताना मला तुमची आठवण आली. मला ठाऊक आहे की मी तुम्हाला खूप दुखवलंय. एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर कुणी कुणाला क्षमा करणार नाही, पण मला तुमच्या सज्जनपणाची जाणीव आहे. तुमचं मन खूप कोमल आहे. तुम्ही मला माझ्या दुष्कृत्यांसाठी क्षमा नसेल केली पण तुम्ही माझ्याबद्दल कडू भावनाही मनात ठेवली नसेल. तेवढ्या आशेवर तुम्हाला भेटायला आले.’’

आशीषच्या हृदयात कळ उठली. नंदिताला खरंच पश्चात्ताप होतोय? ती आपल्या अपराधाचं प्रायश्चित घ्यायला आलीय? त्यानं नंदिताकडे बघितलं, त्याची नजर म्हणत होती, प्रायश्चितच घ्यायचं तर कुठंही घेता आलं असतं? माझ्याकडेच यायची काय गरज होती?

पण प्रत्यक्षात त्यानं म्हटलं, ‘‘तुझ्या मनात नेमकं काय आहे मला ठाऊक नाही. पण मुंबई मोठं शहर आहे. दर दिवशी तिथं लाखो लोक कुठलाही आधार नसताना आपल्या डोळ्यात आशेचे दिवे लावतात. त्यांना कुणाचाही आधार नसतो. कुणी ओळखीचं नसतं, तरीही ते स्वत:ची काही तरी राहण्याची व्यवस्था करतातच!

‘‘तू तर मुंबईतच जन्माला आलीस. किती तरी मित्र, नातलग, ओळखीचे असतील. सगळेच काही कठोर अन् दृष्ट नसतात. कुणीतरी आधार दिलाच असता. तू सक्षम, सुशिक्षित आहेस, स्वत:च्या पायावर उभी राहू शकतेस.’’

नंदितानं त्याच्याकडे बघत म्हटलं, ‘‘तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही हे मला कळतंय, पण मी मुद्दाम तुमच्याकडे आले आहे.’’

आशीषनं म्हटलं, ‘‘त्यामागे नक्कीच काही तरी कारण असणार…’’

‘‘होय, याक्षणी मला एका आधाराची गरज आहे. या शहरात माझं कुणीही नाही. मी तुम्हाला फार त्रास देणार नाही. मला स्वत:ला शक्य तेवढ्या लवकर स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे. तुम्ही मला थोडी मदत केली पाहिजे. दुसरं कुणी, मला मदत करू शकणार नाही. मला खात्री आहे, तुम्ही मला मदत नक्की कराल.’’

‘‘कसली मदत?’’

‘‘फार काही नाही, मला राहायला एक छोटीशी जागा अन् जगण्यासाठी एखादी नोकरी मिळवून द्या. मी एकटी माझं आयुष्य जगेन.’’

‘‘एकटी जगू शकशील?’’ आशीषनं विचारलं.

‘‘प्रयत्न करते. विवाह संस्था माझ्यासाठी नाही आणि पुरूषांवरचा माझा विश्वास उडालाय.’’

आशीषला हसायला आलं. तो काहीच बोलला नाही. पण त्याला कळंत होतं की हिचा पुरूषांवरचा विश्वास उडण्याचं काहीच कारण नाहीए. तिनं स्वत:च एका सज्जन पुरूषाचा विश्वासघात केला आहे. तिला पुरूषांना दोष देण्याचा हक्कच नाहीए.

त्यानं विचारलं, ‘‘आता कुठं थांबली आहेस?’’

‘‘कुठेच नाही. मी आजच इथं आलेय.’’

‘‘मग थांबणार कुठं?’’

‘‘कुणास ठाऊक? तुम्ही माझी काही तरी सोय करून द्या.’’ नंदिता अगदी अधिकारानं बोलत होती. जणू ती त्याची पत्नी होती. तिला आशीषच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घ्यायचा होता की काय? पण आवाजात बोलण्यातला अधिकार जाणवत होता.

आशीषनं तिच्या डोळ्यात रोखून बघितलं. तिथं याचना नव्हती. आदेश होता. तो तिला घाबरला नव्हता किंवा तिची कीवही करत नव्हता. पण ती अडचणीत आहे तर तिची मदत केली पाहिजे एवढी एकच भावना मनात होती.

ती खरोखर अडचणीत आहे की मनानं रचून काही गोष्टी सांगते आहे याची शहानिशा करावी असंदेखील त्याच्या मनात आलं नाही. त्याचा दयाळू स्वभाव त्याला असा काही विचार करू देत नसे.

त्या दिवशी त्यानं नंदिताच्या राहण्याची व्यवस्था एका मित्राच्या गेस्ट हाऊसमध्ये केली. मग पुढले काही दिवस तो तिच्या घराच्या अन् नोकरीच्या शोधात होता. त्यामुळे क्लिनिककडे दुर्लक्ष होत होतं.

घरीही वेळ कमी पडत होता. मुलगा तक्रार करायचा, ‘‘बाबा तुम्ही लवकर घरी येत जा. इतकं काम का करता? आम्हाला भेटतही नाही…’’

दिव्या समजूतदार होती. डॉक्टरचं आयुष्य असंच असतं, पेशंटसाठी डॉक्टर जिवाचं रान करतो हे तिला ठाऊक होतं. पण आशीषला काळजीत बघून तिनंही म्हटलं, ‘‘तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, घेता का थोडी रजा? किती दमलाय तुम्ही?’’

‘‘दिव्या, तसं काही नाहीए. असा काळ कधीतरी असतोच…लवकरच सगळं व्यवस्थित होईल. मी तुम्हाला वेळ देईन.’’

‘‘काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही थोडे त्रस्त अन् काळजीत दिसता आहात?’’

‘‘नाही गं! काहीच नाही. तू उगीच काळजी करतेस. मला काही प्रॉब्लेम असता तर मी तुला सांगितलंच असतं ना?’’

दिव्याचा पतिवर विश्वास होता. संशय घेणं तिच्या स्वभावात नव्हतं.

लवकरच एक छोटासा फ्लॅट मिळाला. नंदितासाठी पुरेसा होता. डिपॉझिट व एडव्हान्स भरायच्यावेळी आशीषनं तिला विचारलं, ‘‘तुझ्याकडे पैसे आहेत?’’

तिनं मान खाली घातली. धीम्या आवाजात म्हणाली, ‘‘नाहीएत.’’

आशीषला आश्चर्य वाटलं. एका मोठ्या कंपनीत काम करत होती ती. पगार भक्कम होता तरीही तिच्याकडे पैसे नसावेत?

त्याच्या मनांतला प्रश्न जणू तिला समजला. खाली मान घालून धीम्या आवाजात म्हणाली, ‘‘त्यानं माझं शारीरिक शोषण केलंय, पैसाही लुबाडला, नोकरीही सोडायला लावली…’’

काही न बोलता आशीषनं पैसे भरले. घरात गरजेचं फर्निचर घेऊन दिलं. किराणा सामान वगैरेही भरलं. यात काही लाख रूपये खर्च झाले. खर्चाबद्दल आशीषला दु:ख नव्हतं. पण हे सगळं दिव्याला न सांगता करतोय याची बोच मनात होती.

स्वत:च्या नावाचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून त्यानं तिला हॉटेलमध्ये असिस्टंट मॅनेजरची नोकरी मिळवून दिली. तिच्या आधीच्या कंपनीतला अनुभव व एमबीए, हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री यामुळे नोकरी मिळाली.

ज्या दिवशी नोकरी मिळाली नंदितानं आशीषला म्हटलं, ‘‘तोंड गोड करायला घरी येणार ना सायंकाळी?’’

अगदी सहजपणे आशीष म्हणाला, ‘‘घरीच कशाला? मिठाई कुठंही खात येते की!’’

‘‘तर मग एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊयात?’’

‘‘नाही, नाही जमणार.’’ आशीष म्हणाला, ‘‘पेशंट बघता बघताच खूप उशीर होतो. रात्री उशीर होईल, वेळ मिळणार नाही.’’

‘‘तुम्ही क्लिनिकमधून सरळ माझ्या घरी या.’’ आग्रहानं तिनं म्हटलं.

‘‘बघतो, पेशंट कमी असले तर जमवतो.’’

‘‘मी वाट बघते,’’ तिच्या सुरात ठाम विश्वास होता. आशीष येणार म्हणजे येणारच! अन् खरंच तो आला. नंदिता खूप आनंदात होती. त्याच्या स्वागतासाठी तयारच होती. एखाद्या विवाहितेसारखी नटली होती. फक्त मंगळसूत्र नव्हतं.

साडीत तिचा कमनीय बांधा खुलून दिसत होता. माणसाच्या आयुष्यात आनंद येतो, तेव्हा त्याचे इतर गुणही उजळून येतात

                                                                               – क्रमश:

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें