आवडत्या वेशभूषेवर पहारा का?

प्राची भारद्वाज

फॅशन प्रत्येक महिलेला आकर्षित करते. पण कित्येक अशा महिला आहेत, ज्यांना कुठल्या न कुठल्या कारणास्तव मनाजोगते कपडे घालता येत नाहीत. कारणे सामाजिक असोत किंवा वैयक्तिक, मनासारखे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच मिळत नाही. बहुतेक महिलांना मनाप्रमाणे कपडे खरेदी करता येत नाहीत. त्यांना मन मारून असेच कपडे विकत घ्यावे लागतात, जे घालण्यास सभोवतालची परिस्थिती अनुमती देते.

नैतिक दबाव

आपल्या समाजात घरी कुटुंबात, नातेवाईक किंवा शेजाऱ्यांपर्यंतच ही गोष्ट मर्यादित नाही. नैतिक दबाव देण्याची अजूनही माध्यमे आहेत. जसे धर्म रक्षक, विद्यापीठ, रस्त्यावर चालणारे अनोळखी लोक, नेतेमंडळी, पोलिस इत्यादी. सामान्य आयुष्यात अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील, जिथे आवडते कपडे घालण्यावर प्रश्नचिन्ह उभी केली जातात.

* मागच्या वर्षी मे महिन्यात पुणे इथून अशी बातमी समजली की ५ पुरूषांनी एका महिलेला कारमधून खेचून बाहेर काढले आणि तिला मारझोड केली. कारण तिने आखुड कपडे घातले होते.

* जून, २०१४ मध्ये गोव्याचे लोकनिर्माण विभाग मंत्री सुधीन ढवळीकर यांचे म्हणणे असे की नाईट क्लबमध्ये तरूणींनी घातलेल्या आखुड कपड्यांमुळे गोव्याच्या संस्कृतीला धोका संभवतो. असे व्हायला नको, यावर आळा घातला पाहिजे.

* मागच्या वर्षी २५ एप्रिलला बंगळुरूमध्ये जेव्हा ऐश्वर्या सुब्रमण्यम्ने ऑफिसला जाण्यासाठी रिक्षा थांबवली, तेव्हा रिक्षा चालक श्रीकांतने म्हटले की माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. पण तुम्ही जे कपडे घातले आहेत ते योग्य नाहीत.

ऐश्वर्याने त्यावेळी गुडघ्यापर्यंत पांढरा सामान्य पोशाख घातला होता. हे ऐकून ऐश्वर्याला आश्चर्यच वाटले. तिने त्याला म्हटले की त्याने आपले काम करावे.

यावर श्रीकांत म्हणाला की आपल्या समाजात स्त्रियांनी व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत. असे शरीर प्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. याच दरम्यान आसपासचे इतर पुरुषही तिथे जमा झाले आणि श्रीकांतला साथ देऊ लागले. या घटनेने ऐश्वर्या इतकी विचलित झाली की तिला रडू कोसळले. नंतर तिने ही घटना फेसबुकवर शेअर केली.

* त्याच महिन्यात बंगळुरूचे एक प्राध्यापक एका मुलीला छोटे कपडे घातले म्हणून ओरडले. या विरोधात दुसऱ्या दिवशी पूर्ण वर्गाने शॉर्ट्स घातल्या.

आथिरा वासुदेवन या विद्यार्थिनीचे मत आहे की कॉलेजच्या प्राध्यापकांकडून अशा वर्तनाची अपेक्षा आम्ही बाळगत नाही. पण लोक बऱ्याचदा स्त्रियांना सभ्य कपडे घालण्याचा सल्ला देतात.

* देशाची राजधानी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजच्या नव्या प्रॉस्पेक्टसमधील नव्या नियमानुसार हॉस्टेलमध्ये मुलींसाठी ड्रेसकोड असावा असे सांगण्यात आले. मुलींनी याला कडाडून विरोध केला आहे.

* राष्ट्रीय टेक्सटाईल विद्यापीठातही एक नोटीस काढण्यात आली की मुलींनी जीन्स, टाईट्स, अर्ध्या बाह्यांचे किंवा स्लिव्हलेस कपडे घालू नयेत.

२५ वर्षीय फरहत मिर्जा, जे काउंसिल फॉर द अॅडवांसमेंट ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स, मॉट्रिअलच्या व्हाईस प्रेसिडंट आहेत, त्या बुरखा घालतात. त्यांच्या मते बुरखा वापरण्यामध्ये एकच चुकीचं आहे की बुरखा वापरणे हा अनेकदा स्त्रियांचा नाईलाज असतो. इच्छा नसताना कोणाला असे भाग पाडणे चुकीचे आहे. त्या मानतात की वेशभूषा प्रत्येकाला वेगळा अनुभव देऊ शकते. पोशाख हा प्रसंगानुरूप परिधान केला पाहिजे. जेणेकरून मर्यादाही राखली जाईल आणि स्वातंत्र्यसुद्धा. वास्तविक त्या बुरखा धार्मिक कट्टरता म्हणून वापरतात, पण आपला तर्क अग्रणी ठेवण्यासाठी स्वातंत्र्याचा आधार घेतात. हे अशाप्रकारचे स्वातंत्र्य आहे जसं की एखादा दलित आपल्यावर होणारे अत्याचार योग्य असल्याचं सांगतो. कारण मागच्या जन्मात मी पाप केले होते, हे बुरखा वापरणं आणि त्याला स्वातंत्र्याचं नाव देणं धार्मिक ब्रेनवॉशिंगचा एक नमूनाच आहे.

अस्सं सासर

एका स्त्रीच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल होतो तो तिच्या विवाहानंतर. दिनक्रमाबरोबरच त्यांचे राहणीमानसुद्धा बदलते. जर सासू आपल्या काळात गाउन घालत असेल तर सूनही वापरू शकते. जर सासू तिच्या तरुणपणी स्लिव्हलेस वापरत असेल तर सुनेला स्लिव्हलेस वापरण्याची परवानगी मिळते. अर्थात सुनेची फॅशन यावर अवलंबून आहे की सासर सुनेला फॅशन करायला किती मुभा देणार.

‘द मदर इन लॉ’ या पुस्तकाच्या लेखिका वीणा वेणुगोपाळ आपल्या पुस्तकात लिहितात की मुली आपल्या सासूचे मन जिंकण्यासाठी पंजाबी ड्रेस वापरतात, बांगड्या घालतात व तसेच वागण्याचा प्रयत्न करतात जसं सासूला आवडेल आणि हेच पहिले चुकीचे पाऊल असते.

सासूची आवड त्यांच्या काळानुसार होती आणि तुमची आवड आत्ताच्या काळाप्रमाणे आहे. तुमची वैयक्तिक स्टाइल दर्शवायला घाबरू नका. आजकाल तर बहुतेक सासरचे लोक नव्या काळातील पेहरावाबाबत सजग आहेत. भारीभक्कम ठेवणीतल्या साड्या आणि अनारकली डे्रस तुम्ही किती दिवस घालणार? तुमच्या सासरकडील लोकांनाही तुमची आवड कळली पाहिजे. यामुळे खोटे वागू नका. हवे असल्यास आधुनिक पेहरावासोबत भारतीय पारंपरिक दागिने घालण्यास हरकत नाही. जसे की कंगन, झुमके, पैंजण इत्यादी.

आत्मविश्वास वाढवा

आपल्या आवडीची फॅशन करता न येण्याचं मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. इच्छा असते पण हिंमत होत नाही. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती मनात खोलवर असते. पण लोकांचं तर कामच आहे, नावं ठेवणं. तुम्ही काहीही घातलं तरी समाजाच्या टिकेपासून वाचू शकणार नाही. तुम्ही सगळ्यांना खूश ठेवू शकत नाही. कोणी तरी तुमच्याबद्दल वाईट बोलणारच. मग तुम्ही  लहान स्कर्ट घाला अन्यथा अंगभर साडी नेसा. टिका होणारच असेल तर तुमच्याच आवडीचा परिधान करून निदान स्वत:ला तरी खुश का ठेवू नये?

फिगरची चिंता सोडा

आपल्या समाजात फॅशन करण्यासाठी एक निर्धारित फिगर असणे अति आवश्यक मानलं जातं. जर तुम्ही लठ्ठ आणि बेडौल असाल आणि तुम्ही जीन्स वापरली तर तुमच्यावर टिकेची झोड उठवली जाईल. याचा अर्थ बेढव महिलांना त्यांच्या मनानुसार फॅशन करण्याचा अधिकारच नाही का? अधिकार आहे. कारण सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तुमचा स्वत:चा आनंद. जर तुमचा पोशाख तुम्ही इतरांच्या आवडीनुसार निवडाल आणि हाच विचार करत राहाल की तुमचा बॉयफ्रेंड काय म्हणेल, पती काय विचार करेल, तर मग तुम्ही स्वत:विषयी कायम दु:खी राहाल. तुमच्या प्रतिमेबद्दल विचार करताना दुसऱ्यांच्या विचारांवर अवलंबून राहू नका. स्वत:बद्दल सकारात्मक विचार बाळगा. स्वत:ला सुंदर समजा. मग बघा, तुम्ही किती सेक्सी दिसाल.

मुंबईच्या गुंजन शर्माचे वजन त्यांच्या आवडत्या पोशाखात बाधा ठरत नाही. त्या म्हणतात, ‘‘हल्ली प्लस साइजचे कपडे सहज मिळतात. मी हरतऱ्हेची फॅशन करते. स्वत:ला मी एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी समजत नाही. फेसबुकवर माझ्या प्रत्येक छायाचित्राला मिळणाऱ्या असंख्य लाइक्स याचा पुरावा आहेत.’’

आयुष्य भरभरून जगा

आपल्याला हे आयुष्य एकदाच मिळाले आहे आणि आपण भरभरून जगले पाहिजे. उद्या काय होणार हे कोणी पाहिले आहे? आज दुनियेची चिंता करत बसलो तर भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येईल की आयुष्यात मी माझ्या आवडीचे कपडेही घातले नाहीत.

उत्सवप्रसंगी नवे प्रयोग करून पाहा

सणासुदीच्या प्रसंगी नव्या पद्धतीनं सजून पाहा. जर तुम्हाला पारंपरिक फॅशन आवडत नसेल तर तुम्ही फ्यूजन ट्राय करू शकता. जसं की लहंग्यावर पारंपरिक डिझाइनऐेवजी फुलांची प्रिंट किंवा जाळीचे काम. ब्लाउजचा गळा हॉल्टर नेक ठेऊ शकता किंवा बॅकलेस. यामुळे पूर्ण लुकच बदलून जाईल. याहीपेक्षा वेगळे म्हणजे ब्लाउजऐवजी पूर्ण बाह्यांचे जॅकेटही लहंग्याचा लुक बदलून टाकेल.

जर साडी किंवा लहंगाचोली आवडत नसेल तर त्याऐवजी कामदार स्कर्ट किंवा टॉपही परिधान करू शकता किंवा प्लाजोसोबत कुर्ता किंवा टॉप आणि उत्सवी वातावरण असल्यामुळे गळ्यात, कानात, हातात दागिने. सध्या धोतीसलवार आणि त्यावर छोटासा टॉप हा नवा ट्रेंड आहे.

फॅशन प्रत्येकासाठी काहीतरी वेगळी असते. याबद्दलचे उत्तम उदाहरण म्हणजे फिलाडेल्फियामध्ये राहणारी प्रिया आणि फरझाना. प्रिया जेव्हा तिथे साडी नेसते, तेव्हा विनाकारण आकर्षणाचा क्रेंदबिंदू बनायला तिला आवडत नाही. याउलट फरझानाला पाश्चिमात्य पोशांखांपेक्षाही सलवार कमीज अधिक आधुनिक भासतात. एकीकडे प्रियाला सर्वांमध्ये उठून दिसणं अजिबात पसंत नाही तर दुसरीकडे फरझानाला गर्दीमध्ये सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनायला खूप आवडतं. शिवाय तिला हे खूप सकारात्मक वाटतं.

मनासारखे कपडे वापरण्याचं स्वातंत्र्य सर्वांनाच मिळत नाही. जर तुम्हाला ते स्वातंत्र्य असेल तर मनापासून याचा उपभोग घ्या आणि जर नसेल तर प्रयत्न करा. विलंब होण्याआधी आपल्या मनाचे ऐका आणि आवडते कपडे परिधान करा.

धर्म असो किंवा पती किंवा कामातील सहकारी कुणालाही दबाव आणण्याचा अधिकार नाही. तुम्ही आवडती वस्त्र परिधान केल्यानंतर गावंढळ दिसा किंवा स्मार्ट हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें