जीवघेणी ठरतेय अंधश्रद्धा

* पद्मा अग्रवाल

इला पेशाने इंजीनिअर आहे. सकाळी वर्तमानपत्रातील मथळयांवर वरचेवर नजर मारून राशीभविष्य पाहण्यास ती विसरत नाही आणि मग त्यात काय लिहिले आहे त्यावरूनच तिचा मूड तयार होतो किंवा बिघडतो. राशीभविष्यात जर प्रिय व्यक्तिशी तणाव निर्माण होईल, असे असल्यास ती कधी पती तर कधी इतरांवर रागावते. तुमचे ग्रह शुभ परिणाम देणार आहेत, असे लिहिलेले असल्यास दिवसभर आनंदाची बातमी ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहात, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याच्याशी जोडत असते.

कुहू काळया रंगाचा गाऊन घालून आत्याच्या मुलाच्या लग्नाला गेली होती. सर्वांनी खूपच छान असे म्हणत तिला खुश केले. पण आत्याच्या जावेला तिने परिधान केलेला काळा रंग अजिबात आवडला नाही. ती सर्वांसमोर खोचकपणे बोलली, ‘‘लग्नाला आली आहेस, दुखवटयाला नाही, मग काळा गाऊन का घातलास.’’

कुहूच्या डोळयात पाणी आले. आत्या सर्व सावरून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या जावेच्या डोळयात प्रचंड राग होता.

जीवनावरील संकट

एकविसाव्या शतकात, अंधश्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांसाठी एक आव्हान आहे. अंधश्रद्धेमुळे बुराडी कांडात हसत्याखेळत्या ११ लोकांचे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले. याआधी महाराष्ट्रातील हसनैन वरेकर कांडात एकाच कुटुंबातील १४ जणांना मृत्यूच्या दाढेत ढकलले होते.

अंधश्रद्धेचे मूळ कारण पुजाऱ्यांचा प्रचार आहे, जो आता इंग्रजीत विज्ञानाच्या सोबतीने भविष्याची भीती दाखवत चांगले वर्तमान मिळवून देण्याचा दावा नेत्यांप्रमाणे करत आहे. उद्या काय होईल, कोणालाच माहिती नसते. आपल्या मनाप्रमाणे घडावे यासाठी लोक कोणीही सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागायला तयार होतात.

अंधश्रद्धा ही अज्ञानाची, भीतिची, निराशेची आणि खेदाची बाब आहे की ज्यामुळे सुशिक्षित लोकही वास्तावाकडे दुर्लक्ष करून अंधश्रद्धेच्या जाळयात अडकतात. अंधश्रद्धेचा प्रसार पुजाऱ्यांपेक्षा त्यांचे भक्तच अधिक करतात.

टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मिडिया ही दोन्ही अंधश्रद्धेची मुळे मजबूत करण्यात गुंतले आहेत. ते अंधश्रद्धा पसरवण्याचे शक्तिशाली माध्यम बनले आहे.

हा संदेश १० लोकांना फॉरवर्ड करा…मनातली इच्छा पूर्ण होईल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या साइट्सवर अशा संदेशांचा पूर आला आहे.

कधी गणपतीने दूध पिण्याची, तर कधी रात्री कुणी वेणी कापत असल्याची बातमी, जगात आपल्या देशाची प्रतिमा मलिन करीत आहे. कधी दिवसानुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याचा आदेश दिला जातो. आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, परंतु महिला करवा चौथला चंद्र पाहण्यासाठी नटूनथटून दिवसभर उपवास करतात.

काही दिवसांपूर्वी वडिलांचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी १३ वर्षांच्या मुलीला ६८ दिवस उपवास करायला लावले. व्यवसायाचे तर माहीत नाही, पण यामुळे मुलीला मात्र जीव गमवावा लागला.

कायदेशीर गुन्हा

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासंदर्भातही आपल्या देशात अंधश्रद्धा आहेत. ग्रहण काळात स्वयंपाक करणे, खाणे, पूजा आदी निषिद्ध मानले जाते. ग्रहणानंतर वाराणसी, हरिद्वार इत्यादी ठिकाणी स्नानासाठी लोकांची गर्दी होते. एलडस हक्सले यांनी अशीच गर्दी बघून सांगितले होते की ‘‘सूर्याला राहूपासून मुक्त करण्यासाठी जितके लोक जमतात, तितक्याच मोठया संख्येने शत्रूच्या तावडीतून भारताला मुक्त करण्यासाठी भारतीय जमू शकत नाहीत.’’

ही टिप्पणी आपल्यासाठी त्रासदायक असली तरी हे सत्य आहे आणि त्याचे कारण पुजाऱ्यांनी प्रचाराची मर्यादा ओलांडणे हे आहे.

मुलाचा जन्म, लग्न असो, गृहप्रवेश किंवा भूमिपूजन, लोक शुभमुहूर्त काढण्यासाठी पुजाऱ्यांकडे धाव घेतात. पुजारी सर्वात आधी आपली सोय पाहून त्यानंतरच शुभमुहूर्त सांगतात. विशेष धातू किंवा रत्नांची अंगठी घालणं, मंतरलेलं ताईत घालणं, जादूटोणा, घर बनविताना काळी हंडी टांगणं अशा अनेक अंधश्रद्धा पूर्वीप्रमाणेच त्यांची पकड घट्ट करीत आहेत.

टीव्ही वाहिन्यांवरील जाहिराती लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत आहेत, जसे की गोरे बनविण्याची क्रीम.

अलाहाबाद उच्च न्यायालयानेही आपल्या निकालात असे म्हटले आहे की तंत्रमंत्र, जादूटोणा, ताईत, प्रार्थना आणि धर्मावरील विश्वासाचा अतिरेक कायदेशीर गुन्हा आहे, परंतु कोर्टाचे म्हणणे कोण ऐकतो?

पुजाऱ्यांनी तयार केलेला प्रपंच

अंधश्रद्धा हा देशाच्या विकासात अडथळा ठरत आहे. यामुळे लोक आर्थिक आणि सामाजिक शोषणाला बळी पडत आहेत. हे विज्ञान युग आहे. अशावेळी  टीव्हीवरील वाहिन्यांवर ‘नजर सुरक्षा कवच’, ‘सिद्धमाला’, ‘सिद्ध रिंग’, ‘धनप्राप्ती यंत्र’ आदींचा धंदा अंधश्रद्धेच्या नावाखाली चालविला जात आहे.

जादूटोणा, भूतप्रेत, चेटूक, तंत्रमंत्र हे केवळ दुर्बल मेंदूतून जन्माला येते. प्रत्येक घटनेमागे एक कारण असते.

काही अंधश्रद्धांमागे वैज्ञानिक कारणंही दिली जाऊ लागली आहेत, जी सुशिक्षितांना मूर्खाप्रमाणे वागायला भाग पाडतात. तसे तर हा पूर्वनियोजित व्यवसायाचाच एक भाग आहे.

दरवाजावर लिंबूमिरची टांगा, लिंबातील सायट्रिक अॅसिड कीटकनाशकाचे काम करते, जे कीटकांना आत येण्यापासून रोखते.

कुंडली जुळविणे हा फक्त पुजाऱ्यांनी थाटलेला प्रपंच आहे. मंगळ दोष निवारणाचा उपायही अंधश्रद्धाच आहे. फिल्मी जगतातील शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायसारख्या विश्वसुंदरीसह आपला मुलगा अभिषेक बच्चन याचे लग्न लावून देण्यापूर्वी ऐश्वर्याने वडाच्या झाडासोबत फेरे घेणे हे अंधश्रद्धेचेच ज्वलंत उदाहरण आहे.

ही अंधश्रद्धा व्यवसायाचा भाग आहे. जसे पोथी-पुराणात असायचे तसे आता नेट व टीव्हीद्वारे होते. मात्र साधू, पुजाऱ्यांना दान देणे, त्यांचे रक्षण करणे कायम आहे.

धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिकता

एमबीए पदवीधर असलेली ५० वर्षांची अस्खलित इंग्रजी बोलणारी फरजाना हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून हैदराबादमधील दर्ग्यात राहत आहे.

तिचा ठाम विश्वास आहे की तिचे कुटुंब तिच्यावर काळी जादू करीत आहे. दर्ग्यात राहिल्यामुळे ती या जादूपासून वाचेल.

मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय अंजलीचे एका मुलावर प्रेम होते. पण आईला त्यांचे नाते मान्य नव्हते. त्यासाठी ती तांत्रिकाला शरण गेली.

तांत्रिक प्रत्येक वेळी मनगटावर धागा बांधण्याच्या बदल्यात तिच्या आईकडून ५ हजार रुपये घेत असे. त्याचे म्हणणे होते की तिने आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न केल्यास भविष्यात तिच्यावर खूप मोठे संकट ओढवेल. या धाग्याच्या प्रभावामुळे ती तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न करू शकणार नाही.

काही दिवसांनंतर अंजलीने धागा काढून फेकून दिला व आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न केले. आता ती खूप आनंदात आहे.

‘वशीकरण’ वेबसाइट चालविणारे कोणत्याही समस्येचे समाधान करू असा दावा करतात. तेथील तथाकथित ज्योतिषाशी मी फोनवर संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही आधी आमच्या खात्यात पैसे जमा करा, त्यानंतर इ-मेलद्वारे समस्या सांगून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता.’’

मी प्रेसमध्ये काम करते, असे सांगताच त्यांनी लगेच फोन कट केला.

प्रशासनातील लोकच धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिक धोरणांत गुंतले आहेत, त्यामुळे समाजातील परिवर्तनाची प्रक्रिया मंदावणार, हे निश्चित आहे.

छळ व हत्या

बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आजही ‘चेटकीण’ या  नावाखाली महिलांचा छळ व हत्या केल्याच्या बातम्या येतच असतात.

रायपूरचे डॉ. दिनेश मिश्र पेशाने नेत्र विशेषज्ज्ञ आहेत. गावकऱ्यांशी संपर्क साधल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की छत्तीसगडमधील काही लोक ज्यांना ओझा असे म्हटले जाते, ते भोळयाभाबडया गावकऱ्यांना आपल्या शब्दांच्या जाळयात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यांना फसवितात. त्यांनी सांगितलेकी त्यांच्याकडे सतत तक्रार यायची की गावात एखाद्या महिलेला ‘चेटकीण’ ठरवून तिला छळले जाते. सोबतच तिचे गावातील अन्नपाणी बंद करून तिला समाज आणि गावाबाहेर काढले जाते. यामुळे गावात अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण होते.

डॉ. मिश्र यांचे प्रयत्न आणि शिफारशींमुळे झाडणे, जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवून एखाद्याला वाळीत टाकणे याला अपराध ठरविण्यात आले.

डॉ. दिनेश मिश्र अंधश्रद्धेविरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’द्वारे गावागावांत जाऊन लोकांमध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे १,३५० सभा घेतल्या आहेत.

त्यांच्याच अथक परिश्रमांमुळे २००५ मध्ये ‘छत्तीसगड जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ तयार करण्यात आला. त्याअंतर्गत अशा प्रकरणांमध्ये ३ वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

२००७ मध्ये त्यांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

अंधश्रद्धेरूपी व्यवसायाची भूमी ही राजकीय पाठिब्यांच्या खतामुळे भरभराटीस येते. या दोघांच्या हातमिळवणीमुळे मिळणारा नफा राजकारणी आणि प्रसारमाध्यमे आपापल्या स्वार्थासाठी स्वत:ला हवा तसा वापरतात.

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हा प्रश्न गंभीर झाला आहे की सरकार अंधश्रद्धेविरूद्ध कठोर कायदे का करीत नाही?

विज्ञानाला देवाप्रमाणे सादर करणारे अमेरिका, ब्रिटन हे युरोपीय देश असोत, जादू, तंत्रमंत्राला कुप्रथा म्हणविणारे अरब देश असोत अथवा आपल्याच देशात जादूटोणा, चमत्कार किंवा मनातली इच्छा पूर्ण करणारे असोत, प्रत्येक ठिकाणी अशा लोकांची मोठी जमातच पाहायला मिळते.

ती कॅन्सरसारख्या आजारांना बरे करण्यासोबतच लग्न, प्रेम, व्यवसायात भरभराट, एखाद्याला वश करणे, शत्रूचा नाश करणे इत्यादींसाठी त्यांचे नेटवर्क देशातील प्रत्येक राज्यात, शहर आणि खेडयात चालवत आहे. सोबतच आता हा व्यवसाय ऑनलाइनही करीत आहेत.

अंधश्रद्धाच्या चक्रव्युहात अडकले प्राणी

* मीता प्रेम शर्मा

विकास सिंह जेव्हा घरी एक पिल्लू घेऊन आले तेव्हा त्याची पुजाऱ्याकडून पूजा आणि नामकरण करण्यात आले. पुजाऱ्याने त्याचे नाव हॅप्पी असे ठेवून सांगितले की या प्राण्याच्या आगमनाने घरातील सुख-समृद्धी, आनंद वाढेल.

सध्या वर्तमानपत्र आणि वेबसाईट्सवर आणखी एका अंधश्रद्धेचा प्रसार होऊ लागला आहे, जिथे प्राण्यांचे पालक प्राण्यांची जन्मकुंडली बनवून नामकरण सोहळा पार पाडतात. किती हास्यास्पद आहे की आतापर्यंत माणूस कुंडली, ग्रहदशेच्या चक्रव्युहात अडकला होता. आता प्राणी, पक्षी (जे कोणी पाळीव आहेत) तेदेखील या चक्रव्युहात अडकत आहेत.

खेदाची गोष्ट अशी की सुशिक्षित आणि बुद्धिजीवी वर्गही स्वसंमतीने, आनंदाने या अंधश्रद्धेच्या जाळयात अडकत आहे आणि याला मान्यता देत आहे.

फ्रिलान्सर विभूती तारे यांनी आपल्या पाळीव प्राण्याची कुंडली बनवून नामकरण सोहळा व पूजाविधी केला. त्यानंतर पार्टीचे आयोजन केले. लेखक म्हणजे समाजाला योग्य मार्ग दाखवण्याची ताकद असलेली मनमोकळया विचारांची व्यक्ती. जर तेच हा मार्ग अवलंबलत असतील तर जनजागृती कोण करणार?

ज्योतिषी, पुजाऱ्यांची चांदी

बुद्धिजीवी वर्ग या कार्यात सहभागी होत असेल तर पुजारी नवनव्या शक्कला लढवून भावनिक भ्रम निर्माण करण्यात यशस्वी होणारच. आतापर्यंत पालक आपल्या मुलांची कुंडली, जन्मपत्रिका बनवून त्याच्या निरर्थक, न दिसणाऱ्या भविष्यात डोकावत होते. मुलाचा जन्म होताच पुजारी, ज्योतिषाचा सल्ला, पूजा, होमहवन इत्यादी न जाणो केव्हापासून सुरू आहे. यात मुलाचा जन्म मूळातच खराब नक्षत्रात झाल्यास पूजा, दान-दक्षिणेचे प्रमाण वाढवून भावनिक खेळ खेळला जातो. आता पाळीव प्राणीही या जाळयात अडकत आहेत.

पाळीव प्राण्यालाही आपल्या मुलांप्रमाणेच कुठलेही कष्ट किंवा त्रास होऊ नये यासाठी नवनवी शक्कल लढवली जात आहे.

भावनिक गंडा घालून जोमात धंदा करणारे पुजारी

कुंडलीनुसार नामकरण केल्याने पाळीव प्राणी घरात येताच घरात आनंद, समृद्धी येते. पाळीव प्राण्यांचे नामकरण करणारे पुजारी दीपक गंगेले यांचा असा दावा आहे की ते पाळीव प्राण्याचा जन्मदिवस आणि जन्मतारखेनुसार, त्याचे असे नाव ठेवतात जे पालक आणि पाळीव प्राणी दोघांसाठीही शुभ आणि आनंद घेऊन येणारे असते. त्यांच्या मते माणूस आणि प्राण्याच्या नामकरणात विशेष फरक नसतो. दोघांसाठीही कुंडली बनवून ग्रहांचा अभ्यास केला जातो.

माझ्या परिचयातील सारिकाने तिच्या पाळीव प्राण्याचे विधिवत नामकरण करून पुजाऱ्याकडून पूजाविधी करून घेतला. पुजाऱ्याने त्याचे ऑस्कर असे नाव ठेवून दावा केला की हे नाव कुटुंबासाठी फलदायी ठरेल. धन मिळेल, प्रगती होईल इत्यादी. त्यानंतर दोन महिनेही होत नाहीत तोच पायऱ्यांवरून पडल्याने ऑस्करचा पाय मोडला. जो ठीक करायला बराच वेळ आणि पैसा गेला.

जेव्हा तो वर्षाचा झाला, तेव्हा तिसऱ्या माळयावरील गच्चीतून त्याने खाली उडी मारली. त्याला बरे करण्यासाठी डॉक्टरांना सहा महिने लागले. डॉक्टरांच्या फेऱ्या, ऑस्करची सेवा यामुळे सारिका व तिचे पती दु:खी, नाराज झाले. ऑस्करला सोडून देणेही शक्य नव्हते. त्याला होणाऱ्या त्रासामुळे ते दु:खी झाले. आता येथे पुजाऱ्याच्या भविष्यवाणीला काय अर्थ राहिला?

हे स्पष्ट आहे की पुजारी भावनांचा खेळ खेळतात. आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन जास्तीत जास्त पैसे उकळण्याचे मार्ग अवलंबतात.

पाळीव प्राण्याची कुंडली

लिसा स्टारडस्टने सांगितले की कुंडलीमुळे पाळीव प्राण्याचे व्यक्तिमत्त्व, मन:स्थिती, वागणूक इत्यादीचा अंदाज येतो. इतकेच नाही तर तो काय विचार करतोय, त्याला कसे वाटतेय, कोणत्या आजारांपासून त्याला दूर ठेवावे लागेल आदी सर्व कुंडलीवरून माहीत करून घेणे सोपे असते, कारण तो बोलू शकत नाही पण त्यालाही भावना असतात. प्रत्येक पाळीव प्राण्याचीही रास असते.

पुजारी दीपक गंगेलेही ज्योतिषाबरोबरच राशी भविष्यालाही तितकेच महत्त्व देतात. प्रत्येक गोष्टीसाठी पुजारी फी उकळतात.

शोधलेला आणखी एक मार्ग

पाळीव प्राणी, पक्ष्याची जन्मतारीख, वेळ, दिवस माहीत नसेल आणि तुम्हाला त्याला घरी आणायचे असेल तर त्यासाठीही एक मार्ग आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, ज्या क्षणी प्राण्याला घरी आणले जाते, ती वेळ त्याची कुंडली बनविण्यासाठी निश्चित केली जाते. त्याच वेळेनुसार आकडेमोड करून नामकरण केले जाते.

पुजारी, ज्योतिषी असा दावा करतात की माणूस ज्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या नक्षत्रावर जन्माला येतो आणि त्याचा स्वभाव, वर्तन, नशीब, समृद्धी सर्व त्यानुसारच ठरते. त्याचप्रमाणे पाळीव प्राण्याचीही ग्रहदशा त्याच्या जन्म नक्षत्रावरच अवलंबून असते.

म्हणूनच मनासारखी परिस्थिती आणि सुखी भविष्यासाठी योग्य नामकरण आवश्यक असते, कारण ते पाळीव कुटुंबातील एक भाग बनते आणि त्याच्या ग्रहांचा प्रभाव कुटुंबावर पडतो.

आचार्य अजय द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार, पालक आणि पाळीव प्राणी या दोघांच्या कुंडली जुळल्यास कुटुंबाचे जीवन निरोगी व सकारात्मक होते. त्या पाळीव प्राण्याचा रंग, जात, नाव इत्यादीही ठरविले जाते.

आणखी एक पाऊल

जॉकी, टॉमी अशा जुन्या नावांऐवजी आता ‘अवनी’, ‘अथर्व’, ‘अग्नी’, ‘मोक्ष’ इत्यादी सांस्कृतिक नावे ठेवली जात आहेत. या नावांच्या प्रभावामुळे प्राणी अधिक बुद्धिवान आणि ऊर्जावान होईल, कुटुंबासाठी शुभ ठरेल असे सांगून पुजारी पालकांना सुखी भविष्य दाखवून आपल्या धर्माचे दुकान व्यवस्थित पुढे चालवत आहेत.

या गोष्टींवरून हे स्पष्ट होते की नवनवीन शक्कला लढवून आणि नवनवीन अंधश्रद्धा निर्माण करून धर्माची ही दुकाने त्यांची विश्वासार्हता वाढविण्यात यशस्वी होत आहेत. अनुयायी मात्र अंधश्रद्धेमुळे विवेकहीन होऊन कुंडली, ग्रहदशेला फसून पैसा आणि वेळ दोन्ही वाया घालवित आहेत. यामुळे आपण केवळ धर्माच्या ठेकेदारांचेच अनुकरण करत राहू. हे थांबविण्यासाठी अंधश्रद्धेचा पडदा बाजूला सारवाच लागेल.

आतापर्यंत धर्माच्या ठेकेदारांनी माणसाभोवती जन्मपत्रिका, कुंडली इत्यादींचेच जाळे विणले होते. आता पाळीव प्राणी, पक्षीही या चक्रव्युहात अडकत आहेत. बुद्धिजीवी वर्गच जर त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी पुजाऱ्यांच्या जाळयात अडकला तर सर्वसामान्य वर्गही त्यांचेच अनुकरण करेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण पुढे जाण्याऐवजी मागे का जात आहोत? आजच्या युगात जिथे ग्रहांचे वास्तव समोर आले आहे, तिथे सुशिक्षित वर्गाला हे दुष्टचक्त्र संपुष्टात आणण्याच्या दिशेने पाऊल उचलावेच लागेल.

या कुंडल्यांमुळे हे सिद्ध होते की माणसाची कुंडली बनविणे हीदेखील शुद्ध फसवणूक आहे. ती शतकानुशतके हिंदू समाजावर लादली जात आहे. आता यात नवीन अध्याय जोडले जात आहेत, कारण अंधश्रद्धाळू लोकांना हजारो प्रकारच्या अंधश्रद्धा स्वीकारण्यास भाग पाडणे खूप सोपे आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें