बहुरुपी

कथा * रीता कोल्हटकर

एका आर्ट गॅलरीत माझी आणि हर्षची पहिली भेट झाली होती. पाच मिनिटाच्या त्या ओझरत्या भेटीत बिझनेस कार्ड, व्हिजिटिंग कार्डची देवाण घेवाण झाली होती.

‘‘माझी स्वत:ची वेबसाइट आहे. त्यावर मी माझ्या सर्व पेंटिग्जचे फोटो टाकले आहेत. त्यांच्या किमती सकट.’’ बिझनेस कार्डच्या वेबसाइटच्या लिंकवर बोट ठेवत मी म्हटलं.

‘‘अरे व्वा! मी नक्की तुमची सर्व पेंटिग्ज बघतो. त्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवून फिडबॅकसुद्धा देतो. आर्ट गॅलरीत तर मी इतकी वर्षं जातोय, पण तुमच्यासारखी कलाकार मात्र कधी भेटलीच नाही. युवर एव्हरी पेंटिंग्ज इज सेईंग थाउजंड वर्ड्स,’’ माझ्या पेंटिग्जकडे निरखून बघत हर्ष म्हणाला.

‘‘हर्ष, तुम्हाला भेटून खरंच खूप हर्ष झालाय मला. स्टे इन टच.’’ मी त्यावेळी खूपच उत्साहित होऊन म्हटलं होतं. त्या छोट्याशा भेटीत मला तो ‘कलेचा पुजारी’ वाटला होता. अद्वितीय वाटला होता.

प्रत्यक्षात आमची भेट पाचच मिनिटं झाली होती, पण त्या आधी अर्धा तास मी दुरून त्याच्यावर लक्ष ठेवून होते. तो प्रत्येक पेंटिंगपाशी थांबून निरीक्षण करत होता. त्याच्या जवळच्या छोट्याशा डायरीत काही नोंदी करत होता.

‘‘नक्कीच हा कुणी तरी कलेतला दर्दी दिसतोय. कलेची पारख आहे याला.’’ माझ्या मनानं कौल दिला.

हर्षची भेट होऊन सहा महिने उलटले होते. या काळात त्यानं किंवा मी, एकमेकांना कधीच फोन वगैरेही केला नाही. माझ्या वेबसाइटवरून माझ्या पेंटिग्जची विक्री होत नव्हती. मी पेंटिग्ज विकली जावीत म्हणून खूप प्रयत्न करत होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या वेबसाइटची लिंक पोहोचावी असा माझा प्रयत्न होता. लोक मला ओळखतात, कमी ओळखतत किंवा जास्त ओळखतात हा मुद्दाच नव्हता. पण मला कलेचा क्षेत्रात नाव अन् पैसा मिळवायचाच आहे हा ध्यास होता. तेच माझं ध्येय, तेच माझं लक्ष होतं. शेवटी एक दिवस मी हर्षला एक मेसेज पाठवलाच.

त्यानं लगेच रिस्पॉन्सही दिला. ‘‘आज माझ्याबरोबर कॉफी घ्यायला आवडेल का?’’

मी चकितच झाले. पाच मिनिटांच्या भेटीनंतर सहा महिने अगदी अलिप्त असलेला हा माणूस मी एक मेसेज काय टाकला तर सरळ एकत्र कॉफी घेऊयात म्हणतोय?

‘‘विचित्रच दिसतोय,’’ मी जरा रागातच मनातल्या मनात म्हटलं अन् त्याच्या विचारण्यावर काही उत्तरही दिलं नाही. चार दिवसांनी माझ्या पेंटिग्जचं प्रदर्शन भरणार होतं, मी त्या कामांत गुंतले अन् नंतर हर्षला पार विसरले, आपल्या प्रयत्नांच्या बळावर आपली कला आणि आपल्यातला कलाकार सिद्ध करण्यावर मी भर दिला होता. काही दिवस मधे गेले अन् त्याचा फोन आला. ‘‘एक कप कॉफी घ्यायला माझ्याबरोबर, वेळ आहे का?’’

‘‘तू मला ओळखत नाहीस, मी तुला ओळखत नाही, अशावेळी ही कॉफी एकत्र घेण्याची बळजबरी का? एक मेसेज तुला टाकला याचा अर्थ मी रिकामटेकडी आहे अन् तुझ्याबरोबर टाइमपास करू शकते असा गैरसमज करून घेऊ नकोस,’’ मी स्पष्टच सांगितलं.

‘‘मी तुझी कला, त्यातली खोली आणि गांभीर्य समजून घेतलंय. त्या प्रवासातच मला तू ही समजली आहेस. जग जेवढा मान एम एफ हुसेनला देतंय तेवढाच मान मी तुला देतो आहे. पहिल्यांदाच जेव्हा तुझं नाव मी माझ्या मोबाइलमध्ये सेव्ह केलं तेव्हा त्यापुढे पेंटर सफिक्स असं लिहिलंय. तू स्वत: विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस. पण एक दिवस कलेच्या क्षेत्रात तू एम एफ हुसेनच्याही पुढे जाशील…राहता राहिली बाब एकमेकांना ओळखण्याची तर ती ओळख वाढवली तरच वाढेल ना?’’

स्वत:चं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही? हर्षच्या शब्दांनी मी ही सुखावले. त्याच्याकडून स्वत:ची प्रशंसा ऐकायला मला आवडू लागलं. त्या नादात मी तासन् तास फोनवर त्याच्याशी बोलू लागले. प्रत्येकवेळी तो माझा, माझ्या पेंटिग्जची, माझ्या कलेची इतकी प्रशंसा करायचा की माझ्या स्वप्नांना पंख फुटू लागले. मनांतल्या मातीत पडून असलेल्या पैसा, मान्यता, लोकप्रियतेच्या बियांना कोंब फुटू लागले.

‘‘मी किती मानतो हे तुला कळायचं नाही. हिंदुस्थानातल्या सव्वा कोटी लोकांनी मिळून जेवढं कुणाचं कौतुक केलं असतं, तेवढं मी एकटा करतोय तुझं कौतुक. महिने उलटले तुला एक कप कॉफी घ्यायला ये म्हणतोय, एवढं बोलल्यावर तर एखादा दगडही विरघळला असता.’’ एक दिवस हर्षचा फोन आला.

मी अर्थात्च दगड नव्हते. मी विरघळले यात नवल ते काय? पहिल्या भेटीनंतर आम्ही वरचेवर अन् पुन्हापुन्हा भेटू लागलो. ओळखीचं रूपांतर दाट मैत्रीत झालं होतं. अशाच एका भेटीत त्यानं सांगितलं की त्याचं लग्न झालेलं आहे. एक मुलगी आहे तीन वर्षांची. बायकोचं नाव मीनाक्षी, ती युनिव्हर्सिटीत संस्कृतची लेक्चरर आहे. तो स्वत: काहीच काम करत नाही.

‘‘मला काही करायची गरजच काय? माझ्या एम.एल.ए. बापानं रग्गड कमवून ठेवलंय. पुढल्यावेळी मलाही एम.एल.ए.चे तिकिट मिळतंय. चार दोनशे रुपयांच्या नोकरीत काही अर्थच नाही.’’ अत्यंत दर्पानं हर्ष बोलला.

मुळात तरुण मुलाचं काहीही न करणं अन् एवढा दर्प मला सहन न होणाऱ्यापलीकडलं. पण मला त्याक्षणी ते फारसं खटकलं नाही…मी बहुधा त्याच्या प्रेमात होते. तरीही मी विचारलंच.

‘‘नोकरी करण्यात अर्थ नाही तर मीनाक्षीसारखी नोकरी करणारी बायको कशी काय केलीस?’’

‘‘मूर्ख आहे ती. आपलच म्हणणं रेटत असते. लग्नापूर्वी तिनं अन् तिच्या घरच्यांनी कबूल केलं होतं की ती नोकरी सोडेल…पण लग्नानंतर ती बदलली. हटून बसली. नोकरी सोडणार नाही म्हणून. करतेय काकूबाई

नोकरी…एमएलएच्या कुटुंबात कसं राहायचं हे तिला अजूनदेखील कळलेलं नाही.’’ हर्षच्या चेहऱ्यावर दर्प अन् बोलण्यात सामान्य व्यक्तींबद्दलचा तिरस्कार ओसंडून जात होता.

त्याचं बोलणं ऐकून मी हतप्रभ झाले. माझं अंतर्मन मला सावध करत होतं की मी एका वाईट माणसासोबत आहे. हा माणूस चांगला, सभ्य, सज्जन नाही. तरीही माझ्या नकळत मी त्याच्यासोबत वाहवत जात होते. तो माझं कौतुक करत होता, सतत माझी प्रशंसा करत होता. आपल्या एम.एल.ए. वडिलांच्या नावाचा वापर करून मला खूप मोठ्या प्रदर्शनात पेंटिग्ज लावण्याचं प्रॉमिस करत होता. मलाही वेडीला ते सर्व खरं वाटत होतं. त्याचे एम.एल.ए. वडील मला माझं ध्येय गाठायला मदत करतील अशी वेडी आशा मी बाळगून होते. माझ्या मनातल्या प्रसिद्धी, पैसा मिळवण्याच्या दिव्याला त्यामुळे तेल मिळत होतं. त्या मिणमिणणाऱ्या उजेडात हर्षच्या खोटेपणाचा काळोख मला धडसा दिसतच नव्हता.

‘‘तू माझ्यासाठी मंदिरातल्या मूर्तीसारखी आहेस. मी काय म्हणतो तेवढं फक्त ऐकत जा. त्याहून जास्त माझ्या प्रेमात पडू नकोस. कारण मी विवाहित आहे. अन् एकदा तुला तुझ्या यशाच्या शिखरावर पोहोचवलं की तुझा माझा संबंध संपला.’’ त्यानं स्पष्टच सांगितलं.

‘‘तू विवाहित आहेस हे मला ठाऊक आहे. मलाही तू माझ्याशी लग्न करावं ही अपेक्षा नाहीए. पण मला एक कळत नाहीए की जर या वाटेवर आपण पुढे जाणार नाही आहोत तर आपण विनाकारणच का भेटतो आहोत?’’

‘‘पूजा करतो मी तुझी. तुला यशाच्या शिखरावर पोहोचलेलं बघायचंय मला. मला तुझ्याकडून काहीही नकोय. पण मी तुझा मित्र आहे. तुला प्रोत्साहन देतोय. पुढल्या वर्षी थायलंडला होणाऱ्या पेंटिग्जच्या प्रदर्शनात तुला ललित कला अकादमीची स्कॉलरशिप मिळवून देणार आहे. माझ्या वडिलांचे मोठमोठ्या लोकांशी कॉण्टेक्ट आहेत. त्यामुळे मलाच हे शक्य आहे. तुझी दोन तीन इंटरनॅशनल एक्द्ब्रिबिशन्स झाली की तुला प्रसिद्धी मिळायला वेळ लागणार नाही.’’

हे असं ऐकलं की माझं मन भरून यायचं. खूप छान वाटायचं. वाटायचं की मी प्रसिद्ध होईन, न होईन पण माझं एवढं कौतुक करणारा प्रशंसक आहे हे भाग्य तरी कमी आहे का? करतोय बिच्चारा माझ्यासाठी प्रयत्न. आता आम्ही रोजच भेटत होतो. पण हर्षची वृत्ती हल्ली बदलली होती. हल्ली तो अंगचटीला येऊ बघायचा. पूजा, मंदिरातली मूर्ती वगैरे न बोलता हल्ली त्याच्या डोळ्यात काही वेगळंच दिसत होतं.

‘‘एक मागू का तुझ्याकडे?’’

‘‘काय?’’

‘‘मी तुला मिठीत घेऊ शकतो?’’

‘‘अजिबात नाही…’’

‘‘फक्त एकदाच! प्लीज…मला काय वाटतं ठाऊक आहे?’’

‘‘काय?’’

‘‘मला असं वाटतं की मी तुला मिठीत घ्यावं अन् काळ तिथंच थांबावा…तुला वेडीला खरंच कल्पना नाहीए की मी तुला किती मानतो…किती किंमत आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल. एवढा मान कोणताही पुरूष कुठल्याही स्त्रीला देणार नाही…’’

अन् मी सरळ त्याच्या बाहुपाशात शिरले. ‘‘पूजा करतो तुझी. तुला उंच आकाशात विहरताना बघायचं मला.’’ माझ्या केसांतून बोटं फिरवत तो पुन्हा:पुन्हा तेच बोलत होता.

‘‘हर्ष, प्लीज, मला घरी जाऊ देत. उद्यापर्यंत एकदोन पेंटिग्ज पूर्ण करायची आहेत.’’

‘‘ठिक आहे. लवकरच भेटतो. या आठवड्यात संधी मिळताच वडिलांशी बोलून तुला ललित कला अकाडमीची स्कॉलरशिप मिळवून देतो.’’

काही दिवसानंतर आम्ही दोघं आमच्या नेहमीच्या रेस्ट्रॉरंन्टमध्ये समोरासमोर बसलो होतो. डिनर संपेपर्यंत रात्र झाली होती. गेले काही दिवस सतत पाऊस होता. आज दिवसभर सोनेरी उन्हानं दिवस प्रसन्न वाटला होता. हर्षनं जवळच्याच बागेत फिरून थोडे पाय मोकळे करण्याबद्दल सुचवलं. हवा खरोखर फार छान होती. मीही आढेवेढे न घेता होकार दिला.

‘‘जरा तिकडे बघ, काय चाललंय तिथं?’’ पार्कातल्या एका कोपऱ्यात झाडात दडलेल्या कबुतरांच्या जोडीकडे बोट दाखवत म्हटलं.

‘‘कुठ काय आहे? काहीच नाही…’’ मी मुद्दाम तिकडे दुर्लक्ष करत म्हटलं.

‘‘असं बघ, प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. कोणताही जीव ही भावना नाकारू शकत नाही. मग आपणच त्यापासून दूर का राहावं?’’ माझ्याकडे गुढपणं बघत हर्षनं म्हटलं.

‘‘हर्ष, काय बोलायचंय ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलू नकोस.’’

‘‘बोलायचं काय? मी विवाहित आहे हे तुला ठाऊक आहे. सगळ्या शहरात माझ्या वडिलांचा दबदबा आहे. त्यामुळेच मी या मार्गावर तुझ्याबरोबर फार काळ राहू शकत नाही. पण जी प्रगाढ मैत्री आपल्या दोघांमध्ये आहे, ती मैत्री मला एवढा अधिकार तर नक्कीच देते की मी कधीतरी तुला किस करू शकतो…खरं ना? अन् वावगं काय आहे? प्रेम ही तर सर्व कालिक, सर्वव्यापी भावना आहे.’’

मी काही प्रतिक्रिया देणार, काही बोलणार, त्या पूर्वीच त्यानं मला पटकन् एका झाडाआड ओढलं अन् माझ्या ओठांवर स्वत:चे ओठ ठेवले. एक दिर्घ चुबंन घेऊन तो म्हणाला, ‘‘बघ तू, एक दिवस जगातल्या सर्वश्रेष्ठ चित्रकारांमध्ये तुझी गणना होईल. जगातल्या ख्यातनाम आर्ट गॅलरीत तुझी चित्र मांडलेली असतील. गेले काही महिने माझे पपा फार कामात होते, त्यामुळे तुझ्या स्कॉलरशिपसाठी मला बोलता आलं नाही. पण आज घरी गेलो की आधी हाच विषय काढतो.’’

काही क्षणांच्या या अनैच्छिक जवळकीनंतर त्यानं मला मिठीतून मुक्त केलं अन् तेच जुनं दळणं पुन्हा तो दळू लागला.

मीही मूर्खासारखी मान डोलावली. जणू मी त्याच्या हातातली कठपुतळी होते.

‘‘रिलॅक्स डार्लिंग, लवकरच तू एमएफ हुसेनच्या बरोबरीनं उभी राहशील…चल, मी तुला तुझ्या फ्लॅटवर सोडतो. मग मी माझ्या घरी जाईन.’’ कारचा दरवाजा माझ्यासाठी उघडत हर्षनं म्हटलं.

घरी पोचेतो बरीच रात्र झाली होती. बाहेरूनच हर्षनं ‘गुडबाय’ केलं. मी मात्र खूपच सैरभैर झाले होते. खूप अस्वस्थ, बेचैन वाटत होतं. कळत नकळत मी अशा एका वाटेवर पोहोचले होते, जिथून मला काही म्हणता काही मिळणार नव्हतं, मिळवता येणार नव्हतं. दूरवर नजर टाकली तरी काहीही दिसत नव्हतं. माझं ध्येय, माझं लक्ष्य…काहीच दृष्टीपथात नव्हतं. माझ्या लक्षात आलं होतं की मी एका भूलभुलैय्यात अडकले होते. माझ्या नशिबात नेमकं काय होतं? ही माझी नियती होती की माझाच मूर्खपणा? मी हर्षच्या प्रेमात वेडी झाले होते की त्याच्या एमएलए वडिलांच्या मोठेपणाची मला भुरळ पडली होती?

प्रश्नांची भेंडोळी डोक्यात गरगरत होती. माझी अन् हर्षची ओळख होऊन एव्हाना दोन वर्षं झाली होती. तो खरोखर मला देवी मानून माझी पूजा करत होता? ही कसली पूजा? त्याला खरोखर वाटतंय का की मी एक महान पेंटर होईन? खराखुरा मित्र म्हणून तो मला मदत करतो. का? गेल्या दोन वर्षांत त्यानं माझं काय भलं केलंय? माझं नाव व्हावं, मला पैसा मिळावा म्हणून त्यानं काय प्रयत्न केलेत?

विचार करता करताच कधीतरी मला झोप लागली. पण सकाळी जागी झाले तरी तेच प्रश्न पुन्हा:पुन्हा फणा काढून समोर येत होते. त्यांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. त्याच क्षणी मला लक्षात आलं की गेली दोन वर्षं मी हर्षमध्ये इतकी गुंतले होते की इतर मित्रमैत्रीणींना पूर्णपणे दुरावले होते. मला एकदम माझ्या जुन्या दोस्त मंडळींची तीव्रतेने आठवण झाली. निदान श्रेयाकडे जाऊन यावं असा विचार करून मी भराभर आवरलं अन् निघालेच!

‘‘इतके दिवस कुठं ग दडून बसली होतीस? किती आठवण यायची तुझी? काहीच पत्ता नव्हता तुझा.’’ श्रेयाच्या आईनं मायेनं जवळ घेतलं, तेव्हा नकळत माझे डोळे भरून आले.

‘‘काही नाही मावशी, एक दोन मोठे प्रोजेक्ट होतं. पेंटिग्ज करण्यातच गुंतले होते, पण मलाही तुमची फार आठवण यायची.’’ मी म्हणाले.

मला पुन्हा जवळ घेत मावशी म्हणाली, ‘‘ठिक आहे, आता आलीस हे ही छान केलंस, काय घेतेस? चहा की कॉफी? की खायला करू काहीतरी?’’

‘‘ ते नंतर, आधी सांगा, श्रेया कुठाय? दिसत नाहीए घरात?’’

‘‘श्रेया येईलच! तुझं खाणंपिणं आटोपतंय तोवर तीही येईलच की! आज तिच्या सतार वादनाचा कार्यक्रम आहे. खूप दिवस ती मेहनत करत होती, या कार्यक्रमामुळे तिला बराच फायदा होईल असं म्हणत होती. भलं व्हावं पोरीचं…’’ बोलता बोलता मावशी भावनाविवश झाल्या.

मला मनातल्या मनात लाज वाटत होती. माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या आयुष्यातल्या एवढ्या महत्त्वाच्या प्रसंगी मी नसावं, मला त्याची माहितीही नसावी? इतका दुरावा आमच्यात कधी निर्माण झाला?

मावशींशी बोलता बोलता तासभर कधी संपला ते कळलंच नाही. दाराची घंटी वाजली. मावशीनं दार उघडताच एखाद्या वादळासारखी श्रेया घरात शिरली अन् तिने आईला मिठीच मारली. आनंदानं तिचा चेहरा केवढा उजळला होता. सर्वांगावर जणू तेज आलं होतं.

‘‘आई, अगं आज ना कार्यक्रम खूपच छान द्ब्राला.’’ आनंदानं चित्कारत होती श्रेया. ‘‘अगं आपले एमएलए साहेब सहकुटुंब कार्यक्रमाला आले होते. तेच आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट होते. कार्यक्रमानंतर त्यांचा मुलगा मला मुद्दाम भेटायला आला. हर्ष नाव आहे त्याचं. अगं, त्यानं माझ्या सतार वादनाचं केवढं कौतुक केलं.’’ म्हणाला, ‘‘युवर म्युझिक इज द फुड फॉर द सोल.’’ मला म्हणाला, ‘‘एक दिवस तू रवीशंकरांसारखीच ख्यातर्कीती सतार वादक होशील.’’ मला त्यानं प्रॉमिस केलंय, तो मला संगीत अकाडमीची स्कॉरलरशिप मिळवून देणार आहे.’’

श्रेयाचं माझ्याकडे लक्षच गेलेलं नव्हतं. ती तिच्याच नादात होती. पण हर्ष आणि त्याचं बोलणं मला आमच्या पहिल्या भेटीची आठवण करून देत होतं. त्या हलकटानं आता श्रेयाचा मासा जाळ्यात ओढला होता. माझं अवसानंच गळालं. स्वत:च्या भावनांना आवर घालणं अवघड झालं. मला आता ताबडतोब घरी जायचं होतं. मला कुणालाही काही सांगायचं, विचारयचं नव्हतं. आता मला गेल्या दोन वर्षांतल्या माझ्या आणि हर्षच्या मैत्रीचा शेवट करायचा होता.

तेवढ्यात श्रेयाचं लक्ष माझ्याकडे गेलं. तिनं धावत येऊन मला मिठी मारली.

‘‘श्रेया, अगं मला बरं वाटत नाहीए…मी तुला नंतर भेटते. आता मला घरी जाऊ दे…’’ मी श्रेयाचा चेहरा माझ्या दोन्ही हातांच्या ओंजलीत घेऊन तिचे लाड केले. माझा आवाज खोल गेला होता.

‘‘अगं, खरंच, किती वेल आणि थकलेली वाटते आहेत तू? मी येऊ का तुला घरी सोडायला?’’ श्रेया मनापासून म्हणाली.

‘‘नको, फक्त रिक्षा मागवून दे…’’

मावशी व श्रेयाचा निरोप घेऊन कशीबशी घरी पोहोचले तोवर संध्याकाळ झाली होती. पण माझ्या मनावर साचलेला काळोख मात्र पूर्णपणे दूर झाला होता. त्या प्रकाशात मला हर्षचं विकृत रूप स्पष्ट दिसत होतं. कसला बहुरूपी होता. सोंग घेणारा बहुरूपी. जो आपल्या सुविद्य पत्नीला मान देत नाही तो इतर स्त्रियांना काय मान देणार? त्याला कलेतलं खरं तर काहीच कळत नाही. पण चांगलं रंग रूप अन् एमएलए बाप याच्या बळावर तो नवोदित कलाकार, तरूणींना आमिषं दाखवत जाळ्यात ओढतो. माझ्यासारख्या मूर्ख मुली फसतात. खरं तर मला कळायला हवं होतं की गेल्या काही वर्षात जे काही नाव मी मिळवलं होतं ते स्वत:च्या मेहनतीवर, जो पैसा मिळवला ती पेंटिग्ज माझ्या बळावर विकली म्हणून. माझी कला, माझी प्रतिभा हेच माझं साधन होतं. कुणा अशिक्षित एमएलएच्या उडाणटप्पू, अकर्मत्य मुलाच्या शिफारसीमुळे नाही.

मुळात माझ्या आणि हर्षच्या कथेची सुरूवातच चूक होती. काळाबरोबर त्यात जे काही अध्याय जोडले जात होते त्यामुळे ती अधिकच बिघडत होती. आता माझ्या मनाच्या आरशावरची धुळ पुसली गेली होती. हर्षचा विद्रुप चेहरा स्पष्ट दिसला होता. तो माझ्या आयुष्यात मला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आलाच नव्हता. पतनाच्या निसरड्या वाटेवर तो मला घेऊन गेला हाता. ही कथा फार सामान्य अन् हीन अभिरूचीची झाली होती. तिची शोकांतिका, विद्रुप शोकांतिका होण्यापूर्वीच तिचा शेवट करायला हवा. त्याचक्षणी श्रेयाला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी काय काय करायचं याचा निर्णय घेतला अन् पुढे हर्षला कधीही न भेटण्याचाही निर्णय घेतला. माझा मोबाइल उचलला अन् त्यावरचा हर्षचा नंबर कायमचा ब्लॉक करून टाकला.

आता मला खूप छान वाटत होतं. स्वत:विषयीची ग्लानी किंवा दयेची भावना आता नव्हती. पूर्ण आत्मविश्वासानं, आत्म तेजानं माझा चेहरा उजळला होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें