आरोग्य परामर्श

– डॉ. यतिश अग्रवाल

प्रश्न : माझं वय ३५ वर्षं आहे आणि मी अविवाहित आहे. माझी मासिक पाळी १५ वर्षांपूर्वी सुरु झाली. सुरूवातीचे ६-७ महिने नियमित स्वरूपात येत राहिली. त्यानंतर अनियमित होऊ लागली, पण मी लक्ष दिलं नाही. आता माझं वजन वाढून ८० किलोग्रॅम झालं आहे. उलट माझी उंची ५ फूट १ इंच आहे. आता खुप वर्षांपासून मासिक पाळीसुद्धा येणं बंद झाली आहे. लग्नानंतर मला गर्भधारणेसाठी काही त्रास तर होणार नाही?

उत्तर : तुमच्या माहितीप्रमाणे स्पष्ट होतं की तुमच्या शरीरात लैंगिक हार्मोनल प्रणाली नीट काम करत नाहीए. प्रत्येक स्त्रीच्या देहात १ जैविक हार्मोनल घडयाळ टिकटिक करत असतं. ज्यामुळे दर २८-३० दिवसांनी तिचं शरीर एका लयबद्ध परिवर्तनातून जातं.

हे हार्मोनल घडयाळ तारुण्यात सुरु होतं. याची किल्ली मेंदूमध्ये असलेल्या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथींमध्ये असते. किशोरावस्थेत येताच त्यात काही विशिष्ट प्रकारचे यौन प्रेरक हारमोन्स तयार होणं सुरु होतं आणि त्यापासून प्रेरणा देणारे सिग्नल घेऊन डिम्ब ग्रंथी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार करू लागतात. याच हार्मोन्सच्या प्रभावामुळे दर महिन्यात डिम्ब ग्रंथींमध्ये एक नवा डिम्ब मॅच्युर होतो आणि डिम्ब ग्रंथीतून सुटून बाहेर येतो. याच हार्मोनल हालचालीमुळे महिन्या अखेर स्त्रीला मासिक स्त्राव होतो.

तुमच्या शरीरात हे जैविक चक्र सुरूवातीपासूनच एखाद्या कारणामुळे लय पकडू शकलं नाही. तुमच्या आईवडिलांनी आणि तुम्ही याची खूप पूर्वीच तपासणी केली असती आणि योग्य वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं. आता यात सुधार होणं कठीण वाटतं आहे. परंतु तरीही तुम्ही एखाद्या गायनोकॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली तुमची रीतसर तपासणी करू शकता.

आता लग्न आणि त्यानंतर प्रेग्नन्सीचा विचार करता, तर स्वाभाविक आहे की या सगळया गडबडीत ही इच्छा पूर्ण होणं सोपं नाही. स्त्रीच्या शरीरात वेळेत मासिक स्त्राव होणं ही गोष्ट दर्शवते की तिची प्रजनन व्यवस्था नीट काम करत आहे. जर या  नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम झाला तर अपत्य सुखाची इच्छा पूर्ण होणं कठीण जातं. तरीही प्रजननाच्या नव्या टेक्निकच्या मदतीने प्रयत्न केला जाऊ शकतो.

प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. मला २ मूलं आहेत ५ वर्षांपूर्वी मी गर्भनिरोधासाठी कॉपर टी बसवली होती. याची वेळ संपल्यावर मी त्या जागेवर नवी कॉपर टी बसवली. परंतु गेल्या काही दिवसांपासून जेव्हा मी मूत्रविसर्जनासाठी जाते तर मला प्रत्येक वेळी योनिमार्गावर जळजळ होते. या जळजळीचा सबंध कॉपर टी लावण्याशी आहे का? मी काय करायला हवं?

उत्तर : तुमच्या लक्षणांवरून हे स्पष्ट दिसून येतं की तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं आहे. अशा वेळेस तुमच्या युरीन कल्चरची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि शक्य तितक्या लवकर अँटिबायोटिक औषधं सुरु करायला हवी. औषधाचा परिणाम होण्यासाठी कमीतकमी १०-१४ दिवस ते नियमित घेणं आवश्यक आहे. औषध सुरु होताच २-३ दिवसात आराम वाटेल.

यादरम्यान पाणी आणि इतर द्रव पदार्थ जेवढे जास्त पिता येतील तेवढे प्या. यामुळे मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. जास्त मूत्र तयार झाल्याने मूत्र व्यवस्थेची वेगाने सफाई होते आणि इन्फेक्शन निर्माण करणारे बॅक्टेरिया मूत्राबरोबर शरीराच्या बाहेर जात राहतात.

औषधांचा डोज पूर्ण झाल्यावर परत युरीन कल्चर तपासून घ्या, जेणेकरून ते स्वच्छ होईल आणि युरिनरी ट्रॅकमध्ये काही अपायकारक बॅक्टेरिया तर राहिले नाही ना हे कळेल. काही केसेसमध्ये अँटिबायोटिक औषधं जास्त दिवस घ्यायची गरज भासू शकते.  औषध घेण्यात चालढकल करणं बरोबर नाही. त्यामुळे किडनीजवर  परिणाम होऊ शकतो.

आता कॉपर टी बाबत म्हणाल, तर हा मात्र योगायोगच आहे की ज्या काळात तुम्ही कॉपर टी लावली त्याच काळात तुम्ही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनशी सामना करत आहात, परंतु हे पण शक्य आहे की कॉपर टी लावताना योग्य प्रकारे अँटिसेप्टिक खबरदाऱ्या न पाळल्या गेल्याने इन्फेक्शन झाले असेल.

प्रश्न : मी ४५ वर्षाची महिला आहे. २६ वर्षांची असताना माझं लग्न झालं. वैवाहिक जीवन ठीकठाक चाललं होतं की अचानक मला गर्भाशयाचा टीबी झाला. नंतर १८ महिने मला टीबीची औषधं चालू होती. त्यानंतर डॉक्टरांनी मी बरी झाली आहे हे सांगून माझी औषधं बंद केली. परंतु अजूनही मला मासिक  पाळीच्या वेळेस खूप वेदना होतात आणि योनिमार्गातून पांढरा स्त्राव होतो. दरम्यान जेव्हा मी कधी अँटिबायोटिक्स औषध घेते तेव्हा काही दिवस आराम पडतो, पण काही दिवासांनी पुन्हा तिच समस्या सुरु होते, डॉक्टरकडे मी गर्भाशय काढण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी सरळ नकार दिला. तुमचं काय मत आहे?

उत्तर : एखाद्या अनुभवी आणि योग्य अशा गायनोकॉलॉजिस्टला दाखवणं योग्य राहील. आपली तपासणी करा आणि डॉक्टरला आवश्यक वाटलं तर पेल्वीस म्हणजे पोटाच्या खालच्या भागाची अल्ट्रासाउंड सोनोग्राफी करून घ्या.

योनीतुन पांढरा स्त्राव जाणे, मासिक पाळीच्या वेळेस वेदना होणे आणि अँटिबायोटिक्स घेतल्यावर आराम पडणे याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला सतत इन्फेक्शन होत आहे.

जर योनीत इन्फेक्शन असल्याचे समजले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या पतीचेसुद्धा योग्य उपचार करा. ही सावधगिरीन बाळगल्यास तुम्हाला हे इन्फेक्शन सतत होऊ शकतं.

आता गर्भाशयाच्या टिबीबद्दल बोलायचं झालं तर १८ महिन्यांच्या यशस्वी उपचारांनंतर त्याच्या पुनरावृत्तीचा धोका जवळपास नाहीच आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें