कोरोना काळातील फूड हायजीन टीप्स

* पारुल भटनागर

बऱ्याचदा असे पहायला मिळते की, आपल्या चुकीच्या सवयीमुळेच आपण आजारी पडतो. खाण्यापिण्यासंदर्भातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष, दूषित जेवण जेवणे इत्यादी कारणांमुळे बॅक्टेरिया किंवा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करुन आपल्याला आजारी पाडतात. संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की, दूषित खाण्यातून बॅक्टेरियांचा शरीरात शिरकाव झाल्यानंतर काहीच तासांनी त्यांची संख्या वेगाने वाढते ज्यामुळे पोटदुखी, उलटी किंवा ताप येतो. ही समस्या गंभीर झाल्यास आपल्या इम्युनिटीवर म्हणजे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. आता जेव्हा संपूर्ण जग कोविड -१९च्या समस्येशी लढा देत आहे तेव्हा या समस्येकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशावेळी तुम्ही घरी जेवण बनवा किंवा बाहेरुन खाण्यापिण्याच्या वस्तू आणा, प्रत्येक वेळी विशेष करुन स्वच्छतेकडे लक्ष द्यायलाच हवे, अन्यथा जरासाही बेजबाबदारपणा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नुसार, जगभरात दरवर्षी दूषित अन्न खाल्ल्यामुळे १० पैकी १ व्यक्ती आजारी पडते आणि दरवर्षी ४ लाख २० हजार लोकांचा मृत्यू होतो.

अशावेळी हे माहिती करुन घेणे खूपच गरजेचे आहे की, फूड हायजीन म्हणजे अन्नपदार्थांच्या सुरक्षेकडे लक्ष देऊन आपण स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे कसे लक्ष देऊ शकतो :

फळे आणि भाजीपाला स्टेरिलाईज कसा करावा?

फळे आणि भाज्या वापरापूर्वी चांगल्या प्रकारे धुतल्या न गेल्यास तुम्ही आजारी पडू शकता. आता तर कोरोना काळात त्यांना घरात आणताच लगेच धुवून त्यानंतर स्टोअर करणे गरजेचे आहे, जेणेकरुन संक्रमित व्यक्तीकडून फळे, भाजीपाल्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या विषाणूच्या संपर्कात येण्यापासून तुम्ही वाचू शकाल. सोबतच फळे, भाजीपाल्यात ज्या कीटकनाशकांचा वापर केला जातो त्याचा प्रभावही या गोष्टी धुतल्यामुळे दूर करता येईल.

कसे कराल स्वच्छ?

* प्रत्येक भाजी स्वच्छ पाण्याखाली धरुन चांगल्या प्रकारे चोळून साफ करा. यामुळे त्यावरील किटाणू निघून जातील. फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननुसार, फळे, भाजीपाला धुण्यासाठी एखाद्या चांगला डिटर्जंट किंवा साबण वापरण्याची गरज नाही, कारण त्यात केमिकल्स असतात. त्यामुळे तुमच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडून आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याउलट केवळ स्वच्छ पाण्याने फळे आणि भाज्या धुतल्यास बॅक्टेरिया मरतात. पण हो, या गोष्टीकडे लक्ष द्या की भाजीपाला धुण्याआधी आणि नंतर स्वत:चे हात स्वच्छ धुवा.

* फळे आणि भाज्या स्वच्छ धुण्यासाठी व्हिनेगर, बेकिंग पावडर खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही कोमट पाण्यात हे दोन्हीही समान प्रमाणात घेऊन त्यात फळे, भाज्या २० मिनिटे ठेवून द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून सुकवा व स्टोअर करा.

* हळद, व्हिनेगर आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यानेही तुम्ही फळे, भाज्या धुवू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या कमीत कमी २० मिनिटे या पाण्यात ठेवाव्या लागतील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून सुकल्यानंतर स्टोअर करा. लक्षात ठेवा, चांगल्या परिणामासाठी तिन्ही समप्रमाणात घेऊन त्यात लिंबाच्या रसाचेही काही थेंब टाका.

किराणा सामान स्वच्छ करणे गरजेचे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ग्रोसरी म्हणजे किराणा सामानामुळे विषाणूचा संसर्ग पसरण्याचा धोका खूपच कमी असतो. तरीही या महामारीच्या काळात जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी कमीच आहे. अशावेळी आपण स्वत:ला बाहेर जाण्यापासून तर रोखू शकतो पण, खाण्यापिण्यासाठी किराणा सामान घ्यावेच लागते. त्यामुळे एकतर तुम्ही ते स्वत: घेऊन या किंवा ऑनलाइन मागवा. सामान आल्याबरोबर तसेच्या तसे स्टोअर करण्याची सवय बदला. उलट ग्रोसरी आणल्यानंतर ती थोडावेळ एकाच ठिकाणी ठेवा. वाइप्स अल्कहोलयुक्त सॅनिटायजरने साफ करा. यामुळे त्यावरील बॅक्टेरिया नष्ट होण्यासोबतच विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यताही जवळजवळ संपुष्टात येईल.

पॅकिंग केलेले सामान मागवण्याचाच प्रयत्न करा, कारण मोकळे सामान जास्त लोकांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते. याउलट पॅकिंग सामानाबाबत अशा प्रकारची शक्यता फारच कमी असते.

जेव्हा बाहेर जेवणाची ऑर्डर द्याल

अनेकदा घरचे जेवण जेवल्याने कंटाळा येतो आणि मग बाहेरचे खाणे मागवले जाते. अशावेळी ते लगेच खाऊ नका. असे सांगितले जाते की, प्लॅस्टिकवर कोरोना विषाणू ७२ तासांपर्यंत जिवंत राहू शकतो, पण आतापर्यंत असे काहीच सिद्ध झालेले नाही की जेवण, खाण्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग पसरतो. तरीही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

म्हणूनच जेव्हा तुम्ही बाहेरून जेवण ऑर्डर कराल तेव्हा कॉण्टॅक्टलेस म्हणजे संपर्कविरहित डिलिव्हरी आणि ऑनलाइन पेमेंटचाच पर्याय निवडा. ऑर्डर आल्यानंतर ते जेवण आपल्या भांडयांमध्ये काढून गरम करायला विसरू नका. जेवणाची ऑर्डर घेताना आणि ती पाकिटे उघडल्यानंतर हात स्वछ धुवा. स्वयंपकाघरात जेथे जेवण ठेवाल ती जागाही चांगल्या प्रकारे डिसइन्फेक्टेडने स्वच्छ करा. अशा प्रकारे खाण्याच्या हायजीनकडे लक्ष देऊन स्वत:ला सुरक्षित ठेवता येईल.

दुधाची पिशवी कशी स्वच्छ कराल?

दूध हे अत्यावश्यक फूड आयटमपैकी एक समजले जाते. त्याच्याशिवाय बहुतांश घरातील दिवसाची सुरुवात होत नाही. पण आता प्रश्न असा आहे की, कोरोना काळात इतक्या अत्यावश्यक दुधाचा काळजीपूर्वक वापर कसा करावा, जेणेकरुन सुरक्षेसोबतच शरीराला पोषक तत्त्वेही मिळू शकतील.

‘फूड सेफ्ट अॅण्ड स्टॅण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया’ने दूधाची सुरक्षा आणि हायजीनसंदर्भात काही टीप्स शेअर केल्या आहेत. त्यानुसार, जेव्हा तुम्ही दुधाची पिशवी घ्याल तेव्हा सर्वात आधी ती पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर ती सुकू द्या किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने कोरडी करा, जेणेकरुन त्याचे पाणी भांडयात पडणार नाही.

कीटकांना घरात आश्रय देऊ नका

घरात कीटक राहू नयेत यासाठी पेस्ट कंट्रोल करणे खूपच गरजेचे आहे, कारण फूड हायजीनसाठी हे आवश्यक समजले जाते. कीटक जास्त करुन फ्रिजच्या कोपऱ्यात, स्वयंपकाघर, तेथील कपाट इत्यादी ठिकाणी लपून राहतात. कधी ते स्वयंपाकघरात फिरताना दिसतात तर कधी भांडयात जाऊन बसतात. त्यामुळे तुम्हाला फूड पॉयजनही होऊ शकते. तुमची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. प्रत्यक्षात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी इम्युनिटी वाढवणे खूपच गरजेचे आहे. म्हणूनच वरचेवर अशा सर्व जागा स्वच्छ करा.

स्वच्छ पाण्याचाच वापर करा

फूड हायजीनसाठी जेवण बनवण्यापूर्वी स्वच्छ पाण्याचा वापर करणे खूपच गरजेचे आहे, कारण दूषित पाण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. यामुळे उलटी, डायरिया आणि पोटासंबंधी समस्या निर्माण होतात. म्हणूनच जेव्हा जेवण बनवाल त्याआधी भाजीपाला, डाळी स्वच्छ पाण्यात धुवायला विसरू नका.

स्वयंपाकगृह ठेवा स्वच्छ

खाण्याच्या हायजीनकडे लक्ष देण्यासोबतच स्वयंपाकघराच्या स्वच्छतेकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे,  कारण कुटुंबाचे आरोग्य त्यावरच अवलंबून असते. त्यामुळेच हे गरजेचे आहे की, दररोज त्या सर्व गोष्टी स्वच्छ करा जिथे बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. जसे की, प्लेट, ग्लास, वाटी इत्यादी वापरल्यानंतर हे सर्व लगेच धुवून ठेवा. वापरात नसले तरी वरचेवर धुवा. सोबतच प्रत्येक वेळी वापरल्यानंतर विळी, चाकू डिसइन्फेक्टेटने व्यवस्थित धुवा. स्पंज आणि स्वयंपाक घरातील कपडयांना रोज रात्री गरम पाण्यात डिसइन्फेक्टेट घालून १५ मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे ते स्वच्छ होण्यासोबतच त्यातील किटाणूही नष्ट होतात. अशाच प्रकारे संपूर्ण स्वयंपाकघरही चांगल्या कपडयाने नेहमी स्वच्छ करा, कारण स्वयंपाकाची प्रत्येक गोष्ट स्वयंपाकघरातच असते आणि त्याला सतत हात लागल्यामुळे त्यावरील किटाणू खाद्यपदार्थात जाऊन आपल्याला आजारी पाडू शकतात. सिंक गरम पाणी आणि साबणाने रोज स्वच्छ करा. आठवडयातून एकदा स्वयंपाकघरातील प्रत्येक कोपरा, भांडी ठेवायचे कपाट, स्टोव्ह इत्यादी वस्तू चांगल्या प्रकारे डिसइन्फेक्टेड किंवा गरम पाण्यात साबणासह लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून व्यवस्थित स्वच्छ करा. यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागेल आणि न दिसणारे बॅक्टेरिया मरुन जातील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें