दीर्घ कथा * सीमा खापर
गुळगुळीत डांबरी रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर अन् पीतमोहराच्या झाडांची लांबलचक रांग होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंद फुटपाथ होते. अन् दिवे लागले की तो रस्ता अधिकच सुंदर भासायचा. गेली कित्येक वर्षं याच वाटेवरून तिची येजा असते.
गेल्या आठ वर्षांत अनेक नोकऱ्या केल्या पण हीच नोकरी बरी दोन वर्षं टिकून आहे. त्या आधीच्या नोकऱ्या ८-१० महिने, फार तर वर्षंभर केल्या. कधी तिने राजीनामा दिला, कधी नोकरीने ‘बाय बाय’ केलं.
या गुलमोहराच्या झाडाखालून जाताना तिला हमखास वसंत आठवतो. वसंत तिच्या आयुष्यात आला आणि जणू वसंतोत्सव सुरू झाला. दिवस सुगंधी अन् रात्री रेशमाच्या झाल्या.
‘‘तुला माहीत आहे, मला वसंत फार आवडतो.’’ ती स्वप्नाळूपणे म्हणाली.
‘‘खरंच?’’ खट्याळपणे तिच्याकडे बघत त्याने म्हटलं अन् ती लाजून लाल झाली.
‘‘मी वसंत ऋतूबद्दल बोलतेय…’’
‘‘मी पण तेच म्हणतोय,’’ पुन्हा तेच खट्याळ हसणं अन् त्याच्या गालाला पडणाऱ्या खळ्यांमध्ये ती हरवून जाते.
कंपनी पार्कच्या मधोमध असलेल्या घड्याळ्याच्या टॉवरमधून सहाचे टोल पडले अन् ती भानावर येऊन भराभर चालू लागली.
ती घरी पोहोचली तेव्हा शुभी शाळेचा होमवर्क करत बसली होती.
‘‘माझी गुणाची पोर गं ती, छान अभ्यास कर हं!’’ तिने शुभीच्या पाठीवर प्रेमाने थोपटत म्हटलं. हातातली पर्स कपाटात ठेवून हातपाय धुऊन ती स्वयंपाकघरात गेली. चहा पिण्याची प्रबळ इच्छा होती. पण ज्याच्यामुळे चहाची सवय लागली होती तो आता कुठे होता, कुणास ठाऊक.
‘‘अरेच्चा? थर्मासमध्ये चहा अन् हॉटपॉटमध्ये खाण्यासाठी काहीतरी तयार दिसतंय?’’ तिने हसून कौतुकाने म्हटलं.
तेवढ्यात शुभी उठून आली अन् तिच्या गळ्यात पडली. हा लाड कशासाठी आहे हे सुमा जाणून होती. काही न बोलता तिने शुभीचा मुका घेतला.
चहाचा ट्रे घेऊन ती ड्रॉईंगरूममध्ये आली. चहा घेता घेता ती लक्षपूर्वक शुभीकडे बघत होती. शुभी काय, काय, किती, किती बोलत होती. पण चहा संपता संपता ती मुद्दयावर येईल याची सुमाला खात्री होती.
‘‘ममा, प्लीज मला जाऊ दे ना शाळेच्या ट्रिपबरोबर. उद्या पैसे भरण्याचा शेवटचा दिवस आहे. प्लीज ममा, नंतर वाटलं तर कुठेही पाठवू नकोस…ममा, प्लीज, अगं शालू, विजू, जया, निमा सगळ्या जाताहेत गं!’’ शुभी बोलता बोलता रडवेली झाली होती.
थोडी वैतागून सुमा म्हणाली, ‘‘तुला मी आधीच सांगितलं होतं, पाणी असलेल्या ठिकाणी मी तुला पाठवणार नाही म्हणून.’’
‘‘शिट् ममा, अगं मी काय कुक्कुलं बाळ आहे का? उगीचच पाण्यात जाऊ बसेन का मी? मलासुद्धा कळतं ना? एक तर स्वत: मला कुठे नेत नाही आणि आता सगळ्या मैत्रिणी शाळेतून जाताहेत तर तिथेही पाठवत नाहीस?’’ शुभी रडायला लागली.
तिला पोटाशी घेऊन आपणही मोठ्यांदा रडावं असं सुमाला वाटलं. गेली कित्येक वर्षं तीच तर एकटीने सगळं निभावते आहे.
शुभीच्या बाबतीत ती फार हळवी आहे. तिला शुभीची फार काळजी वाटते. नोकरीमुळे ती तशीच दिवसभर शुभीपासून दूर असते त्यामुळे घरी परतल्यावर शुभीपासून दूर राहाणं तिला सहन होत नाही.
शुभीचे अश्रू तिला बघवत नाहीत, तिने प्रेमाने शुभीला जवळ घेतलं. कळतंय तिला की किती दिवस ती शुभीला असं आपल्याजवळ ठेवू शकेल?
शुभीने स्ट्राँग व्हावं, आपल्या पायावर उभं राहावं असं तिलाही वाटतंय. थोडी मोठी झाल्यावर तिला एखाद्या कोर्ससाठी बाहेर पाठवावं लागेल, अशावेळी ती शुभीला अडवून धरेल का? अन् शुभीच्या आयुष्यात कुणी वसंत आला तर? छे: छे:, नकोच! शुभीला मुक्त आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. इतकं ओव्हर प्रोटेक्टिव राहून चालणार नाही.
‘‘उद्या तुझ्या क्लास टीचरला माझ्याशी बोलायला सांग.’’ तिने प्रेमाने शुभीच्या गालावर ओठ टेकवत म्हटलं. शुभी खुदकन् हसली.
सकाळी शुभीला उठवावं लागलं नाही. स्वत:च उठली, आवरून सरळ आईजवळ स्वयंपाकघरात आली. गळ्यात हात घातले. गालाचा मुका घेतला. पुन्हा तेच खुदकन् हसणं. आईने दिलेले पैसे व्यवस्थित कंपास बॉक्समध्ये ठेवले अन् टाटा करून शुभी घराबाहेर पडली.
शुभीची सणसणीत उंची अन् गालावरच्या खळ्या…हुबेहूब वसंतची कार्बन कॉपीच जणू. आधी किती दिवस लग्न होतंय की नाही ही काळजी. त्यानंतर दोन वर्षांनी तिला दिवस गेले. वसंतला मूल नको होतं. पण सुमा आपल्याच आनंदात दंग होती.
वसंतच्या छातीवर डोकं टेकवत ती म्हणाली होती, ‘‘मला मुलगाच हवाय, तुझ्यासारखा.’’
‘‘अन् मुलगी झाली तर?’’
‘‘नाही, मुलगाच होईल.’’
‘‘लोक म्हणतात, ‘पहिली बेटी, धनाची पेटी’ अन् तू मुलगा हवा म्हणतेस?’’
‘‘हो, मला पहिला मुलगाच हवाय…’’
‘‘पहिला म्हणजे? अजून यानंतर एक मुलगी हवीय? महागाई इतकी आहे अन्…’’ वसंतची ठराविक बडबड सुरू झाली.
‘‘कमालच करतोस. अरे आयतं घर तुला राहायला मिळालंय. घरात सगळ्या वस्तू, सगळं सामान आहे. आता तुला काय मुलं पोसायचीही ऐपत नाही का? तुला मुलंच आवडत नाहीत का? महागाईत काय लोक मुलं जन्माला घालत नाहीत का?’’ तिला संताप यायचा. वसंतचं गप्प बसणं असह्य व्हायचं.
वसंतला तिने प्रथम बघितलं ते शाळेच्या कॅण्टीनमध्ये. शाळेच्या कॅम्पसमध्ये ते कॅण्टीन होतं. उंच, रुबाबदार बांधा, गव्हाळ कांती, मोठमोठे डोळे. पॅण्टच्या खिशात हात घालून तो बेदकारपणे इकडेतिकडे बघत उभा होता.
कॅण्टीनच्या एका कोपऱ्यात उभी राहून ती अगदी अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे बघत होती. कोवळं वय…कुणाचंही आकर्षण वाटावं असं अडनिड वय, चुंबकाकडे आकर्षित व्हावं तशी ती त्याच्याकडे ओढली गेली होती. रमा कधीची तिच्याजवळ येऊन उभी होती, पण सुमाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. रमाने तिला जोरदार चिमटा काढला तेव्हा ती दचकून ओरडली.
तिच्या ओरडण्यामुळे वसंताने मान वळवून तिच्याकडे बघितलं. दृष्टिभेट झाली अन् तो हसला. त्याच्या गालावरच्या खळ्यांमध्ये ती अशी हरवली की तिला स्वत:चा शोधा लागेना.
दुसऱ्या दिवशी तिच्याही नकळत की पुन्हा त्याच कॅन्टीनकडे वळली. वसंत आजही तिथे होता पण कालच्यासारखा नाही तर तिची वाट बघत असल्यासारखा. त्यानंतर भेटी ठरवून होऊ लागल्या. हॉस्टेलमधून फक्त शनिवारी बाहेर पडायला परवानगी होती. तेव्हा ती दोघं भेटायची. हॉस्टेलची वॉर्डन तरुणच होती. फारशी बंधनं लादत नव्हती.
सुमा शनिवारची आतुरतेने वाट बघायची. खूप नटायची, छान दिसायचा प्रयत्न करायची. हातात हात घालून दोघं याच रस्त्यावरून लांबपर्यंत फिरायला जायची. ते गुलमोहर तिच्या प्रेमाचं साक्षीदार होतं. वसंतच्या बाहुपाशात ती सगळं जग विसरायची. त्याच्या आधारावर ती कुठल्याही संकटाशी भिडायला तयार होती.
शाळेचे दिवस आता संपत आले होते. पुन्हा अलवरला राजस्थानात परत जावं लागणार होतं. सुमाचे आईवडील बरेच आधी अपघातात दगावले होते. तिची सगळी जबाबदारी मोठी बहीण हेमाताई व मेहुणे रतन भावोजींवर होती.
‘‘वसंत काही तरी केलं पाहिजे. मला परत जायचं नाहीए. इथेच राहायचं आहे,’’ ती रडतच बोलली.
‘‘तू रडू नकोस. काही तरी मार्ग निघेल. अन् अजून बरेच दिवस आहेत. मी तरी बरा तुला जाऊ देईन?’’
बारावीचा निकाल येऊ लागला होता. तेवढ्यात बारावीच्या मुलांमुलींसाठी ज्यूनियर कॉलेजाने उन्हाळी सुट्टीत हॉबी क्लासेस सुरू केले होते. तीच संधी सुमाने साधली. हॉबी क्लासमुळे गावी जाणं टाळता आलं.
बारावीचा निकाल चांगला लागला. वसंतने झकास पार्टी दिली.
‘‘मला अजूनही काहीतरी हवंय.’’ त्याच्या डोळ्यांत बघत ती धिटाईने बोलली.
‘‘बोल ना?’’ कपाळावर आलेले तिचे केस बोटाने बाजूला करत वसंतने म्हटलं.
‘‘मला इथून जाऊ देऊ नकोस. मला तुझ्याजवळच राहायचं आहे.’’
‘‘प्रॉमिस! तुला कुठेही जाऊ देणार नाही.’’
स्कूल कॉलेजच्या हॉस्टेलमधून वसंतने तिला एका दुसऱ्या हॉस्टेलमध्ये शिफ्ट केलं. एक प्रौढ ख्रिश्चन महिला ते हॉस्टेल चालवायची. जवळच फॅशन इन्स्टिट्यूट होती. रमाची बहीण तिथे कोर्स करत होती. बी.ए.चा अभ्यास प्रायव्हेट करायचा अन् फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा असा कार्यक्रम ठरला. आता इथे राहाण्याचं भक्कम कारण हेमाताई आणि भावोजींना सांगता येणार होतं.
हॉस्टेलच्या रूमवर हेमाताई तिला राग भरत होती. ‘‘वेड लागलंय तुला? का राहायचं आहे इथे? आहे तरी काय एवढं? तुझ्या हट्टामुळे तुझं स्कूलिंग इथे केलं. यांना तर तू आमच्याकडे राहून शिकावं असं वाटत होतं. एवढे दिवस ऐकून घेतलं त्यांनी, पण आता नाही हं ते ऐकून घेणार. त्यांनी तर एक छानसा मुलगाही बघून ठेवलाय तुझ्यासाठी. कमावता, देखणा, चांगल्या घराण्यातला. तू बी.ए झाल्याझाल्या लग्न करणार आहोत तुझं आमची जबाबदारी आहे गं ती. आम्हालाही काळजीतून मोकळं कर गं बाई!’’
हेमाताई चिडलेली होती. सुमा मान खाली घालून मुकाट्याने ऐकून घेत होती. लहानपणापासून ती असंच करायची. कधी वाद घातला नाही, दुरुत्तरं केली नाहीत. बस्स, गप्प राहूनच आपल्याला काय हवं ते करून घ्यायची. आत्ताही तेच झालं, शेवटी हेमाताई मुकाट्याने परत गेली. पण रमा अन् तिच्या घरच्यांनी ‘‘आम्ही सुमाची काळजी घेऊ’’ म्हणून तिला आश्वस्त केलं होतं. हॉस्टेलची मालकीण विलियमनेही तिला ‘‘काळजी करू नका. मी लक्ष ठेवते तिच्यावर,’’ म्हणून सांगितलं होतं.
हेमाताईने जाताजाता शंभर सूचना केल्या होत्या. ती गेली अन् आठ दिवसांत भावोजी आले. ते नाराज होते. पण तिच्या राहाण्याजेवण्याची हॉस्टेलच्या फीची, कॉलेजच्या फीची सर्व व्यवस्था जातीने लावून गेले. सुमाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली होती.
काळ पुढे सरकत होता. सुमाला हा कोर्स खूप आवडला होता. तिचा जीव त्यात रमत होता. बी.ए.चा अभ्यासही सुरूच होता. दोन वर्षं बघता बघता संपली. बी.ए.चं शेवटचं वर्षं अन् फॅशन डिझायनिंगचंही शेवटचं वर्षं…त्यानंतर?
एका सायंकाळी बागेत फिरता फिरता तिने वसंतला विचारलं, ‘‘आपण लग्न कधी करायचं? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न करण्याचा विचारही मी करू शकत नाही.’’
वसंतने उत्तर दिलं नाही.
‘‘काही तरी बोल, मला भीती वाटायला लागली आहे.’’
‘‘हो गं बाई, होईल सगळं,’’ बेपर्वाईने वसंत उत्तरला.
‘‘आयुष्यभर काय मी शिकतंच राहीन का? हेमाताईला लक्षात आलंय. आपल्याला लग्न करावं लागेल. ताई आली की तू बोल तिच्याशी.’’
ती आशाळभूतपणे त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. तो गप्प होता. चेहराही मख्ख!
‘‘ताई पुढल्या महिन्यात येतेय. मी तिच्याबरोबर परत जावं असं तिला वाटतंय. तिचं म्हणणं पेपर देण्यापुरतंच इथे यावं… तू यावेळी तिच्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलशील का?’’ तिने गळ घातली.
‘‘बघूया…घाई काय आहे? तू आधी आपला अभ्यास पूर्ण कर.’’ वसंत टाळण्याच्या मूडमध्ये होता. ती चिडली. बराच वेळ दोघंही गप्प होती. मग वसंतने तिला आपल्याजवळ ओढून घेतली. त्याच्या उष्ण स्पर्शाने ती लोण्यासारखी विरघळली. तो विषय तिथेच संपला.
‘‘उद्याच येतेय हेमाताई अन् तुला नेमकं आत्ताच बाहेर जावं लागतंय? खरंच काम आहे की तू तिला भेटणं टाळतो आहेस?’’ ती जोरजोरात रडायला लागली.
वसंतने तिला जवळ घेऊन समजावलं. तिला गप्प केलं. ‘‘माझ्यावर विश्वास ठेव, मी पुढल्या वेळी नक्की तुझ्या ताईला भेटतो,’’ वगैरे गोड गोड बोलून शेवटी तिला स्वत:च्या मनाप्रमाणे राजी केलं. पुन्हा हेमाताईच्या सरबत्तीला उत्तरं द्यायला ती एकटीच उभी होती.
यावेळी तर ती हेमाताईशी खूप काही खोटं बोलली. आयुष्यात प्रथमच खोटं बोलणं, तेही आईसारख्या हेमाताईशी. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. हेमाताईही कधी नव्हे ती खूप चिडली. या पोरीचं कसं होणार या काळजीने काळवंडून हेमाताई निघून गेली आणि सुमा धाय मोकलून रडू लागली. काही तरी मनात सलत होतं. कुठे तरी काही तरी खटकत होतं.
विलियमने प्रेमाने तिच्या खांद्यावर, डोक्यावर थोपटलं, ‘‘तू तुझ्या ताईला वसंतबद्दल सांगत का नाहीस?’’ तिने म्हटलं. वसंत अन् सुमाचं प्रकरण विलियमला ठाऊक होतं. इतक्या दिवसात प्रथमच तिने त्याबद्दल बोलून दाखवलं होतं.
‘‘खरं म्हणजे वसंतने हे तिला सांगायला पाहिजे.’’ सुमाला पुन्हा रडू फुटलं.
‘‘तो तुझ्या बहिणीला भेटत का नाही? का टाळतोय? हे बघ, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू त्याला अगदी स्पष्ट विचार,’’ विलियम याहून अधिक काही बोलली नाही पण प्रश्नांच्या गुंत्यात सुमाला मात्र अडकवून गेली.
आठ दिवसांसाठी बाहेर जायचंय म्हणून सांगून गेलेला वसंत दुसऱ्याच दिवशी परत आला. वसंतला बघून ती आनंदली. पण प्रथमच तिला त्याचं वागणं खूप खटकलं. इतक्या लवकर परत आलाय तर एक दिवस नंतरही जाऊ शकला असता ना? निदान ताईला भेटला असता. पण वसंतने जणू तिच्यावर जादू केली होती. ती त्याला काहीही म्हणू शकली नाही.
फायनल परीक्षाही येऊन ठेपली. अभ्यासाचा ताण अन् काळजी होतीच पण त्यापेक्षाही अधिक काळजी होती ती वसंतच्या बेपर्वाईची. लग्नाच्या बाबतीत तो काहीच बोलायला तयार नव्हता. सुमाला खात्री होती, इथून ती घरी गेली की तिचं लग्न होईल हे नक्की. तिला वाटे, वसंतनेच होऊन लग्नाचा विषय काढावा अन् तिने जसं स्वत:विषयी सगळं सांगितलं आहे तसं त्यानेही मोकळेपणाने तिला सांगावं. पण तसं होत नव्हतं.
एकदा गुलमोहराच्या झाडाखाली तिने वसंतला म्हटलं होतं, ‘‘आता लवकरच मी इथून परत जाईन. तुला माझी आठवणही येणार नाही.’’
‘‘काय एकसारखं जाण्याचंच रडगाणं गात असतेस? म्हटलं ना, काही तरी करतो म्हणून?’’ वसंत तिरसटला.
‘‘तू काहीही करणार नाहीएस. अन् आता तर मीही काही करणार नाहीए.’’ ती हसली.
‘‘लग्न केलं नाही तर प्रेम खोटं ठरतं का? अगं, लग्न म्हणजे वैताग असतो. लग्न केल्यावर म्हणशील, ‘आधीच आपण बरे होतो,’ ’’ वसंत गळ्यात हात घालून म्हणाला.
‘‘तुला कसं माहीत लग्न म्हणजे वैताग असतो म्हणून? अशी किती लग्न केली आहेत तू?’’
वसंतने डोळा मारत म्हटलं, ‘‘फार नाही, चार-पाच लग्न केलीएत.’’
‘‘वसंत, प्लीज मला स्पष्ट काय ते सांग,’’ बोलता बोलता तिला रडू कोसळलं.
तिचे अश्रू पुसत वसंत निर्विकारपणे म्हणाला, ‘‘माझ्याजवळ काहीही नाहीए. घर नाही, पैसे नाहीत, कामधंदा नाही. लग्न केलं तरी तू माझ्याबरोबर राहाशील कशी?’’
‘‘राहीन मी, फक्त तू लग्नाला हो म्हण. माझ्या आईवडिलांची जी प्रॉपटी आहे ती आम्हा दोघी बहिणींची आहे. लग्नानंतर माझा वाटा मला मिळेल. आपण त्यातून घर घेऊ. तुझ्या धंद्यालाही भांडवल होईल.’’
वसंत मुकाटपणे सगळं ऐकत होता. शेवटी त्याने लग्नाला होकार दिला.
विचारांच्या नादात ती ऑफिसला कधी पोहोचली तेही तिला कळलं नाही.
नेहमीचंच आहे हे. मनात नसतानाही ती भूतकाळात भरकटत जाते. ऑफिसात पाय ठेवल्या ठेवल्या तिथला शिपाई धावतच तिच्याकडे आला, ‘‘मॅडम, आज सकाळपासूनच खूप लोकांची धुलाई केलीय सरांनी. तुमचीच वाट बघताऐत ते.’’
तिने पर्स आपल्या टेबलाच्या खणात टाकली अन् ती मेजर आनंदच्या केबिनकडे वळली.
‘‘मे आय कम इन, सर?’’
‘‘येस, प्लीज,’’
‘‘सर, तुम्ही बोलावलंत?’’
‘‘बसा…’’ मेजर आनंद म्हणाले, ‘‘दिवाण असोसिएशनच्या पेमेण्टचा चेक त्यांना मिळाला नाहीए, ही पहिली गोष्ट अन् दुसरं म्हणजे स्टोअरमघल्या डाळींचा स्टॉक जवळ जवळ संपला आहे.’’
‘‘सॉरी सर, असं व्हायला नको होतं. पण आज मी जातीने लक्ष देऊन सगळं व्यवस्थित करून घेते,’’ ती हळू आवाजात म्हणाली.
‘‘ठीक आहे, संस्थेचं काम व्यवस्थित व्हायलाच हवं, यासाठी सांगितलं. बरं मी बोललो होतो, त्यावर काही विचार केलात का?’’ मेजर तिच्याकडे बघत बोलले.
तिला उत्तर सुधरेना, ‘‘मी विचार करून सांगते, सर,’’ एवढं बोलून ती आपल्या टेबलाशी आली अन् कामाला लागली.
फायलीचं काम पूर्ण करून स्टोअरमध्ये गेल्यावर लक्षात आलं की डाळींखेरीज इतरही अनेक गोष्टी संपत आल्या आहेत. मन लावून ती कामं आटोपत होती. लंच टाइम झाला अन् आपण डबा आणलेला नाही हे तिला आठवलं. संस्थेच्या केबिनमध्ये चहा अन् ब्रेडरोल ऑर्डर करून ती टेबलाशी येऊन बसली. मेजर आनंदही बरेचदा कॅण्टीनमध्ये लंच घ्यायला यायचे. जवळच त्यांची इन्स्टिट्यूट होती. तिथे मुलामुलींना लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभं राहून आयुष्य जगता येईल असे कोर्सेस शिकवले जात होते. गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण दिलं जायचं. पैसे देऊन शिकणाऱ्यांना आपण दिलेल्या पैशाचं सार्थक झालंय असं वाटायचं. संस्थेचा पैसा सत्कार्यातच खर्च होईल याकडे मेजर जातीने लक्ष द्यायचे. संस्थेला सरकारी मान्यता होती. त्याखेरीज शेतकरी, कुटीर उद्योग करणारे कारागीर या लोकांचा माल वाजवी किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते जागोजागी ट्रेड फेअर भरवत असत. स्वच्छ चारित्र्य आणि त्यांचा पारदर्शक आर्थिक कारभार यामुळे समाजातही त्यांना मान होता. त्यांची बायको व दोन मुलं एका कार अपघातात दगावली. त्यानंतर त्यांनी लष्कराची नोकरी सोडली व आपली कोट्यवधी रुपयांची पिढीजात प्रॉपटी विकून ही संस्था व इतर सामाजिक उपक्रम सुरू केले असं सुमा ऐकून होती.
इथली नोकरी सुरू केली तेव्हा आपण इथे किती काळ टिकून राहू याबद्दल सुमा साशंक होती. कारण लष्करातली माणसं फार कडक शिस्तीची असतात हे ती ऐकून होती. मेजर आनंद होतेही तसेच. पण हळूहळू तिला इथलं काम, इथली शिस्त सगळं आवडायला लागलं, अंगवळणीही पडलं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण इथे जे काम करतो त्यातून अनेक गरजू लोकांना मदत होते. अनेक होतकरू मुलांचा भविष्यकाळ घडतो अन् किती तरी स्त्रिया स्वावलंबी होतात ही गोष्ट फारच समाधान देणारी होती. तिला आठवलं, सकाळी तिला मेजर आनंदने जवळच भरणाऱ्या ट्रेफेअरमध्ये चलण्याबद्दल विचारलं होतं अन् तिने विचार करून सांगते म्हणून त्यांना म्हटलं होतं. यापूर्वीही ती जवळपासच्या टे्रड फेअरमध्ये टीमसोबत गेली होती. पण सकाळी जाऊन सायंकाळी परत आली होती. पण यावेळी दोनतीन दिवस तिथेच थांबावं लागणार होतं.
अशावेळी नेहमीच तिचं उत्तर नकारार्थी असायचं पण यावेळी मात्र तिलाच थोडा बदल हवा असेल किंवा रूटीनमधून ब्रेक हवासा वाटला म्हणून तिने जाण्याचा निर्णय घेतला. दुपारची कॉफी घेतली अन् ती सरळ मेजर आनंदच्या केबिनमध्ये गेली.
‘‘सर, कधी निघावं लागेल?’’
मेजरने हसून तिच्याकडे बघितलं अन् म्हटलं, ‘‘या संपूर्ण महिन्यात जेव्हा तुम्हाला सोयीचं असेल त्याप्रमाणे जाता येईल.’’
ती परत आपल्या टेबलाशी येऊन कामाला लागली. कामं संपवून घरी जाताना ट्रेड फेअरचाच विचार मनात होता. चहा वगैरे घेतल्यावर तिने कपाट उघडलं. इतक्या वर्षांत हौशीने, आवडीने काही घालणं तिने बंदच केलं होतं. फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय हेही ती विसरली होती. तिला हसायला आलं. मन शांत, आनंदी अन् थाऱ्यावर असायला हवं ना? मनच शांत नाही तर देहाची शुद्ध तरी कशी राहाणार? ती अंथरुणावर पडली अन् तिच्याही नकळत पुन्हा भूतकाळात शिरली. (क्रमश 🙂