नाजूक आहेत कमकुवत नाही

* रोहित

२१ व्या शतकातील २०२२ या वर्षात आपण पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी बरेच बदल झाले, पण एक गोष्ट जशीच्या तशी आहे आणि ती म्हणजे समाजातील महिलांची स्थिती. हजारो वर्षांपासून जगात एक रुढीवादी परंपरा आपली मुळे घट्ट रोवून आहे, जी असे सांगते की, पौराणिक काळापासूनच देव आणि निसर्गाने महिला, पुरुषांमध्ये भेदभाव केला आहे. यामुळे पुरुषांचे काम वेगळे आणि महिलांचे काम वेगळे आहे. ही प्रवृत्ती नेहमीच असे सांगत आली आहे की, आदि मानवासापासून जेव्हा कधी जेवण गोळा करण्यासारखे अवघड काम करावे लागले, मग ती जुन्या काळात शिकार करणे असो किंवा आजच्या युगात बाहेर पडून कुटुंबासाठी पैसे कमावणे असो, त्यासाठी पुरुषांनाच सक्षम ठरवण्यात आले आहे आणि शारीरिकदृष्टया कमकुवत असल्यामुळे महिलांच्या वाटयाला घरातली कामे आली आहेत.

या लैंगिक भेदामुळेच महिलांचे बाहेर पडून काम न करण्यामागचे कारण त्यांचा शारीरिक कमकुवतपणा असल्याचे सांगण्यात आले. त्यांची शारीरिक ठेवण पुरुषांच्या तुलनेत दुबळी किंवा कमकुवत आणि अशुद्ध ठरवण्यात आली. त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले. त्या पुरुषांच्या तुलनेत शारीरिकदृष्टया कमकुवत आहेत, बाहेरचे काम करण्यासाठी योग्य नाहीत आणि कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाहीत, याची जाणीव त्यांची त्यांनाच करून देण्यात आली.

हेच कारण आहे की, आज लिंगावर आधारित असमानतेवर जगभरात वादविवादाच्या फैरी झोडत आहेत. महिलांचा शारीरिक दुबळेपणा हा नेहमीच या वादातील एक मोठा भाग राहिला आहे. याच

वादादरम्यान संशोधकांनी दक्षिण अमेरिकेतील एंडिज पर्वतरांगेत ९,००० वर्षांपूर्वीच्या अशा एका जागेचा शोध लावला जिथे महिला शिकाऱ्यांना दफन केले जात असे. या शोधामुळे प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या पुरुषप्रधान वर्चस्वाला आव्हान मिळाले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाशी जोडले गेलेले आणि या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिक असलेले रँडी हास यांचे म्हणणे आहे की, प्राचीन काळातील दफनविधी प्रक्रियेचे हे संशोधन आणि विश्लेषण फक्त पुरुषच शिकारी असण्याचे पुरुषांचे वर्चस्व मोडणारे आहे.

कुशल शिकारी

या संशोधनात यावर शिक्कामोर्तब झाले आहे की, प्राचीन काळात पुरुषांप्रमाणेच महिलाही घराबाहेर पडून शिकार करायच्या. त्यावेळी बाहेर पडून शिकार करणे हे पूर्णपणे श्रमावर आधारित होते, लिंगभेदावर नाही.

२०१८ मध्ये पेरूच्या पर्वतांवरील उंचीवर पुरातत्त्व उत्खननादरम्यान संशोधकांनी जुन्या शिकाऱ्यांना दफन केलेल्या प्राचीन जागेचा शोध लावला होता. तेथे शिकारीची आणि प्राण्यांना कापण्याची धारदार अवजारे सापडली होती. त्याच ठिकाणी ९,००० वर्षांपूर्वी दफन केलेले मानवी सांगाडे सापडले. त्यांची हाडे आणि दातांच्या तपासणीनंतर ते महिलांचे सांगाडे असल्याचा निष्कर्ष निघाला.

 

उत्तरेकडील आणि दक्षिणी अमेरिकेत सापडलेल्या अशा १०७ प्राचीन ठिकाणांच्या संशोधनानंतर संशोधकांनी ४२९ सांगाडयांची ओळख पटवली. संशोधकांनी सांगितले की, यातील एकूण २७ शिकाऱ्यांचे सांगाडे होते, ज्यात ११ महिला आणि १६ पुरुष होते. सांगाडे आणि संशोधकांनी लावलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, प्राचीन काळात महिलाही शिकार करायच्या. इतकेच नव्हे तर शिकारीच्या कामात पुरुषांच्या तुलनेत महिलाही जवळपास बरोबरीतच होत्या. संशोधनानुसार संशोधकांचे असे म्हणणे आहे की, त्या काळात शिकारीच्या कामात महिला, पुरुषांचे समान वर्चस्व होते. महिलांचा शिकारीत सहभाग घेण्याचा वाटा जवळपास ३०-५० टक्के पर्यंत होता. उत्खननात सापडलेल्या सांगाडयांच्या आधारावर असा निष्कर्ष निघतो की, असे कोणतेच निर्बंध (नैसर्गिक किंवा दैवी) त्या काळात महिलांवर नव्हते, ज्या आधारे असे म्हणता येईल की, तेव्हा कामांची विभागणी होत असे.

हा शोध लैंगिक समानतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचे मोठे कारण महिला आणि पुरुषांमध्ये कामाच्या विभागणीवरून पूर्वापार चालत आलेला वाद हे आहे. या संशोधनात जी महत्त्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे त्या काळात महिला पूर्णपणे स्वावलंबी होत्या. स्वत:चे निर्णय स्वत:च घेत होत्या. एका महिलेचे शिकारी असणे हेच सांगते की, ती आपली जमात किंवा कुटुंबासाठी बाहेर पडून काम करत होती. स्वत:च्या मुलांचे पोट स्वत: भरू शकत

होती. तिला पुरुषाच्या खांद्याच्या आधाराची गरज नव्हती. शिकार करून आणलेल्या मांसाचे वाटप कशा प्रकारे करायचे आहे, किती करायचे आहे आणि ते कोणाला द्यायचे आहे, हे सर्व निर्णय महिलाच घेत असत. हे स्वाभाविक आहे की, जो आपल्या जमातीचे पोट भरतो त्याला त्या जमातीवर वर्चस्व गाजवण्याचा अधिकार असतो. अशा वेळी जर महिला आणि पुरुष बरोबरीने कुटुंबाचे पालनपोषण करत असतील तर तिथे दोघांना समान अधिकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिकारी होण्यामागचा एक अर्थ असाही आहे की, त्या काळातील महिलांकडे आपल्या सुरक्षेसाठी लागणारी हत्यारे होती. ही हत्यारे त्यांना सुरक्षा मिळवून देण्यासोबतच ती त्यांच्याकडील बहुमूल्य साधनांपैकी एक होती. यातून कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो, जसे की, ज्या पुरुषी समाजात महिलांना स्वत:कडे संपत्ती ठेवण्याचा अधिकार नसेल, पण कदाचित त्या काळात महिलांकडेच मौल्यवान संपत्ती म्हणून पाहिले जात असेल. त्यामुळेच त्या काळातील तो एक असा समाज असेल जिथे महिलांकडे संपत्तीच्या रूपात हत्यारांचे असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.

महिला शारीरिकदृष्टया दुबळया किंवा कमकुवत असतात, त्यामुळेच त्या घराबाहेरची कामे करण्यासाठी योग्य नाहीत, असा जो तर्क पुरुषप्रधान संस्कृती पूर्वापारपासून लावत आली आहे त्या तर्काला या संशोधनाने मोठा धक्का दिला आहे. शिकारीसारख्या कामासाठी आवश्यक असलेली शारीरिक चपळता, ताकद, हिंमत महिलांमध्ये होती, सोबतच त्या हे काम करण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत कुठेच कमी नव्हत्या. अशा वेळी प्रश्न असा उपस्थित होतो की, जर प्राचीन काळात महिला शारीरिकदृष्टया पुरुषांच्या बरोबरीने काम करत होत्या तर मग आज याच्या अगदी उलट अशी त्या शारीरिकदृष्टया कमकुवत असल्याची प्रतिमा समाजात कशी रूढ झाली?

धर्माचे निर्बंध

जगातील कितीतरी इतिहासकारांनी महिलांवरील पुरुषांच्या वर्चस्वाशी संबंधित असलेले अनेक शोध यापूर्वी लावले आहेत. ज्यात त्यांनी असे सांगितले की, आदियुगात अशा समाजाचे अस्तित्व होते जिथे कुठलीही गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य महिलांना होते. परंतु या शोधांवर सर्वात जास्त कठोर आणि थेट हल्ला ज्या लोकांनी केला ते धर्मकर्माशी जोडलेले रुढीवादी लोक होते. त्यांच्या मतानुसार जग देवाने बनवले आहे आणि महिलांच्या शारीरिक ठेवणीला कमकुवत तर पुरुषांना बळकट करून या जगाचे संतुलन साधण्यात आले आहे. त्यांच्या या तर्कामुळेच पुरुषांना संरक्षक आणि महिलांना अबलेचा दर्जा देण्यात आला.

हे पूर्णपणे महिलांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रत्येक धर्मातील त्या कथांना, ग्रंथांना प्रमाण मानण्यात येऊ लागले जे महिलांना आदर्श स्त्री किंवा पतिव्रता बनण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर दबाब आणणारे होते. महिलांनी पतिव्रता असणे केवळ वंशाच्या शुद्धीसाठीच नव्हे तर परपुरुषाशी तिने शारीरिक संबंध ठेवू नयेत यासाठीही गरजेचे मानले जाऊ लागले.

धर्मदेखील आहे जबाबदार

हिंदू समाजातील ग्रंथ, पौराणिक कथा, रामायण, महाभारत, गीता, वेद आणि तत्सम संबंधित कथांमध्ये सामूहिकरित्या सांगण्यात आले आहे की, महिलांनी स्वतंत्र होता कामा नये.

मनुस्मृती ज्याला सरंजामशाहीचे संविधान मानले जाते त्यात महिला पुरुषांच्या तुलनेत कमकुवत आणि दुय्यम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जवळपास सर्वच संघटित धर्मग्रंथांमध्ये पृथ्वीवरील संतुलनासाठी लिंग भेदभाव हे प्रमाण मानले गेले. ज्या पौराणिक ग्रंथांमधून महिला स्वतंत्र असल्याचे आणि सक्षम असल्याचे समोर आले तिथे ते ग्रंथ किंवा अशा सक्षम महिलेला राक्षसीन, कुरूप समजण्यात आले. त्यांच्याऐवजी घाबरलेल्या, भित्र्या, कमकुवत, गृहिणी असलेल्या महिलेलाच आदर्श मानण्यात आले

या सर्व बुरसटलेल्या विचारसरणीमुळे महिलांना घराबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले, सोबतच राहणीमान, वागणे-बोलणे, हसणे, यौन शुचिता अशा सर्वच बाबतीत तिच्यावर निर्बंध लादण्यात आले. याचे दूरगामी परिणाम असे झाले की, महिलांकडून जबरदस्तीने किंवा त्यांना आपले म्हणणे पटवून देऊन त्यांच्याकडून यासाठी परवानगी घेण्यात आली की, त्यांचे व्यक्तिमत्त्व निसर्गत:च पुरुषांपेक्षा दुबळे, कमकुवत आहे. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी पुरुषांचा आधार घ्यायला हवा.

असो, पण या संशोधनातून २ गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे महिलांचे व्यक्तिमत्त्व नैसर्गिकरित्या पुरुषांपेक्षा कमकुवत नाही आणि दुसरे म्हणजे धर्मात महिलांसाठी लिहून ठेवण्यात आलेल्या सर्व गोष्टी या ईश्वराच्या मुखातून निघालेली अमरवाणी नाही तर धर्मातील पुरुष ठेकेदारांनी अर्ध्या लोकसंख्येकडून फुकटात श्रमाची कामे करून घेण्यासाठी आणि भोगविलासाचे जीवन जगण्यासाठी करून ठेवलेली तरतूद आहे.

आधीही नव्हती आणि आताही कमकुवत नाही

उत्तराखंडातील पौडी जिल्ह्यातील जलथा गावात राहणाऱ्या ४४ वर्षीय बसंती भंडारीचे गाव कोटद्वार शहरापासून खूप दूर, दुर्गम भागात आहे. या गावातील जनजीवन त्याच्या जवळ असलेल्या इतर भागातील गावांसारखेच खूप अवघड आहे. पहाडी, दुर्गम भाग असल्यामुळे आजही लोकांना उदरनिर्वाहासाठी बऱ्याच लांबवर शेती करण्यासाठी जावे लागते. त्यासाठी बसंती देवी यांना पाळीव जनावरांचे वजनदार शेण गोळा करून त्याचे खत बनवून ते डोक्यावरून २-३ किलोमीटरपर्यंत घेऊन जावे लागते. असे काम करण्यासाठी हिंमत आणि प्रचंड ताकदीची गरज असते.

बसंती भंडारी सांगतात, ‘‘माझे अर्धे आयुष्य असेच मेहनतीच्या कामात गेले. पर्यटकांना हे पर्वत आवडतात, पण मी नेहमीच येथे खूप काबाडकष्ट केले.

‘‘इतके अवजड वजन डोक्यावर वाहून नेण्याबाबत त्यांनी सांगितले की, पुरुषांचे काम फक्त शेतात बैलांना हाकून नांगर चालवण्यापुरतेच आहे. महिलांनाच पेरणी, खत घालणे, कापणी, गवत आणणे, दूरवरून पाणी, लाकडे आणणे, अशी श्रमाची कामे करावी लागतात. तरीही त्याची दखल कुठेच घेतली जात नाही. खरंतर जास्त मेहनतीची कामे महिलाच करतात.

नाही आहोत कमकुवत

असे फक्त खेडोपाडयात पाहायला मिळत नाही. दिल्ली शहरात मजुरी करणाऱ्या २६ वर्षीय मुनमुन देवीचे गाव उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात आहे. लग्नाला वर्ष झाल्यानंतर त्या ४ वर्षांपूर्वी आपल्या पतीसह दिल्ली शहरात आल्या होत्या. मुनमुन यांना ३ मुले आहेत. या ३ मुलांमध्ये १ मुलगी असून ती दिड वर्षांची तर मुलगा २ वर्षांचा आहे. मोठा मुलगा ३ वर्षांचा आहे. दिल्लीतील बलजीत नगर परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे, तिथे सरकारी ठेकेदाराकडे काम करताना मुनमुन एका हाताने आपल्या ३ वर्षांच्या रडणाऱ्या मुलाला कसेबसे आपल्या कमरेवर पकडून डोक्यावर सिमेंटने भरलेले घमेले घेऊन जाते.

मुनमुन सांगते की, मी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पतीसोबत मजुरी करते. आमच्यातील बहुतांश महिलांचे काम डोक्यावरून विटा उचलून नेणे, घमेल्यातून सिमेंट आणणे, खड्डा खोदणे असे असते. या कामासाठी आम्हाला तितकीच ताकद लागते जितकी एका पुरुषाला हे काम करण्यासाठी लागेल. असे असताना आम्ही कमकुवत कशा काय? अनेकदा आम्हाला कामादरम्यान मुलांना दूधही पाजावे लागते.’’

युनायटेड नेशनच्या एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय महिलांना एकूण कामांपैकी ५१ टक्के कामांचा मोबदला मिळत नाही. दुसरीकडे जगभरात घरातील ७५ टक्के काम महिला कोणताच मोबदला न घेता करतात. तरीही जगातील ६० टक्के महिला किंवा मुली भुकेल्या असतात. त्यांच्यात भूकबळीचे प्रमाण अधिक असते.

एका अभ्यासानुसार, आफ्रिका आणि आशियात एकूण कामगारांपैकी जवळपास ६० टक्के कामगार महिला असतात आणि तरीही पुरूषप्रधान समाजात त्यांना शेतकऱ्याचा दर्जाही मिळत नाही.

अशा वेळी हे स्पष्ट आहे की, महिला पूर्वीही कमकुवत नव्हत्या आणि आजही नाहीत. त्या शारीरिकदृष्टया सक्षम आहेत. पुरुषांप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. फक्त समाजाच्या डोक्यातून महिलांना कमकुवत समजण्याच्या संकुचित विचाराला कायमची तिलांजली देण्याची गरज आहे.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें