७ लेटेस्ट फ्लोअरिंग ट्रेंड

* नसीम अन्सारी कोचर

तुमच्या घराचे सौंदर्य ठरविण्यात टाईल्स किंवा फरशी मोठी भूमिका बजावतात. आज बाजारात विविध प्रकारच्या सुंदर टाईल्स पाहायला मिळतात, पण आपण ज्या ठिकाणी राहातो त्या ठिकाणचे हवामान, तापमान आणि आर्द्रता लक्षात घेऊनच टाईल्स निवडणे गरजेचे असते. याशिवाय जमिनीवर लावायच्या टाईल्स, स्वयंपाकघराच्या टाईल्स, भिंतीच्या टाईल्स यांची निवडही काळजीपूर्वक करायला हवी.

जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च करत असाल, तेव्हा प्रत्येक खोलीत सारख्याच टाईल्स पाहाणे तुम्हाला नक्कीच आवडणार नाही. तुम्हाला प्रत्येक खोलीत काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन पाहायला आवडेल, जेणेकरून प्रत्येक खोलीत एक वेगळी अनुभूती येईल.

गृहिणी अनेकदा घराकरिता सर्वोत्तम टाईल्स खरेदी करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अनेकदा इंटरनेटवर योग्य निवड करता न आल्यामुळे दुकानांमध्ये जातात आणि तिथे दुकानदार त्यांना गोंधळात टाकतात. मग त्यांना अशा टाईल्स आवडतात ज्याचा त्यांना काही दिवसातच कंटाळा येऊ लागतो. अशा परिस्थितीत, काही सूचना आहेत ज्या तुम्ही तुमच्या घराचे फ्लोअरिंग ठरवण्यापूर्वी लक्षात ठेवल्या तर तुमचे शेजारी आणि मित्र-मैत्रिणी तुमच्या घराचे फ्लोअरिंग पाहून आश्चर्यचकित होतील.

टाईल्स खरेदी करण्यापूर्वी

सर्वप्रथम तुम्ही त्या खोलीचा विचार करा, ज्या खोलीत टाईल्स लावायच्या आहेत. त्या खोलीतील फर्निचर आणि कपाटांना कोणता रंग आहे? भिंतींचा रंग कोणता? त्या खोलीत तुम्ही कोणत्या रंगाचे पडदे वापरणार आहात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधल्यानंतरच, टाईल्सच्या दुकानात जा, जेणेकरून तुम्ही दुकानदाराला सर्व माहिती देऊ शकाल. यामुळे त्याला खोलीतील इतर गोष्टींना अनुरूप टाईल्स किंवा फ्लोअरिंग दाखवणे सोपे होईल आणि तुमचाही गोंधळ उडणार नाही.

एकदा तुमची खोली टाईल्स लावण्यासाठी तयार झाली की, तुम्हाला किती टाईल्स लागतील हे तपासा. एकाचवेळी त्या विकत घेणे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त घेणे केव्हाही चांगले, कारण जर लावताना काही टाईल्स खराब झाल्या किंवा तुटल्या तर तुम्हाला त्या तशाच्या तशा पुन्हा मिळतील की नाही, हे सांगणे कठीण असते. म्हणूनच त्या थोडया अधिक घेणे चांगले असते.

टाईल्स किंवा फ्लोअरिंगसाठी डिझायनर किंवा कॉन्ट्रॅक्टरला सोबत घेऊन जाणे उत्तम, कारण टाईल्सचा आकार पाहून तो तुम्हाला सांगू शकेल की, कोणत्या टाईल्स बहुतेक खोल्यांच्या रंगांशी जुळतील आणि एखाद्या विशिष्ट खोलीसाठी तुम्हाला त्या कशा अनुकूल ठरतील. शयनगृह किंवा दिवाणखान्यात. किती टाईल्स लागतील, हेही ते सांगतील.

तुमच्या जमिनीवरच्या टाईल्स सुस्थितीत असल्यास तुमच्या खोलीचे स्वरूप बदलण्यासाठी तुम्ही पीव्हीसी पॉलीविनाइल क्लोराईड किंवा विनाइल फ्लोअरिंग करून घेऊ शकता. हे काम कमी बजेटमध्ये होते.

काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत जसे की, लहान आकाराच्या खोलीसाठी मोठया आकाराच्या टाईल्स कधीही घेऊ नयेत, त्या सुंदर दिसत नाहीत. लहान खोलीवरील खर्च कमी करण्यासाठी, लहान आकाराच्या टाईल्स घ्याव्यात.

टाईल्स खरेदीसाठी कधीही संध्याकाळी किंवा रात्री दुकानात जाऊ नका, नेहमी दिवसाच्या उजेडात जा आणि वेगवेगळया खोल्यांच्या गरजेनुसार सूर्यप्रकाशात टाइल्सचा रंग आणि डिझाईन निवडा.

विट्रिफाइड टाईल्स

संगमरवरी आणि ग्रॅनाइटचा हा उत्तम पर्याय आहे. सिलिका आणि चिकणमातीपासून बनवलेल्या विट्रिफाइड टाईल्स टिकाऊपणाच्या दृष्टीने सर्वोत्तम आहेत. व्हरांडा पॅटिओ किंवा आउटडोअर फ्लोअरिंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ओरबडे येणे आणि डाग प्रतिरोधक असल्याने, व्हिट्रिफाइड टाइल्स स्वयंपाकघरासारख्या सतत राबता असलेल्या खोलीसाठी चांगल्या आहेत, त्या ग्लॉसी फिनिश किंवा मॅट फिनिशसह अनेक डिझाईन आणि प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

संगमरवरी टाईल्स

भारतातील घरांमध्ये आकर्षक आणि शाही लुक देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रकारांपैकी संगमरवर हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. उच्च दर्जाचे भारतीय संगमरवर परवडणारे आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. ते सर्व प्रकारच्या रंग आणि डिझाईनमध्येही उपलब्ध आहे. त्याची हलकीशी चमक आणि नाजूक लुक तुमचे घर ग्लॅमरस बनवेल. त्यामुळे काहीसा राजेशाही थाटाचाही अनुभव येईल.

विनाईल

ज्यांना त्यांच्या घराच्या जमिनीला लाकडी फ्लोअरिंगचा लुक द्यायचा आहे त्यांच्यासाठी विनाईल फ्लोअरिंग हा एक चांगला पर्याय आहे. विनाईल विविध प्रकार, रंग, चकाकी आणि डिझाईनमध्ये येते. लाकूड किंवा संगमरवरी फ्लोअरिंगच्या अगदी विरुद्ध असे विनाइल फ्लोअरिंग कमी बजेटमध्ये येते. ते जास्त काळ टिकते. त्यामुळे तुमची गुंतवणूक वाया जाणार नाही याची तुम्ही खात्री बाळगू शकता.

ग्राफिक चिनीमातीच्या टाईल्स

तुम्हाला भडक आणि उठावदार असे काहीतरी हवे असल्यास ग्राफिक टाईल्स फक्त तुमच्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत. या निवडक, चकचकीत टाईल्स लक्ष वेधण्याचा उत्तम मार्ग आहेत. या टाईल्स तुमची खोली क्षणार्धात उजळून टाकतात. पाणी आणि इतर न निघणारे डाग सहन करण्याच्या क्षमतेमुळे त्या बहुतेक करून स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा भिंतींवर लावल्या जातात.

लाकडी टाईल्स

लाकडी टाईल्स खोलीत उबदारपणा आणि मनमोकळेपणाचा अनुभव देतात. त्या खोली अधिक आकर्षक बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. लाकडी फ्लोअरिंगची योग्य काळजी घेतल्यास ते अत्यंत टिकाऊ असून आणि सर्व प्रकारच्या सजावटीसह उपलब्ध आहे.

लॅमिनेट

लाकडी फ्लोअरिंगचा विचार केल्यास लॅमिनेट हा एक चांगला पर्यायी पर्याय आहे, तुम्ही कमी खर्चात लाकडी फ्लोअरिंगचा आनंद घेऊ शकता. हे सिंथेटिक मिश्रण लॅमिनेट मटेरियलच्या जोरदार दाबलेल्या थरांनी बनलेले असते आणि त्यावर संरक्षणासाठी अत्यंत प्रतिरोधक सेल्युलोजरल आवरण असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें