जीवनाची परीक्षा जिंकवणारे १५ धडे

* गरिमा पंकज

कोरोनाने आपले जीवन पूर्णपणे बदलले आहे. मौजमस्ती, वायफळ खर्च, दर दोन दिवसांनी उपहारगृहात जेवायला जाणे, तिथली पार्टी, उगाचच फिरायला जाणे, कधी भरपूर खरेदी, कधी सिनेमा पाहायला जाणे, तर कधी नातेवाईकांचे घरी येणे या सर्वांवर कोरोनाने निर्बंध घातले. बहुसंख्य लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. निरर्थक फिरण्याला लगाम लागला आहे. मास्क आणि सॅनिटायजर जीवनातील महत्त्वाचे घटक झाले आहेत.

अशा वेळी जर तुम्हीही या अशा जीवनापासून धडा घेऊन येणारे आयुष्य आणि भविष्य आनंदी करू इच्छित असाल तर स्वत:ची जीवनशैली, विचारसरणी आणि जीवन जगण्याच्या पद्धतीत काही असे बदल करा, जेणेकरून एका सुंदर जीवनाची सुरुवात करू शकाल.

नात्यांना प्रेमात गुंफून ठेवायला शिका

नाती आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. संकट काळात माणूस आपल्या घराकडेच धाव घेतो. लोक घाबरून शहर सोडून आपापल्या गावी कसे पळत होते, हे आपण कोरोना काळात पाहिले. प्रत्यक्षात प्रत्येक माणसाला माहीत असते की, संकट काळात अनोळखी शहरात तो एकटाच असतो. त्यामुळे संकट जास्त मोठे वाटू लागते.

जेव्हा तुम्ही आपल्या माणसांमध्ये असता तेव्हा मिळूनमिसळून सर्व संकटांवर मात करू शकता. भलेही संकट कायम असते, पण दु:ख वाटल्यामुळे संकटाचा सामना करणे सोपे होते. आईवडील, भाऊ-बहीण ज्यांना तुम्ही कितीही बरेवाईट सुनावले असेल तरी जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा एखादे संकट येते तेव्हा तेच तुमचा खरा आधार बनतात.

म्हणूनच नेहमी आपल्या नात्यांना प्रेमात गुंफून ठेवायला हवे. त्यांना याची जाणीव करून द्यायला हवी की, तुमचे त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. ज्या प्रकारे बँक आणि तत्सम ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवता त्याचप्रकारे नात्यांमध्येही प्रेमाची गुंतवणूक करा. प्रेमाची शिंपडण करून नात्यांची बाग कोमेजू देऊ नका. मग पाहा, एक वेळ अशी येईल जेव्हा हीच बाग तुमचे जीवन आनंदाने फुलवेल.

मंदिरा, अनिलचा प्रेमविवाह होता. अनिल नेहमीच मंदिराची प्रत्येक गोष्ट ऐकत असे. लग्नानंतर अनिल आणि मंदिरा ३-४ महिने कसेबसे कुटुंबासोबत राहिले. त्यानंतर मंदिराच्या सल्ल्यानुसार त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आईवडील दु:खी झाले, पण मंदिराला सासरी राहायला आवडत नव्हते.

सासूने सुनेचा हात प्रेमाने हातात घेत विचारले, ‘‘बाळा एकत्र राहण्यात काय अडचण आहे? इतके मोठे घर आहे. तुला काहीच त्रास होणार नाही.’’

मंदिराने स्पष्टपणे सांगितले की, ‘‘आई, घर कितीही मोठे असले तरी घरातील माणसांची गर्दी तर पाहा ना? नणंद, दीर, वहिनी, तुम्ही, बाबा आणि नंदू… इतक्या माणसांमध्ये माझा जीव गुदमरतो. त्यात सतत नातेवाईकांची ये-जा असतेच. मला लहानपणापासून कमी माणसांमध्ये राहायची सवय आहे. त्यामुळे वेगळे घर घेऊन अनिलसोबत राहीन. अनिलला मी याबद्दल लग्नापूर्वीच सांगितले होते.’’

आईने मुलाकडे अपेक्षेने पाहिले आणि त्यानंतर निमूटपणे मान खाली घातली. अनिल आणि मंदिराने दुसरीकडे घर घेतले. दोघे तिथे राहू लागले. नव्या घरात मोकळया वेळेत ती टीव्ही पाहायची किंवा मोबाईलवर मैत्रिणींशी गप्पा मारायची.

दरम्यान कोरोना संसर्गाची लाट आली. अनिलची नोकरी गेली. त्यावेळी मंदिरा गरोदर होती. आर्थिक चणचण जाणवू लागली. त्यातच अनिलला कोरोना झाला. अनिलची काळजी घ्यायची की स्वत:ची आणि गर्भात वाढणाऱ्या बाळाची? मंदिराला काही सुचेनासे झाले. तिने तिच्या आईला फोन लावला, पण ती स्वत:च आजारी होती.

नाईलाजाने तिने सासूला फोन करून सर्व सांगितले. सासूबाईंनी लगेच त्यांचे सामान भरले आणि त्या मंदिराकडे राहायला आल्या.

अनिलची सोय त्यांनी वेगळया खोलीत केली. मंदिराला आठवा महिना लागला होता, त्यामुळे तिलाही वेगळया खोलीत आराम करायला सांगितले आणि स्वत: काम करू लागल्या. स्वयंपाक, वेळेवर औषध देणे, सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतल्या. सासरे शक्य तेवढी आर्थिक मदत करत होते. दोघांनी मंदिराचा संसार सावरला.

तिने अनिलला विनंती करत सांगितले की, ‘‘माझ्या मुलीने रुग्णालयातून थेट तिच्या घरी म्हणजे तिच्या आजीच्या घरी जावे असे मला वाटते.’’

मंदिराचे बोलणे ऐकून सासूचे डोळे पाणावले. तिने मंदिराला प्रेमाने मिठी मारली.

सर्वात मोठी संपत्ती

खरेतर नाती म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती. आपण कितीही पैसा कमावला तरी जोपर्यंत नात्याची संपत्ती कमावत नाही तोपर्यंत जीवनातील खरा आनंद, मन:शांती मिळत नाही. जीवनात जे कोणी तुमचे आपले आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. कुठलेही नाते गृहित धरू नका. प्रत्येक नाते निभवायला शिका. तरच गरज पडताच तीही माणसे तुमच्या मदतीला धावून येतील.

आजकाल आपण त्रिकोणी कुटुंब पद्धतीच्या आहारी जात आहोत. त्यामुळेच बऱ्याचशा जवळच्या नात्यांपासून दुरावत चाललो आहोत. वेळ आली की आपल्याला त्या नात्यांचे महत्त्व समजते. कोरोनाने बऱ्याच अंशी लोकांचे डोळे उघडले आहेत. त्यांना आपल्या माणसांच्या सोबतीचे महत्त्व पटवून दिले आहे.

गुंतवणुकीकडे विशेष लक्ष द्या

संकट काळात गरजेला दोनच गोष्टी धावून येतात. आपल्या माणसांची सोबत आणि जमवलेले पैसे. नाती जोडून ठेवण्यासोबतच आपल्याला या नव्या वर्षात गुंतवणुकीचे महत्त्वही समजून घ्यायला हवे. तुम्ही खूप मोठया रकमेची गुंतवणूक करायला हवी, असे मुळीच नाही. तुमचे उत्पन्न कमी असले तरी हरकत नाही. तुम्ही छोटी छोटी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमवू शकता.

तसेही एकाच ठिकाणी जास्त गुंतवणूक करण्यापेक्षा वेगवेगळया ठिकाणी थोडी थोडी गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. यामुळे पैसे बुडण्याची भीती कमी होते आणि जास्त नफा मिळण्याची शक्यता वाढते.

सिप

जेव्हा गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. म्युच्युअल फंडात सिपमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामुळे शेअरचा लाभ मिळतो, शिवाय हे सुरक्षित असते. व्याजाची रक्कम ठरलेली असते. ती फार बदलत नाही. यात मोठया कालावधीपर्यंत छोटी-छोटी रक्कम गुंतवता येते. जे धोका पत्करायला तयार असतात ते इक्विटी लिंक्ड सेविंग या योजनेत पैसे गुंतवू शकतात. ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे ते हायब्रिड किंवा डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. यात तुम्हाला बऱ्याच अंशी ठरलेला परतावा मिळतो.

लाईफ इन्शुरन्स अर्थात जीवन विमा

लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमाअंतर्गत १५ वर्षांत बऱ्याच कंपन्या दुप्पट परतावा देतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दरमहा, तीन महिन्यांतून एकदा, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा गुंतवणूक करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

मुलीच्या जन्मानंतर,१० वर्षांच्या आत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही एक सरकारी योजना आहे, जिथे तुम्हाला वर्षाला २५० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यात परतावा खूप चांगला मिळतो. ७.५ टक्यांपर्यंत व्याज मिळते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर रक्कम परत मिळते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

तुम्ही पीपीएफमध्ये थोडे थोडे पैसे भरून चांगला परतावा मिकवू शकता. हीदेखील एक सुरक्षित गुंतवणूक आहे.

शेअर

सुरुवातीला फिक्स डिपॉझिट म्हणजे सुरक्षित ठेवींवर चांगला परतावा मिळायचा. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणारे फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे. आता मात्र बँका खूप कमी व्याज देतात. त्यामुळेच लोक इतर पर्यायांकडे वळत आहेत.

वायफळ खर्च टाळा

आतापर्यंत आपण जीवनाकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. गरज नसतानाही केवळ मनाला वाटले म्हणून कपडे, खूप सारी खरेदी करतो. एखादे गॅझेट आवडले तर ऑनलाइन मागवतो. मनाला वाटेल तेव्हा बाहेर जेवायला जातो. मित्रांसोबत पार्टी करतो. छोटीशी गोष्टही भरपूर खर्च करून साजरी करतो. एकंदरच वायफळ खर्च करण्यात आपण सर्वात पुढे असतो. आता मात्र या महामारीनंतर आपण हा धडा गिरवायला हवा की, उगाचच खर्च करणे योग्य नाही. कोरोना काळात अनेकांची नोकरी गेली. बऱ्याच जणांचा पगार कमी करण्यात आला. पुढील काही काळ परिस्थिती अशीच असेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

आरोग्य आहे तर सर्वकाही आहे

या कोरोना काळात आपल्याला एक गोष्ट चांगलीच समजली आहे की, जीवनात निरोगी आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य बिघडले असेल तर तुमच्याकडे जगभरातील सुखसुविधा आणि संपत्ती असूनही तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही आणि प्रत्येक श्वासासाठी लाचार होता. म्हणूनच स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दूर राहा. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली आणि आणि पौष्टिक आहार गरजेचा आहे. दररोज पहाटेच्या मोकळया हवेत फेरफटका मारणे, व्यायाम करणे, सकारात्मक विचारसरणी आणि नात्यातील गोडव्यामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. आरोग्य निरोगी राहील याकडे लक्ष द्या. पौष्टिक आहार घ्या, चांगला विचार करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. यामुळे तुम्हाला मन:शांती लाभेल आणि शरीरही आतून मजबूत होईल.

निरर्थक वाद घालू नका

वाद आणि तणाव यामुळे बऱ्याचदा आपण मन:शांती गमावतो, शिवाय यातून हाती काहीच लागत नाही. उलट नात्यांसोबत आरोग्यही बिघडते. जीवनात कधीही काहीही होऊ शकते, याचा अनुभव मागच्या वर्षात आपण घेतला आहे. उद्याचा भरवसा नसतो. म्हणूनच आज चांगल्या पद्धतीने जगा. आज सुंदर करण्यासाठी डोकं आणि मन शांत असणे खूपच गरजेचे असते. त्यासाठी निरर्थक वाद किंवा भांडणांपासून दूर राहायला हवे.

अशा ठिकाणी फिरायला जा, जिथे कधीच गेला नसाल

निसर्गाचा पदर सर्व लेकरांना सामावून घेणारा आहे. आपण निसर्गाच्या जितके जवळ राहू तितके आपले आरोग्य निरोगी राहील. नवनवीन ठिकाणांवर फिरल्यामुळे मन प्रसन्न होते. कोरोनाने आपल्याला घरात बंद केल्यानंतरच आपल्याला बाहेर फिरण्यात किती आनंद असतो, याची जाणीव झाली आहे. परिस्थिती हळूहळू आणखी सुधारेल आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी पुन्हा मिळेल. तिथे जाता येईल जिथे निरोगी आरोग्यासह निखळ आनंद मिळेल. शक्यतो आपल्या घराच्या आजूबाजूलाही हिरवळ राहील, असा प्रयत्न करा.

राखून ठेवलेली कामे पूर्ण करा

बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाची कामे, आपले ध्येय बाजूला ठेवून आलेला दिवस घालवत असतो. वेळच मिळत नाही, असे कारण सतत पुढे करतो. कधी कामावरच्या कामांची धावपळ तर घर, मुलांचा अभ्यास, या सर्वांमध्ये दिवसच काय, पण कामासाठी रात्रही अपुरी पडते. त्यामुळे अधिकचे काम करणार कधी? हा बहाणा ऐकायला बरा वाटतो, पण या बहाण्याआडून तुम्ही खूप काही गमावत असता.

वेळेचा सदुपयोग

धावपळ कमी करूनही आपण जीवनातील सर्व जबाबदाऱ्या कशा पार पाडू शकतो, हे कोरोना काळाने आपल्याला शिकवले आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना तुमच्या डोक्यात हा विचार नक्की आला असेल की, तुम्ही दैनंदिन कामात काही वेळ उगाचच वाया घालवत होता.

एकीकडे कार्यालयात जाण्यासाठी बराच वेळ घालवायचा तर दुसरीकडे मित्रांसोबत कधी खरेदी तर कधी बाहेरचे जेवण. महागडया उपहारगृहात जेवणासाठी नंबर लागेपर्यंत रांगेत उभे राहणे तर कधी चित्रपट पाहण्यासाठी वेळ वाया घालवणे. त्याऐवजी तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करत शिल्लक राहिलेली कामे पूर्ण केली असती तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठणे किंवा पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले असते.

एखादे काम नंतर करू, असा विचार करून तुम्ही ते बाजूला ठेवता, पण ते पूर्ण करण्याइतका वेळ जीवन आपल्याला देईल का? म्हणूनच हातातले काम लगेच पूर्ण करा. आज तुमचा आहे. उद्याचा भरवसा नाही. तर मग सर्व महत्त्वाची कामे आजच पूर्ण करायला नकोत का?

कारण नसतानाही आनंदी रहा

जीवनात खुश होण्यासाठी तुम्ही संधीची वाट पाहात बसाल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. माणूस आनंदी राहिला तरच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तो निरोगी राहतो. मनातल्या आनंदाचा आरोग्याशी थेट संबंध येतो. म्हणूनच स्वत:ला नेहमी आनंदी ठेवा. यामुळे चेहऱ्यावरही चमक येते. कारण नसतानाही काही चांगल्या गोष्टी आठवून हसा. चांगले कपडे परिधान करा. मस्त दिसा. मेकअप करा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. यामुळे तुम्ही सुंदर दिसाल आणि निरोगीही राहाल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें