* प्रतिभा अग्निहोत्री
आपल्या मुलांच्या आपापसांतील भांडणामुळे रश्मी नेहमीच इतकी त्रासून जाते की कधीकधी ती रागाने म्हणू लागते की तिने दोन मुलांना जन्म देऊन आयुष्याची मोठी चूक केली आहे. फक्त रश्मीच नाही, तर आजकाल प्रत्येक घरातले पालक मुलांच्या रोज-रोजच्या भांडणाने वैतागून जातात. एकतर कोरोनामुळे सर्व शाळा बर्याच दिवसांपासून बंद आहेत, वरून लॉकडाउन असल्यामुळे मुलेही त्यांच्या घरात स्वतःला कोंडून घेण्यास विवश आहेत. खरं तर, मुलांमध्ये भांडणे ही त्यांच्या योग्य विकासाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु बर्याचदा घरातील कामात गुंतलेल्या माता अस्वस्थ होतात आणि स्वतः ही क्रोधाने बेभान होतात, ज्यामुळे ही समस्या गंभीर रूप धारण करते. येथे काही टिप्स आहेत, ज्या अवलंबून आपण मुलांमधील संघर्ष सहजतेने सोडवू शकता.
1. मुलाच्या कामाची, वागणुकीची आणि अभ्यासाची तुलना बाहेरील किंवा घरातील इतर मुलांबरोबर कधीही करु नका कारण प्रत्येक मुलाचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व असते.
2. मुलांचे वय कितीही असो, आपण त्यांना त्यांच्या वयानुसार घरगुती कामे करायला लावली पाहिजेत, यामुळे ते व्यस्तही राहतील आणि कामे करण्यास देखील शिकतील.
3. जर मुल तुम्हाला काही सांगत असेल तर त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्या, मग त्याला समजवा मध्येच त्याला टोकून शांत करण्याचा प्रयत्न करू नका.
4. टी. व्ही आणि खेळणी मुलांमध्ये भांडणाचे मुख्य कारण असतात, म्हणून त्यांच्यात खेळणी वाटून द्या आणि टीव्ही पाहाण्यासाठी वेळ निश्चित करा.
5.ते कितीही भांडले तरी हरकत नाही, परंतु आपण क्रोधाने बेभान होऊन आपला हात उचण्याची किंवा आरडा-ओरड करण्याची चूक करू नये, अन्यथा तुम्हाला पाहून ते सुद्धा आपापसांत तसंच वागतील.
6. आपल्या मुलास कुठल्याही पाहुण्यासमोर किंवा इतर मुलांसमोर दटावणे टाळा…नंतर त्याला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
7. आपण स्वतःही एकमेकांशी भांडण करू नये आणि मुलांसमोर आदर्श उदाहरण सादर करावे कारण बर्याच संशोधनात असे सिद्ध झाले आहे की मुले त्यांच्या पालकांचे अनुकरण करतात.