धोकादायक ठरू शकते, दिशाभूल करणारे मेसेज पाठवणे

– नसीम अंसारी कोचर

आजकाल सोशल मिडिया सर्वात वेगाने धावणारे प्रसारणाचे माध्यम बनले आहे. ज्या वेगाने फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, लिंकडिनसारख्या सोशल साइट्सवर मेसेज व्हायरल होतात, तेवढा वेग तर इलेक्ट्रॉनिक मिडियाही दाखवू शकत नाही. सध्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहेत. महिला तर सर्व कामधंदा सोडून संपूर्ण दिवस मोबाइलवरच चॅटिंग करण्यात बिझी असतात. एक मेसेज पट्कन त्यांच्या फोनवर येत नाही तोच काही मिनिटांत पूर्ण ग्रुपवर फॉरवर्ड होतो.

जोक्स, विचार, फोटो, धार्मिक संदेश, आरोग्य सल्ले, रेसिपीज आणि न जाणो काय काय सोशल साइट्सवर शेअर होत आहे. रिकामा वेळ तर आता कोणाकडेच नाही. सद्यस्थितीत २०० मिलियन यूजर्स व्हॉट्सअॅपवर सक्रिय आहेत.

व्हॉट्सअॅप सर्वांच्याच आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनले आहे. सर्वच आपले मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात राहण्यासाठी याचा वापर करतात. पण हेच व्हॉट्सअॅप सध्या फसव्या बातम्या, व्हिडिओ पसरवण्याचे माध्यम बनले आहे. सोबतच यूजर व्हॉट्सअॅपच्या अनामिक जगात अफवांचे शिकार होत आहेत. अफवा कुठून आली, कोणी पाठवली, हे कोणालाच माहीत नाही, पण अनाहूतपणे तिला फॉरवर्ड केले जाते.

खरंतर आपला हेतू आपल्या ओळखीच्यांना अमुक एका घटनेबाबत सावध करण्याचा असतो, पण नकळतपणे आपण एका निर्दोष व्यक्ती विरुद्धच्या गुन्ह्यात सहभागी होतो, जेव्हा की या अफवा पसरवणारे वाचतात. त्यांचे बिंग फोडणे कठीण होऊन जाते.

आता खैर नाही

म्हणूनच सावधान. सर्वोच्च न्यायालय विचार न करताच मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांविरोधात आता खूपच कठोर झाले आहे. नुकतेच दक्षिण भारतातील भाजप नेते एस. वी. शेखर, जे यापूर्वी एक कलाकार आणि खूप चांगले पत्रकार म्हणूनही ओळखले जायचे, त्यांना देशातील सर्वात मोठया न्यायालयाने फैलावर घेतले आणि त्यांची अग्रिम जामीन याचिकाही फेटाळली, कारण त्यांनी विचार न करताच महिलांना अपमानित करणारा एक मेसेज आपल्या फेसबूक अकाउंटवर शेअर आणि फॉरवर्ड केला.

एस. व्ही. शेखर दक्षिण भारतात भाजपचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. एप्रिल महिन्यात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसंबंधी एक अपमानजनक गोष्ट आपल्या फेसबूक अकाउंटवर शेअर केली होती, जी दुसऱ्या कुणीतरी त्यांना पाठविली होती. शेखर यांनी ती लिहिली नव्हती, तरीही त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याचा खटला दाखल झाला आणि अटकेपर्यंतची वेळ आली.

अटकेपासून वाचण्यासाठी एस. व्ही. शेखर मद्रास हायकोर्टात गेले. जिथे त्यांना चांगलेच फटकारले गेले आणि त्यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. येथेही न्यायालयाने त्यांना फैलावर घेत त्यांची याचिका रद्द केली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एल. नागेश्वर राव आणि एम. एम. शांतनागौडार यांच्या खंडपीठाने एस. व्ही शेखरच्या वकील बालाजी श्रीनिवासन यांना सांगितले, ‘‘ते खूप मोठे अभिनेते आहेत. तुम्हाला माहीत नसेल पण आम्हाला माहिती आहे. पण कायद्यांतर्गत कोणालाही विशेष वागणूक देता येत नाही. तुम्ही खालच्या न्यायालयात जा आणि नियमित जामीनाची मागणी करा.’’

खंडपीठाने त्यांचा अग्रिम जामीनाचा अर्ज नाकारत सांगितले की कायद्यात असे स्पष्ट आहे की चौकशी पूर्ण झाल्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच आरोपीला नियमित जामीन मिळवता येतो.

यापूर्वी मद्रास हायकोर्टाने एस. व्ही. शेखर यांनी अशोभनीय मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी सांगितले की आलेला मेसेज दुसऱ्याला फॉरवर्ड करणे याचा अर्थ तुम्ही त्याचा स्वीकार करता आणि त्याचे समर्थन करता. सांगण्यात काय येते ते महत्वपूर्ण आहे, पण हे कोण सांगतेय तेदेखील खूपच महत्त्वाचे असते, कारण लोक सामाजिक स्टेटस असलेल्या व्यक्तींचा सन्मान करतात.

जेव्हा एखाद्या व्यक्तीप्रमाणे एक सेलिब्रिटी अशा प्रकारचा मेसेज फॉरवर्ड करतो, तेव्हा सामान्य जनतेचा त्यावर विश्वास बसतो. हे समाजाला चुकीचा संदेश देते. शेखर यांच्या मेसेजमधील भाषा आणि वापरलेले शब्द अप्रत्यक्ष नाहीत, तर प्रत्यक्ष क्षमता असलेली अश्लील भाषा आहे, जी अशी क्षमता आणि वयाच्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही.

न्यायालयाने स्पष्ट केले की आपल्या अनुयायांसाठी एक आदर्श मॉडेल व्हायचे सोडून त्यांनी एक चुकीचा आदर्श ठेवला आहे. सामाजिक भावनांसंदर्भात असे प्रकार सोशल मिडियावर केल्याप्रकरणी रोज तरुणांना अटक होत असल्याचे पाहायला मिळते. कायदा सर्वांसाठी सारखा आहे आणि लोकांचा आपल्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडता कामा नये. चूक आणि गुन्हा हे समान नाही. चुका फक्त मुलंच करू शकतात, ज्यांना माफ करता येते. पण हेच वयस्कर व्यक्तीने केले तर तो गुन्हा ठरतो.

फेक मेसेजचे गंभीर आव्हान

सोशल मिडियाद्वारे व्हायरल होणारे फेक न्यूज/मेसेज सरकारसाठी आता गंभीर आव्हान ठरत आहे, दुसरीकडे सामान्य जनता याचे दुष्परिणाम भोगत आहे. मागे व्हॉट्सअॅपद्वारे पसरलेल्या अफवेमुळे अनेकांचे जीव गेले होते.

महाराष्ट्रात एका जमावाने मुले पळवणारे असल्याच्या संशयावरून ५ जणांना मारहाण करून त्यांचा जीव घेतला. खरंतर ही पहिली घटना नाही. याआधीही सोशल साइट्सवर पसरलेल्या अफवांमुळे अनेकांचे जीव गेले. अशावेळी हे गरजेचे आहे की योग्य आणि चुकीच्या बातमीतील फरक ओळखा आणि भूलथापांना फसू नका.

देशात व्हॉट्सअॅपचे २० कोटी अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. याद्वारे एकमेकांना पाठवण्यात येणारे कितीतरी मेसेज, फोटो आणि व्हिडिओ फेक असतात, पण विचार न करता ते शेअर केल्यामुळे व्हायरल होतात. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात की त्याचा समाजावर काय परिणाम होईल.

धोकादायक परिणाम

विचार न करताच व्हॉट्सअॅपवर मेसेज फॉरवर्ड केल्याचा किती धोकादायक परिणाम होऊ शकतो, याचे आणखी एक उदाहरण पाहा. ४ वर्षे जुना एक मेसेज अनेकांनी फॉरवर्ड केला आणि सत्य समोर आले, तेव्हा सर्वच स्तब्ध झाले.

बंगळुरूतील बाणशंकरीत विभागात राहणारे व्यावसायिक प्रशांत यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला, ज्यात म्हटले होते की केपगौडा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलमध्ये एक मुलगा डोक्याला दुखापत झाल्याने दाखल आहे. त्याची ओळख पटलेली नाही. त्याच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी हा मेसेज आणि फोटो फॉरवर्ड करायला सांगितले होते.

हा मेसेज कुणीतरी प्रशांत यांनाही फॉरवर्ड केला. यात ज्या मुलाचा फोटो होता, त्याचा चेहरा त्यांच्या भाच्याशी मिळताजुळता होता. त्यांनी लगेच बहिणीला फोन केला. मुलगा हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचे ऐकून ती खूपच अस्वस्थ झाली. तिच्या कुटुंबात खळबळ उडाली. ती पतिसह मुलाच्या शाळेत गेली. जिथे त्यांनी पाहिले की मुलगा अगदी व्यवस्थित आहे. शाळेचे प्राचार्य मात्र यामुळे नाराज झाले की सुशिक्षित असूनही ते व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर विश्वास कसे काय ठेवतात?

दुसरीकडे प्रशांत त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले, ज्याने सर्वात आधी हा मेसेज पाठवला होता. त्यांना त्या व्यक्तीचा शोध लागला, तेव्हा सत्य ऐकून ते थक्क झाले. त्या व्यक्तीने सांगितले की त्याने नवा फोन घेतला होता आणि बॅकअप रिस्टोर करत होता. व्हॉट्सअॅप सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने ४ वर्षे जुना मेसेज फॉरवर्ड केला. त्या मेसेजसोबत पाठवलेला फोटो प्रशांत यांच्या भाच्याशी मिळताजुळता होता.

सावध व्हा

तुम्हीही व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज विचार न करताच फॉरवर्ड करत असाल तर सावध व्हा, कारण याबाबत आता देशातील न्यायालये कठोर झाली आहेत.

पोलीसही आता कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यावर ती तात्काळ दाखल करुन आरोपीविरुद्ध त्वरित कारवाई करू लागले आहेत.

नुकतेच बहराइचमधील बडीहाटचे रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह कार्टून पाठवल्याप्रकरणी लखनौचा रहिवासी चंद्रशेखरवर केस दाखल झाली. बडीहाट येथे राहणारे शफीक अली यांनी जबानीत सांगितले की त्यांच्या मोबाइलवर एका व्यक्तीने एक आक्षेपार्ह कार्टून पाठवले. चौकशीत समजले की तो नंबर लखनौमधील अलीगंजचे रहिवासी चंद्रशेखर त्रिपाठी वापरतात. शफीक अली यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रशेखर त्रिपाठीवर धार्मिक भावना भडकवल्याचा आणि आक्षेपार्ह व्यंगचित्र पाठवल्याचा खटला दाखल करत तुरुंगात पाठवले.

नेटवरील टीप्स टाळा

सोशल मिडियावर पसरवल्या जाणाऱ्या माहितीला फसून लोक आपल्या आरोग्याशीही खेळ खेळत असल्याचे पाहायला मिळते. खासकरून सध्या विविध आजारांपासून वाचण्याचे उपाय वेगाने फॉरवर्ड होत आहेत. अनेकदा तर कॅन्सर, टीवीसारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक किंवा यूनानी उपचार व्हॉट्सअॅप ग्रुपवर सर्क्युलेत होत आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिलांचा सहभाग सर्वात जास्त असतो.

अशाच प्रकारे काही धार्मिक मेसेजही येतात. ज्यावर लिहिलेले असते की हे कमीत कमी १०० लोकांपर्यंत पोहोचवा. यामुळे तुमचे दु:ख दूर होईल. सहृदय महिलांना यामागचे कपट समजत नाही आणि त्या ग्रुप्समध्ये हा मेसेज फॉरवर्ड करतात. आतातर व्हॉट्सअॅपने ५ पेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी मेसेज फॉरवर्ड करायला बंदी घातली आहे. पण जेव्हा असे मेसेज ग्रुपवर फॉरवर्ड होतात तेव्हा शेकडो लोकांपर्यंत पोहोचतात.

अफवाच अफवा

नोटबंदीवेळी तर अफवांचा पूर आला होता. कुठे नोटांमध्ये चिप असल्याची अफवा तर कुठे गोणीत नोटा मिळाल्याची अफवा. त्याच दिवसांत एक मेसेज खूपच सर्कुलेट झाला होता की मीठ महाग होणार आहे. खऱ्याखोटयाची शहानिशा न करताच लोकांनी फोनद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पाठवणे सुरू केले. पाहता पाहता ही बातमी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि लोकांनी मिठाच्या खरेदीसाठी बाजारात धाव घेतली. दुकानदार, व्यापाऱ्यांनी याचा चांगला फायदा घेतला आणि जे मीठ २० रुपये प्रति किलोग्रॅमने विकले जात होते ते ६०० आणि ७०० रुपये किलोग्रॅमपर्यंत विकले गेले. यामागे काळाबाजार करणाऱ्यांचा हात होता. काही वर्षांपूर्वी जग नष्ट होण्याची मोठी अफवा पसरली होती. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात याची दहशत होती. अनेकदा अफवांमुळे जातीय तणाव पसरतो आणि दंगलीची परिस्थिती निर्माण होते.

असामाजिक तत्त्व अफवांद्वारे देशाचे वातावरण खराब करू इच्छितात आणि त्यांच्या या षडयंत्राचा आपण सर्वच एक भाग बनतो, त्यांनी पाठवलेला बनावट मेसेज आपल्या ओळखीतल्यांना पाठवून फेसबूकवर तर अश्लील मेसेजेसचा भडिमार होतो. सरदार, मौलवी, महिलांवरील जोक्स, अश्लील कमेंट, अश्लील फोटोग्राफ्समुळे लोकांचे फेसबूक अकाउंट भरले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या संबंधात जी कठोर पावले उचलली आहेत ती पाहाता आता एखाद्या व्यक्तीला फेसबूक अकाउंट किंवा व्हॉट्सअॅपवर अशाप्रकारचा मेसेज आला, ज्यामुळे त्याची धार्मिक भावना किंवा श्रद्धेला तडा गेला असेल तर तो हा मेसेज पाठवणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करू शकतो. म्हणूनच विचार न करताच कुठलाही मेसेज कुणाला फॉरवर्ड करू नका, भलेही मग तो जोक असेल. शिवाय व्हॉट्सअॅपची मजा किरकिरी होऊ नये आणि पोलिसांनी तुमचा दरवाजा ठोठावू नये. लक्षात ठेवा,  एकदा पोलीस केस तयार झाली की मग त्यातून मुश्किलीनेच सहिसलामत सुटता येते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें