* सोमा घोष
फिटनेस राखणे हे फार गरजेचे आहे. अनेक महिला या मोसमात सुस्त होतात. मग त्या गृहिणी असोत किंवा नोकरदार महिला. मॉन्सूनमध्ये बाहेर पडून वर्कआउट करणं कोणाला फारसे रूचत नाही. अशामुळे पचनशक्ती कमकुवत होते आणि याबरोबरीनेच अनेक आजारही उद्भवतात. अशावेळी जर सोप्या फिटनेस टीप्स मिळाल्या तर घरी वर्कआउट करणेही सोपे होऊन जाईल.
मुंबईतील साईबोल डान्स अॅन्ड फिटनेस सेंटरच्या फिटनेस एक्सपर्ट मनीषा कपूर अनेक वर्षांपासून महिलांना ट्रेनिंग देत आहेत. मनीषाने सुचवलेल्या फिटनेस टीप्स पुढीलप्रमाणे :
- या दमट ऋतुत घाम जास्त येतो. त्यामुळे पाणी जास्त प्यावे. दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी जरूर प्यावे.
- या ऋतुत काकडी, मोसमी फळे ज्यात कलिंगड, टरबूज इ. फळे जास्त प्रमाणात खावीत. यामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वांधिक असते.
- वर्कआऊट एंजॉयमेंटच्या रूपाने करावा. फक्त व्यायाम म्हणून करू नये. जर तुम्हाला डान्स आवडत असेल तर तोही करू शकता. कमीत कमी १५ ते २० मिनिटे वर्कआऊट करा.
- उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बाहेर जाणे शक्य नसते. त्यामुळे घरी राहूनच बॉडी वेट एक्सरसाइज, स्टे्रचेस इ. केले जाऊ शकते.
- वर्कआऊटच्या आधी प्रॉपर वॉर्मअप करायला विसरू नये अन्यथा पेशींना हानी पोहोचू शकते.
- वर्क आऊटनंतर कूल डाऊन पोजीशनमध्ये अवश्य राहा.
- तसे तर तुम्ही कधीही वर्कआऊट करू शकता, पण सकाळी आणि संध्याकाळी वर्कआऊट करणे चांगले असते. यावेळी वातावरण थोडे थंड असते.
- वर्कआऊटच्या दरम्यान श्वास नेहमी नाकानेच घ्यावा. यामुळे तुमचा वेग थोडा मंदावेल. पण तुमच्या कॅलरीज न थकताच बर्न होतील.
- वर्कआऊटच्यावेळी नेहमी फिक्या रंगाचे आरामदायक कपडे घालावेत.
- वर्कआऊट करताना जर थकल्यासारखे वाटले तर ताबडतोब थांबा आणि पंख्याखाली निवांत बसा.
- व्यायाम करताना मन शांत ठेवण्यासाठी एखादे आवडीचे गाणे ऐकू शकता. यामुळे मनात काही इतर विचारही येणार नाहीत. कारण दिवसभर जरी तुम्ही पळापळ करत असता अणि त्यावेळी एखादे काम उरकण्याचा तुमचा मानस असतो. अशावेळी वर्कआउट करताना तुमचा मेंदू हाच ताण अनुभवतो.
- कुटुंबासोबत किंवा मैत्रीणींसोबतही तुम्ही व्यायाम करू शकता. यामुळे आळस येणार नाही व फिटनेस रूटिन निर्माण होईल.
- या मोसमात योग्य डाएट जरूरी असतो. मिठाई, तळलेले तेलकट पदार्थ टाळावेत. आहारात फळे, भाज्या यांचा समावेश करावा.
- पावसात बाहेर गेलात तर केळी, टरबूज, सफरचंद इ. कापून स्वत:जवळ ठेवावे. याशिवाय लिंबूपाणी, कैरीचे पन्हे, ताक, कोकम सरबत हेही ठेवू शकता.
- बाहेर पडताना पाण्याची बाटली अवश्य जवळ बाळगावी. या पाण्यामध्ये पुदिन्याची पाने, काकडी आणि लिंबू लहान आकारात कापून टाकावेत. पाणी प्यायल्यानंतर त्यामध्ये या सर्वांचा स्वाद आणि थंडपणा येतो. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
- जंक फूडमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते, विशेषत: वेफर, लोणचे आणि चटण्या कमी खाव्यात.
- जेवण बनवताना कोथिंबीर, पुदिन्याची पानं, आणि बडिशेपचा वापर अधिक प्रमाणात करावा. कारण यामुळे शरीर थंड राहतं. गरम मसाल्यांचा वापर कमी करावा.
- बराच वेळ कापून ठेवलेली फळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही खाऊ नयेत. कारण या मोसमात जीवजंतूची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते.
- भाज्या शिजवण्याआधी व्यवस्थित धुवून घ्या. गरज पडल्यास कोमट पाण्यात मीठ घालून त्यात भाज्या धुवून घ्याव्यात.
- ७-८ तास जरूर झोपा.
- या ऋतुत एखादा छंद जोपासण्याचा प्रयत्न करावा.
- बाहेरून घरी येताच मेडिकेटेड साबणाने सर्वप्रथम हातपाय धुऊन स्वत:ला फ्रेश ठेवावे. वैयक्तिक स्वच्छतेसाठी हे गरजेचे आहे.
- या मोसमात पायांकडे विशेष लक्ष द्यावे लागते, कारण पावसात बाहेरील घाणेरड्या पाण्यामुळे पायाच्या बोटांना इन्फेक्शन होऊ शकते. पाय कोरडे राहू द्या. गरज पडल्यास बोरिक अॅसिड पावडर पायाला लावावी.
- विनाकारण पावसात भिजणे आजाराला आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे याबाबत काळजी घ्या.
- वातावरण जरी खराब असले तरी वेळ चांगला जावा म्हणून आवडीचे संगीत ऐकावे. पुस्तके वाचावीत आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहते.
आजपासूनच या टीप्स अंमलात आणा आणि पावसाच्या शिडकाव्यासोबत आनंदी आणि सुदृढ राहा.