गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २५ वर्षांची तरूणी आहे. एका मुलावर माझे खूप प्रेम आहे. त्याचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. पण लग्नाचा विषय काढला की तो गोंधळतो. त्याच्या घरी अजून त्याच्या लग्नाचा विषय नाही असे म्हणतो. याशिवाय त्याच्या आईचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे हे ही स्पष्ट झाले आहे. तसेच तो भाड्याच्या घरात राहतो. आधी त्याला त्याचे घर घ्यायचे आहे. मग तो लग्नाचा विचार करणार आहे. त्याचे वय २९ वर्षं होऊन गेले आहे. जर अशाचप्रकारे तो लग्नाचं बोलणं टाळत राहिला तर लग्नाचे वय निघून जाईल. मी काय केले पाहिजे सांगा?

तुम्ही दोघेही आता लग्नाच्या वयाचे आहात. तुम्हाला असे वाटत असेल की तुमचा प्रियकर तुमच्याशी लग्न करण्याबाबत गंभीर आहे व तो त्याच्या आईलाही या लग्नासाठी राजी करेल तर तुम्ही थोडा वेळ त्याला देऊ शकता. स्वत:चे घर घेण्याचा निर्णयही योग्य आहे. कारण लग्नानंतर तसेही जबाबदाऱ्या व खर्च वाढतात व तेव्हा घर घेणे अवघड असते. जर सध्या तो लग्न टाळत असेल तर तो योग्य आहे आणि लग्नाच्या वयाचा जो प्रश्न आहे तर २ वर्षांनी काही फरक पडणार नाही. पण जी कारणे तो सांगत आहे, ती खरी असावी.

  • मी १९ वर्षीय तरुणी आहे. ४ वर्षांपासून मी एका तरूणावर प्रेम करते आहे. त्याचेही माझ्यावर प्रेम आहे असे मला त्याच्या वागण्या बोलण्यावरून वाटते. आम्ही अजून एकमेकांशी बोललोही नाही. त्याला पाहिले की मला खूप उत्तेजित व्हायला होते. त्याच्याशी संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा होते. माझी कामेच्छा पूर्ण करण्यासाठी मी हस्तमैथून करते. कृपया मला सांगा की मी काय करू आणि माझ्या भावना सामान्य आहेत ना? मी काही चुकीचे तर करत नाही ना?

याचा अर्थ तुम्ही १५ वर्षांच्या असल्यापासून त्या मुलावर प्रेम करत आहात. किशोरावस्थेत असताना विरूद्धलिंगी आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. हे फक्त आकर्षण आहे, प्रेम नाही आणि त्या व्यक्तिच्या फक्त हावभावांवरून व वागण्यावरून तुम्ही असा अंदाज लावत आहात की तो ही तुमच्यावर प्रेम करतो, तर हा फक्त तुमचा गोड गैरसमज असू शकतो. एकमेकांशी बोलल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय व प्रेम व्यक्त केल्याशिवाय तो तुमच्यावर प्रेम करतो हे समजणे चुकीचे आहे आणि तुम्ही स्वत:बद्दल कुठलाही पूर्वग्रह बाळगू नका. तुम्ही नॉर्मल आहात. हस्तमैथूनाद्वारे स्वत:ची यौन उत्तेजना शांत करणे चुकीचे नाही.

  • मी २४ वर्षांची तरूणी आहे. सहा महिन्यांनंतर माझे लग्न आहे. लग्नाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसा मला जास्तच ताण येत आहे. खरंतर, मी एका तरूणावर प्रेम करत होते. वर्षभर माझ्याशी प्रेमाचे नाटक केल्यानंतर माझ्या प्रियकराने जबरदस्तीने माझ्याशी संबंध प्रस्थापित केले. मी विरोध केला असता त्याने मला खूप अपमानित केले. त्याचे असे म्हणणे आहे की मी जुन्या विचारांची आहे. त्याच्याशी वाद घालत असताना त्याच्या तोंडून शेवटी खरं काय ते निघाले, की त्याचे माझ्यावर प्रेमच नाही. हे कळल्यावर मला धक्काच बसला व आता तर वेगळ्याच तरूणाशी माझे लग्न होत आहे. त्यामुळे मला काळजी वाटत आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझ्या पतीला कळेल की माझे शील भंग झाला आहे, तेव्हा काय होईल?

प्रेमात तुम्हाला त्रास, खोटेपणा सहन करावा लागला असल्यामुले ताण येणे स्वाभाविक आहे. पण आता जर तुमचे लग्न होणार आहे तर तुम्ही तुमचा भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सुखद भविष्याचा विचार केला पाहिजे. आता तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्रीचा विचार करत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही स्वत: काही बोलत नाही तोपर्यंत तुमच्या पतीला काही कळणार नाही. तुमचे इतर कोणाशी संबंध होते हे विसरून जा.

  • माझ्या लग्नाला ६ महिने झाले आहेत. माझे पती माझ्यावर प्रेम करतात व मीही त्यांच्यावर खूप प्रेम करते. तरीही माझ्या मनात कायम साशंकता असते. लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्यांनी मला सांगितलं की विवाहाआधी त्यांचे एका मुलीवर प्रेम होते. पण घरचे लग्नासाठी तयार नव्हते, म्हणून तिला सोडून मला तुझ्याशी लग्न करावे लागले. त्यांनी मला हेही सांगितलं की आता त्यांच्यासाठी मीच सर्वकाही आहे व त्या मुलीला ते पूर्णत: विसरले आहेत. पण माझ्या मनात मात्र अढी निर्माण झाली आहे. न जाणो त्यांचे प्रेम कधी जागृत झाले आणि ते मला सोडून तिच्याकडे गेले तर काय होईल?

तुमच्याशी संबंध प्रस्थापित करण्याआधी त्यांनी तुम्हाला त्यांच्या भूतकाळाविषयी सर्व काही सांगितले तर त्यांच्या प्रामाणिकपणाचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही त्यांच्या लग्नाच्या पत्नी आहात आणि तुम्ही मान्य करता की ते तुमच्यावर प्रेम करतात. मग विनाकारण त्यांच्यावर संशय घेऊ नका. त्यांना एवढे प्रेम द्या की त्यांना इतर कुणाबद्दल विचार करण्याची गरजच पडणार नाही. तुमचे नवे नवे लग्न झाले आहे तर या सर्व गोष्टींचा विचार सोडून वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें