स्त्रीला गुलाम बनविणाऱ्या धार्मिक कथा

* सरस्वती रमेश

लहानपणी आई अनेकदा एक कथा सांगत असे. एका सती महिलेच्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला होता. सती पतीला टोपलीमध्ये बसवून नदीच्या काठी स्नान घालण्यासाठी नेत असे. एके दिवशी तिथल्या नदीकाठी एक वेश्या स्नान करीत होती. कुष्ठरोगी त्या वेश्येच्या प्रेमात पडला. त्यानंतर कुष्ठरोगी उदास राहू लागला. जेव्हा पत्नीने त्याच्या दु:खाचे कारण विचारले तेव्हा कुष्ठरोग्याने तिला सर्वकाही सांगितले. पत्नीने पतीला धीर दिला आणि त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर दररोज पहाटे सती स्त्री गुप्तपणे त्या वेश्याच्या घरात शिरायची आणि तिची सर्व कामे करून परत यायची. घरातील सर्व कामे कोण करते म्हणून वेश्या आश्चर्यचकित होती. एक दिवस वेश्याने सती स्त्रीला पकडले आणि तिला कारण विचारले. जेव्हा त्या महिलेने तिला तिच्या पतीच्या प्रेमाबद्दल सांगितले तेव्हा वेश्याने त्याला घेऊन आणण्यास सांगितले. ती स्त्री आनंदाने घरी गेली. तिने नवऱ्याला ही बातमी सांगितली. तिने पतीसाठी नवीन कपडे काढले आणि अंघोळ घालून त्याला वेश्याच्या घरी नेण्यासाठी नदीकडे चालू लागली. वाटेत काही क्षणांसाठी टोपली तिथेच झाडाखाली उतरवून ती विश्रांती घेऊ लागली. तिच्या पतीच्या कुष्ठरोगी देहातून वास येत होता. तेथूनच काही साधू-संत जात होते. साधूंना दुर्गंधी सहन झाली नाही तेव्हा त्यांनी शाप दिला की ज्या जीवापासून ही दुर्गंधी येत आहे तो सूर्यास्त होण्याबरोबरच मृत्यूला प्राप्त व्हावा.

सतीने त्यांचा आवाज ऐकला आणि नंतर सूर्याकडे वळून म्हणाली, ‘‘मी बघतेच की सूर्य माझ्या इच्छेविरुद्ध कसा अस्त होतो ते.’’

कथेनुसार स्त्रीच्या सतीत्वात परम शक्ती होती, ज्यासमोर सूर्यदेवालाही झुकावे लागले आणि सूर्य तिथल्या तिथेच थबकला.

अनेक स्त्रियांनी ही कहाणी आपल्या वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यात ऐकली असेल. वास्तविक, ही केवळ एक कथा नाही तर आपल्या धार्मिक कथा-गोष्टींमधून पाजल्या जाणाऱ्या बाळगुटीचा एक नमुना आहे. बहुतेक धार्मिक कथा-गोष्टींमध्ये नैतिक शिकवण आणि प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रणालींची बाळगुटी स्त्रियांनाच पाजली जात राहिली आहे.

स्त्रियांसाठी वर्षातील बहुतेक दिवस निर्जल व्रत, उपवासाचे कर्मकांड आहे, परंतु पुरुषांनी नेहमीच उपासाच्या आसनावर विराजमान रहावे. कथेच्या माध्यमातून महिलेला तिचे सतीत्व शिकवले गेले आहे, जर पती कुष्ठरोगी झाला तर त्याची सेवा करून आणि पती कोणाच्या प्रेमात पडला तर त्याला त्याच्या प्रेमिकेशी भेटवून त्या स्त्रीला सती आणि पतिव्रता यासारख्या नावांनी सुशोभित केले जाते. तिच्याकडून कोणतीही कठोर परीक्षा घेतली जाऊ शकते.

धार्मिक कथांचे पाठ

या कथा-कहाण्या स्त्रियांची स्वतंत्र सत्ता व अस्तित्व स्वीकारतच नाहीत.

मनुने तर असेही म्हटले आहे :

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।

पुत्रो रक्षति वार्धक्ये न स्त्री स्वातंत्र्यमर्हंति॥

म्हणजे स्त्रीला मुक्त सोडले जाऊ नये. बालपणात वडील, तारुण्यात पती आणि त्यानंतर मुलाच्या स्वाधीन ठेवले पाहिजे.

केवळ हिंदू धर्माच्या कथांमध्येच नव्हे तर यहुदी, इस्लामच्या धार्मिक कथांमध्येही ती स्त्री असल्यामुळे अत्याचाराला बळी पडली आहे.

इस्लामशी संबंधित कथांमध्ये महिलांना आपल्या पतीची सेवा आणि पडद्यात राहण्याचा सल्ला बहुतेक वेळा मिळतो. त्याचप्रमाणे २ स्त्रियांची साक्ष १ पुरुषाच्या बरोबरीची मानली जाते.

बहुतेक धार्मिक कथा-कहाण्यामध्ये महिलांना हाच धडा शिकविला जातो की पतीची सेवा करण्यापासून त्याच्या लैंगिक इच्छेची पूर्तता करणे हे प्रत्येक स्त्रीचे परम कर्तव्य आहे. स्त्रियांना पतिव्रता, नवऱ्याचे अनुसरण करण्याची आणि प्रत्येक परिस्थितीत मर्यादेचे पालन करण्याची शिकवण दिली जाते. पावलोंपावली महिलेच्या सहनशक्तीच्या परीक्षेचा उल्लेख मिळतो.

लैंगिक असमानतेने भरलेल्या या कथा-कहाण्या किंवा प्रवचने ऐकून स्त्रिया स्वत:ला निकृष्ट दर्जाचे मानू लागतात. आयुष्यभर या कथा-कहाण्यांचा त्यांच्या मनावर खोलवर प्रभाव टिकून राहतो.

रामायण हा एक असा धार्मिक ग्रंथ आहे, जो प्रत्येक घरात बघावयास मिळतो. रामायण कथेच्या प्रभावाबद्दल विचार करतांना रामायण मालिकेच्या वेळी घरांमध्ये पसरलेल्या शांततेची आठवण उत्स्फूर्तपणे येते. याच रामायण कथेत सीता गर्भवती असताना मर्यादेच्या नावावर जंगलात सोडली गेली होती. तरीही राम निर्दोष असल्याचे वर्णन केले गेलं. रामायण सीतेच्या वेदनेबद्दल शांत आहे. हीच कहाणी रामलीलेच्या माध्यमातून निरक्षर महिलांपर्यंत पोहोचते.

त्याचप्रमाणे महाभारतात कौरवांच्या सभेत जुगारात आपल्या पत्नीला डावावर लावण्याची कहाणी आहे. जुगारात द्रौपदीला गमावण्याचा व निर्वस्त्र होण्याचा हुकूम ऐकूनही पती गप्प बसल्याचा उल्लेख आहे. ही कसली सभ्यता होती, जिथे राजाच्या सभांमध्ये बसलेली प्रत्येक उच्चपदस्थ व्यक्ती एका स्त्रीच्या शोषणावर मौन बाळगुन आहे? द्रौपदीने ओरडून-ओरडून मदत मागितल्यानंतरही दुर्योधनाचा लहान बंधू विकर्णखेरीज कोणत्याही शक्तिशाली सदस्याचे मौन तुटत नाही.

प्रकरण फक्त रामायण किंवा महाभारताच्या कथेपुरतेच मर्यादित नाही. महिला वर्षभर जितके काही व्रत-उत्सव करतात त्यांच्या कथांमध्ये लैंगिक फरक स्पष्ट झळकतो. करवाचौथ, हरतालिका तीज व्रत, वट सावित्री पूजा अशा सर्व उपवासांच्या कथांमध्ये महिलांचे स्तर कमी लेखून प्रस्तुत केले गेले आहेत. ऋषि पंचमी व्रताच्या कथेनुसार विदर्भ नावाच्या ब्राह्मणाच्या कन्येच्या शरीरात यामुळे किडे पडले, कारण मासिक पाळी असूनही तिने स्वयंपाकघरातील भांडयांना स्पर्श केला होता.

मासिक पाळीचा शाप

या प्रकारच्या कथा स्त्री होण्याला एखाद्या शापाप्रमाणे दर्शवितात आणि त्यांच्या मासिक चक्राला पापी कृत्यासारखे आच्छादित करतात. अशा कथांमुळेच स्त्रिया मासिक पाळीला त्यांच्या शरीरात एखाद्या विकारासारखे स्वीकारतात आणि एखाद्या दोषाप्रमाणे आपल्या आयुष्यात घेऊन जगतात. धार्मिक कथांमध्ये मासिक पाळीशी संबंधित हजारो नियम आहेत, त्यातील काही नियम आजही महिला पाळत आहेत. या नियमांचे कोणतेही तार्किक आधार किंवा ठोस कारण दिसून येत नाही, परंतु या नियमांचे पालन करतांना स्त्री स्वत:ला निकृष्ट निर्मिती म्हणून अवश्य मानू लागते.

स्त्री शरीराची शुद्धता

धार्मिक कथा विश्व स्त्री शरीराच्या शुद्धतेवर इतके अधिक केंद्रित आहे की जर तिचे शील-भंग इच्छेने किंवा अनिच्छेने झाले असेल तर ते मृत्यूच्या बरोबरीचे मानले जाते. असे थोडेच अपवाद असतील, ज्यात स्त्रीचे शील-भंग होऊनही तिला सारे अधिकार देण्यात आले असतील. तिचे मन गौण मानले जाते. याचा परिणाम असा झाला की ज्या मुलींचे इच्छेने वा अनिच्छेने शील-भंग झाले त्या पश्चातापाने भरल्या गेल्या. कधी-कधी त्यांनी शापित होऊन दगड बनणे स्वीकार केले तर कधी अग्निमध्ये स्वत:ला झोकून देणे.

कुमारिका आणि कुंवाऱ्या शरीराची संकल्पना या कथांमधून निघून आपल्या समाजात अशा प्रकारे पसरली आहे की मुलीसाठी कुंवारेपण आणि पवित्रताच तिच्या सर्व योग्यतांचा आधार बनून जाते. कुंवारेपणाची ही संकल्पना बरेच समाज आणि धर्मांमध्ये बालविवाहाच्या कुप्रथेचे कारण बनली. शिक्षणाचा प्रचार-प्रसार असूनही ही वाईट प्रथा आजही बऱ्याच ठिकाणी सुरू आहे, तिचा अधिकतर दुष्परिणाम बाल वयात गर्भवती होणाऱ्या मुलींच्या वाटयाला येतो.

नात्यांचे वेगवेगळे अर्थ

आपल्या धार्मिक कथांमध्ये एखाद्या राजाच्या २ किंवा ४ राण्या आणि एखाद्या दुसऱ्या सौंदर्यवतीशी संबंध सामान्य गोष्टी आहेत. यासाठी त्याला ना खेद असतो, ना ही समाजासाठी जबाबदार. परंतु जर एखाद्या स्त्रीने लग्नानंतर पर पुरुषाशी संबंध स्थापित केले तर ती केवळ छळाचाच नव्हे तर सामाजिक बहिष्काराचादेखील बळी ठरते. पुरुष कामवासनेच्या अधीन होऊन संबंध स्थापित करतो, परंतु हेच काम जर स्त्री करत असेल तर तिला समाजात व्यभिचारी, चारित्र्यहीन इत्यादी नावे दिली जातात.

पत्नीचा सहज त्याग

धार्मिक कथांमध्ये पत्नीचा त्याग करणे सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक पावलोपावली बायकोला नाकारले जाते, त्याग केली जाऊ शकते, परंतु पुरुषाचा त्याग करणारी स्त्री सहसा आपल्या धार्मिक कथांमध्ये जन्माला येत नाही किंवा पुरुषाला अशा प्रकारे त्यागण्याची पत्नीसाठी कोणतीही परंपरा सापडत नाही. स्त्रीला दुय्यम समजण्याचा सर्वात जागृत प्रकार सती प्रथा होती, ज्यात सतीची नियमानुसार पूजादेखील केली जात असे. आजही काही ठिकाणी सती चबुतरे आहेत, जिथे नियमाने जत्राही भरते.

धार्मिक कथांमध्ये समाविष्ट असलेल्या या सर्व गोष्टी स्त्रियांची धर्मनिष्ठा आणि त्यांच्या अत्याधिक सहनशीलतेचे कौतुक करून त्यांना समानतेच्या अधिकारापासून वंचित ठेवतात, स्त्रीवर अधिकार गाजवण्याचे साधन म्हणून काम करतात. ज्या कथांमध्ये स्त्री-पुरुष समानतेसारख्या मूलभूत मानवी मूल्यांची कमतरता आहे त्यांना खऱ्या अर्थाने धार्मिक मानले जाऊ शकत नाही.

लैंगिक समानतेचा हक्क मिळविण्यासाठी महिलांना या धार्मिक कथांद्वारे निर्मित आदर्श स्त्रीच्या मापदंडांचा नाकार करून त्यांच्या वर्तुळातून बाहेर पडावेच लागेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें