पावसाळ्यात त्वचेची अॅलर्जी

* गरिमा पंकज

२४ वर्षांची अंजली वर्मा खूपच बिनधास्त स्वभावाची मुलगी आहे. तिला प्रवास, खरेदी आणि सुंदर दिसायला खूपच आवडते. उन्हाळयातही ती एकापेक्षा एक सुंदर कपडे खरेदी करते आणि पूर्ण मेकअप करूनच बाहेर पडते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिला काटेरी उन्हाचा त्रास होऊ लागला आहे.

गेल्या रविवारी जेव्हा ती मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पोहोचली तेव्हा तिला पाहून सगळेच थक्क झाले. स्टायलिश वन पीस ड्रेस आणि मोकळया केसांमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती, पण संध्याकाळी तिच्या पाठीच्या खालच्या भागात आणि घशाला खाज येऊ लागली. ही खाज वाढतच गेली आणि लहान लाल ठिपके आले. तिच्या मैत्रिणीने अॅलर्जीचे औषध दिले आणि तिला अंघोळीला पाठवले. अंघोळीनंतर तिला सुती कपडे घालायला दिले आणि  लालसर पुरळ आलेल्या जागेवर कोरफडीचे जेल लावले. हळूहळू तिचा त्रास कमी झाला.

वास्तविक, उन्हाळयात त्वचेसंबंधी रोग जसे की, घामोळे येण्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते. हा आजार निष्काळजीपणामुळे गंभीर बनू शकतो. त्वचेवर लाल रंगाचे पुरळ येणे आणि त्यात खाज येणे हे सामान्यत: घामोळयांचे लक्षण असते. या स्थितीत शरीरावर घामाच्या ठिकाणी किंवा नायलॉनच्या कापडाने झाकलेल्या ठिकाणी लहान लाल पुरळ उठते, ज्यामध्ये खाज सुटू लागते.

अति उष्णतेमुळे किंवा घट्ट कपडे घातल्यामुळेही असे होते. हे टाळण्यासाठी शक्यतो सूर्यप्रकाशात येणे टाळा. जर तुम्हाला उन्हात जायचेच असेल तर टोपी आणि छत्री वापरा. शरीराच्या उघडया भागावर सनस्क्रीन लावा. पॉलिस्टर किंवा नायलॉन कपडयांऐवजी सुती, सैल आणि आरामदायक कपडे घाला.

जर त्वचा संवेदनशील असेल तर एखाद्या विशिष्ट गोष्टीचा त्वचेवर परिणाम झाल्यामुळे त्वचेवर मुरुमं किंवा लाल पुरळ येऊ शकते. त्वचेच्या अॅलर्जीची अनेक कारणे असू शकतात :

* काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांची अॅलर्जी असते. तो विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांच्या अंगाला खाज येऊ लागते.

* काही लोकांना एखाद्या औषधाच्या दुष्परिणामामुळेही खाज सुटणे किंवा अॅलर्जी होऊ शकते.

* रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधने वापरल्यानेही खाज येऊ शकते. रसायनयुक्त हेअर डाय किंवा केसांचा रंग वापरल्याने अनेकदा खाज येण्याची समस्या उद्भवते. त्याचप्रमाणे काहींना फाउंडेशनने तर काहींना चेहऱ्यावर लावायच्या क्रीममुळे या समस्येचा सामना करावा लागतो.

* काही महिलांची त्वचा दागिन्यांबाबत संवेदनशील असते. अशा महिलांनी धातूपासून बनवलेले कोणतेही दागिने घातल्यास त्यांच्या त्वचेवर खाज येऊ शकते. उन्हाळयात जेव्हा दागिने घामाच्या संपर्कात येतात तेव्हा त्वचेवर अॅलर्जी होते.

* काही लोकांना सिंथेटिक कपडयांमुळेही अॅलर्जी होते.

* पाळीव प्राण्याला स्पर्श केल्याने किंवा खूप कडक साबण वापरल्यानेही खाज सुटू शकते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा किंवा पुरळ येतो. फोडही येऊ शकतात.

* मूत्रपिंड किंवा थायरॉईडच्या समस्येमुळेही खाज येऊ शकते.

* कोरडया त्वचेची समस्या हेही याचे एक कारण आहे. खूप गरम किंवा थंड हवामानात त्वचा कोरडी पडू शकते. अशावेळी नियमितपणे चांगले मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.

* एखाद्या प्रकारचा कीटक चावल्यावरही त्वचेवर खाज सुटणे किंवा अन्य समस्या उद्भवू शकते.

* बुरशीजन्य संसर्गही खाज येण्याचे कारण असू शकते.

* मधुमेहामुळेही अशी समस्या उद्भवू शकते.

* हिवाळयात लोक अनेकदा लोकरीचे कपडे घालतात, ज्यामुळे त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

* मूत्रपिंड खराब झाल्यावरही खाज येण्याची समस्या निर्माण होते.

* अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी किंवा कांजण्या आल्यामुळेही त्वचेवर खाज सुटते किंवा ती लालसर होते.

* काही लोकांना अत्तराची अॅलर्जी असते. जेव्हा असे लोक अत्तर लावतात तेव्हा त्यांच्या त्वचेवर लाल पुरळ उठते.

त्वचेच्या अॅलर्जीचे प्रकार

बुरशीजन्य संसर्ग : बुरशीजन्य संसर्ग हा बुरशीमुळे होणारी त्वचेची अॅलर्जी आहे. त्याला मायकोसिसही म्हणतात. चेहरा, हात किंवा शरीराच्या कोणत्याही भागाच्या त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. या अॅलर्जीमध्ये त्वचेवर एक प्रकारचा खडबडीतपणा येतो आणि खाजही सुटते. हा संसर्ग शरीराच्या अशा ठिकाणच्या त्वचेवर जास्त होतो जिथे बोटं, हातापायांचे कोपरे, नखे, गुप्तांग, स्तन इत्यादींमध्ये थोडासा ओलावा असतो.

लाइकेन प्लेनस : हा देखील एक प्रकारचा त्वचेचा संसर्ग किंवा त्वचेची अॅलर्जी आहे, जी ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. हा एक प्रकारचा खाज सुटणारा लाल पुरळ असतो जो शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकतो, पण मनगट, खालचा पाय, पाठ, मान इत्यादींना या अॅलर्जीचा धोका असतो. ही अॅलर्जी अनुवांशिक असते.

एक्जिमा : एक्जिमा किंवा इसब हा एक असा आजार आहे ज्यामध्ये त्वचेला तीव्र खाज सुटते आणि त्वचा कोरडी पडते. काही लोकांमध्ये ही समस्या इतकी त्रासदायक बनते की त्यांना त्यावर दीर्घ उपचार घ्यावे लागतात. ऋतू बदलल्याने हा त्रास आणखी वाढतो. काहींना इतकी तीव्र खाज सुटते की, त्वचेतून रक्तही येऊ लागते. हे प्रौढ आणि मुले दोघांनाही होऊ शकते.

अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी : ही एक प्रकारची त्वचेची अॅलर्जी आहे, ज्यामध्ये त्वचेवर मोठया प्रमाणावर लाल पुरळ उठतो, चट्टे येतात. त्याला खूप खाज येते. तुम्ही त्या जागेवर जितके जास्त खाजवाल तितकी ही अॅलर्जी अधिक वेगाने वाढू लागते. काही दिवसांनंतर ती स्वत:च बरी होते.

त्वचेच्या अॅलर्जीसाठी घरगुती उपचार

चहाच्या झाडाचे तेल : चहाच्या झाडाचे तेल त्वचेच्या अॅलर्जीमध्ये खूप उपयुक्त आहे. यात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या अॅलर्जीपासून आराम मिळतो. त्वचेवर लालसरपणा आणि खाज सुटत असल्यास चहाच्या झाडाचे तेल हा एक चांगला पर्याय आहे.

तुळस : तुळशीत विषाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म मोठया प्रमाणावर असतात, जे तुमच्या त्वचेचे संसर्गापासून रक्षण करण्याचे काम करतात. याशिवाय, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या अॅलर्जीशी संबंधित लालसरपणा, सूज आणि खाज सुटण्यापासून आराम देतात. यासोबतच तुळस ही अॅलर्जीरोधक आहे. तुळशीची पाने धुवून त्याची पेस्ट बनवा. ती प्रभावित भागावर लावा आणि २० ते ३० मिनिटांनी धुवून टाका.

अॅपल सायडर व्हिनेगर : अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि विषाणूंविरोधी गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे ते त्वचेवर लावल्याने अॅलर्जीपासून आराम मिळतो आणि त्वचेवर संसर्ग वाढत नाही. तुम्ही पाणी गरम करा आणि त्यात अॅपल म्हणजेच सफरचंदचे व्हिनेगर मिसळा. आता हे मिश्रण कापसाच्या मदतीने प्रभावित भागावर लावा. १५ ते २० मिनिटांनी त्वचा स्वच्छ   धुवा.

कोरफड : कोरफडीच्या जेलमध्ये बरे करण्याचे गुणधर्म असतात. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म खाज सुटणे आणि लाल पुरळ उठण्यापासून रोखण्यास मदत करतात.

प्रभावित भागावर ताजे कोरफड जेल लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा. कोरडे झाल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.

नारळाचे तेल : नारळाच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुणधर्म भरपूर असतात. यात वेदनाशामक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेच्या अॅलर्जीमुळे येणारा लालसरपणा आणि खाज सुटण्यापासून रोखण्यात मदत होते. ते वापरण्यासाठी तळहातावर खोबरेल तेलाचे काही थेंब घ्या आणि प्रभावित त्वचेवर लावा. २० ते ३० मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा आणि नंतर टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या.

कडुलिंब : कडुलिंबात दाहकविरोधी आणि जिवाणूंविरोधी गुणधर्म असतात. त्वचेच्या अॅलर्जीच्या उपचारांमध्ये हे प्रभावी मानले जाते. कडुलिंबाची पाने बारीक वाटून पेस्ट बनवा आणि त्वचेवर २० ते ३० मिनिटे राहू द्या. ती कोरडी झाल्यावर पाण्याने धुवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें