* सोमा घोष
मराठी सिनेमा आणि थिएटरद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारी नेहा महाजन प्रसिद्ध सतार वादक पंडित विदुर महाजन व अपर्णा महाजन यांची कन्या आहे . कलेच्या वातावरणात मोठया झालेल्या नेहाने लहानपणापासून अगदी लहान वयात आपल्या वडिलांच्या सहवासात सतारीचे प्रशिक्षण घेणे सुरु केले. तिची आईसुद्धा मराठी कथा लेखिका आहे. नेहाने मराठी चित्रपटाशिवाय हिंदी, इंग्लिश व मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचे नाव सतारवादनात आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते. अलीकडेच तिने गायक व कवी रिकी मार्टिनसोबत सतार वाजवली आहे, ज्यामुळे ती अतिशय खुश आहे. विनम्र, हसतमुख नेहाशी तिच्या प्रवासाविषयी झालेल्या गप्पा खूपच रोमांचक होत्या, सादर आहे यातील काही भाग :
अभिनयात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
मला सिनेमा हे माध्यम फारच आवडायचे. मी महाराष्ट्रातील तळेगाव येथील आहे. कॉलेजमध्ये मला केवळ १६ वर्षांची असताना अमेरिकेतील टेक्सासमध्ये जाण्याची संधी मिळाली. मी तिथे शिकायला गेले, पण मला थिएटरच आवडायचे. परत आल्यावर मी पुण्यात शिक्षण सुरु केले. या प्रवासात मला जे अनुभव आलेत ते शेअर करण्यासाठी मला एखाद्या मंचाची गरज होती. संगीताने मनाला थोडेफार समाधान मिळायचे पण थिएटरमध्ये ज्या कथा कथन केल्या जातात, त्यांचा एक भाग मला व्हायचे होते. म्हणून मी अभिनयाशी जोडले गेले.
अभिनयातील पहिला ब्रेक कुठे व कसा मिळाला?
लहानपणीच मी सतार वाजवणे सुरु केले. अनेक मोठमोठे संगीतज्ज्ञ आमच्याकडे येत असत. मी अनेक मोठमोठया काँसर्टमध्येसुद्धा जाऊन आले आहे. संगीताचे वातावरण लहानपणापासूनच बघितले आहे. पण व्यवस्थित रियाज मी १८ वर्षांची असतानापासून सुरु केला. माझी आई प्राध्यापिका आहे. माझ्या घरी एक चांगला माणूस बनणे, पैसा कमावण्यापेक्षा जास्त महत्वाचे मानले जाते. त्यामुळे मी शिक्षणासोबत सतार वाजवणे सुरु केले व नंतरच अभिनयाकडे वळले. पहिला ब्रेक मला दीपा मेहता यांनी ‘मिड नाईट चिल्ड्रन’ यात दिला, जो एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट होता. तो अनुभवसुद्धा खूप छान होता. जेव्हा मी मुंबईला गेले तेव्हा ऑडिशन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मला कळले की मी हा चित्रपट करत आहे. यामुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
सध्या काय करते आहेस?
माझा शेवटचा इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यात मी रणदीप हुडाच्या पत्नीची भूमिका केली आहे. यानंतर मी रिकी मार्टिनच्या एका गाण्यात सतार वाजवली. मी माझ्या कामाबाबत समाधानी आहे. अभिनयाची कामंही मला बरीच मिळत आहेत. वेब सिरीजसुद्धा करत आहे. मराठीतसुद्धा काही नवे करायचा प्रयत्न करत आहे.
हिंदी, इंग्रजी, मराठी भाषांमध्ये तू काम केले आहे, यात काय फरक जाणवतो?
माध्यम ही माझ्यासाठी फार मोठी समस्या नाही आहे. मला अनेक भाषा ऐकायची सवय आहे. पण यात फरक बजेटचा असतो. काही चित्रपटात कमी असतो तर काही चित्रपटात जास्त असतो. मी जेव्हा रोहित शेट्टीच्या बिग बजेट चित्रपट ‘सिम्बा’मध्ये काम केले तेव्हाचा अनुभव छान होता पण मराठी चित्रपट ‘नीलकंठ मास्तर’ केला होता, ज्याचे बजेट खूपच कमी होते. तिथे व्हॅनिटी व्हॅनसुद्धा नव्हती. एका लहानशा गावात जाऊन शूटिंग करत होते. तिथे कपडे बदलण्यासाठी व मेकअपसाठी आम्ही सगळयांनी एक घर घेतले होते. मला अनेक भाषा शिकणे आवडते. मी चित्रपटाच्या सेटवर भूमिका आणि भावना यात जगते.
अभिनयामुळे सतार वादनापासून दूर जाते आहेस का?
असे काही नाही, कारण एका चित्रपटाचा काळ २-३ महिने असतो आणि या काळात मी सतारीचा रियाज थोडा थांबवते.पण कुठेही गेले तरी सतार माझ्यासोबत असतेच. जेव्हा वेळ मिळतो, अर्धा, एक तास सतार वाजवतेच. शूटिंग संपल्यावर परत सतारीचा रियाज करते.
शास्त्रीय संगीताची परंपरा कमी होत चालली आहे, अशात हे संगीत लुप्त होऊ नये यासाठी तरुणांना काय संदेश देशील?
सगळयांनी विचार करायची गरज आहे की जीवनात काय महत्त्वाचे आहे? कोरोनाच्या संक्रमणाने सगळयांनाच जीवनाचा अर्थ कळू लागला आहे. पैसा कमावण्याच्या स्पर्धेत लोक जीवनातील आवश्यक गोष्टी विसरत चालले आहेत. शिवाय लोकांकडे एकमेकांशी बोलायला दुसरे काही असायला हवे. संगीत त्यांना व्यक्त व्हायला मंच उपलब्ध करून देते. संगीताचा उपयोग ती आपल्या आनंदासाठी करते. जीवनात संगीत असणे खूप आवश्यक आहे. यामुळे माणसाला शक्ति आणि आत्मविश्वास मिळतो.
सतार वादनाचे कार्यक्रम करताना देशी व विदेशी श्रोत्यांच्या अभिरुचीमध्ये काय फरक जाणवतो?
आपल्या देशात सगळयांना तिकडचे जग आवडते. कारण त्यांना ते माहीत नसते. विदेशात राहणाऱ्यांना आपला देश आवडतो, कारण आपण त्यांच्यासाठी नवे आहोत. नवीन गोष्ट सगळयांनाच आवडते. संगीताचे प्रशंसक संपूर्ण जगात असतात. वेगळे काहीही नसते.
कोणत्या प्रोजेक्टने तुझे जीवन बदलले?
प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीना काही नवीन शिकायला मिळते. प्रत्येक काम जीवन बदलून टाकते. माणूस कामामुळेच बदलत जातो.
उत्सव येत आहे आणि सगळे कोरोनामुळे घरात अडकले आहेत. कशा प्रकारे उत्सव साजरा करायला हवा?
प्रत्येक उत्सव घरात आनंद घेऊन येतो. म्हणून अशावेळी घरातच राहून परिवारासोबत उत्सव साजरा करा. यावर्षी तर विचार करून भावनात्मकरीत्या सण साजरा करायला हवा व मीसुद्धा असाच साजरा करणार आहे.
चित्रपट व वेब सिरीजमधील खाजगी दृश्य करताना तू कितपत सहज असते?
कोणत्याही वेब सिरीज अथवा चित्रपटात हिंसा दाखवणे मला अनैतिक वाटते, कारण हे बघायची लोकांना सवय होऊन जाते. चुंबन दृश्यात प्रेम व सखोल भावना दडलेली असते, जे लोकांच्या हृदयात चांगली भावना निर्माण करते. जर कथेत प्रेमाची दृश्य ही कथेची गरज असेल तर ते करण्यात काही हरकत नाही. मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडते.
एखादया बायोपिकवर काम करण्याची इच्छा आहे का?
मला एखाद्या गायकाची बायोपिक करायला आवडेल. उदाहरणार्थ, हिराबाई बडोदेकर, किशोरी आमोणकर वगैरे. एखाद्या स्त्रीला यशस्वी गायिका होणे सोपे नाही. त्यानी अनेक संकटे झेलल्यावर यश मिळते
तुझ्या कामात आई-वडिलांचे किती सहकार्य असते?
सहयोगासोबत मला प्रेरणासुद्धा मिळत असते, आई व बाबा दोघेही क्रिएटिव्ह क्षेत्रातील आहेत. मी दिग्दर्शक झाले तर माझ्या आईच्या कथांवर अवश्य चित्रपट बनवेन.
‘गृहशोभिके’द्वारे वाचकांना काय संदेश देऊ इच्छिता?
स्वत: शिवाय दुसऱ्यांबाबतही काही चांगला विचार करा. धर्म, जात सोडून व्यक्तिबाबत विचार करा व काहीतरी चांगले करायचा विचार करा, जेणेकरून सगळेच आनंदी राहू शकतील.
आवडता रंग – पिवळा.
आऊटफिट – आरामदायक वेस्टर्न व भारतीय.
आवडते पुस्तक – द स्कल्प्चर, वॉर अँड पीस.
फावल्या वेळात – मेडिटेशन व पुस्तक वाचणे.
नकारात्मक भाव मनात आल्यास – विचार करते अन्यथा शेअर करते.
पर्यटन स्थळ – कान्हा जंगल, निसर्गाजवळ जाणारे पर्यटन स्थळ.
परफ्युम – फॉरेस्ट एसेंशियलचे नर्गिस.
जीवनातील आदर्श – सौंदर्य, सत्य व शांती.
सामाजिक काम – मुलांसाठी संगीत व शिक्षण क्षेत्रात काम करणे.