मान्सून स्पेशल : रिमझिम पावसात महाराष्ट्राची सैर

* सोमा घोष

भीषण गरमीनंतर पावसाची पहिली सर जेव्हा मुंबई आणि आजूबाजूच्या ठिकाणांवर पाण्याचा वर्षाव करते, तेव्हा झाडंझुडपं, जीवजंतूंबरोबरच मनुष्यही खू्श होऊन जातो.

पावसाळयाच्या दिवसांत मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये राहाणारे लोकसुद्धा वीकेंडसाठी काही ठिकाणी जाणं खूप पसंत करतात.

महाराष्ट्रात नेहमी टुरिझमला प्रोत्साहन मिळत आलं आहे. पावसाळयात लोणावळा, माथेरान, भंडारदरा, माळशेज घाट इ. पर्यटनस्थळं लोक सर्वात जास्त पसंत करतात.

पावसाळयात पर्यटकांची संख्या वाढण्याचं कारण येथील पाणी आणि हवा असून, त्यामुळे पर्यटकांना खूप आल्हाददायक वाटतं. ठोसेघर, अंबोली घाट, भांबावली वज्री इ. ठिकाणाचे धबधबे खूप प्रसिद्ध आहेत. याबरोबरच काही इतर आकर्षक स्थळं उदा. कुंडालिका वॉटर राफ्टिंग, लोहगडाचे ट्रेकिंग इ ठिकाणंसुद्धा पावसाळयात आकर्षणाची केंद्र बनतात, तसेच या दिवसांत समुद्रकिनारी फिरण्याचा अनुभवही मनमोहक असतो.

पावसाळ्यातील खास पर्यटनस्थळं

माळशेज घाट

सह्याद्री रांगांमधील हे हिल स्टेशन हिरवीगार वनराई आणि झऱ्यांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत आहे. हा डोंगर आपल्या नैसर्गिक सौंदर्यांने सर्वांनाच भुरळ घालतो. माळशेज घाट पुण्यापासून १३० किलोमीटर अंतरावर ठाणे आणि अहमदनगर बॉर्डरवर असून, इथे अनेक रिसॉर्टही आहेत.

लोणावळा आणि खंडाळा

हे ठिकाण मुंबईपासून खूप जवळ आहे. इथे जमीन आणि पाण्याचा अद्भूत संगम पाहायला मिळतो. पावसाळयाच्या दिवसांत येथील नैसर्गिक सौंदर्य हिरवळ व धबधब्यांनी जास्त खुलून येते. इथे विमानतळ नसल्यामुळे मुंबई किंवा पुण्यावरून बस किंवा ट्रेनने जावं लागतं. मुंबईपासून ८३ किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी ट्रेन किंवा लझरी बसेसची सुविधा उपलब्ध आहे.

भुशी डॅम, राजमाची पॉइंट आणि सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम इ. खंडाळयामध्ये फिरण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत. इथे राहाण्यासाठी महाराष्ट्र टुरिझमच्या हॉटेल्सबरोबरच अनेक हॉलिडे रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सही आहेत.

मुळशी डॅम

मुळा नदीवर बांधलेल्या या धरणापर्यंत मुंबईवरून केवळ तीन तासांत पोहोचता येतं. हा डॅम संपूर्ण महाराष्ट्रासाठी विद्युत उत्पादनाचा प्रमुख स्रोत आहे. पावसाळयात हा डॅम पाण्याने पूर्णपणे भरतो. परिणामी, पाण्याच्या वेगामुळे इथे एवढं धुकं होतं की, पर्यटकांना ढगांवरून चालल्याचा आभास होतो. हे एक नवीन पर्यटनस्थळ आहे. याच्या आजूबाजूला राहाण्यासाठी अनेक सुविधा आहेत.

कळसूबाई शिखर

सह्याद्री डोंगररांगांतील सर्वात उंचावर (५,४०० फूट) असलेल्या या कळसूबाई शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटलं जातं. इथे असलेला कळसूबाई हरिश्चंद्र गड वाइल्ड लाइफ सेंच्युरी खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण वर्षभर इथे ट्रेकर्स येतात. मात्र, पावसाळी वातावरणात येथील सुंदरता अवर्णनीय असतं. मुंबईपासून हे ठिकाण १५२.८ किलोमीटर अंतरावर आहे.

इथे वास्तव्य करण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये हॉटेल परिचय, हॉटेल राज पॅलेस, यश रिसॉर्ट, आदित्य लॉज अॅण्ड विस्टा रूम्स इ. आहेत.

भंडारदरा

भंडारदरा महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. मुंबईपासून १८५ किलोमीटर अंतरावरील या ठिकाणी पोहोचल्यानंतर, नैसर्गिक धबधबे, पर्वत-शिखर, हिरवळ, शांती आणि प्राचीन वातावरण या गोष्टी पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतात.

प्रवरा नदीच्या किनारी वसलेलं हे क्षेत्र आर्थर धबधबा आणि रंधा झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र पावसाळयाच्या दिवसांत आकर्षणाचं केंद्र बनते. मुंबईहून भंडारदऱ्याला जाण्यासाठी सर्वात उत्तम म्हणजे रस्ता मार्ग आहे.

आंबोली घाट

महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन ६९० मीटर उंचीवर आहे. सह्याद्री हिल्सवर असलेले हे ठिकाण जगातील एकमेव ‘इको हॉट स्पॉट’ मानलं जातं. येथील ‘फ्लोरा आणि फना’ची व्हरायटी खूप चांगली मानली जाते. पर्यटक इथे पावसाळयाच्या दिवसांतच फिरायला येतात. मुंबईपासून ४९१ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्यटनस्थळी कार, ट्रेन किंवा बसद्वारे जाता येतं.

इथे राहाण्यासाठी चांगले रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये वृंदावन रिसॉर्ट्स, हॉटेल सैली, साइलण्ट व्हॅली रिसॉर्ट, महाराष्ट्र टुरिझम इ. हॉटेल्स प्रमुख आहेत. नानगरता तलाव, केवलेश पॉइंट, आंबोली धबधबा, शिरगावकर पॉइंट, माधवगड किल्ला इ. प्रेक्षणीय स्थळं आहेत.

कर्नाळा

चारही बाजूला हिरवीगार निसर्गसंपदा आणि नैसर्गिक धबधब्यांनी सुशोभित झालेलं हे ठिकाण मुंबईपासून केवळ ८० किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळयात येथील ट्रेकिंग हे खास आकर्षण असते. येथे कर्नाळा किल्ला इ. सारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत.

कोलाड

मुंबई-गोवा हायवेजवळील कोलाड हे एक छोटंसं पर्यटनस्थळ आहे. हे ठिकाण चारही बाजूने छोटया-छोटया डोंगरांनी वेढलेलं आहे. कुंडलिका नदीजवळील हे ठिकाण मुंबईपासून ११७ किलोमीटर अंतरावर आहे.

येथे असलेल्या धरणातून पाणी सोडल्यानंतर कोलाड राफ्टर्स, मुंबई हाइकर्स, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन इ. राफ्टिंगची सोय करतात.

ठोसेघर धबधबा

मुंबईपासून जवळच असलेलं हे ठिकाण धबधब्यांचे सौंदर्य आणि फ्लॉवर व्हॅलीसाठी प्रसिद्ध आहे. येथील धबधबे २० मीटरपासून ५०० मीटर उंचीवरून वाहातात. पावसाळयातील शांत वातावरणात हे धबधबे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनतात. इथे जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा आधार घ्यावा लागतो. कास धबधबा, फुलांनी डवरलेलं येथील कास पठार पाहाण्यासारखी स्थळं आहेत.

लोहगड किल्ला

लोहगडचा किल्ला मुंबईच्या सर्वात जवळील पर्यटनकेंद्र आहे. याचा इतिहास जुना आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट यादव, बहमनी, निजाम, मोघल इ.नी वेळोवेळी यावर कब्जा केला. ३,३९० फुट उंचीवर असलेला हा किल्ला पावसाळयात आपलं नैसर्गिक सौंदर्य उधळतो. इथे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वेगवेगळया वनस्पती पाहायला मिळतात. हा किल्ला पुणे आणि मुंबई विमानतळापासून जवळ आहे. येथील जवळचं रेल्वेस्टेशन म्हणजे मालावली. लोणावळा आणि पुण्याला जाणाऱ्या सर्व ट्रेनमधून येथे जाता येतं. पावसाळयात ट्रेकिंगसाठी हे ठिकाण उत्तम आहे. याबरोबरच भाजे लेणी, कारला लेणी इ. ठिकाणंही पाहण्यालायक आहेत. इथे राहाण्यासाठी पुणे आणि आजूबाजूला अनेक हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें