संसार मोडण्याचं कारण महत्त्वाकांक्षी पती किंवा पत्नी

* भारत भूषण श्रीवास्तव

दिग्दर्शक गुलजारचा १९७५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘आंधी’ने ‘रेकॉर्डब्रेक’ यश संपादन केलं होतं. या चित्रपटावर त्या काळात वाद झालेच होते, त्याची चर्चा आजही ऐकायला मिळते. कारण हा चित्रपट दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आयुष्यावर बनला होता. या चित्रपटात संजीव कुमारने नायकाची आणि सुचित्रा सेनने नायिकेची भूमिका साकारली होती, जिचं २०१४ साली निधन झालं होतं.

‘आंधी’ चित्रपटाचा केंद्रीय विषय राजकारण होता, पण हा चित्रपट चालला तो तडा जाणाऱ्या दाम्पत्य जीवनाच्या सटीक चित्रीकरणामुळे. ज्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये इंदिरा गांधी स्पष्ट दिसत होत्या. त्याचबरोबर दिसत होत्या त्या एक प्रतिभासंपन्न पत्नीच्या इच्छा आकांक्षा, ज्या पूर्ण करण्यासाठी ती पतीचाही त्याग करते आणि मुलीचाही, पण त्यांना मात्र ती विसरू शकत नाही. पतीपासून वेगळी होऊन जेव्हा ती अनेक वर्षांनी एका हिल स्टेशनवर आपले राजकीय दिवस घालवायला येते, तेव्हा ती ज्या हॉटेलात थांबते, तिथला मॅनेजर तिचा पतीच निघतो.

पतीला पुन्हा आपल्याजवळ बघून वृद्ध होत चाललेली नायिका कमजोर पडू लागते. तिच्या लक्षात येतं की खरं सुख पतीच्या बाहुपाशात, स्वयंपाकघरात, घरसंसारात, आपसातील थट्टामस्करीत आणि मुलांच्या संगोपनात आहे, अशा चिखलफेक करणाऱ्या राजकारणात नाही. पण प्रत्येकवेळी तिला हीच जाणीव होते की आता या राजकीय दलदलीतून बाहेर पडणं कठिण आहे, जे तिच्या पतीला आवडत नाही. राजकारण आणि पती यापैकी एकाची निवड करणं तिला कायम द्विधावस्थेत टाकत असे. अशात तिचे वडीलही तिला कायम पुढे जाण्यासाठी भडकवत असतात. ही द्विधावस्था चेहऱ्यावरील भाव आणि संवाद इत्यादींच्या माध्यमाने सुचित्रा सेनने इतकी सशक्त बनवली होती की कदाचित खरा पात्रदेखील असं करू शकला नसता.

आरतीची भूमिका साकारणारी सुचित्रा सेन जेव्हा दाम्पत्यजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर पतीबरोबर फिरताना आणि रोमांस करताना दिसते, तेव्हा तर विरोधक तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू लागतात.

स्वभावाने हट्टी आणि रागिष्ट आरती या सगळ्यामुळे भडकते, कारण तिच्या नजरेत ती काहीच चुकीचं करत नव्हती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा तिला सर्वत्र हे विचारलं जातं की हॉटेल मॅनेजर जे.के.शी तिचे काय संबंध आहेत, तेव्हा मात्र ती शस्त्र टाकते, अशात तिचा पती तिची साथ देतो. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या जनता सभेत ती आपल्या पतीला घेऊन जाते आणि सर्वांना सत्य सांगते की ते तिचे पती आहेत. जर त्यांच्यासोबत फिरणं हा अपराध आहे तर हो तिने हा अपराध केला आहे आणि शेवटी रडत रडत भावुक होऊन आरती जनतेला म्हणते की ती मत नव्हे, त्यांच्याकडून न्याय मागत आहे.

जनताही तिला विजयी करून न्याय मिळवून देते. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात ती जेव्हा हॅलीकॉप्टरमध्ये बसून दिल्लीला निघते, तेव्हा संजीव कुमार तिला सांगतो की मला तुला कायम जिंकताना पाहायचं आहे.

याच सुखावर चित्रपट संपतो. पण तिथेच ज्ञानी प्रेक्षकांसमोर हा प्रश्नदेखील सोडून जातो की ज्या पतीला करिअरसाठी सोडलं, त्याला सार्वजनिकरीत्या स्वीकार करणं हा राजाकारणाचा भाग नव्हता का? ही जनतेसोबत एक भावनात्मक ब्लॅकमेलिंग नव्हती का?

एकच गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात सगळं काही योग्य आहे. हेदेखील स्पष्ट होतं की एक महत्त्वाकांक्षी पत्नी जिला हरणं पसंत नाही ती जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.

इंदिरा गांधी: अपवाद आणि आदर्श

चित्रपट बाजूला ठेवला तर इंदिरा गांधी भारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श ठरल्या आहेत. याचं कारण म्हणावं तर ७०च्या दशकात स्त्रियांवर अनेक बंधनं होती. त्यांचं महत्त्वाकांक्षी असणं गुन्हा समजला जायचा आणि या महत्त्वाकांक्षेची हत्या तेव्हा खूपच सहजपणे पतप्रतिष्ठा आणि समाज नावाच्या शस्त्राने केली जायची. मात्र इंदिरा गांधी याला अपवाद होत्या, म्हणूनच त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा जिवंत ठेवली आणि दाम्पत्य व संसाराच्या भानगडीत पडल्या नाही, ज्यामुळे त्या एक आदर्श आणि अपवाद ठरल्या नव्या पिढीला त्यांच्याबद्दल फक्त इतकंच माहीत आहे की त्या एक यशस्वी आणि लोकप्रिय नेत्या होत्या. पण या सगळ्या गोष्टी त्यांनी कोणत्या अटींवर मिळवल्या होत्या, याचं दर्शन ‘आंधी’ चित्रपटातून झालं आहे.

इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधीचा त्यांच्या पत्नीवर कसलाच जोर चालत नव्हता. त्यामुळे इंदिरा गांधी आपल्या आंतरजातीय प्रेम विवाहावर कधीच पस्तावल्या नाहीत आणि त्यांनी कधीच सार्वजनिकरीत्या आपल्या पतीची निंदानालस्ती वा चर्चाही केली नाही. या वैशिष्ट्यांमुळेदेखील ज्याला पतीचा मोठा सन्मान समजला गेला होता. त्यांना उच्च स्तरावर नेऊन ठेवलं होतं.

पण जेव्हा पत्नी इतकी महत्त्वाकांक्षी असेल की ती घर तोडायलाच निघाली असेल तेव्हा पतीने काय करायला हवं, जेणेकरून संसारही टिकून राहील आणि पत्नीला कसलं नुकसानही होणार नाही. त्या प्रश्नाची एक नव्हे अनेक उत्तरं असतील, ज्या खरंतर सूचना असतील, कारण हे देखील स्पष्ट आहे की पत्नी महत्त्वाकांक्षी असणं ही समस्या नाही, तर समस्या पतीकडून तिला मॅनेज न करू शकणं आहे.

याच शृंखलेत पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटपटू ६३ वर्षांच्या क्रिकेटर इमरान खानचंही नाव येतं, ज्यांनी आपल्या पत्नी रेहम खानला तलाक दिला. विशेष म्हणजे रेहम खान आणि इमरान दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. रेहमला पहिल्या पतीपासून ३ मुलं आहेत, तर इमरानलाही पहिल्या पत्नीपासून २ मुलं आहेत. वयानेही रेहम इमरानपेक्षा २० वर्षांनी लहान आहे.

या घटस्फोटाचं कारण त्या दोघांचं दुसरं लग्न किंवा मेळ नसलेलं लग्न नसून इमरानच्या मते रेहमची वाढती राजकीय इच्छा आकांक्षा जबाबदार आहे. इमरान पाकिस्तानच्या मुख्य राजकीय पक्ष तहरीके इंसाफ (पीटीआय)चे संस्थापक आणि पुढारी आहेत. अशीदेखील चर्चा आहे की रेहम पीटीआयवर अधिकार गाजवायला बघत होती. ती सतत पक्षाच्या बैठकीत जाऊ लागली होती आणि कार्यकर्त्यांची पसंतही ठरू लागली होती. पीटीआयची पाकिस्तानच्या सत्तेत काही दखल असो वा नसो, पण तिथल्या राजकारणात मजबूत पकड आहे, ज्यामुळे पाकिस्तानात इमरानच्या चाहत्यांची संख्याही जास्त आहे.

या तणावामुळे एकेकाळची बीबीसीची टीव्हीवरील निवेदिका असलेल्या रेहमदेखील असं वक्तव्य करून हे सिद्ध केलं की या घटस्फोटाचं कारण खरोखरंच तिची महत्त्वाकांक्षा आहे. रेहम सांगते की पाकिस्तानात तिला शिव्या दिल्या जायच्या. तिथलं वातावरण स्त्रियांच्या हक्कांच्या बाजूचं नव्हतं. ती तर संपूर्ण देशाची वहिनी झाली होती, ज्यांना हवं ते तिला शिव्या देऊ शकत होते.

घटस्फोटानंतर रेहमने हे सांगितलं की इमरानची इच्छा होती की तिने फक्त चूल पेटवावी म्हणजे एखाद्या पारंपरिक घरगुती बायकोसारखं राहावं, जे तिला मान्य नव्हतं. स्पष्टच आहे की या सगळ्यांमुळे खरोखरंच रेहमच्या महत्वाकांक्षा जागृत होऊ लागल्या होत्या आणि इमरानला हे मान्य नव्हतं.

पती होण्याचा एक फरक

प्रश्न हा आहे की काय पतीकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकते की ते आपल्या पत्नींच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यास अडथळा ठरणार नाहीत. तर याचं उत्तर स्पष्ट आहे ‘नाही.’ कारण पुरुषांचा स्वत:चा अहंकार असतो. तो पत्नीला आपल्यापुढे जाऊन वेगळी ओळख निर्माण करण्याची आणि प्रसिद्ध होण्याची संधी देत नाही. मात्र याबाबत पूर्णपणे त्यालाच दोषी ठरवणंदेखील त्याच्याशी अतिरेकपणाचं ठरेल. जर पती म्हणू शकते की तिनेच का झुकावं आणि तडजोड करावी, तर पतीकडूनही हा हक्क हिरावला जाऊ शकत नाही. प्रश्न संसार आणि मुलांसोबत अघोषित असलेल्या विवाहाच्या नियमांचाही असतो.

१९७३ साली अमिताभ बच्चन आणि जया भादुरीचा चित्रपट ‘अभिमान’देखील बॉक्स ऑफिसवर बराच गाजला होता. या चित्रपटात पती पत्नी दोघेही गायक असतात, पण पत्नीला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे पती वैतागतो आणि एकमेकांपासून वेगळे होण्याची परिस्थिती निर्माण होते. पत्नी माहेरी निघून जाते आणि गर्भपात झाल्यामुळे दु:खी राहू लागते. मात्र नंतर पती तिची समजूत घालून तिला पुन्हा स्टेजवर आणतो आणि तिच्यासोबत गाणं गातो. पण असं तेव्हाच घडतं, जेव्हा पत्नीने पराभव पत्करलेला असतो.

एका मध्यमवर्गीय पतीचं आपल्या पत्नीचं यश आणि प्रसिद्धी पचवू न शकणं आणि त्यासाठी दु:खी, कुंठित आणि चिडचिडं होणं, या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं. त्याला वाटतं की पत्नी पुढे गेल्यामुळे जग त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. पत्नीमुळे त्याच्या प्रतिभेचं योग्य मूल्यमापन होत नाहीए आणि लोक त्याची चेष्टा करत आहेत. आता एक नजर रीलऐवेजी रियल लाइफवर टाकली, तर इथे अमिताभ प्रसिद्धीच्या अलौकिक उंचीवर होता, हे तर प्रत्येकालाच माहीत आहे की इथे जया भादूरीचे अमिताभसाठी कितपत आणि काय काय त्याग केले आहेत. आपल्या पतीचं बुडणारं करिअर सावरण्यासाठी तिने ‘सिलसिला’ चित्रपटात काम करणंही स्वीकारलं होतं.

खरंतर प्रतिभासंपन्न महत्त्वाकांक्षी पत्नीचा पती कायम हीनभावना आणि कुंठितपणाला बळी पडत असल्याची गोष्ट सामान्य आयुष्यात घडत असल्याचं दिसून येतं. कारण त्याचा कमकुवतपणा दर्शवणारं एक सत्य त्याच्यासमोर उभं ठाकलेलं असतं आणि इथूनच सुरू होतो लढा, द्विधावस्था, चिडचिड आणि कुंठितपणा. पतीला हे चांगल्याप्रकारे माहीत असतं की तो पत्नीपेक्षा मागे आहे आणि हे सत्य सर्वांना कळत आहे. वैवाहिक जीवनाचा हा तो टप्पा असतो जिथे तो आपल्या पत्नीला नाकारू शकत नाही, स्वीकारूही शकत नाही आणि खरंतर पत्नीची यामध्ये काहीच चूक नसते.

एकीकडे यश आणि प्रसिद्धीच्या पायऱ्या चढणाऱ्या पत्नीला पतीचा कुंठितपणा आणि चिंता कळतच नाही आणि ती आपला प्रवास सुरूच ठेवते तर दुसरीकडे पतीला असं वाटतं की ती मुद्दामून त्याला चिडवण्यासाठी असं करत आहे. अशावेळी गरज असते ती ‘अभिमान’ चित्रपटातील बिंदू, असराणी आणि डेविडसारख्या शुभचिंतकांची.

जे पतीपत्नीला समजवू शकतील की खरंतर दोघांपैकी चुकीचं कोणीच नाहीए. गरज वास्तविकता स्वीकारण्याची असते, जिथे कोणाचाच अपमान होणार नसतो.

पण असे शुभचिंतक चित्रपटांमध्येच आढळतात. खऱ्या जगात नाही. त्यामुळे पतीचा कुंठीतपणा नैराश्यात बदलू लागतो आणि तो अनेकवेळा क्रूरपणा करू लागतो.

अशा कुंठितपणापासून सुटका मिळवण्यासाठी ही गोष्ट फार गरजेची आहे की पतीने पत्नीची पात्रता आणि श्रेष्ठत्त्व मनापासून स्वीकारावं आणि पत्नीनेही पतीला सतत हे दर्शवून द्यावं की तिने आजवर जे काही मिळवलं आहे ते त्याच्या सहकार्यामुळेच आहे.

यात शंका नाही की महत्त्वाकांक्षी पत्नीचं पहिलं प्राधान्य तिचं आपलं ध्येय असतं, घर संसार, मुलं किंवा पती नाही. पण याचा अर्थ असा नसतो की तिला त्यांची कसलीच काळजी अगर पर्वा नाही. याचा हाच अर्थ असतो की तिला आपली प्रतिभा कळते, आपल्या ध्येयापर्यंत तिला पोहोचता येतं आणि कुठलीच तडजोड करण्यावर तिचा विश्वास नसतो.

लक्षात ठेवा

  • पतीपत्नीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा वैवाहिक जीवन आणि संसारासाठी चांगली नसते. म्हणून यापासून दूर राहा. एकमेकांच्या भावना आणि इच्छेचा मान राखल्यानेच ते दोघे त्या सर्व गोष्टी मिळवू शकतात, ज्या त्यांना हव्या आहेत.
  • पत्नीला जर आयुष्यात काही मिळवायचं असेल वा काही बनायचं असेल तर काहीच चुकीचं नाही. हा तिचा हक्क आहे. पण पत्नींनी हेदेखील समजून घ्यावं की त्यांना जे हवं आहे, त्याने त्यांना काय मिळणार आणि यामुळे पतींच्या भावना दुखावत तर नाहीत ना…?
  • पतीचं प्रोत्साहन आणि प्रशंसा मिळाल्याने पत्नीची प्रतिभा आणखीनच उजळून निघते. तिचा विचार पतीला अपमानित करण्याचा नसतो. ही परिस्थिती तेव्हाच येते, जेव्हा पती आतल्या आत जळफळत असतो आणि पत्नीने जे यश मिळवलं असतं त्यातून तो स्वत:ला बाजूला करून टाकतो.
  • पत्नी कमवती असेल, सार्वजनिक आयुष्य जगत असेल तर पतीनेही हीन भावना न बाळगता आपल्या पत्नीवर अभिमान बाळगायला हवा.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें