प्रश्न: मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. जवळपास ६ वर्षांपूर्वी मला सिझेरियनने मुलगा झाला होता. आता जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात. त्या शरीरिक संबंध बनवल्यानंतर दीर्घकाळ मला त्रस्त करतात. यामागे काय कारण असू शकते?
उत्तर:आपल्याप्रमाणेच बऱ्याचशा महिला आई बनल्यानंतर त्रासदायक सहवासाच्या समस्येतून जातात. ज्या महिलांची मुले नैसर्गिकरीत्या योनीमार्गातून जन्म घेतात आणि त्यात योनीमार्ग मोठा करण्यासाठी डॉक्टर प्रसूतीच्या वेळी अॅपीसिओरोमीचा चीर पाडतात. त्यातील १७ ते ४५ टक्के महिला आई बनल्यानंतर या त्रासातून जातात. उलट सिझेरियनने आई बनणाऱ्या २ ते १९ टक्के महिला अशा प्रकारचा त्रास असल्याचे सांगतात.
म्हणजेच याचा अर्थ असा की सिझेरियननंतर त्रासदायक संबंधाची समस्या कमी दिसते, परंतु ती असू शकते. यामागे योग्य कारण काय आहे, याबाबत केवळ अंदाजच लावला जाऊ शकला आहे. असे समजले जाते की काही महिलांमध्ये सिझेरियनच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक द्विधावस्था पुढे जाऊन त्यांच्या मनात एवढी तीव्र चिंता निर्माण करते की त्यांना संबंधांची भीती वाटू लागते. त्यांचे मन विचार करू लागते की पुन्हा जर गरोदर राहिले, तर पुन्हा सिझेरियनमधून जावे लागेल आणि याच मानसिक द्विधावस्थेत त्यांचे मन सेक्सबाबत नकारात्मक होते.
अन्य मानसशास्त्रीय कारणंही समस्या निर्माण करतात. नुकत्याच आई बनलेल्या महिलांची जर रात्री झोप पूर्ण झाली नाही, व्यवस्थित आराम मिळाला, व्यवस्थित पोषण मिळाले नाही, एकमेकांसोबत प्रेमळ सहवालाची संधी मिळाली नाही, तसेच पतीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही, तर अशी मन:स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे.
सिझेरियननंतर जर टाक्यांत पू झाला, तर नंतर ते भरल्यानंतरही वरील टिश्यूमध्ये झालेल्या दुष्परिवर्तनामुळे महिलांना वेदना जाणवतात. काही महिलांमध्ये हार्मोनल समस्याही निर्माण होत. एस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता घटते. परिणामी, संबंध कष्टदायक होतात.
काही शारीरिक समस्या जसं की योनीद्वाराला आलेली सूज, मूत्रनलिकेला आलेली सूज, त्यावर उत्पन्न झालेली मांसाची गाठ, योनीद्वाराशी सलग्न बार्थोलिन ग्लँडमध्ये आलेली सूज किंवा गुदद्वाराला फिशर झाल्यानेही सहवास क्रीडेच्या वेळी त्रास होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे गर्भाशयाची सूज आणि एंडोमिट्रिओसिससारखे रोगही त्रास देतात.
शिवाय समस्या हीसुध्दा आहे की एकदा सुरुवातीला वेदना निर्माण झाल्यावर पुढे मनात शारीरिक संबंधाबाबत तणाव जाणवतो. केवळ स्पर्शानेही योनी भागातील पेशी संकुचित होतात, योनी संकुचित होते आणि संबंध बनवणे कठीण होते. समस्या एकदा सुरू झाल्यानंतर पुढे नेहमीच चक्रव्यूह बनते. जेव्हा जेव्हा पती-पत्नीला मिलनाच्या बंधनात अडकायची इच्छा असते, पत्नी वेदनेने तळमळते. सर्वप्रथम आपण एखाद्या योग्य स्त्रीरोग विशेषज्ञाला भेटून आपली अंतर्गत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे समस्येच्या मूळ कारणाचे निदान होईल व आपण समस्येवर योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल.
जर अंतर्गत एखादा विकार नसेल तर आपण आणि आपले पती दोहांनी दाम्पत्य मानसशास्त्रात निपुण एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आपसात प्रेमाचा सेतू असेल, तर सर्व समस्या कालांतराने दूर होतील. सहवासापूर्वी प्रणयक्रीडेला वेळ देणेही लाभदायक होऊ शकेल. त्यामुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता वाढते, त्यामुळे संबंध सोपे होतात.