गैरसमज

कथा * सुवर्णा पाटील

आज नोकरीचा पहिला दिवस. रियाने सकाळीच सर्व आवरले व ऑफिसला निघाली. वडिल वारल्यानंतर घराची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती. इंजिनिअरिंग कॉलेजला नेहमी टॉपवर राहणाऱ्या रियाची खुप मोठी मोठी स्वप्ने होती, पण परिस्थितीमुळे तिला हा मार्ग स्वीकारावा लागला. आधी करत असलेल्या लहान नोकरीत तिच्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण होत नव्हत्या. त्यातच एके दिवशी ऑनलाईन मुलाखतीच्या जाहिरातीने तिचे लक्ष वेधून घेतले. तिने त्याप्रमाणे फॉर्म भरला व तिची त्या कंपनीत निवड झाली.

रिया ऑफिसात आली, तेव्हा ऑफिसातील काही स्टाफ नुकताच आलेला होता. तिथेच रिसेप्शनला बसलेल्या अंजलीने रियाला विचारले, ‘‘गुड मॉर्निंग मॅडम, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे?’’

‘‘नाही, माझी या कंपनीत ऑनलाईन मुलाखतीतून निवड झाली आहे. मला आज हजर होण्यासाठी बोलवले आहे. हे लेटर…’’

‘‘ओ.. असे होय.. अभिनंदन! तुमचे आपल्या कंपनीत स्वागत आहे. तुम्ही थोडा वेळ इथे बसा. मी मॅनेजर साहेबांशी बोलून पुढच्या सूचना देते.’’

रिया तिथेच बसून कंपनीचे निरीक्षण करू लागली. त्याचवेळेस कंपनीत बऱ्याच ठिकाणी असलेल्या आर. जे. या लोगोने तिचे लक्ष वेधून घेतले. तेवढयात अंजली आली, ‘‘मॅडम तुम्ही मॅनेजर साहेबांकडे जा ते तुम्हाला पुढची प्रोसेस समजावून देतील.’’

‘‘अंजली मॅडम, एक प्रश्न विचारू का? कंपनीत जागोजागी आर.जे. हा लोगो कशासाठी आहे?’’

‘‘आर. जे. लोगो म्हणजे आपल्या कंपनीचे सर्वेसर्वा श्री मुजुमदार साहेब यांच्या एकुलत्या एक चिरंजीवांच्या नावाची आद्याक्षरे आहेत. खरं म्हणजे ऑनलाईन मुलाखत ही त्यांचीच कल्पना होती. आज त्यांचाही कंपनीचा पहिलाच दिवस आहे. चला, आता आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ.’’

‘‘हो नक्कीच, चला.’’

कंपनीचे मॅनेजर ही जेष्ठ व्यक्ती होती. त्यांच्या बोलण्याच्या आणि काम समजावण्याच्या पद्धतीवरून रियाच्या मनावरील बराचसा ताण हलका झाला. तिने सर्व समजून घेतले व कामास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही दिवसातच रियाने स्वत:च्या हसतमुख स्वभावाने व कामाच्या तत्परतेने सर्वांना आपलेसे करून घेतले. पण अजूनही तिची कंपनीचे मालक आर. जे. सरांशी भेट झाली नव्हती. कंपनीची मिटींग असो वा कोणताही प्रसंग, ज्यात तिची भेट त्यांच्याशी होऊ शकत होती, त्यात तिला टाळले जायचे. हे तिच्यासाठी एक गुढच होते.

एके दिवशी नेहमीच्या फाईल बघत असताना शिपायाने निरोप दिला, ‘‘तुम्हाला मॅनेजर साहेबांनी बोलावले आहे.’’

‘‘या, रिया मॅडम. तुम्हाला कामाबद्दल काही सुचना द्यायच्या आहेत. आज तुम्हाला या कंपनीत येऊन किती दिवस झाले?’’

‘‘का, काय झाले सर? माझे काही चुकले का?’’

‘‘चुकले असे नाही म्हणता येणार. पण तुम्ही तुमच्या कामाची गती वाढवा आणि हो, या ठिकाणी आपण काम करण्याचा पगार घेतो, गप्पा मारण्याचा नव्हे. यापुढे लक्षात ठेवा, या आता.’’

रिया खुपच दुखावली गेली. खरंतर मॅनेजर साहेब कधीही तिच्याशी या पद्धतीने बोलले नव्हते. पण ती काहीच बोलू शकली नाही. ती तिच्या जागेवर परत आली.

थोडयाच वेळात शिपायाने तिच्या विभागाच्या सर्व फायली तिच्याकडे दिल्या ‘‘यात ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्या आजच्या आजच पूर्ण करून घ्या असे साहेबांनी सांगितले आहे.’’

‘‘पण हे काम एकाच दिवसात कसे पूर्ण होईल.’’

‘‘ते मला माहिती नाही. पण मोठया साहेबांनी असेच सांगितले आहे.’’

‘‘मोठे साहेब….?’’

‘‘अहो मॅडम, मोठे साहेब म्हणजे आपले आर. जे. साहेब, तुम्हाला माहिती नाही का?’’

आता रियाला सर्व परिस्थिती लक्षात आली. तिने केलेल्या कामात आर. जे. सरांनी चूका काढल्या होत्या. खरंतर ती अजून त्यांना भेटलीसुद्धा नव्हती. मग ते असे का वागत होते हा प्रश्न रियाला सतावत होता.

तिने मनातील सर्व विचार झटकले आणि कामाला सुरुवात केली. ऑफिसची वेळ संपत आली तरी रियाचे काम सुरूच होते. तिने एकदा मॅनेजर साहेबांना विचारले, पण त्यांनी काम आजच पूर्ण करावे अशी सक्त ताकीद दिली. बाकी सर्व स्टाफ घरी निघून गेला होता. आता ऑफिसमध्ये फक्त रिया, शिपाई आणि आर. जे. सरांच्या केबिनचा लाईट सुरू होता म्हणजे तेसुद्धा ऑफिसमध्ये होते. काम पूर्ण करत रियाला बराच वेळ झाला.

त्या दिवसानंतर रियाला जवळ जवळ प्रत्येकच दिवशी जास्तीचे काम करावे लागत होते. तिची सहनशीलता संपत होती. तिने एके दिवशी निश्चय केला, ‘आज जर मला नेहमीप्रमाणे जादा काम मिळाले तर सरळ आर. जे. सरांना भेटायचे.’ आणि झालेही तसेच. तिला आजही कामासाठी थांबावे लागणार होते. तिने काम थांबवले व ती आर. जे. सरांच्या केबीनकडे जाऊ लागली. शिपायाने तिला अडवले, पण ती सरळ केबिनमध्ये शिरली.

‘‘सॉरी सर, मी तुमची परवानगी न घेता तुम्हाला भेटायला आले. पण आपण मला सांगू शकाल का नक्की माझे कोणते काम तुम्हाला चुकीचे वाटते? नक्की मी कुठे चुकत आहे? ते एकदाचे सांगून टाका म्हणजे मी त्याप्रमाणे वागत जाईन पण…वारंवार…असे….’’

रियाचे पुढील शब्द तोंडातच राहिले. कारण रिया केबीनमध्ये आली, तेव्हा आर. जे. सर खुर्चीवर पाठमोरे बसले होते. त्यांनी सुरूवातीचे रियाचे वाक्य ऐकून घेतले व त्यांची खुर्ची आता रियाकडे वळली.

‘‘सर…. तुम्ही….तू….. राज… कसे शक्य आहे?…तू इथे कसा?…’’ रियाला आश्चर्या मोठा धक्काच बसला. ती आता तिथेच कोसळून पडेल असे तिला वाटत होते.

‘‘ हं बोला रिया मॅडम, काय अडचण आहे तुम्हाला?’’ राजच्या या रुक्ष प्रश्नाने ती भानावर आली व काही न बोलता केबिनच्या बाहेर निघून गेली. तिचा भूतकाळ असा अचानक तिच्यासमोर येईल अशी तिने कल्पनाही केली नव्हती.

आर. जे. सर म्हणजे दुसरे कोणी नसून तिचा खूपच जवळचा मित्र राज होता. त्या मैत्रीच्या नात्यात प्रेमाचे धागे कधी विणले गेले हे दोघांच्याही लक्षात आले नाही. रियाला कॉलेजातील पहिला दिवस आठवला. कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळच सिनिअर मुलांच्या टोळक्याने तिला अडवले.

‘‘या मॅडम, कुठे चाललात? कॉलेजातील प्रत्येक नवीन विद्यार्थाने आपली ओळख करून द्यायची असते मगच पुढे जायचे.’’

रिया प्रथमच तिच्या गावातून शिक्षणासाठी इथे शहरात आली होती आणि आल्याआल्या कॉलेजमधील या प्रसंगाला सामोरं जाताना ती खुपच घाबरून गेली.

‘‘अरे हिरो ,तू कुठे चालला? तुला दिसत नाही इथे ओळख परेड सुरू आहे. चल, असे कर या मॅडम जरा जास्तच घाबरलेल्या दिसत आहेत. तू त्यांना प्रपोज कर म्हणजे त्यांचीही भीती जाईल.’’

नुकताच आलेला तरुण या प्रसंगाने थोडाही बावरला नाही. त्याने लगेच रियाकडे पाहिले. एक स्मितहास्य दिले व म्हणाला. ‘‘हाय…मी राज…घाबरू नकोस. बडे बडे शहरो में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं.’’ राजच्या या फिल्मी स्टाईलचे रियालाही हसू आले.

‘‘आज आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. या वर्षा ऋतूच्या साक्षीने माझ्या मैत्रीचा स्वीकार करशील.’’ रियाच्या तोंडून अनपेक्षितपणे होकार कधी आला हे तिलाही समजले नाही. पण तिच्या होकाराबरोबर सिनिअर टोळक्याने एकच जल्लोष केला.

‘‘वाह, क्या बात है! खरा हिरो शोभतोस. तुझ्याकडून प्रेमाचे धडे घ्यावे लागतील.’’

‘‘नक्कीच, केव्हाही…

रियाकडे एक कटाक्ष टाकून राज केव्हा कॉलेजच्या गर्दीत नाहीसा झाला हे तिच्या लक्षातच आले नाही. एका कॉलेजात, एका वर्गात असल्याने त्यांची वारंवार भेट होत असे. राज हा त्याच्या स्वभावामुळे सर्वांमध्ये प्रिय होता. कॉलेजातील सर्व मुली त्याच्याशी बोलण्यासाठी झुरत. पण राज मात्र दुसऱ्याच नात्यात अडकत होता. ते नाते होते रियाबरोबर जुळलेले अबोल नाते. तिचा शांत स्वभाव, तिचे निरागस रूप ज्याला शहरीपणाचा जराही लवलेश नव्हता. तिचे हेच वेगळेपण राजला तिच्याकडे ओढत होते.

एके दिवशी दोघे जण कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलेले होते, तेव्हा राजने विषय काढला, ‘‘रिया तू किती वेगळी आहेस ना! आपल्या कॉलेजचे तिसरे वर्षे सुरू झाले. पण तुला इथले लटके फटके अजूनही जमत नाही…’’

‘‘मी आहे तशीच चांगली आहे. शिवाय मी कॉलेजला शिकण्यासाठी आले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मला नोकरी करून माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांनी माझ्यासाठी खुपच कष्ट घेतले आहेत.’’

रियाचे बोलणे ऐकून राजला तिच्याबद्दल प्रेमाबरोबरच आदरही वाटू लागला. तिसऱ्या वर्षाच्या शेवटच्या पेपरला राजने रियाला सांगितले, ‘‘मला तुला महत्त्वाचे सांगायचे आहे. संध्याकाळी भेटू या.’’ खरंतर त्याचे डोळेच सर्व सांगत होते. रियासुद्धा या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. ती त्याच आनंदात होस्टेलला आली पण तेवढयात मेट्रनने सांगितले, ‘‘तुझ्या घरून फोन होता. तुला तातडीने घरी बोलवले आहे.’’

रियाने लगेच बॅग भरली व गावाकडे निघाली. घरी काय झाले असेल या विचाराने तिला हैराण केले होते. या सर्व गोष्टीत ती राजबद्दल विसरूनच गेली. घरी गेल्यावर समोर वडिलांचे प्रेत, त्या आघाताने बेशुद्ध पडलेली आई आणि रडणारा लहान भाऊ. नक्की कोणाला धीर देऊ, स्वत:च्या भावनांना कसे सांभाळू हेच तिला समजत नव्हते. एका अपघातात तिचे वडील जागच्या जागी वारले होते. तिच मोठी असल्याने तिने स्वत:च्या भावना गोठवून टाकल्या व पुढचे सर्व सोपस्कार पार पाडले.

या प्रसंगानंतर तिने शिक्षण अर्ध्यावरच सोडले आणि लहानशी नोकरी पत्करून घराची जबाबदारी घेतली.

इकडे राज मात्र पूर्ण बिथरून गेला. तो पूर्ण रात्र रियाची वाट बघत होता. पण ती आलीच नाही. त्याने कॉलेज होस्टेलमध्ये सगळीकडे तपास केला, पण त्याला तिचा काहीच पत्ता लागला नाही. रियानेच तशी सोय करून ठेवली होती. तिला राजवर ओझे बनायचे नव्हते. पण राज यापासून अनभिज्ञ होता. तो खुपच दुखावला गेला असल्याने त्यानेही ते कॉलेज सोडले. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला निघून गेला.

‘‘मॅडम, तुमचे काम झाले का? मला ऑफिस बंद करायचे आहे. मोठे साहेबही गेले केव्हाचे…’’

‘‘शिपायाच्या बोलण्याने रिया वर्तमानात आली. तिने सर्व आवरले व घरी निघाली. तिच्या मनात तोच विचार सुरू होता, ‘मी राजचा गैरसमज कसा दूर करू? त्याला माझे म्हणणे पटेल का? ही नोकरी नाही सोडता येणार… काय करावे…’ या विचारातच तिने पूर्ण रात्र जागून काढली.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अंजलीने रियाला रिसेप्शनवरच हटकले, ‘‘काय गं रिया…काय झाले? तुझे डोळे असे का दिसत आहेत? बरी आहेस ना..’’

‘‘काही नाही गं, थोडा थकवा आला आहे, बस्स. तू सांग आजचे काय शेड्युल?..’’

‘‘अगं, आपल्या कंपनीला ते मोठे प्रोजेक्ट मिळाले ना म्हणून उद्या सर्व स्टाफसाठी आर. जे. सरांनी पार्टी ठेवली आहे. प्रत्येकाला त्या पार्टीत यावेच लागेल.’’

‘‘हो…येईन ना…’’

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ठरलेल्या वेळी पार्टी सुरू झाली. रिया फक्त हजेरी लावून लगेच निघणार होती. राजचे पूर्ण लक्ष रियाकडे होते, तेवढयात त्याला एक परिचित आवाज आला.

‘‘हाय राज…तू इकडे कसा? किती दिवसांनी भेटलास तू …आहे अगदी तसाच आहे. पण तुझे नेहमीचे हसू कोठे आहे…?’’

‘‘अगं ,हो…हो…किती प्रश्न विचारशील. स्नेहल तूसुद्धा नाही बदललीस गं. कॉलेजला होतीस तशीच आहेस. प्रश्नांची खाण… तू मला सांग तू इथे कशी…?’’

‘‘अरे, मी माझ्या पतीसोबत आली आहे. आज त्यांच्या आर. जे. सरांनी सर्व स्टाफला कुटुंबासोबत बोलवले होते. म्हणून मी आले. तू कोणासोबत आला आहेस?’’

‘‘मी एकटाच आलो आहे. मीच आहे तुझ्या पतिचा आर.जे. सर.’’

‘‘काय सांगतोस राज, तू तर मला आश्चर्याचा धक्काच दिला. अरे हो, आता आठवले…रियासुद्धा याच कंपनीत आहे ना. तुमचे सर्व गैरसमज दूर झाले तर…’’

‘‘गैरसमज, कोणता गैरसमज…?’’

‘‘अरे रिया अचानक कॉलेज सोडून का गेली, तिच्या वडिलांचा अपघातात झालेला मृत्यू ,हे सर्व..’’

‘‘काय.. मला हे माहितीच नाही.’’

स्नेहल रिया व राजची कॉलेजमधील मैत्रीण होती. ती त्या दोघांमधील मैत्री, प्रेम, दुरावा या सर्व प्रसंगांची साक्षीदार होती, पण तिला नंतर रियाबद्दल सर्व समजले. तिने ते राजला सांगितले.

राजला ते ऐकून खुप वाईट वाटले. आपण रियाबद्दल किती गैरसमज करून घेतला. खरंतर तिची यात काहीच चूक नव्हती. त्याची नजर पार्टीत रियाला शोधू लागली. पण ती तोपर्यंत निघून गेली होती.

तो तिला शोधण्यासाठी बस स्टॉपकडे पळाला.

पावसाळयाचे दिवस असल्याने रिया एका झाडाच्या आडोश्याला उभी होती. त्याने दुरूनच तिला आवाज दिला

‘‘रिया….रिया…..’’

‘‘काय झाले सर? तुम्ही इथे का आलात? तुमचे काही काम होते का?’’

‘‘नाही गं, सर नको म्हणू. मी तुझा पूर्वीचा राजच आहे. मला आताच स्नेहलकडून सर्व समजले. मला माफ कर रिया…’’

‘‘नाही नाही, राज तुझी यात कोणतीही चूक नाही. ती परिस्थितीच तशी होती.’’

‘‘रिया, आज पुन्हा या वर्षा ऋतूच्या साक्षीने मी तुला विचारतो…माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का?’’

रियाच्या आनंदाअश्रूंनी राजला त्याचे उत्तर दिले.

आणि राजने तिला आपल्या मिठीत घेतले. त्यांच्या या मिलनाला पावसानेही साथ दिली. त्या पावसाच्या धारांमध्ये त्यांच्यामधील दुरावा, गैरसमज अलगद वाहून गेला.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें