आईच्या पलीकडेही आहे तुमची ओळख

* गरिमा पंकज

अनेकदा स्त्रीच्या आयुष्याची सुरुवात एक आज्ञाधारक, सुसंस्कृत आणि प्रेमळ मुलगी म्हणून होते, जिच्या खांद्यावर एकीकडे कुटुंबाची प्रतिष्ठा सांभाळण्याची तर दुसरीकडे कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी असते. तिच्याकडून अशी अपेक्षा केली जाते की, तिने आईवडिलांची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानावी आणि कुठलेही असे पाऊल उचलू नये ज्यामुळे काही चुकीचे घडू नये.

काही घरांमध्ये मुलीला भवितव्य घडवण्यासाठीची संधी दिली जाते तर काही घरांमध्ये तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. जिथे तिला संधी मिळते तिथे ती उज्जवल भवितव्याचे शिखर गाठते. लग्नानंतर सासरी गेल्यावर तिथले वातावरण तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी असते. नवे वातावरण, नवी माणसे, नव्या अपेक्षा यामध्ये ती तिचे अस्तित्वच विसरून जाते, मात्र जर पती उदारमतवादी असेल तर तो पत्नीला पुढे जाण्याची संधी देतो.

स्त्रीचे स्वत:चे पहिले प्राधान्य नेहमीच कुटुंब असते, विशेषत: आई झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे तिच्या मुलाभोवती फिरू लागते. मुलगी आणि पतीपासून सुरू झालेला हा प्रवास मातृत्वावर येऊन संपतो आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याची इच्छा आतल्या आत विरून जाते. कधी समाज पुढे जाऊ देत नाही तर कधी पुढे जाण्यासाठीची हिंमत ती स्वत:हून करू शकत नाही.

स्वत:ची ओळख निर्माण करा

महिलांनी हे समजून घेतले पाहिजे की, आई होणे याचा अर्थ त्यांचे करिअर संपले असा होत नाही. आई झाल्यानंतरही ती तिच्या सोयीनुसार काम करून स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकते.

आज अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी आई झाल्यानंतर आपल्या करिअरला नवे रूप दिले आणि घर सांभाळण्यासोबतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची जिद्द, मेहनत पाहून सासरच्या मंडळींनीही त्यांना साथ दिली.

२ लहान मुलांची आई असलेली दीक्षा मिश्रा हे याचे उत्तम उदाहरण आहे, जी एक उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंन्सर म्हणून ओळखली जाते.

अतिशय आकर्षक आणि सडपातळ असलेल्या दीक्षा मिश्राला पाहून, ती २ मुलांची आई आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. दीक्षाने तिच्या करिअरची सुरुवात मीडिया पीआर प्रोफेशनल म्हणून केली होती. मार्केटिंग आणि कार्पोरेट कम्युनिकेशन्सची प्रमुख म्हणून आघाडीच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि हॉस्पिटॅलिटी ब्रँड्ससोबत तिने अनेक वर्षे काम केले आहे.

लग्नानंतर जवळपास ३ वर्षे दीक्षा मिश्राने काम केले. २ मुले झाल्यानंतर मात्र तिने कामाला वेगळे स्वरूप देण्याचा आणि उद्योजक तसेच सोशल मीडिया इन्फ्लूएंन्सर म्हणून फ्रीलान्स काम करण्याचा निर्णय घेतला.

दीक्षा सांगते, ‘‘मला १ वर्षाचा आणि ३ वर्षांचा असे दोन मुलगे आहेत. त्यामुळे ९ ते ९ वाजेपर्यंतची पूर्णवेळ नोकरी करणे माझ्यासाठी शक्य नव्हते. आता मात्र फ्रीलान्सिंग म्हणून मी माझ्या मनाप्रमाणे काम करू शकत आहे. केवळ यासाठीच मी हा पर्याय निवडला आणि घरून काम करायला सुरुवात केली.

‘‘माझे जुने संपर्क कामी आले आणि मला पुढे जाण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे काम करताना आपण ते आपल्या वेळेनुसार करू शकतो, शिवाय मुलांना सांभाळून काम करता येते. मला माझ्या पती आणि सासूचा पूर्ण पाठिंबा आहे.

‘‘गेल्या एका वर्षात मी १०० हून अधिक ब्रँड्ससोबत काम केले आहे. अशा प्रकारे माझ्या व्यावसायिक आयुष्यासोबतच मी मातृत्वाचा आनंदही अतिशय सुंदरपणे घेत आहे. माझ्या मते लग्नानंतर तुमचा प्रवास थांबू शकत नाही. मनात काहीतरी करण्याची जबरदस्त इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता.’’

आई झाल्यानंतरही नाव कमावले

मेरी कोम

बॉक्सिंग विश्वातील लोकप्रिय नाव एमसी मेरी कोम हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. ३ मुलांना जन्म दिल्यानंतरही या महिला खेळाडूने बॉक्सिंगच्या रिंगणात चमक दाखवली. तिने ६ वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. भारतासाठी महिला बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी एमसी मेरी कोम ही पहिली भारतीय आहे. २००३ मध्ये मेरी कोमला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तीन वर्षांनी २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००९ मध्ये तिला सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार देण्यात आला.

तायक्वांदो चॅम्पियन नेहा

यूपीच्या मथुरा येथील तायक्वांदो चॅम्पियन असलेल्या नेहाचा प्रवासही अशा महिलांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यांना लग्नानंतर आपले करिअर संपले आहे असे वाटते. नेहाने लग्नानंतर शिक्षण तर घेतलेच सोबतच स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदकही मिळवले.

लग्नानंतर इतर मुलींप्रमाणे नेहालाही वाटले होते की, आता ती कदाचित हा खेळ कधीच खेळू शकणार नाही. पण जेव्हा मुले मोठी होऊन शाळेत जाऊ लागली, तेव्हा नेहाने पुन्हा या खेळाचा सराव सुरू केला. तिची जिद्द आणि मेहनत पाहून घरच्यांनीही तिला पाठिंबा दिला.

पीटी उषा

खेळाडूंच्या अनेक पिढयांसाठी प्रेरणादायी असलेल्या पीटी उषा आजही अनेक तरुण खेळाडूंच्या कारकिर्दीला आकार देण्याची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पीटी उषा चौथीत असताना धावू लागल्या. १९८० मध्ये, वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी मॉस्को येथे झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला होता. सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ५ सुवर्ण पदके जिंकली आणि यापैकी ४ सुवर्ण पदके एकटया पीटी उषा यांनी जिंकली होती. १९८३ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. १९९५ मध्ये देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

विवाह, मातृत्व आणि पुनरागमन

पीटी उषा यांनी १९९१ मध्ये लग्नानंतर काही दिवसांनी अॅथलेटिक्समधून ब्रेक घेतला आणि मुलाला जन्म दिला. त्यानंतर पती व्ही. श्रीनिवासन यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी क्रीडा जगतात पुनरागमन केले. १९९७ मध्ये त्यांनी त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला निरोप दिला, मात्र तोपर्यंत त्यांनी भारतासाठी १०३ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू इच्छिणाऱ्या तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी अकॅडमी सुरू केली. अजूनही त्या या क्षेत्रात सक्रिय आहेत.

सुरू केली स्वत:ची अॅथलेटिक कारकीर्द

‘मिरॅकल फॉर चंदिगढ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या १०२ वर्षीय मन कौर या भारतातील सर्वात वयस्कर महिला धावपटू आहेत. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांच्या अॅथलेटिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना भारत सरकारने नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे.

ध्येयवेडे असणे गरजेचे

ज्या वयात एखादी व्यक्ती एका कोपऱ्यात शेवटच्या क्षणाची वाट पाहत बसलेली असते, त्या वयात एखाद्या स्त्रीने क्रीडा क्षेत्रात आपले करिअर सुरू केले आणि उत्तुंग यश मिळवले, तर तिला काय म्हणायचे? ९३ वर्षीय मन कौर यांनी २०११ मध्ये अॅथलॅटिक्समध्ये पदार्पण केले आणि त्याचवर्षी १०० मीटर शर्यतीत लांब उडी (३.२१ मी.) रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. २०१८ मध्ये, त्यांनी ऑकलंडमधील वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये १०० मीटर स्प्रिंट जिंकून भारताला सन्मान मिळवून दिला.

मन कौर यांना त्यांचा ७८ वर्षांचा मुलगा गुरदेव यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले, जे स्वत: एक धावपटू आहेत. मन कौर यांना साहसी खेळांची आवड आहे. ऑकलंडच्या स्काय टॉवरच्या माथ्यावरून चालणारी सर्वात वृद्ध व्यक्ती होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण करूनही १०२ वर्षीय मन कौर यांनी आतापर्यंत २० हून अधिक पदके जिंकली आहेत.

प्रशिक्षण आणि संतुलित आहार घेणे गरजेचे

चांगल्या आहारासोबतच मन कौर नियमित तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतात आणि जिममध्येही जातात. प्रत्येकवेळी खेळाच्या मैदानावर आल्यानंतर त्या ५ वेळा ५० मीटर धावतात आणि धावतच मैदानात १०० तसेच २०० मीटरची १-१ फेरी मारतात. यामुळे त्यांच्यात चपळता येते. दिवसातून दोनदा त्या अंकुरलेल्या गव्हापासून बनवलेल्या चपात्या खातात. सुकामेवा खातात. फळांचा रस पितात.

केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही तर अन्य क्षेत्रातही महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. अभिनय क्षेत्राबाबत बोलायचे झाल्यास करिना कपूर, शिल्पा शेट्टी, काजोल, ऐश्वर्या रॉय, राणी मुखर्जी, विद्या बालन, मलायका अरोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींनी या क्षेत्रातील आपली घोडदौड कायम राखली आणि नेहमीच चर्चेत राहिल्या. याशिवाय अशा हजारो उद्योजक महिला आहेत ज्या आई झाल्यानंतरही स्वत:ला सिद्ध करत आहेत.

यशस्वी होण्यासाठी गरजेच्या असलेल्या काही गोष्टी

ध्येयावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे : एखादी महिला लग्न आणि मुलांनंतरही करिअरच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकते, परंतु त्यासाठी सर्वप्रथम तिने ध्येय ठरवून त्यावर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे असते. कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे हे तिला समजायला हवे, कारण जर तिच्या मनात संभ्रम असेल तर ती कुठेलेही ध्येय गाठू शकत नाही. आवड आणि क्षमता लक्षात घेऊन कोणत्या क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल, याबाबत तिने आधीच ठरवले असेल, तर ती नक्कीच यशस्वी होईल.

फ्रीलान्स हाही एक पर्याय : लग्न आणि मुले झाल्यावर हे गरजेचे नाही की, तुम्ही असे एखादे काम करावे ज्यासाठी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत घराबाहेर राहावे लागेल आणि मुलांना कुटुंबाच्या किंवा घरकाम करणाऱ्या बाईच्या भरवशावर सोडावे लागेल.

तुम्ही स्वत:साठी फ्रीलान्सिंगचा पर्याय निवडू शकता. जर तुम्ही लग्नाआधी काम केले असेल, तर तुमचे जुने संपर्क यासाठी खूप उपयोगी ठरतील. जर तुम्ही याआधी काम केले नसेल किंवा फ्रेशर असाल, तरीही स्वत:मधील सर्जनशीलतेने किंवा कामातील एखादे नावीन्य दाखवून तुम्ही नक्कीच काम मिळवू शकता.

असे काहीतरी करा, ज्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ करावी लागणार नाही आणि जे तुम्ही अगदी सहजतेने करू शकाल. लक्षात ठेवा, इतरांवर अवलंबून राहून काहीही साध्य होणार नाही.

स्वत:वर विश्वास : जोपर्यंत तुमचा स्वत:वर विश्वास नाही तोपर्यंत कुटुंबातील सदस्यही तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार नाहीत. याउलट तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर मार्ग आपसूकच सापडेल. मुले झाल्यानंतर काम करणे याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला मुलांना एकटे सोडावे लागेल. असा एखादा मधला मार्ग तुम्ही शोधू शकता, ज्यामुळे तुम्ही मुलांकडेही लक्ष देऊ शकाल आणि स्वत:ची वेगळी ओळखही निर्माण करू शकाल. मुले लहान असल्यामुळे तुमच्यासाठी हे शक्य होत नसेल तर काही काळ थांबा. ती थोडी मोठी झाल्यावर तुम्ही स्वत:चे स्वप्न पूर्ण करू शकता.

डोळे उघडे ठेवा : नेहमी डोळे उघडे ठेवा. तुमचे लग्न झाले आहे आणि तुम्हाला मुले आहेत, याचा अर्थ असा नाही की, आता सर्व काही संपले आहे. नेहमी संधीच्या शोधात राहा.

ही गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही तुमचे करिअर कधीही घडवू शकता. नेहमी आपल्या मित्रांच्या आणि परिचितांच्या संपर्कात राहा. अशा महिला नातेवाईकांच्या संपर्कात राहा, ज्या लग्न आणि मुले झाल्यानंतरही काहीतरी करत आहेत. त्यांना पाहून तुमच्या मनात नक्कीच एखादी कल्पना सुचेल.

वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे : लग्न आणि मुलांनंतर, जेव्हा तुम्ही कामासाठी घराबाहेत पडता किंवा घरातून काम करायला सुरुवात करता तेव्हा वेळेचे व्यवस्थापन करायला शिकणे महत्त्वाचे असते. तुम्हाला आधीच नियोजन करावे लागेल की, अमुक एका वेळेपर्यंत घरातली कामे करायची आहेत आणि त्यानंतर बाहेरचे काम करायचे आहे. अशा प्रकारच्या नियोजनामुळे तुम्हाला कधीही तणाव येणार नाही किंवा तुमची घाई होणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांनाही तुम्हाला दोष देण्याची संधी मिळणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें