तर मेकअपने होणार नाही अॅलर्जी

* पारूल भटनागर

आजकाल क्वचितच असा एखादा कार्यक्रम होत असेल जिथे महिला मेकअप करून जात नसतील. मेकअप भलेही काही वेळेपुरता केलेला असला तरी तो महिलांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील उणिवा झाकतो.

अनेकदा ज्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर आपण रूप उजळण्यासाठी करतो तीच प्रसाधने आपले रूप बिघडवण्याचे काम करतात. मात्र जेव्हा हे लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

अशा स्थितीत सौंदर्य प्रसाधनांमध्ये असलेली कुठले सामग्री तुमच्या त्वचेसाठी नुकसानकारक आहे, याबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते, जेणेकरून मेकअपमुळे झालेल्या अॅलर्जीपासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकाल.

याबाबत फरिदाबादच्या ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चे त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर अमित बांगा यांच्याकडून जाणून घेऊया :

कशामुळे होते मेकअपची अॅलर्जी?

मेकअप केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर लाल चट्टे उमटतात. जळजळ, खाज सूज, वेदना असह्य होतात, त्यावेळी तुम्ही विचार करता की, मेकअप केला नसता तर बरे झाले असते. कोणत्या सौंदर्य प्रसाधनांमुळे चेहऱ्यावर अॅलर्जी होते, हे जाणून घेऊया.

फाऊंडेशन आणि कन्सिलर : फाऊंडेशनचा वापर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी केला जातो, पण यात अशा रसायनांचा वापर केला जातो की त्यामुळेच ते न वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जेव्हा तुम्ही याचा दररोज वापर करू लागता तेव्हा त्वचेवर अॅलर्जी होते.

यात पेराबेर्स, सुगंधी द्रव्ये, प्रिझर्व्हेटिव्ह, ट्रिक्लोसन, सोडियम लॉरेथ सल्फेट, शिसे, फतहलातेसचा वापर केला जातो. या सर्व गोष्टी फाऊंडेशन आणि कन्सिलरचा रंग, त्याचा टिकाऊपणा, त्यातील सुगंध टिकवून ठेवण्यासाठी वापरल्या जातात. यामुळे त्वचेवर अॅलर्जी, त्वचेवरील छिद्र्रे बंद होणे, अॅक्ने तसेच कर्करोगही होऊ शकतो.

म्हणूनच फाऊंडेशनची निवड करताना त्यात त्वचेच्या आरोग्याचे रक्षण करणारे घटक असायला हवेत, जसे की, झिंक, ऑक्साइड इत्यादी. असे फाऊंडेशन संवेदनशील त्वचेसाठी सर्वोत्तम मानले जाते. सोबतच ते सूर्यकिरणांपासूनही रक्षण करते. वृद्धत्वाच्या खुणा दूर ठेवण्यास मदत करते.

ब्लश आणि हायलायटर : मेकअप केला आणि ब्लश तसेच हायलायटर वापरले नाही, असे होऊच शकत नाही, कारण ब्लशमुळे गालांचे उंचवटे आणि हनुवटीवर उभारी येते, शिवाय चेहऱ्यावर वेगळेच तेज येते. हायलायटर कंटूरिंग आणि चेहऱ्यावर चकाकी आणण्याचे काम करते. अनेकदा ब्लश आणि हायलायटरच्या वापरामुळे चेहरा खराब होतो. तो इतका जास्त कोरडा होतो की, कुठलेच क्रीम, मॉइश्चरायझर परिणामकारक ठरत नाही, कारण याच्या एका शेडला बनवण्यासाठी ३-४ पिगमेंट्स आणि रसायनांचा वापर केला जातो. ज्या महिलांना त्वचेची अॅलर्जी आहे त्यांच्यासाठी हे नुकसानकारक ठरू शकते. म्हणूनच जेव्हा ब्लशचा वापर कराल तेव्हा ते नैसर्गिक असेल याकडे लक्ष द्यायला हवे. ब्लश आणि हायलायटरसाठी ज्या ब्रशचा वापर कराल ते स्वच्छ हवे, कारण त्यामुळेही अॅलर्जी होऊ शकते.

डोळयांचा मेकअप : डोळयांना चमक यावी, ते थोडे मोठे दिसावेत यासाठी डोळयांचा मेकअप केला जातो. त्यासाठी काजळ, लायनर, मसकारा, आयशॅडो, आयलॅशचा वापर केला जातो.

अनेकदा असा वापर डोळयांच्या अॅलर्जीस कारणीभूत ठरतो, कारण यात लेड सल्फाईड, कार्बन ब्लॅक, इथेनॉल माईन, बेंजल्कोनियम क्लोराईड (प्रिझर्व्हेटिव्ह), प्राईम यलो कारनोवा वॅक्स (वॉटरप्रूफ बनवण्यासाठी वापरले जाणारे), फॉर्मेल्डह्यदे रिलिजिंग प्रिझर्व्हेटिव्हचा वापर केलेला असतो.

सोबतच यातील जड धातू, अल्युमिनियम पावडरमुळे सर्व प्रकारचे कर्करोग, डोळे कोरडे होणे, अॅलर्जी, डोळे लाल होणे, असे त्रास होतात. म्हणूनच डोळयांच्या मेकअपचे सामान खरेदी करताना त्यात कोणते घटक वापरले आहेत, हे तपासून पाहा. ज्यात कमीत कमी रसायनांचा वापर केलेला असतो तेच सर्वोत्तम असते.

लिपस्टिक : लिपस्टिकशिवाय मेकअप अपूर्ण असतो. म्हणूनच तर घराबाहेर जवळच कुठेतरी जायचे असो किंवा पार्टीला जायचे असो, त्या सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळया रंगाच्या लिपस्टिक लावतात. प्रत्यक्षात लिपस्टिकमध्ये वापरली जाणारी रसायने तुमच्या ओठांचे नुकसान करण्यासोबतच ओठांद्वारे सहज तुमच्या शरीरात जाऊन तुम्हाला आजारी पाडतात.

यात प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून मिथाईलोपॅराबिनचा वापर केला जातो, ज्यामुळे अॅलर्जीसोबतच कॅन्सरही होऊ शकतो. यात पेट्रोलियम द्र्रव्यांपासून बनवलेल्या सिंथेटिक ड्रायचाही वापर केला जातो. यामुळे त्वचेची जळजळ, खाज येणे अशा समस्या निर्माण होतात.

म्हणूनच लिपस्टिक, लिपग्लोस, लिप बामची निवड करताना त्यात नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हसह इसेन्शिअल ऑइल जास्तीत जास्त असायला हवेत.

टिकली आणि कुंकू : पारंपरिक लुकबद्दल बोलले जाते तेव्हा टिकली लावली जातेच. जर तुम्ही प्रदीर्घ काळ टिकली किंवा कुंकू लावत असाल तर त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते, कारण काही टिकल्यांचा गोंद चांगला नसतो तर अनेकदा आपण एकच टिकली आरशाला चिकटवून सतत तीच वापरतो, जी त्वचेच्या अॅलर्जीस कारणीभूत ठरते.

अशाच प्रकारे सतत लिपस्टिक कुंकू म्हणून लावणे किंवा कुंकवाने भांग भरण्याच्या सवयीमुळे पुढचे केस निघून जाणे किंवा तिथली त्वचा कोरडी पडणे असे परिणाम होतात. शरीरासाठीही ते घातक असतात.

म्हणूनच कुठल्याही गोष्टींची सवय लावून घेऊ नका. टिकली आणि कुंकू नेहमीच चांगल्या दर्जाचे वापरा, जेणेकरून तुमचा शृंगार तुमच्या सौंदर्यात अडसर ठरणार नाहीत.

नेलपेंट : प्रत्येक मुलगी आणि महिलेला नेलपेंट लावायला आवडते, कारण त्यामुळे नखे आणि बोटांचे सौंदर्य वाढते. आज फक्त एकाच नेलपेंटने नखे रंगवली जात नाहीत तर सध्या नेल आर्टचाही ट्रेंड आहे.

अनेकदा नेलपेंट, नेल रिमूव्हरच्या वापरामुळे नखे पिवळी आणि कमकुवत होतात. त्यामुळे नाईलाजाने ती रंगवावीच लागतात, कारण नेलपेंटमध्ये फॉर्मेल्डह्यदे, टोल्यूनेसारख्या रसायनांचा वापर केला जातो जो नखांना कमकुवत आणि पिवळे बनवतो. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवरही होतो. नेल रिमूव्हरमध्ये एसीटोन, टोल्यूने, मिथिनॉलसारख्या रसायनांचा वापर करण्यात आल्यामुळे तो कॅन्सर, त्वचेची अॅलर्जी, डोकेदुखीचे कारण ठरते.

म्हणूनच नेहमी रसायनमक्त नेलपेंट आणि नेल रिमूव्हरचा वापर करा. नेलपेंट लावण्यापूर्वी बेस कोट नक्की लावा, जेणेकरून ते तुमच्या नखांसाठी संरक्षणात्मक आच्छादन ठरेल.

क्रीम आणि लोशन : बऱ्याच फेस क्रीम अॅलर्जीचे कारण ठरतात, कारण एकतर त्यात रसायनांचा वापर केलेला असतो आणि दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या त्वचेचा पोत लक्षात न घेताच ती खरेदी करता. त्यामुळे अॅक्ने, त्वचेवरील छिद्र्रे बंद होणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण होतात. बऱ्याच फेस क्रीम, लोशनमध्ये मिनरल ऑईलचा वापर केला जातो. त्वचेसाठी तो चांगला नसतो, कारण तो त्वचेवरील छिद्र्रांना बंद करतो. त्यामुळे त्वचेतील खराब द्रव्ये बाहेर पडू शकत नाहीत आणि ती अॅक्नेस कारणीभूत ठरतात. यातील पेरॅबिन्सच्या वापरामुळे अॅलर्जीसह हार्मोन्सचे संतुलन बिघडते.

वाढत्या वयातही दिसा तरूण

* अनुराधा गुप्ता

आपल्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायला कोणाला नाही आवडत? महिलांबाबत बोलायचं झालं तर त्या आपलं वय लपवण्यासाठी काहीही ट्राय करायला मागेपुढे पाहात नाहीत.

म्हणूनच कॉस्मेटीक इंडस्ट्रीने वाढत्या वयावर नियंत्रण ठेवणारी बरीच उत्पादनं बाजारात आणली आहेत. यामुळे चेहऱ्यावरच्या वयाच्या खुणा लपवण्यासाठी महिलांना मदत होते. पण ही उत्पादनं वापरण्यापूर्वी त्याविषयी संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे, नाहीतर या उत्पादनांचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

कॉस्मेटोलॉजिस्ट अवलीन खोखर म्हणतात, ‘‘सौंदर्य प्रसाधनं सौंदर्य वाढवण्यासाठी असतात. यांच्या वापराने चेहऱ्यावरची कमतरता भरून काढली जाऊ शकते. पण ती कमतरता आणि त्यासाठी असलेलं योग्य उत्पादन यांचं योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे, नाहीतर वय कमी दिसण्यापेक्षा जास्त दिसू लागेल.’’

त्वचेला मेकअपसाठी करा तयार

अवलीनच्या म्हणण्यानुसार त्वचेवर कोणतंही सौंदर्य प्रसाधन लावण्यापूर्वी त्याचा प्रकार जाणून घ्या. कारण त्वचेला अनुरूप निवड केल्यास योग्य लुक मिळतो. बाजारात ड्राय, ऑयली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी वेगवेगळी उत्पादनं उपलब्ध आहेत. योग्य निवडीसह त्वचेला मेकअपसाठी तयार करणंही महत्त्वाचं आहे. त्वचा स्वच्छ केली नाही तर धुलीकण त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकून राहतात आणि मेकअपच्या थरामुळे छिद्र बंद होतात. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मेकअपच्या आधी त्वचेचं क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग नक्की करा. यामुळे मेकअपमध्ये स्मूदनेस येतो.

कंसीलरचा वापर टाळा

कंसीलरचा उपयोग काळे डाग लपवण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावर काळे डाग असणाऱ्या भागातच कंसीलर लावलं जातं. पण काही महिला हे पूर्ण चेहऱ्यावर लावतात. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ठळक होतात. अवलीनच्या म्हणण्यानुसार कंसीलर जाडसर असतं आणि थोडं लावल्यानंतरही परिणाम दिसू लागतो. जास्त लावल्यामुळे चेहऱ्यावर ओरखडे दिसतात. काही महिला काळी वर्तुळं लपवण्यासाठी कंसीलरचा वापर करता. पण हे चुकीचं आहे. डोळ्यांखाली कंसीलर फक्त इनर कॉर्नरवरच लावावं. अधिक प्रमाणात कंसीलर लावल्यास डोळे चमकदार दिसतात जेणेकरून कळून येतं की डोळ्यांवर कंसीलर लावलं आहे.

जास्त फाउंडेशन लावू नका

फाउंडेशनची निवड आपल्या स्किन टाइपप्रमाणे करा. उदाहरणार्थ : नॉर्मल त्वचा असणाऱ्या महिला मिनरल बेस्ड किंवा मॉइश्चराइजरयुक्त फाउंडेशन वापरू शकतात. तर कोरड्या त्वचेसाठी हायडे्रटिंग फाउंडेशन योग्य ठरेल. सेम स्किन टोनचं फाउंडेशनच घ्या. नाहीतर त्वचा ग्रे दिसू लागेल. ऑयली त्वचेसाठी पावडर डबल फाउंडेशन वापरा. हे त्वचेला मेटीफाय करतं.

फाउंडेशनच्या योग्य निवडीसह त्याचा योग्य वापरही आवश्यक आहे. काही महिला संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावतात. हे चुकीचं आहे. फाउंडेशन चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत म्हणजे थोडंसं फाउंडेशन बोटावर घेऊन डॅब करत योग्यप्रकारे चेहऱ्यावर लावावं. यामुळे वयानुसार त्वचेमध्ये झालेलं डिस्कलरेशन निघून जातं.

कॉम्पॅक्टने द्या फिनिशिंग

बऱ्याच महिला फाऊंडेशननंतर कॉम्पॅक्ट पावडर लावत नाहीत. अवलीन याला मेकअप ब्लंडर म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की कॉम्पॅक्ट पावडर मेकअपला फिनिशिंग देतं. पण याचाही अतिवापर करू नये. त्यामुळे ओरखडे उठतात.

याची निवडही काळजीपूर्वक करावी. मुख्य म्हणजे स्किनकलर टोनप्रमाणेच शेड निवडा. आपल्या स्किन टाइपचाही विचार करा. उदारणार्थ, ऑयली त्वचेसाठी ऑइल कंट्रोल मॅट फिनिशिंग कॉम्पॅक्ट पावडर तर कोरड्या त्वचेसाठी क्रिमी कॉम्पॅक्ट घ्या. यामुळे त्वचा निरोगी दिसते. सेन्सिटिव्ह स्किनसाठी इमोलिएंट ऑइल आणि वॅक्सयुक्त कॉम्पॅक्ट सर्वात चांगला पर्याय आहे.

आय मेकअप काळजीपूर्वक करा

तरूण दिसण्यासाठी आय मेकअप योग्यप्रकारे करणं आवश्यक आहे. बऱ्याच महिलांचा गैरसमज असतो की डोळ्यांना गडद मेकअप केल्याने तरूण दिसता येतं. पण अवलीनचं म्हणणं आहे की एशियन स्कीन आणि रस्ट कलरमुळे वय कमी दिसतं. आयशेड्समध्ये हेच रंग वापरावेत. क्रिमी ऑयशेड्समुळे निवडू नका. यामुळे डोळ्यांच्या चुण्या लपल्या जात नाहीत. आयशेड्सह आयलायनरही ब्राउन निवडा.

काजळ आणि मस्काराशिवाय डोळ्यांचा मेकअप अपूर्ण असतो. काजळामुळे डोळे   उठून दिसतात. सध्या स्मजप्रूफ काजळ फॅशनमध्ये आहे. त्यामुळे आपल्यासाठी हेच काजळ निवडा. मस्कारा निवडतानाही काळजी घ्या. वाढत्या वयानुसार पापण्यांचे केस गळू लागतात. चुकीचा मस्कारा लावल्याने गळती वाढू शकते. पण हायडे्रटिंग मस्कारामुळे पापण्यांचे केस मजबूत होतात. मस्काराची योग्य निवड आणि योग्य वापर केल्यानेच तरूण दिसता येते. म्हणून मस्कारा नेहमी अपर आणि लोअर लॅशेजवर लावा. यामुळे डोळ्यांना छान लुक मिळतो.

लिपस्टिकच्या ब्राइट शेड निवडा

शास्त्रीयदृष्ट्या ब्राइट शेडमुळे कोणतीही गोष्ट छोटी दिसते. पण ओठांच्या बाबतीत उलट परिणाम दिसतो. डार्क शेड्समुळे ओठ मोठे दिसतात. आपल्या वयापेक्षा तरूण दिसायचं असेल तर न्यूड आणि ग्लॉसी लिपस्टिक निवडा. लिपलायनवर लिपस्टिकच्या शेडशी मॅच होईल याची काळजी घ्या. फाटलेल्या ओठांवर लिपस्टिक लावू नका. ओठ फाटले असतील तर पेट्रोलिअम जेली लावून स्मूद करा.

अशाप्रकारे मेकअपचे बारकावे माहीत असतील तर तुम्ही वाढत्या वयातही तरूण दिसू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें